फुसके बार - २३ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 22 December, 2015 - 13:54

फुसके बार - २३ डिसेंबर २०१५
.
१) रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर अनेकदा मटारच्या नावाखाली असलेले पदार्थ मागवले तर बर्‍याचवेळा मटारऐवजी वाटाण्याचे पदार्थ मिळण्याची शक्यता असते. हे निम्नशहरी भागात हमखास, तर कित्येकदा शहरी भागातही होते. मटार पनीरच्या ऐवजी वाटाणे पनीर असे लिहिणे त्यांना रूचत नसावे.

बाकी काही नाही, हे वाटाणे अनेकदा माणसाला जमिनीपासून काही उंचीवर चालायला लावतात. तेही केवळ रॉकेटसारखे उडण्यासाठी लागणारा दाब निर्माण होऊ शकत नाही म्हणून.

२) काल रावसाहेब कसबे यांच्या ‘संतांच्या ब्राह्मणीकरणाच्या’ दाव्याबद्दल फुसके बारमध्ये लिहिले होते. प्रसिद्ध चित्रकार विजय काकडे यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया अशी:

श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्र, शातवाहन पर्व ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ब्राह्मणाबद्दल माहिती दिली आहे .त्यातिल काही भाग देतो " 'भारतीयांच्या व्यापक क्षत्रिय समाज निर्मितीच्या इतिहासावर मानवी रक्ताचा सडा शिम्पडलेला नाही याचे कारण ब्राम्हणाची व्यापक अभिरुची आणि सर्व विद्या संरक्षणाची वृत्ती होय …ब्राम्हणास केवळ आपापसात उत्पन्न झालेल्या भिन्न मतांचे एकीकरण करावयाचे नव्हते, तर जे भिन्न जातीमूलक, भिन्न दैवताराधन लोकात प्रचलित होती त्याचेही एकीकरण करावयाचे होते." सर्व मतांचे समन्वय करण्याकडे ब्राम्हणाचा कल होता. हे केतकरांच्या मते ब्राम्हणीकरण होय.

ज्ञानकोषकारांचा व्यासंग व त्यांचे योगदान लक्षात घेता तरी कोणी त्यांचे हे मत म्हणजे तथाकथित ‘ब्राह्मणी कावा’ आहे असे म्हणणार नाहीत अशी आशा आहे.

मी काल म्हटल्याप्रमाणे आजकाल ब्राह्मण्य हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो, तो जातीय किंवा सामाजिक वर्चस्ववादाच्या अर्थाने असतो. तेव्हा त्या अर्थासाठी उगाचच सवयीप्रमाणे ब्राह्मण्य हा शब्द वापरून लोकांनी आपला पुरोगामीपणा किंवा जातीय दृष्टिकोन न दाखवता सरळ वर्चस्ववाद हा शब्द वापरावा.

३) दिसेल त्यात किंवा कानावर पडेल त्यात चूक काढण्याची अनेकांना खोड असते. दृश्यम सिनेमामध्ये पोलिस अधिकार्‍याच्या मुलाची गाडी सिनेमाचा नायक एका दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात ढकलून देतो. आमचा मित्र म्हणतो की इथेच गुन्हेगार फसतात. आधी पाणी किती खोल आहे याची खात्री करून घेतली होती का? गाडी पूर्ण बुडालीच नसती तर सिनेमा तेथेच संपला असता की!

४) पुण्याच्या आपटे रस्त्यासारख्या वर्दळीच्या भागात गावठी पिस्तुल बाळगणार्‍या इसमाचा पाठलाग करणार्‍या पोलिसावर गोळीबार करून तो इसम पळून गेल्याची घटना घडली. आता हे संकट किती जवळ येऊन ठेपले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

५) मदर तेरेसांना संतपद देण्यावरून टीव्हीवरील चर्चेत श्याम मानव आणि श्रीरंग गोडबोले यांनी फ्रान्सिस दिब्रिटो यांची पार भंबेरी उडवली. संतपद देण्याची पद्धत ही वेळखाऊ असते आणि खर्चिक असते यावरून त्यांना विचारले गेले की पद्धत कशी का असेना, पण त्यासाठी चमत्कार सिद्ध करण्याची आवश्यकता काय? याला दिब्रिटो यांच्याकडे काही उत्तर नव्हते.

अमेरिकेमध्ये एका स्पॅनिश मुळाच्या व्यक्तीलाही संतपद दिलेले आहे. या व्यक्तीने अमेरिकेतील सत्तर हजार लोकांची कत्तल केली होती. परंतु आताच्या अमेरिकेतील हिस्पॅनिक वंशाच्या लोकांना खुश करण्याच्या कारणामुळेच त्याला हे संतपद दिले गेले. तेव्हा संतपद देण्यामध्ये चर्चचा निव्वळ धंदेवाईक दृष्टीकोन आहे असे आरोप केले गेले.

मदर तेरेसा यांच्याबाबतीतही बंगालमधील ज्या रूग्णाची कॅन्सरची गाठ तेरेसा यांनी बरी केली असा दाखला देण्यात आला, त्याबाबतीत तो रूग्ण ज्या हॉस्पतलमध्ये होता तेथील डॉक्टरनीदेखील त्या रूग्णाला कॅन्सर नव्हे तर टीबी होता असे सांगितले होते. शिवाय रूग्णाच्या पतीने याबाबतीत गप्प बसण्यासाठी त्याच्यावर चर्चकडून दबाव आल्याचे सांगितले होते. संतपदाच्या पद्धतीतली हि बनवाबनवीही उघड करण्यात आली. त्यावर दिब्रिटो यांच्याकडे उत्तर नव्हते.

श्याम मानव यांनी यामागे चमत्काराचे दाखले देणे हा शुद्ध भंपकपणा असल्याचे ठासून सांगितले.

आजवर दिब्रिटो यांची जी प्रतिमा होती तिला त्यांच्या या चर्चेतील भुमिकेवरून धक्का बसला.

६) मुंबईतील तीन मुस्लिम तरूण घरी काही न सांगताच गायब झाले. त्यांचा शोध घेतला असता ते इसिसच्या प्रभावाखाली आल्य़ाचे कळले. त्याबद्दल प्रतिक्रिया देताना मुस्लिम धर्माशी संबंधित असलेल्या काही गैरसमजांबद्दल काही जण सांगताना दिसले की बुरखा म्हणजे अंग काळ्या कापडाने झाकणे नव्हे. तर डोळ्याने जे पाहू ते आणि हृदय जे सांगेल ते चांगलेच असेल याचा आग्रह धरणे असा हा त्याचा खरा अर्थ आहे.

अरे. मग पुस्तकातला व माहित असलेला सगळाच शहाणपणा नेहमीच का झाकला जातो?

७) बालगुन्हेगारी कायद्यातील बदल – काही अनुत्तरीत प्रश्न
.
निर्भया ज्योती सिंग हिचा बलात्कारी अल्पवयीन गुन्हेगार अल्पवयीन असल्याचा फायदा उठवून किरकोळ सजेवर सुटला. त्यावरून जो वाद निर्माण झाला त्यामुळे आज राज्यसभेत अडकलेले बालगुन्हेगारीसंबंधीचे विधेयक आज घाईघाईने पास करण्यात आले.

या विधेयकात बालगुन्हेगार समजण्याचे वय १८वरून १६ करण्याची तरतुद आहे. मात्र गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे किंवा गांभिर्याप्रमाणे एखाद्याला अल्पवयीन असल्याचे ठरवावे की नाही याबाबत या विधेयकात नक्की काय तरतुद आहे हे काही नक्की कळत नाही.

या विधेयकावरील चर्चेमध्ये झालेले एकमेव अभ्यासू भाषण हे माकपच्या सीताराम येचुरी यांचे होते, असे म्हणावे लागेल. त्यांचे म्हणणे असे की उद्या एखादा गंभीर गुन्हा १४ वर्षाच्या मुलाने केला तर तुम्ही पुन्हा कायदा बदलणार का? त्यांचा हा प्रश्न निश्चितच अर्थपूर्ण आहे आणि त्यावर चर्चा न होताच हे विधेयक पास करण्यात आले. तेव्हा सामान्य लोक यामुळे नक्कीच समाधान मानतील, परंतु आजचा प्रश्न केवळ उद्यावर ढकलला गेलेला आहे हे नक्की.

वर उल्लेख केलेल्या आक्षेपांना या नवीन कायद्यात समाधानकारक उत्तर नसेल (आणि ते आहे असे दिसत नाही), तर नजिकच्या भविष्यात पुन्हा अनेक प्रश्न उद्भवणारच आहेत याची जाणीव असावी. त्यावेळी येचुरींचे शब्द आपल्याला आठवतील. मार्क्सवादी जे म्हणतात ते सगळेच चुकीचे असते असे नाही.

८) आव्हाडांची भावविवशता आणि आपली विवशता
.
शरद पवार यांचे महाराष्ट्र विधानसभेत अभिष्टचिंतन होतेवेळी त्यांच्याच पक्षाचे जीतेंद्र आव्हाड यांनी भावविवश होत आपले उर्वरित आयुष्य पवारसाहेबांना लाभावे अशी कामना केली.

आपल्याकडे काही दैवी शक्ती नसल्यामुळे आपण त्यांना तथास्तु म्हणू शकत नाही. शिवाय आव्हाड हे आधुनिक दैत्यासारखे वागत असले तरी अजून त्यांच्या अंताची अपेक्षा करण्याइतकी आपणही आपली बुद्धी भ्रष्ट केलेली नाही.
बाकी कोणी देवमाणूस खरोखर मृत्युपंथाला लागला लागला असेल आणि त्याला आव्हाडांसारख्या व्यक्तीने अशी ऑफर दिलीच, तर तो त्यापेक्षा शांतपणे मरण पत्करेल याची खात्री. शेवटी कोणाकडून उपकार करून घ्यायचे, यालाही काही मर्यादा असते की नाही?

शिवाय आव्हाडांनाही पक्के माहित आहे की तो परमेश्वर नाही. अन्यथा त्याने यांना गुंडासारखे वागूच दिले नसते. त्यामुळे नुसते भावनेने भरलेले शब्द फेकायला काही हरकत नाही, कारण तसे नक्कीच होणार नाही याची त्यांना पक्की खात्री आहे.

हे असे नाटक करण्याऐवजी आव्हाडांनी यानिमित्ताने सभ्य व स्वच्छ राजकारण करेन अशी प्रतिज्ञा केली असती तर?

या ‘आपले आयुष्य दुसर्‍याला मिळू दे’ प्रकरणावरून मागे काश्मीरमध्ये श्रीनगरजवळील एका बागेमध्ये वाचलेली गोष्ट आठवली.

शहाजहानचा मुलगा दारा शुकोह अतिशय आजारी होता. अगदी मरणासन्न होता. तेव्हा बादशहाने करूणा भाकली की माझे आयुष्य त्याला मिळू दे. आणि काही दिवसातच बादशहाचे निधन झाले व दारा खडखडीत बरा झाला.
अर्थात नंतर गादीवर आलेल्या औरंगजेबाने दाराला लवकरच कपटाने मारले हे पाहता शहाजहानचे फार आयुष्य शिल्लक नव्हतेच असे समजायला हरकत नाही.

या आख्यायिकेचा व आव्हाडांच्या भावविवशतेचा अर्थातच काहीही संबंध नाही.

९) भुजबळांची चूक नाही - कायद्याचे राज्यच राहिलेले नाही
.
हे काय चालले आहे कळत नाही. मोदी आल्यापासून या देशात कायद्याचे राज्य संपले आहे, याचा एक पुरावा. छगन भुजबळ यांच्या एकामागून एक मालमत्तांवर टाच आणली जात आहे. त्याचे कोर्टात जाऊन झाल्यावर हे सगळे चालू आहे की ते आता यापुढे आणखी किती मालमत्तांवर टाच येते ते पाहता काय शिल्लक राहते ते पाहिल्यानंतर ते तसे करणार आहेत? की कोर्टाच्या देखरेखीखाली जी केस चालू आहे त्याचा भाग म्हणूनच हे चालू आहे, त्यामुळे हे सारे पाहत राहण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नाही असे म्हणायचे का?

देशातील ओबीसींचा व महात्मा फुलेंच्या कार्याचा हा अपमान आहे अशी त्यांची नेहमीची गर्जना अजून ऐकू आलेली नाही. भाजपमधले त्यांचे मोठे साथीदार आता नसल्यानेही कदाचित ते एकटे पडले असावेत.

एवढ्या मोठ्या मालमत्ता जप्त होत असताना भुजबळ बाहेर कसे असा प्रश्न पडल्यास नवल नाही.

भुजबळांची यातली चूक काय, तर घेतलेली लाच किंवा केलेला भ्रष्टाचार हा कधीही आपल्या कुटुंबियांच्या नावावर लावायचा नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांच्याच भ्रष्टगुंडवादी पार्टीतील या क्षेत्रातील भीष्मपितामहांनी त्यांना यातले धडे व्यवस्थित दिले नसावेत असे समजायला जागा आहे. आता हे ठरवून झाले की नकळत झाले हे कसे कळावे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलकर्णी,

ब्राह्मण्य, ब्राह्मणीकरण, ब्राह्मण असले विषय आणून काय मिळते? दुसर्‍या दिवशी झडणारे वाद वाचायला येणार्‍या मजेशिवाय? त्यात आणखी इसिस, भुजबळ, पवार हेही विषय घेतले आहेत. जे पगारेंना सुचवत असे तेच आपल्यालाही सुचवतो. नुसतेच वाद ट्रिगर होतील असे लिहिण्यापेक्षा एक विषय घेऊन काही तपशीलवार का लिहीत नाही तुम्ही?

अवांतर लिहिण्याबद्दल क्षमस्व!

धारदार लेखणी आहे राकुंची. सर्वांना नाचवतात. Happy
( हे एका वाहत्या पानावर एका (सध्या गुडबॉय मोड मधील) आयडी कडून व्यक्त झालेलं मत आहे.

शहाजहानचा मुलगा दारा शुकोह अतिशय आजारी होता. अगदी मरणासन्न होता. तेव्हा बादशहाने करूणा भाकली की माझे आयुष्य त्याला मिळू दे. आणि काही दिवसातच बादशहाचे निधन झाले व दारा खडखडीत बरा झाला.
अर्थात नंतर गादीवर आलेल्या औरंगजेबाने दाराला लवकरच कपटाने मारले हे पाहता शहाजहानचे फार आयुष्य शिल्लक नव्हतेच असे समजायला हरकत नाही.
>>>>>>

कुलकर्णी,

किमान पटेल असं आणि नीट माहिती घेऊन लिहा.

औरंगजेब शाहजहान जिवंत असतानाच तख्तावर आला होता. त्याने दाराला १६५९ मध्ये ठार केलं आणि त्याचं धडावेगळं शीर शाहजहान कडे पाठवलं होतं. शाहजहान मेला १६६६ मध्ये, त्यामुळे शाहजहानचं निधन झालं आणि दारा खडखडीत बरा झाला हे धादांत असत्यं आहे.

<मदर तेरेसांना संतपद देण्यावरून टीव्हीवरील चर्चेत श्याम मानव आणि श्रीरंग गोडबोले यांनी फ्रान्सिस दिब्रिटो यांची पार भंबेरी उडवली>

हो ना? मदर तेरेसांच्या चमत्कारांवरून अंनिसवर शरसंधान करणार्‍यांनी पाहिलं नसेलच.

ऋत्विका,
काय लिहिले अाहे हे नीट वाचले असतेत तर तुमची प्रतिक्रिया वेगळ्या प्रकारे लिहिली असती.
मी जे वाचले होते त्याबद्दल लिहिले आहे. कधी काश्मीरला (पुन्हा) जाल खात्री करून घेऊ शकाल.