फुसके बार – १८ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 17 December, 2015 - 13:18

फुसके बार – १८ डिसेंबर २०१५
.
१) मागे हेमलकसाला जायचे ठरवले तेव्हा प्रत्यक्ष तेथे जाऊन आलेले कोणी परिचयाचे नव्हते. तेव्हा संपर्कासाठी डॉ. प्रकाश आमटे यांचा काही पत्ता मिळतो का हे पाहिले तर इंटरनेटवर लोकबिरादरी प्रकल्पाचे एक लेटरहेड दिसले. त्यावर असलेल्या क्रमांकावर फोन केला. पलीकडून पुरूषी आवाज, विचारले, कोठून येताय? म्हटले पुण्याहून. कसे येणार? गाडीने.

त्या व्यक्तीचे पुढचे वाक्य, येथे जंगलात येऊन राहणारे आम्ही वेडे, आणि येथे आम्हाला भेटायला गाडी चालवत येणारे तुम्ही आणखी वेडे.

विचारले, तेथे आल्यावर कोठे रहायचे? म्हणाले, आमच्याकडेच रहायचे. मी प्रकाश आमटे बोलतोय.

प्रत्यक्ष भेटीबद्दल नंतर.

२) टीव्ही मालिकांबद्दल चर्चा

जी चर्चा होते ती अवाजवी पद्धतीने लांबलेल्या रटाळ झालेल्या मालिकांबद्दल. चांगल्या मालिकांबद्दल अजिबात बोलले जात नाही. चांगल्या मालिका नाहीत हेही खरे. हवा येऊ द्या सारख्या कार्यक्रमात विषय कोणता आहे यावर सारे अवलंबून. पण तेथेही ठराविक पॅटर्न. अंगावर येणारा.

तरी अजून प्रेक्षकांमध्ये आम्ही झी लॉयलिस्ट, आम्ही एबीपी लॉयलिस्ट असे गट पडलेले नाहीत हे नशीब.

३) वर्षभरात एखाद्याने जे फोटो आपल्या वॉलवर टाकले असतील त्यांचे संकलन करून देण्याची सोय फेबुने वर्षाखेरच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेली दिसते. मी फारसे फोटो टाकत नाही, पण जर ही सोय वापरायचे ठरवले तर मेघालयातल्या जंगलातील बबूनचा फोटोही त्यात येईल. तो माझाच असा कोणाचा समज व्हायचा त्यापेक्षा ही सोय वापरायलाच नको.

४) पुण्यात एका इमारतीतील अनधिकृत शेडमध्ये गादीचा कारखाना चालवला जात असताना वेल्डिंगची ठिणगी पडून लागलेल्या आगीमध्ये ३-४जण जळून ठार झाल्याची बातमी आहे. आता महापालिकेचे अधिकारी डोळ्यावरचे झापड निघाल्यासारखे काहीतरी कारवाई केल्याचे नाटक करतील.

या सर्व अनधिकृतपणे चाललेल्या प्रकारांमुळे इमारतीतील रहिवाशांचा जीवही धोक्यात येऊ शकतो हे लक्षात घेतले तर सर्वांनी याला संघटितपणे विरोध करायला हवा.

मी अनेकदा म्हणत असतो की भ्रष्टमार्गाने धंदा करू इच्छिणारे लोक आणि त्यांच्याकडून पैसे खाऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतामुळे बकालपणा वाढतो. या बकालपणाची किंमत कोणाला कशी चुकवावी लागेल याचा नेम नाही.

५) मुलांना लहानपणी आधारासाठी कोणी परी वगैरे चालते, तसे मोठे झालेल्यांना देव लागतो. लहान मुलांचे समजू शकतो, पण मोठयांचे काय? ते तर मोठे झालेले असतात ना?

६) देशातील असहिष्णु वातावरणाबद्दल शाहरूख खान याने जे विधान केले होते त्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. अर्थात ते करताना त्याने त्याच्या आधीच्या विधानाचा विपर्यास झाला असे म्हणायला कमी केलेले नाही. माझ्या या आताच्या वक्तव्याचा माझ्या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाशी संबंध जोडू नये अशी पुस्तीही त्याने जोडली आहे.

आता आम्ही म्हणत नव्हतो का की देशात तसे काही वातावरण नाही, असे म्हणणा-यांना जोर चढेल, आणि खरे आहेही ते.

७) एस.टी. कर्मचा-यांनी आज अचानक पुकारलेल्या संपामुळे अनेक बसगाड्या गंतव्य स्थानापर्यंत न नेता मध्येच थांबवल्या गेल्या. त्यामुळे अनेक प्रवाशी इच्छित स्थळी पोहोचू शकले नाहीत. अनेकांना परीक्षेसाठी पोहोचता आले नाही.

या एस.टी. कर्मचा-यांची पोटे प्रवाशांकडून मिळालेल्या पैशांमधून चालतात याची जाणीव नसल्यासारखे त्यांनी प्रवाशांना वेठीला धरले आहे. एस.टी.च्या चार कर्मचा-यांनी तुटपुंज्या पगारापायी आत्महत्या केली, कारण ब-याच काळात त्यांची वेतनवाढ केलेली नाही. सरकारच्या इतर तोटयातल्या महामंडळांच्या कर्मचा-यांना मात्र घसघशीत वेतनवाढ मिळालेली आहे. अशीच वाढ मिळावी म्हणून एस.टी. कर्मचा-यांच्या संघटनेने हा संप अचानक घोषित करून कित्येकांची गैरसोय केली.

एस.टी. महामंडळ हे त्याच्या संचालक मंडळाचे खाण्याचे कुरण बनलेले असल्यामुळे इंधनवापर, स्पेअर पार्ट्स या व अशा अनेक गोष्टींमधील घोटाळ्यांमुळे ते भिकेला लागलेले नव्हे लावलेले आहे. या कर्मचा-यांपैकी काहीजण या भ्रष्टाचारात सामील आहेत. तर मग ते कोणत्या तोंडाने हे आंदोलन करत आहेत?

हे सरकार मागच्या सरकारची काही पापे धुवून काढण्यामागे आहे. हे प्रकरण देखील तसेच आहे.

महामंडळाच्या कर्मचा-यांच्या भल्यासाठी काही पावले ताबडतोब उचलण्यात यावीत व त्याचप्रमाणे एस.टी. महामंडळ हे राजकीय नेत्यांचे कुरण म्हणून त्यांना आंदण देऊ नये. मला वाटते, मागे परिचारक अध्यक्ष असताना हे महामंडळ थोडा काळ फायद्यात आले होते, पण त्यांना बदलल्यापासून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न झालेले आहेत. तेव्हा या महामंडळातला भ्रष्टाचार कठोरपणे मोडून काढला जावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अनेकदा म्हणत असतो की भ्रष्टमार्गाने धंदा करू इच्छिणारे लोक आणि त्यांच्याकडून पैसे खाऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतामुळे बकालपणा वाढतो

आणि हे सगळे पाहणारी तुम्ही आम्ही जनता 'हे असेच चालायचेच' म्हणुन याच्याकडे दुर्लक्ष करते म्हणुन बकालपणा साथीच्य रोगासारखा सगळीकडे पसरतो हेही कृपया यात घाला.

घरात अनागोंदी असेल तर त्याला घरमालक तितकाच जबाबदार असतो. त्याने नुसते मत देऊन अनागोंदी संपणार नाही तर त्या घराचा मालक तो स्वतः असल्यामुळे तिथली अनागोंदी संपवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल त्यालाच उचलावे लागणार.