फुसके बार - २० डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 December, 2015 - 14:03

फुसके बार - २० डिसेंबर २०१५

१) संत मदर तेरेसा

मदर तेरेसा यांना अखेर संतपद बहाल झाले. आता त्या सेंट मदर तेरेसा किंवा सेंट तेरेसा अशा नावाने ओळखल्या जातील. आधीच्यापैकी एक पोप जॉन पॉल आणि केरळमधील एक सिस्टर यांनाही तो दिला जाणार असल्याच्या बातम्या एक-दोन वर्षांपूर्वी वाचल्या होत्या. संतपद देण्याआधी त्या व्यक्तीने काही चमत्कार केल्याचे सिद्ध व्हावे लागते. अशी पद्धत आहे.

भंपकपणाचा मक्ता केवळ हिंदूंनीच घेतलेला नाही याचे काहीतरी पुरावे दिसायला हवे ना. आता याबद्दल ख्रिश्चन समाजाकडून चमत्कार वगैरे प्रकारांविरूद्ध फार काही बोलले जाणार नाही हेही जवळजवळ निश्चित.

एकीकडे चर्च डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताबद्दल सकारात्मकपणे बोलताना दिसू लागले आहे आणि दुसरीकडे संतपद बहाल करण्यासाठी असलेला त्यांनी चमत्कार केले हे सिद्ध करण्याद्दलचा चर्चचा एकविसाव्या शतकातला हा मूर्खपणाचा अट्टाहास. मदर तेरेसा यांच्या कार्याबद्दल कोणी वैयक्तिक आरोप करू शकत नाही, कारण त्यांनी ते काम प्रत्यक्ष केले व ते कोणीच नाकारू सकत नाही. मात्र त्यामागचा चर्चचा डाव एव्हाना सर्वांना समजलेला आहे. त्यांच्या वैयक्तिक कार्याबद्दल कोणताही चमत्कार केल्याचा पुरावा मागण्याचा आग्रह न धरताच त्यांना संतपद देता आले असते की. त्याला कोणी हरकत घेतली असती?

२) राधे मॉंचे पुढे काय झाले कळले का? जसे निगेटिव्ह पब्लिसिटीचाही फायदा उठवला जातो, तसेच तिचेही झाले असल्यास व तिचा व तिच्या पाठिराख्यांचा व्यवसाय अधिक जोमाने चालू झाला असेल तर नवल वाटणार नाही. कदाचित आता तिला उचलून घेण्याचा दर आता वाढला असेल.

मागच्या वेळी जो वाद झाला त्यावेळी ती कसल्या तरी नशेत होती असे स्पष्ट दिसत होते. त्याचीही काही चौकशी झाल्याचे दिसले नाही.

३) नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया, राहूल व मोतिलाल व्होरा यांनी वेगवेगळी टोपी घालून घेत इतके वेगवेगळे व्यवहार केले आहेत, ते पाहता ही केस संपेपर्यंत न्यायाधिशांच्या डोक्यावरील केस शिल्लक राहतील याची खात्री नाही. हे प्रकरण समजून घेण्यासाठी न्यायाधिशांना या विषयातील तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल असे दिसते.

या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी पप्पू व सोनिया जामीन न घेता कोठडीत जाणे पसंत करतील वगैरे सांगण्यात येत होते. पण तसे काही न करता दोघांनीही गुमाने जामीन घेतला. पप्पू अजूनही शाळेत असल्यासारखे बडबडत आहे. ही केस लढण्याचा व गरिबांची सेवा करण्या – न करण्याचा काय संबंध? पण त्याची जी बाराखडी त्याने प्रथमपासून पाठ केलेली आहे, त्यातून तो अजूनही बाहेर पडायला तयार नाही.

४) महाराष्ट्रातील किडनी रॅकेटचा सुत्रधार सांगलीजवळच्या इस्लामपूरमधील सरकारी शाळेतील एक कारकून आहे असे कळते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना सुरूवातीला आर्थिक मदत करायची. त्यांना त्याची परतफेड करता आली नाही की त्याच्या बदल्यात किडनी विकण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करायची. त्याबदल्यात त्यांना काही लाख रूपयांची खात्री द्यायची. त्यानंतर किडनी काढून घेतल्यावर कबूल केलेल्या रकमेपैकी पूर्ण रक्कम न देता धाकधपटशाने शेतकर्‍यांना गप्प करणे, असा प्रकार चाले.

प्रकरणात कबूल केलेली रक्कम न मिळाल्याने एका शेतकर्‍याने त्याबाबत पोलिसांमध्ये तक्रार केल्यामुळे ही साखळी उघड झालेली आहे. यापैकी काही जणांची किडनी तर श्रीलंकेत काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हा सगळा प्रकारच कल्पनेच्या पलीकडचा आहे.

५) मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाच्या पायलट व कोपायलटच्या हलगर्जीपणामुळे एक कर्मचारी इंजिनिअर विमानाच्या इंजिनमध्ये ओढला जाऊन जागेवरच मरण पावला. अशा अपघाताची तीव्रता इतकी भयानक असते की नुसत्या कल्पनेनेही अंगावर शहारा यावा. असे अपघात जगभरात यापूर्वीही झालेले आहेत. अबु धाबीत झालेल्या अशा प्रकारच्या एका अपघाताचा व्हिडियो उपलब्ध आहे. मी त्याची लिंक येथे मुद्दाम देत नाही. विमान हवेत असताना पक्ष्याची धडक बसल्याने इंजिन निकामी होते. येथे तर ते जमिनीवर असताना जमिनीवरचा माणूस त्यात खेचला जाऊन असा भयानक अपघात होतो. भयानक आहे हे सारे.

वैमानिक व सहवैमानिक यांना निलंबित केलेले असले तरी त्यांच्यावर पुढे काय कारवाई होते ते पहायचे.

६) राष्ट्रपती झाल्यावर पुन्हा कोणती निवडणूक लढवू नये असा संकेत आहे, तसे सिनेमात गॉडचा रोल केल्यावर मॉर्गन फ्रीमन याला यापुढे आणखी कोणती भूमिका करू नये असे वाटले असेल काय?

७) आयबीएन-लोकमतवरील चर्चेत आज भालचंद्र मुणगेकरांना अचानक सिलेक्टीव्ह बहिरेपण आले होते की काय कोणास ठाऊक! नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून आज सोनिया व राहूलला न्यायालयात हजर रहावे लागणार होते. कॉंग्रेसचे खासदार लोकसभेत सोनिया-राहूलवरून घोषणा देत असल्यामुळे याप्रकरणावरून लोकसभेचे कामकाज रोखण्यामागे काय उद्देश होता हा प्रश्न होता. त्यावर मुणगेकर यांनी तो विरोध अरूणाचलमधील घडामोडींवरून होत असल्याचे सांगितले. अरूणाचलमधील घडामोडी व सोनिया-राहुल यांच्यासाठी घोषणा यांच्यात काय संबंध आहे हे न कळण्याइतके मुणगेकर बुद्धू नक्कीच नाहीत. म्हणून म्हणले आज त्यांनी ठरवून नीट ऐकू येत नसल्याचे सोंग घेतले होते.

कुमार सप्तर्षी हे भलतेच बोलण्याच्या बाबतीत एकदम एक्सपर्ट आहेत हे त्यांनी आज पुन्हा दाखवले. एरवी भाजपविरूद्ध बोलण्यासाठी त्यांना चर्चेमध्ये बोलावले जाते. तरीही ते जे बोलतात त्यातून सहसा काहीच निष्पन्न होत नाही हे पाहता चर्चेतील भाजपविरोधकाची एक जागा रिकामी राहिलेली परवडली, पण सप्तर्षी नकोत अशी परिस्थिती ते त्यांच्या बर्‍याचशा असंबद्ध बोलण्यामुळे निर्माण करतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users