कुणीतरी सांगा त्याला …

Submitted by भुईकमळ on 24 December, 2015 - 04:52

कुणीतरी सांगा त्याला ,रान नि:शब्द हे झाले
धुंद कवितांचे थवे, दूर नभापार गेले ॥ धृ ॥

घेत पाषाण उशाला
नदीपात्र पहुडले ,
शेवाळाच्या पदरात
मासे घुसमटलेले...
कुणीतरी सांगा त्याला ,'झरे वाळुत जिरले..'.॥ १॥

भूईकडे बघतात
घोस मिटल्या कळ्यांचे
अश्रु सुकले ऋतूचे ,
पानांनी या झेललेले
कुणीतरी सांगा त्याला ,'फुलपंख ते झडले' .॥ २॥

पाणकणीस पाहते
तळ्यावर झुकलेले ,
मेघ गुलालात चिंब
जळी बिंब रेंगाळले
कुणीतरी सांगा त्याला , ' तळे भासांनी पेटले '॥३॥

कुठे गुंफेत शिल्पाचे
मंद स्मित भेगाळले ,
कळकीच्या बनातुन
रानवारे विव्हळले
कुणीतरी सांगा त्याला ,'वेळु शापांनी फुलले' … ॥४॥

कधी झुलतील मोर
निळ्या निळ्या कारवीचे
स्वप्न निद्रित रानाचे '
कुण्याकाळी पाहिलेले
कुणीतरी सांगा त्याला,'रान रंगहीन झाले'…॥५॥

धुंद कवितांचे थवे, दूर नभापार गेले ..
......................माणिक वांगडे ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या शब्दकुंचल्याची कला नेहमीप्रमाणे विलोभनीय आहेच.

धृपदात नि:शब्द असा लिहीणार का तो शब्द ?

पहिल्या, दुस-या आणि चौथ्या कडव्यातील शब्दचित्रातून जो निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, त्याला तिसरे कडवे अपवाद ठरतेय असे मला वाटले. माझ्या समजण्यात चूक होऊ शकते याची कल्पना आहे.

धन्यवाद शशांकजी !!!नेहमीच चांगल्या कवितेला फक्त मनातच दाद देऊन न थांबणारया आभाळमनास प्रणाम …कैपोचे सर , खुप धन्यवाद.त्या शब्दातली चुक सुधारली आहे .तिसरया कडव्या बद्दल स्पष्टीकरण नंतर देईन . चालेल ना…
धन्यवाद समाधानी ! सर्व मान्यवरांचे अगदी मनापासून आभार. …

कैपोचे सर , सर्वात आधी धन्यवाद !...यासाठी की तुम्ही आवडलेल्या कवितेबद्दल त्यातल्या खटकलेल्या विसंवादी सूराबद्दल जाणुन घ्यायला उत्सुक आहात.
या संपूर्ण कवितेत कुणाच्यातरी दुराव्यानंतर निसर्गाच्या वेगवेगळ्या खिन्न करडया चित्रछटांतून मनाच्या पातळीवरचेच अदृश्य परिणाम मला रेखाटायचे होते यामधून मनातल्या कोमेजल्या भावनांची बिंबे नुसतीच बाह्य निसर्गात दृश्यमान होत नसुन कुणाच्यातरी आसपास नसण्यानेच एकेकाळी मोहक असलेल्या या चित्राला अवकळा येत गेलीय अशीच मनाची धारणा आहे.
काही कडव्यांत मी निसर्गनियमांचा सुद्धा उपयोग करून घेतलाय , अगदी शेवटच्या कडव्यात अजूनही थोडं आशावादी असलेल्या मनास , हे सर्व चित्र पुनरपि रंगविभोर होईल काय असा प्रश्न पडलाय जो दृष्टीची रंगतृषा अधिकच वाढवत नेत आहे जसे की दरआठ किंवा बारा वर्षानंतर दरयाखोरयातून पसरणारी romanticism च्या उत्कट रंग छटांचा कहर भासणारी जांभुळगर्द फुलांची कारवी . .जेव्हा कधी ती कारवी उमलुन येइल तेव्हाही त्याच्या एकट्याच्या नसण्याने असुनही नसल्यातच जमा आहे अर्थात रान तेव्हाही निरंगीच भासणार आणि जिथे रंगच उरले नाहीत तिथे शब्द ही उरणार नाहीत त्या धुंद प्रेमकवितांचे ....तसेच चवथ्या कडव्यात 'वेळु शापांनी फुलले.' या ओळीत सुद्धा निसर्गनियमाचा वापर केलाय वेळुचे , बांबूचे बन जेव्हा फुलांनी बहरते तेव्हा त्याचा अंत अटळपणे सुरु झालेला असतो . एकमेकांच्या प्रेमात संभाव्य परिणामांची पर्वा न करता अतीव असोशीने नैसर्गिक प्रेरणेने अंतर्बाह्य उमलणे हे सुद्धा तसेच शापांनी फुलण्यासारखेच आहे आता तर .जसं काही सगळ जगणच काष्ठवत… निष्प्राण होत चाललंय त्यातून -असंच काहीसं सुचवायचय.
तिसरया कडव्यात मात्र तुम्ही म्हणता तसे वेगळेच चित्र दिसते . पण त्या ओळींचा अर्थही याच अस्वस्थशा मूड मध्ये घेवून जातो. आपण जेव्हा कधी विमनस्क झाल्या अवस्थेत भोवताली पाहतो तेव्हा आपल्याच आतल्या जगातल्या कृष्णछाया पांघरलेल्या प्रतिमा बाहेर जागोजागी दिसू लागतात ज्याप्रमाणे की पहिल्या ,दुसर्या व चवथ्या कडव्यात दिसतात कधी मात्र दृष्टीवेधक अतिरम्य असं काही दृश्य दिसलं तरी जुने संदर्भ आठवुन डोळे भरून येतात. . तिसरया कडव्यातल पाणकणीस ,ते तळं हे साक्षीदार असतील काही सचैल डुम्बल्या क्षणांचे …. त्या प्रेमी युगुलांचे भिजण ,भिडणे… पेटणे विलगणे जे यांनी कधी पाह्यलंय तेच त्यांना या क्षणी दिसत आहे. प्रतिबिम्बातली ,.सन्ध्येच्या गुल्लाली बाहुपाशात अपार बेभानली मेघाकृती म्हणुन ' तळे भासांनी पेटले '. यातील ' भासांनी' या शब्दाला खूप महत्व आहे कारण आता फक्त भासच उरलेत प्रत्यक्षात काहीच उरलेलं नाही कुणीच कुणाच्या इतक्या समीप नाही की रंगस्पर्शांनी पेटून उठावं ..इथेच हे स्पष्टीकरण थांबवतेय .
सर्व लेखन फारच पाल्हाळिक झालय का ?

सत्यजीत ,बेफिकीरजी खुप धन्यवाद !
पुन्हा एकदा सर्व प्रतिसाद दात्यांची मनापासून आभारी आहे.

sonalisl , प्रतिसादासाठी धन्यवाद!
कैपोचे सर,चालेल सावकाश कधीही लिहा. ....
मनापासुन धन्यवाद ... दिनेशदा !
अवल, धन्यवाद!!! अग ,मीच आभारी आहे तुम्हा सर्वान्ची....

सुंदर !

मुक्तेश्वर कुळकर्णी धन्यवाद! अनमोल दाद दिलीत....
श्यामली ,तुमचा अनपेक्षित प्रतिसाद पाहून खूप छान वाटतंय
चांगल्या कवितेला न विसरता दर्दी दाद देणारया सायु व मनीमोहर यांची देखील अत्यंत आभारी आहे

कामाच्या गडबडीत विसरूनच गेलेले ज्यांची पारदर्शी, चिंतनगर्भ लेखनशैली मला भावलीय त्या मुग्धमानसीचे आभार मानायला …. dhanyavaad...