इच्छा नसतानाही तुमच्यापर्यंत पोहोचणारी जात

Submitted by Rajesh Kulkarni on 19 December, 2015 - 13:35

इच्छा नसतानाही तुमच्यापर्यंत पोहोचणारी जात
.

जात नाही ती जात हे तर एव्हाना आपण सर्वांनी ऐकले असेल. हा किस्सा मात्र तुमची इच्छा नसतानाही एखाद्याची जात तुमच्यापर्यंत जबरदस्तीने कशी पोहोचते याचा.

परभणी जिल्ह्यातल्या पण नांदेडला जवळ असलेल्या गावात असतानाची गोष्ट. गावातील एका सरपंचाकडे जेवण्यासाठी आमंत्रण होते. पुरूषांचे जेवण झाल्यावर बायकांची पंगत बसली. जेवण झाल्यावर सरपंचांच्या पत्नीने माझ्या आईला तिचे ताट धुवून ठेवायला सांगितले. दुसर्‍या दिवशी माझ्या वडलांनी हा विषय सरपंचांकडे काढला. की फक्त माझ्याच आईला तसे का करायला सांगितले? काय झाले ते विचारून घेतो असे सरपंच म्हणाले.

त्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने दूर अंतरावरून पाणी आणून ते भरण्यासाठी आमच्याकडे एक गडी होता. आता हा गडी खालच्या जातीचा होता. म्हणजे निघाला. हा गडी आमच्याकडे पाणी भरायचे काम करत असल्यामुळे आम्ही सारेच त्याच्या बरोबरचे समजले गेलेलो होतो. पण सरपंचांचे पाहुणे म्हटल्यावर आणि तेही त्यांच्या पंक्तीला म्हटल्यावर आम्हाला वेगळी वागणूक दिली गेली नाही. पण बायकांच्या पंगतीत बसणार्‍या माझ्या आईला मात्र त्याचा व्यवस्थित प्रसाद मिळाला. सरपंचाच्या बायकोने आईला स्वत:च्या पंगतीला बसू दिले हेच नशिब, नंतर फक्त आपले ताट व वाट्या धुवून ठेवायला सांगितले एवढेच ते काय.

सरपंचांना मात्र काय झाले ते कळले. त्यांनी वडलांकडे झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीपण व्यक्त केली.

मात्र हा प्रकार होईपर्यंत आम्हाला ज्याची जातही माहित नव्हती व ती माहित असण्याची गरजही नव्हती, त्या पाणी भरणार्‍या गड्याच्या कानावर कसे कोणास ठाऊक हा प्रकार गेला. त्याने कामाला येण्याचेच बंद केले. त्याचे म्हणणे माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. त्याला परत बोलावण्यासाठी आम्हालाच त्याची मिनतवारी करावी लागली. की बाबा, तुझ्या जातीमुळे आमच्याकडे तू भरलेल्या पाण्याचा आम्हाला विटाळ वगैरे होत नाही. तेव्हा बाकीचे आमच्याशी कसे वागतात ते आम्ही पाहून घेऊ. पण तू काम बंद करू नकोस.

सरपंचांकडे जे इतर सवर्ण त्या दिवशी जेवणासाठी आमंत्रित होते, त्यातले काही जण तर आमच्या परिचयाचे होते. आणखी एक धक्का त्या दिवशी बसला तो म्हणजे त्यांच्याकडेही आमचे येणेजाणे त्यानंतर बंद झाले. पर्याय नसल्यामुळे कामाच्या ठिकाणीच काय त्या भेटीगाठी होत.

अखेर आम्हीच त्या गावात कोणाकडे जेवायला जाण्याचे बंद केले. आमच्याकडे कोणी त्यासाठी येण्याचा प्रश्न अर्थात नव्हताच. शेवटी ते गाव सुटल्यावरच हा प्रकार थांबला.

एखाद्याची जात तुम्हाला नको असेल तरी तुमच्यापर्यंत पोहोचते ती अशी.

ज्यांना हा प्रकार प्रत्यक्ष सहन करावा लागत असेल व तोही रोज सहन करावा लागत असेल त्यांच्या भावनांची तर मी कल्पनाही करू शकत नाही. वरवर पाहता त्यांच्यामधल्या काहीजणांनी हा प्रकार जगण्याची पद्धत म्हणून स्विकारलेलाही दिसे. पण त्या आत खोलवरच्या जखमेची कळ कधीतरी त्या जखमेची आठवण करून देत असणारच.

त्यांच्या मानाने आमचा हा अनुभव काहीच नाही. पण असेही होऊ शकते हे तुमच्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा गडी आमच्याकडे पाणी भरायचे काम करत असल्यामुळे आम्ही सारेच त्याच्या बरोबरचे समजले गेलेलो होतो. >>> असं कुठेही होत नाही. ब्राह्मणांच्या बाबतीत तर अजिबात नाही. फारतर त्याला कामाला ठेवू नका म्हणून विनंती झाली असती. हरियाणा मधे घडतं. पण तिथेही शेतक-याला खालच्या समाजाच्या कार्यक्रमात जाऊ नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील अशी वॉर्निंग आधी देण्यात आलेली होती. त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याची चावडीवर बोलावून हत्या करण्यात आली. सोनी वर दस्तक मधे हा एपिसोड अधून मधून दाखवण्यात येतो. अशा बातम्याही येत असतात.

महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमधे जातीय अत्याचाराच्या सर्वाधिक बातम्या आहेत तिथेही मिरवणूक का काढली, देवळात का गेला यावरून आधी तणाव निर्माण होतो आणि नंतर वस्तीवर हल्ला , हत्या अशा घटना घडतात. दुसरे म्हणजे ऑनर किलिंग.

पण स्वस्तातले मजूर म्हणून गरीब लोकच हवे असल्याने कामाला ठेवू नका असं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. उलट कामाला नकार दिला म्हणून हल्ले केल्याच्या घटना घडतात. एखाद्याने कामाला गडी ठेवला म्हणून त्याला अशी ट्रीटमेंट मिळाली हा प्रकार पहिल्यांदाच ऐकण्या.वाचनात आला.

इतकं नाही, पण थोडेफार घडतेच.
माझ्या नणदेच्या सासरी अजुनही, माझ्याबरोबर एखादी मैत्रिण आली तर ब्राह्मणेतर असेल असा तिच्या जातीचा अंदाज बांधून तिला चहाचा वेगळा कप दिला जातो (धुवायला नाही सांगत). अशी घरे महाराष्ट्रात आहेत हे नक्की.

मयेकरसाहेब,
एखादी गोष्ट नाकारणे हा सगळ्यात सोपा आणि बेष्ट प्रकार. आवडले. आख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने सांगताय हे तर आणखी मौजेचे. असो.

कपोचे,
डोक्यातल्या जातीचे वेगवेगळे पैलू असतात. या विषयावर क्वचितच उघडपणे बोलले जाते, त्यामुळे वेगळे वाटले असेल. सर्वांनीच याबाबतीतले आपापले अनुभव शेअर केले, तर एक प्रकारचा खजिनाचाच बाहेर यावा. अर्थात यात अभिमानास्पद काही नाही.

इतरत्र कुणीतरी लक्षात आणून दिले की हा किस्सा साठ वर्षांपूर्वीचा आहे. हे ध्यानात नव्हतं आलं.

साठ वर्षांपूर्वी असं घडत असणार हे मान्य आहे. मी आजच्या काळाच्या संदर्भाने लिहीलं होतं. समजण्यात गल्लत झाली.

लेखात कुठे उल्लेख आहे कि हा ३५ वर्षापुर्वीचा अनुभव आहे?
कृपया पोस्ट करण्यापुर्वी स्पेसिफाय करा हे कधी घडले ते.
उद्या तुम्ही १०० वर्षापुर्वीचा अनुभव लिहाल.
तुमचा Agenda काय आहे मला माहित नाही पण कृपया अपप्रचार करु नका. (You know Cops now a days take things like this very seriously..just a suggestion)

mansmi18,
तुम्हाला जे लिहिले आहे तेच वाचावे एवढे साधे सूत्र तुम्हाला माहित नाही हे पाहून आश्चर्य वाटले. हा अजेंडा वगैरे ज्ञान कोठून येते? अपप्रचार वगैरे वाटत असेल तर सोडून द्या. कॉप्स वगैरेबद्दलही मला सांगण्याची आवश्यकता नाही.

@ moga : ;)...!! @ Rajesh Kulkarni : तुम्ही सरपंचांचे पाहुणे म्हणजे सरपंच पण कुलकर्णीच असावेत (शक्यतो नसतात...! पण हल्ली काही सांगता येत नाही...!!) त्यामुळे असा प्रकार घडला असावा... 'बाकी' कोणी असे करत असेल यावर विश्वास बसत नाही..!

धनन्जय भोसले, सरपन्च कुलकर्णीच असतील कशावरुन? उलट आज जातीभेद न मानणारे ब्राह्मणच जास्त आहेत. कारण पूर्वी जे काही माणुसकी हीन प्रकार ब्राह्मण समाजाच्या हातुन झालेत, त्याची उपरती त्याना झालीय. निदान शहरान्मध्ये तरी असला प्रकार होणे शक्य नाही. हो, पण काही गावान्मध्ये,खेड्यापाड्यान्मध्ये हा मुर्खपणा काही लोक नक्कीच करतात आणी त्यान्च्यात ब्राह्मण, मराठा व इतर असु शकतात.

आपल्या हातुन ज्या चूका झाल्यात त्या बद्दल शल्य असलेच पाहीजे, नाहीतर लोक सुधारणार केव्हा?

ओ राकु हे कधी घडल ते साल तर लिहा.

@ रश्मी.. : रश्मी ताई, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण लेखात सांगितलेला प्रसंग हा लेखकांच्या आई-वडिलांच्या बाबतीत घडला आहे... लेखकांचे अंदाजे वय ३० पकडले तरी सदर प्रसंग १९८५-९० च्या आसपास घडलेला असणार असा अंदाज बांधुन प्रतिक्रिया दिली.. सद्ध्याच्या जमान्यात असे कुणी वागत असेल तर लेखकांनी त्याच्यावर खटला दाखल करायला हवा या मताचा मी आहे..!!

@ रश्मी.. : बघा... अंदाज खरा ठरला कि नाही..?? :)... असो.. तरिही असा प्रकार आताच्या जमान्यात होणे शक्य नाही असे नाही..! पण तो होउ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे..!

महाराष्ट्रात आजही जातीभेद मानला जातो. मी रायगड जिल्ह्यातली आहे. माझ्या गावी आजही आम्हाला वेगळी वागणूक दिली जाते. आम्हाला मंदिरात प्रवेश नाही. माझी ताई लग्नानंतर राजापूरला दिली (म्हणजे तिचे सासर ) तिच्याकडेही तेच. गावातले सवर्ण ह्यांना घरात येऊ देत नाहीत ह्यांना फक्त ओसरीवरच जागा. हे हि आमच्याकडे येणार - बोलणार, चहा- पाणी वगैरे घेणार नाहीत. पण कामाला मात्र हेच लोक आम्हाला बोलवतात तेव्हा चहा दिला तर वेगळ्या कपात देणार पाण्याच भांड पण वेगळ. आमच्या कडे ह्याचं बघण म्हणजे एखाद्या परग्रहवासीया सारख असत.
लांब कशाला जा, मुंबई मध्ये माझी मैत्रीण राहते बोरिवलीला त्यांच्या सोसायटी मध्ये दत्तमंदिर आहे त्यांच्या कडे काही कार्यक्रम असेल तर ते सगळे लोक मंदिरात साजरा करतात (उदा. साखरपुडा, वगैरे ) पण तिथेच राहणारे आमच्या जातीतल्या रहिवाश्यांना हे निषिद्ध आहे.
खूप वाईट वाटत हे पाहिलं कि, आम्हाला माणसासारखी वागणूक कधी मिळणार?

Swara@1 - तुमची पोस्ट वाचुन खुप दु:ख आणि आन्तरिक यातना झाल्या... सर्व प्रकार लज्जास्पद आहे.

मी मन्दिरात जाणे टाळतो आणि त्याने माझे किव्वा अजुन कुणाचे काहीही अडत नाही... पण काही (खासगी सोहळा, सामाजिक, सान्कृतिक) कार्य असेल तर मदतीला (जेवण तयार करणे, वाढणे, सफाई - कामे) आवर्जुन जातो.

कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करुन नका आणि प्रसन्गी कायदेशीर मार्गान्चा विचार करा.

स्वरा, हा त्या लोकान्चा नीचपणा आहे. माणसातला देव हे कधी पहायला शिकणार देव जाणे. अशाना काय देव पावायचाय? तुम्हाला वाईट वाटणे सहाजीकच आहे, पण या लोकाना जबरी धडा बसल्याशिवाय हे सुधरणार नाहीत. उलट तुमच्याच विचाराचे लोक तुमच्या बरोबर घेऊन याना तुम्हीच वाळीत टाका, म्हणजे चान्गला धडा बसेल. देव पाठिशी असतो, कोणाचे अडत नाही.

रश्मी,

कदाचित Swara@1 खोटे बोलत असतील. नै?

कारण जातीभेद पाळण्याचा विषय निघाला, की प्रत्येकवेळी तुमच्याकडून या गोष्टी "आजकालच्या जमान्यात शक्य नाहीत", "शहरात तर नक्कीच नाहीत" इत्यादि पोस्टी येत असतात. बरोबर ना?

स्वरा, खरंच वाचून वाईट वाटलं. मी मुंबई पुण्यातल्या माझ्या अनुभवात अजून तरी या प्रकारचा नीचपणा पाहिलेला नाही.
अशा घटनांना फेसबुक किंवा मीडियावर एक्स्पोज करुन उपयोग होत नाही का?

Swara@1,
तुमच्या अनुभवाला येत असलेले हे वास्तव म्हणजे माणुसकीला काळिमा आहे. यातले कित्येक जण शिकलेले असतील, पैसे राखून असतील, कुठल्या बुवाच्या मागे लागले असतील, कोणाकडे पाळीव प्राणी असतील. पण माणसाशी माणसासारखे वागावे एवढी साधी गोष्ट त्यांना कळत नाही. शहरी भागात हा प्रकार ग्रामीण भागापेक्षा कमी झाला असेलही, पण तो अस्तित्वात आहे नक्की.

दीड मायबोलीकर, आपल्याला जर खात्री नसेल तर आपला प्रतिसाद देऊ नये. कारण हे आम्ही अनुभवतो त्यामुळे खोट बोलायची गरज मला तरी नाही आहे.
आणि हो, इथे नेहमी बाकीच्यांच्या खोटेपणावरून, जे खरे बोलतात त्यांना judge करू नका. (इथे नेहमी असाच होत त्यामुळे मी मुद्दाम प्रतिसाद देणे टाळते पण आज हा विषय पहिला आणि स्वताला थांबवू नाही शकले )

@स्वरा१
मला वाटते दीड मायबोलीकर यांनी ती पोस्ट रश्मी यांना उपरोधांनी लिहिली आहे.

<<चुकून प्रतिसाद संपादित झाला आहे तो. मी टाईपल होत संपादित नवत करायचं. (क्षमस्व दि. मा.)>>
---- तुम्ही लिहीलेला प्रत्येक प्रतिसाद केवळ तुम्हाला (आणि येथिल अ‍ॅडमीन महाशयान्ना) स्वत: लाच सम्पादित करता येतो. तुमच्या प्रतिसादाच्या शेवटी उजव्या बाजुला सम्पादन असे दिसते.

प्रतिसाद बदलता येतो. लिहीलेले शब्द आणि त्यात झालेल्या चुका दुरुस्त करता येतात.

Pages