संकेत - भाग ५

Submitted by मुग्धमानसी on 24 December, 2015 - 02:05

याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
'संकेत' भाग ३ - http://www.maayboli.com/node/56845
'संकेत' भाग ४ - http://www.maayboli.com/node/56884
_____________________________________________

"मॅडम... तुमची तब्येत आज बरी नाहिये का?" ऑफिसला पोचल्या पोचल्या स्वातीनं विचारलं.
काय सांगणार तिला? वाटेत पसरलेले फुटल्या मडक्यांच्या खापरांचे तुकडे चुकवत चालणं किती अवघड असतं ते हिला कसं कळणार?
"अं... नाही... मी बरी आहे. आजचं शेडयूल सांग आणि त्या आधी बाहेर एक कडक चहा सांग माझ्यासाठी. आणि हो... आज फार महत्त्वाच्या अपॉईंटमेंट्स शक्यतो घेऊ नकोस. आधीच घेतल्या असशील तर राहूदेत. नविन घेऊ नकोस."
"ओके मॅडम." स्वाती वळली तशी मी तिला पुन्हा हाक मारली... "स्वाती..."
"येस मॅडम..."
"तू कधी अगदी माझ्यासारखी दिसणारी एखादी व्यक्ती पाहिली आहेस कागं कधी कुठे?"
स्वाती किंचित दचकल्यासारखी वाटली. हा प्रश्न फारच अनपेक्षित होता तिला. ती बावचळून म्हणाली... "न... नाही मॅडम."
"ठीक आहे. जा तू." ती गेली. चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह घेऊन.
मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच कुणाशी बोलत नाही. मला दोन बहिणी आहेत... माझ्याच नाळेतून जन्मलेल्या... हे कुणालाच माहित नव्हतं.
आणि माझ्यासारख्याच दिसत असतील का त्या अजूनही? माझ्या चेहर्‍यावर उमटलेले हे विद्रूप व्रण.. खूणा... त्यांच्याही चेहर्‍यावर उमटल्या असतील?
पण त्या आहेत... कुठेतरी... कुठल्यातरी कोपर्‍यात... सुखरूप आहेत हे माहीत होतं मला. कधीतरी उगाचंच हसू आलं की जाणवायचं कावू मजेत दिसतीये आज... कधीकधी उगाच घाबरायला व्हायचं. मग मी मनातल्या मनात गोदीला समजवायचे... घाबरू नकोस गं... सगळं ठीक होईल.
कधी कधी रात्री अपरात्री मला कामाच्या व्यापानं ताण आला तर आपोआपच मिटलेल्या डोळ्यांना कुठूनतरी गारवा मिळायचा... धीर मिळायचा... कुठूनतरी कावू आणि गोदा सगळी अंतरं कापून माझ्या उशाशी येऊन निजायच्या. आम्ही खूप गप्पाही मारायचो एकमेकांशी... गेली २३ वर्षं आम्हाला ठावूक नव्हता एकमेकींचा पत्ता... तरिही... आम्ही खूप गप्पा मारायचो.
अगदी कावूचा पाय दुखत असेल तरी मला जाणवायचं. पण मी माझा पाय हलके हलके दाबायची. तिकडे कावूला नक्की बरं वाटत असणार....
हे असं अवघड नातं कसं कुणाला कळावं?
पहिल्या पहिल्यांदा बरिच वर्षं अनेकदा रात्री संपूर्ण अंगभर जडजड भार जाणवायचा. विचित्र घुसमट, घाणेरडी वेदना आणि मग स्वतःचीच भयंकर किळस.... खूप त्रास व्हायचा.
मग मी थोडी शांत व्हायचे... उठायचे... डोळे मिटून आबाला आठवायचे. कधी देवाकडे दिवा लावायचे. डोळ्यांतून घळाघळा पाणी वहात रहायचं.... पहाटेपर्यंत....

कावू... गोदा... कुठे आहात गं.....? मी खिडकीबाहेर नजर टाकून आभाळाला प्रश्न केला.... काहीच उत्तर आलं नाही. याच आभाळाखाली आहेत दोघीही... पण कुठे?
_____________________________________________________

तशी मी फार खंबीर आहे. एवढ्या-तेवढ्याने मन:स्वास्थ्य बिघडत नाही माझं. उलट मला ओळखणार्‍या बर्‍याच जणांना मी भावनाशून्य वाटते.
पण आज मी खरोखरच भांबावून गेले आहे. मनःस्थिती ढासळते आहे माझी. माझे काही खरे नाही.
आज पुन्हा दिसली मला ती तीन मडकी आणि तो माणूस.... यावेळेस राखाडी सदरा घातलेला.

पेडणेकरांनी प्रायोजित केलेल्या एका शास्त्रीय संगिताच्या मैफ़िलीला त्यांच्याच निमंत्रणावरून गेले होते. मला शास्त्रीय संगित ऐकायला आवडतं. शांत वाटतं. म्हणून गेले आणि भयंकर अशांत होऊन परतले.
मृदंगम आणि घटम् वादनाची अनोखी जुगलबंदी स्टेजवर रंगली होती. दोघेही वादक प्राण ओतून देहभान विसरून घामाघूम होत वाजवत होते.... ही शेवटचीच संधी असल्याप्रमाणे जणू...
संपूर्ण सभा स्तब्ध, निःशब्द होऊन ऐकत होती. सगळ्या मंडपात सगळ्या अवयवांचे फक्त आणि फक्त कान झाले होते जणू... वाजवणारे चार हात आणि उर्वरीत सगळेच कान!

मीही तो एकेक स्वर टिपून घेत होते आणि त्या नादाची धुंदी दूर कुठेतरी पोहोचवत होते.... तेवढ्यात मला तो दिसला.
राखाडी सदरा घालून दूर एका खुर्चीत बसलेला. त्याची मान एकाही सुराला डोलत नव्हती.
त्याच्या मांडीवर होता एक कागदाचा पुडा.... ज्यात काय आहे हे मला ठावूक होतं....
मी अचानक सून्न झाले. मला काहीही ऐकू येईना. बधीर झाले.
एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला. माझ्या शेजारी बसलेले पेडणेकर उभे राहून टाळ्या वाजवू लागले. नजरेसमोर त्यांच्या स्थूल देहाची भिंत उभी राहिल्यावर मला पलिकडचं काही दिसेना... मीही उठले... पुन्हा माना वळवत नजरेला ’त्या’च्या पर्यंत पोचायला एखादा रस्ता शोधत राहिले. पण तो निघून गेला होता. तेवढ्या काही सेकंदातच.

आणि मलाही समजले... मी आता काय करणार आहे... कावू आणि गोदा आता काय करणार आहेत....
_____________________________________________________

आबा नावाच्या आभाळाला तडा गेला आणि आम्हा तिघी तिळ्या बहिणींची मडकी वादळात दिशाहीन हिंदोळू लागली. गंगात्तूनं तिच्या म्हातार्‍या हातांनी आमच्या आयुष्यातलं सारं वादळ पेलायचा प्रयत्न केला. तसं वचन दिलं होतं तिनं आबाला मरताना. आबा आमच्या शिक्षणासाठी पैसे देऊन गेला होता गंगात्तूला बरेचसे. तेवढ्या जीवावर आमची शाळा चालू राहिली.
आबा गेल्यावर दोन गोष्टी अगदी ताबडतोब घडल्या. एक - यमी आणि सुधाची शाळा बंद झाली. आणि दोन - आम्ही एकदम मोठ्या झालो. कावू तर अगदिच एकदम मोठ्ठी झाली.
कावू आबासारखी चुलीपाशी बसून आमच्यासाठी भाकरी करू लागली. त्या जळक्या कडक भाकरी आम्ही आबाला आठवत एकमेकींना भरवत असू. आबाची आठवण यायची फार. मग एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत असू... गंगात्तू आम्हाला पीठ-मीठ काय काय पुरवायची. कधी नलाक्का तिच्या घरून लपून आमच्यासाठी जेवण आणायची.
त्याकाळी आबाच्या त्याच्याशिवायच्या त्या घरात आम्हा तिघींना पुन्हा एकमेकींत गुरफटून आईच्या गर्भात असल्यासारखं वाटायचं

मग कधीतरी आम्ही तिघी खरोखरच मोठ्या झालो. आधी गोदी, मग मी आणि मग कावू अशा आम्ही तिघीही रांगेनं न्हात्या झालो. गंगात्तूनं जवळ घेऊन तिघींनाही सांगितलं कि तुमी आता प्वारी र्‍हायल्या न्हाईत... ’बाय’ झाल्या हाईती. तवा आता शान्यासारखं वागायचं. प्वाराटोरांत ख्येळायचं न्हाई. उनाडपना करायचा न्हाई. यकमेकास्नी धरून र्‍हायचं. यकटंदुकट्यानं फ़िरायचं न्हाई. कुनालाबी भुलायचं न्हाई...
आज ती गंगात्तूची ’न्हाई.. न्हाई..’ ची पोथी आठवून हसू येतं. पण गंगात्तू खरंच फार वेगळं वागू लागली त्यानंतर आम्हा तिघींशी. तिन्ही सांजेला अधूनमधून आमची दृष्ट काढून टाकू लागली. आमच्या काळजीत बेजार होऊ लागली. आम्ही शाळेतनं परतायला मिनिटभर जरी उशीर केला तरी येरझारा घालू लागली.
नलाक्का मात्र आम्हाला कणाकणानं फुलताना बघून स्वतःच मोहरल्यासारखी खूष व्हायची. तीची सुधा सुद्धा घाटाघाटानं अंग धरू लागली होती... नलाक्का वयात येणार्‍या आम्हा पोरींना नजरेनंच कौतुकानं न्याहाळत रहायची. मग गंगात्तू ओढत आम्हाला घरात न्यायची. पुटपुटत म्हणायची... ’हडळ मेली... नजर लाविल माज्या सोन्यासारक्या लेकीस्नी...’
कावू मग गंगात्तूला म्हणायची... "आसं कागं बोल्तीस गंगात्तू? नलाक्का आपली हाय... तिनं पान्हा पाजलाय आमास्नी... आपल्या लेकराला कुनी नजर लावतंय व्हय?"
"तुला नाय कळायचं डुचके. आतृप्त आत्मा हाय त्यो... तिच्या डोळ्यांत याड दिसतंय माला. तुमच्यात तिची करपत जानारी ज्वानी बघतिया ती... तुमाला कळायचं न्हाय. यवढंच धेनात ठिवायचं... त्या भवानेपासून लांब र्‍हायचं. कळ्ळं?"
तिचं ’कळ्ळं’ आगदी आबाची आठवण करून देणारं. अभावितासारखं आम्ही तिघींनीही मान हलवली.

आमच्या नलाक्काला वेड लागत होतं. गंगात्तू म्हणते म्हणजे खरंच असणार... येडाशी तिच्याएवढा संबंध अजून कुणाचा होता?
पण आमची नलाक्का... गंगात्तूच्या नवर्‍यासारखी ओंगळ वाकड्या तोंडातून सारखी लाळ गाळणारी... केसांच्या रासवट जटा गोंजारणारी... ईईईई!
अशी नलाक्का आम्हाला नको. आम्ही यमीला आणि सुधालासुद्धा सांगितलं. सुधा चिडून निघून गेली. पण यमी आता खूपदा आमच्याकडेच राहू लागली.

एकदा आम्ही शाळेतून घरी आलो तर नलाक्का दाराशी बसली होती. आमची वाट बघत. आम्ही लांबूनच नीट पाहिलं... तिचं तोंड सरळ होतं. लुगडं नीट नेसलेलं होतं. केस जरासे विस्कटले होते... पण जरासेच. आणि तोंडातून लाळ अजिबातच गळत नव्हती.
गंगात्तू काहिही बोलते. तिचा नवरा वेडा म्हणून तिला सगळेच वेडे वाटतात. - गोदा म्हणाली. कावूनं तिच्याकडे रागानं पाहिलं. मी मात्र नलाक्काजवळ जाता जाता तिच्याकडे बघत होते. काहितरी वेगळं होतं खरं.
आम्ही नलाक्काच्या जवळ पोचलो तसं नलाक्का छान हसू लागली. पण ती वेगळी दिसत होती. तिचा चेहरा सुजला होता. डोळे लाल भडक दिसत होते आणि डाव्या बाजूला कपाळावर काळंनिळं झालं होतं.
"नलाक्का.... चंद्रीनं मारलं तुला?" कावूनं बरोब्बर ओळखलं.
पण नलाक्का हसतच होती. "आता नाही मारायची ती मला. ह्ये आलेत आता. त्येच सांगाया आल्ते."
"ह्ये....??"
नलाक्का एकदम प्रसन्न हसली..
"आगं बायांनू... ह्ये... यमीचे बाबा... आलेत." आणि नलाक्का बिभत्स लाजली. तिच्या सुजलेल्या काळ्यानिळ्या चेहर्‍यावर ते बेंगरुळ लाजणं हिडिस दिसलं एकदम. आम्ही तिघी एकमेकींकडे पाहू लागलो.
"बगताय काय अशा? खरं वाटित न्हाय ना? मलाबी वाटंना... पन खरंच आलेत त्ये. यवड्या वर्सांनी आलेत... आमाला इसरले न्हाईत त्ये..." नलाक्काच्या डोळ्यांत अचानक पाणी आलं.
"चला की. भेटीवते तुमास्नी."
आम्ही एकमेकींकडे पाहिलं. यमीच्या बाबांना खुद्द यमीनेच आजवर पाहिलं नव्हतं. तिच्यावेळी नलाक्काला दिवस असतानाच तो कुटंतरी निघून गेला तो परतलाच नव्हता. आज आला... एवड्या वर्षांनी. नलाक्काला एकटं सोडून गेला. तो असता तर नलाक्काला सासूचा आणि जावांचा एवढा छळ सहन करावा लागला नसता.
नलाक्काला यमीऐवजी मुलगा झाला असता तर तिचा नवरा नलाक्काजवळ राहिला असता.
आमच्या आईला पण आमच्या तिघींपैकी एकजरी मुलगा झाला असता तर आमचा बाप आबानं कळवल्यावर आमाला न्यायला आला असता. का त्यानं फक्त आमच्या भावाला नेलं असतं?
आमाला भाऊ असता तर आमची आय जगली आस्ती का? - आबाला विचारायच्या राहून गेलेल्या अनेक प्रश्नांपैकी हे काही प्रश्न. राहिलं ते राहिलंच!

या प्रश्नांमुळेच गावातल्या पशा, सुन्या वगैरे मुलांचा फारच धिक्कार करायचे मी. त्याकाळी ’माणूस’ म्हणजे ’घाण’ हे समिकरण डोक्यात बसलं ते आजतागायत. (माणूस म्हणजे 'man'. बाई माणूस नसते. लक्षात आहे ना?)

नलाक्का कावूचा हात धरून तिला खेचू लागली. कावू म्हणाली, "आगं थांब की... गंगात्तूला सांगून तर येऊदे..."
"ती बया कशाला न्हाई म्हनंल?"
"तरी बी इचारून येऊदे. गोदे, जा गं. गंगात्तूला सांगून ये. आमी नलाक्केसोबत जातूय म्हनावं."
गोदी पळाली. आणि परत आली. म्हणाली, "चला."
__________________________________________________________

क्रमशः
__________________________________________________________

यापुढचा भाग -
http://www.maayboli.com/node/56963

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users