मोठ्ठा झाल्यावर..

Submitted by मंदार खरे on 25 December, 2015 - 03:44

एके दिवशी विचारायला देवबाप्पालाच फोन लावला
का रे देतोस ईतकी कामे माझ्या आई बाबाला?
कुडकुड्त्या थंडीत पहाटे लवकर ऊठते आई
सकाळ होण्याआधीच बाबाला कामावर जायची घाई

शाळेमधून येतो तेव्हाही आई कामातच असते
भाजी, आमटी नाही तर कुकरची तयारी असते
त्यातच कधी दांडी मारते आमची कामवाली बाई
मग तर विचारुच नको आमच्या घरची लढाई

बाबाला तर बरेच दिवसात बघितलेच नाही
कधी येतो कधी जातो मला कळतच नाही
कित्येक दिवसात गोष्ट त्याच्याकडून ऐकली नाही
कुशीत त्याच्या शिरुन मस्ती केली नाही

आईशी सुध्दा खेळायला मजा यायची भारी
सापशिडी, पत्ते नाही तर व्यापार कधी तरी
आता मात्र घरी जाताच करते अभ्यासाची तयारी
सांग तीला जरा मोकळे सोड निदान घरी

माहिती आहे तू सुद्धा त्यांचीच बाजू घेणार
माझ्या भल्यासाठी म्हणे त्यांचीच री ओढणार
मोठ्ठा झाल्यावर मी मात्र तसा नाही होणार
अत्तासारखा मोठेपणी पण खुप खुप खेळणार

Group content visibility: 
Public - accessible to all site users