बायकांचा अपमान

Submitted by वाट्टेल ते on 14 December, 2015 - 11:21

शनिशिंगणापूरला, पुण्याच्या एका मुलीने जाऊन कुठल्याश्या चौथऱ्यावर तेल ओतले. बरं ओतले ते ओतले पण त्यानंतर गावातल्या लोकांनी मिळून त्यावर दूध ओतले. आणि या सगळ्यामुळे झाले काय तर बायकांचा अपमान ! कित्येक लोकांचे गहाण पडलेले मेंदू जमा करूनसुद्धा कशाचा काही संदर्भ लावता येईना. तेलाचा चिकटपणा दुधाने निघत नाही इतकी साधी गोष्ट या जुन्या जाणत्या लोकांना कळू नये ? अशावेळी नेहमीप्रमाणे सर्वज्ञानी त्रिकालदर्शी channels ना मध्ये पडावे लागले. त्यांनी साबणाचे भरपूर फुगे काढले. पण पोकळ फुगे काय करणार ? तात्पर्य हे की आता तेल, दूध आणि साबणाचा चिखल शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर वाळत पडला आहे.

त्या पुण्याच्या मुलीने जरा आजूबाजूला विचारले असते तर (असो, सवय नसल्याने राहून जाते) कोठल्याश्या त्या गावाला जायचे तिचे कष्ट वाचले असते. तिच्या गावातच पर्वती नामक टेकाड चढून गेल्या गेल्या कार्तिकेयाचे देउळ येते तिथे स्त्रियांना प्रवेश निषिद्ध असल्याचे पुणेरी शुद्ध मराठीत लिहीले आहे. तिने त्या भोज्याला शिवले असते तर विरोधकांना दुधाच्या पिशव्या आणि channel ना कॅमेरे घेऊन क्रियाकर्मासाठी पर्वती चढण्याचे कष्ट तरी घ्यावे लागले असते. पर्वतीवर शिवाशिवी खेळायला मोक्याच्या जागासुद्धा भरपूर आहेत. तर त्या मुलीला प्रेमाचा सल्ला की हा लढा पुढे नेण्यासाठी दर महिन्याच्या महिन्याला एकदा याप्रमाणे प्रत्येक वेळी नवीन मारुतीला तेल वाहायचे तिने ठरवले तरी वानवा पडणार नाही इतके मारुती एकट्या पुण्यात आहेत. एकदा साधारण तारखा माहीत झाल्या की channel वाले प्रत्येक महिन्याला तयारच असतील. फक्त यावेळी कोणत्या मारुतीवर चढाई करायची तेच कळण्याची खोटी. काही तेल घाणे चालवणाऱ्यांनी प्रायोजक म्हणून संपर्क पण साधला आहे. बिनमलईचे दूधवाले पण हवे तेवढे मिळतील. दुधाच्या किंवा तेलात तळलेल्या छान छान पदार्थांनी आमच्या जिभा तृप्त झाल्या नाहीत तरी चालतील पण कोणीही अपमान वगैरे काय असेल तो सहन करू नये.
हे सर्व तत्वज्ञान एके ठिकाणी पाजळायला जाण्याची संधी मला मिळाली होती पण हाय कर्मा ! माझी कामवाली तिला तिच्या नवऱ्याने बडवल्याने गेले ४ दिवस कामावर येत नसल्याने कामे तशीच पडून राहिली होती. ती उरकण्यातच माझा सगळा वेळ गेला. शनिशिंगणापूरच्या होत असलेल्या बायकांच्या अपमानाची गोष्ट इतकी मोठी होती की बाकी चिल्लर गोष्टींकडे माझे लक्षच गेले नाही. आता तिला तिचा नवरा मारतो हा त्यांच्या घरगुती प्रश्न आहे आणि त्यात नाक खुपसायला मला अजिबात आवडणार नाही. तसेही हे लोक कधी सुधारणार नाहीत.
सगळी कामे उरकते तेवढ्यात थोरल्या जाऊबाईंचा फोन. त्यांच्याकडे कसलीशी पूजा असल्याने मला जेवायला बोलवणे. एरवी जेवायला म्हणून जायला मी नाही म्हटले नसते पण त्यांच्याकडे जायचे म्हणजे सगळा स्वैपाक त्या माझ्याकडूनच करून घेणार आणि वर त्यात चुका काढणार. कशाला ती भानगड ? म्हणून त्यांना स्वच्छपणे मला अडचण असून येणे जमणार नाही असे सांगते तो त्यावर आम्ही काहीही शिवाशिव पाळत नसल्याचे सांगून त्यांनी माझी खरोखरचीच अडचण केली. मला प्रशस्त वाटत नाही म्हणावे तर दूधवाल्यांच्या पार्टीत त्या आम्हाला निष्कारण टाकणार आणि गेले तर तिथे कामाचा गाडा उपसावा लागणार. शेवटी जिसका डर था वही हुवा. तिथे कामे करताना कंटाळा आला किंवा कंबर दुखते म्हणायचा अवकाश, तू म्हणजे अगदी सुपर वुमनच आहेस असे मधाचे बोट लावले की आमची बोलती बंद आणि दुप्पट उत्साहाने कामाला सुरुवात. मोठमोठ्या management school मध्ये तरी motivation theory वगैरे थोर्थोर नावाखाली अजून काय शिकवतात ? असो. काम संपले तेव्हा फुकाच्या चर्चा चालू आणि त्यात आगरकर, कर्वे , फुले असे काही काही तुकडे हाती लागत होते. पण आता केशवपन आणि सती वगैरे भयंकर मढी चर्चेत सुद्धा तरी कशाला उकरून काढतात देव जाणे ? साडेसात वाजता चर्चांना पूर्णविराम मिळाला कारण TV वर कोणती ती उच्चशिक्षित मुंबईत वाढलेली हिरविण, तिचे लग्न होते आणि तिचे सर्व उच्चशिक्षित कुटुंबीय “आपली मुलीची बाजू”, “मुलीने घर सोडणे”, “नाव बदलणे” वगैरे म्हणत होते. मग दुसरीकडे सासूने सुनेला घराबाहेर काढले होते. तिसरीकडे पायगुण - अपशकून असे काही तरी ऐकू आले. थोडा वेळ ते सर्व प्रकरण पाहिल्यावर याच दिशेने गाडी चालत राहिली तर काही वर्षानी सतीसुद्धा हळूहळू relevant वाटायला लागेल आणि हिरोच्या मृत्यूनंतर हिरविण त्याच्यावरच्या प्रेमापायी सती जाण्याचा आग्रह धरते आणि पुरोगामी मंडळी तिला समजावतात बगैरे दाखवतील की काय अशी भीती मला वाटून गेली. पण लक्षात कोण घेतो ? ती फक्त serial असते त्यातले मनावर घ्यायचे नाही. पुन्हा माध्यमे म्हणजे त्यांचे अभिव्यक्ती का काय ते स्वातंत्र्य वगैरे आहे की नाही. बायकांचा शनिशिंगणापूरमधला अपमान महत्वाचा.
सगळ्याचा एकूणच शीण आला आणि ठरवले आपला अपमान म्हणून होऊ द्यायचा नाही. बसमध्ये स्त्रियांच्या राखीव जागेवर बसले नाही. ट्रेनमध्ये हट्टाने general compartment मध्ये चढले. येता येता कामवालीला डॉक्टरकडे नेउन औषधे देऊन आले. घरी फोन करून मला उशीर होत असल्याने मुलगा व मुलगी दोघांना, साधा स्वैपाक करून ताटे मांडून ठेवायला सांगितले पण हातातल्या सामानाच्या जड पिशव्या उचलायला खाली येण्याची गरज नाही असे बजावले. फोनवर नवऱ्याला विचारले, ‘काय करतोयस ?’. तो म्हणाला, “आपल्या घरात राहणाऱ्या ४ मुक्त माणसांचे मुक्त वाहणारे कपाट आवरतोय. सगळ्यांना एकसारखी जागा करून देणारे”. मी म्हटले, “हा समाजवाद सकाळी आठवला नाही वाटते? तुझ्याच भावाच्या घरी जायचे होते पण तू बरोबर येत नाही असे तोंडभर सांगितलेस . “ नवरा म्हणाला, “ तुझ्या हुशारीवर खरतर माझा विश्वास होता, पण अजून शिकायला वाव आहे असे वाटते. कोणत्याही माणसाच्या वेळेवर त्याच्या मनाची सत्ता चालायला हवी इतके स्वातंत्र्य तुला, मला - सर्वांनाच नको का?” मी म्हटले, “हा कमालीचा व्यक्तिवादी आणि स्वार्थी विचार झाला ! “ त्यावर नवरा म्हणाला, “ असेल कदाचित ! पण गेल्या वर्षी तू याच पूजेसाठी गेलेली असताना तुझ्या भावाच्या मुलासाठी hospital मध्ये मला अचानक जावे लागले तेव्हा somehow हा व्यक्तिवादी आणि स्वार्थी विचार मध्ये आला नव्हता. कधीकधी स्वत:च्या मनाचेच ऐकायला शीक.” मी फोन आवरला. स्वत:ला फक्त स्त्री समजू लागले की समाज-संस्कृती-अपेक्षा वगैरे सगळ्याचे माझ्या मानेवर जड जोखड भासू लागले. तेच फक्त जबाबदार माणूस म्हटले की हलके आणि मुक्त वाटू लागले. शनिशिंगणापूरच काय अजून कोठेही स्त्री ला जायला कोणाचा अडसर असला काय नसला काय, ते फारसे महत्वाचे नाही. समोरचा माणूस, स्त्री वा पुरुष स्वत:ला आणि मला माणूसच समजतो की नाही ते जास्त महत्वाचे.

शनिशिंगणापूरला म्हणे घराच्या दारांना कुलुपे नसतात. घरदार यात दार किंवा दाराचा अर्थ खरोखरचे दार नसून बायको असा आहे हे लक्षात घेतले तर दारांना कुलुपे नसणे म्हणजे घरच्या स्त्रीला फक्त स्त्रीपणाचे बंधन नसणे असा तर या शनिशिंगणापूरच्या सर्व गोंधळाचा अर्थ नव्हे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिशिंगणापूरला म्हणे घराच्या दारांना कुलुपे नसतात. घरदार यात दार किंवा दाराचा अर्थ खरोखरचे दार नसून बायको असा आहे हे लक्षात घेतले तर दारांना कुलुपे नसणे म्हणजे घरच्या स्त्रीला स्त्रीपणाचे बंधन नसणे असा तर या शनिशिंगणापूरच्या सर्व गोंधळाचा अर्थ नव्हे?
<<
अकलेचे धिंडवडे म्हणतात, ते हेच तर नव्हेत?

तिच्या गावातच पर्वती नामक टेकाड चढून गेल्या गेल्या कार्तिकेयाचे देउळ येते तिथे स्त्रियांना प्रवेश निषिद्ध असल्याचे पुणेरी शुद्ध मराठीत लिहीले आहे.
>>>
कार्तिकेय म्हणजे गणपतीचा भाऊच ना? त्याच्या देवळात स्त्रियांना बंदी यामागे काय लॉजिक किंवा दंतकथा आहे कोणी जाणकार प्रकाश टाकेल का?

कार्तिकेयाचे पार्वतीबरोबर भांडण झाले आणि त्या मध्ये 'मी यापुढे बायकांचे तोंड पाहणार नाही' असे कार्तिकेयाने म्हणून समस्त स्त्रियांना शाप दिला. अशी कथा प्रचलित आहे. पुण्याच्याच काय पण कुठल्याही कार्तिकेयाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही. फक्त यावर स्त्रियांनी आक्षेप घेतल्याने काही मंदिरांवर पाटी बदलून 'स्त्रियांनी स्वतःच्या जबाबदारी वर दर्शन घेणे' असे लिहिले आहे

मॉरिशिस, मालदिव इ. ठिकाणी कार्तिकेय देवाची पुजा महिला करतात. उलट त्याचे पुजन सुध्दा त्यांच्या हातातून केलेले चालते. तिथे मात्र कोणी महिलांना आडकाठी केलेले कधी ऐकवत नाही.

ते कार्तिकेअन वेगळे आहे का? मुरगन असे काहीसे नाव प्रचलित आहे तिथे

जयंत, आई घरात बदडते पण पाहुणे गेल्यावर प्रेमाने वागते ना मुलांशी?
कार्तिकेयाला माहित्येय मॉरिशस, माल्दीवला टूरला आल्यावर आई सर्वांसमोर धपाटे घालणार नाही.
म्हणून तिथे आई आणि बायकांना चालवून घेत असेल तो.
Happy

जयन्त, साऊथमध्ये कार्तिकेयाची पुजा करतात. आणी गणपतीला काहीतरी वेगेळे नाव आहे. तिकडे रावणा ला देव मानतात. हो, मुरुगन म्हणजे कार्तिकेय.

माझ्या मॉरिशन मैत्रिणी आहे. त्या बिन्धास्त पुजा करतात. जेव्हा मी सांगितले कि कार्तिकेअनला महिला पुजा केलेल्या चालत नाही तेव्हा त्यांनीच मला खुळ्यात काढले Sad नंतर मला वाटले तो वेगळा कार्तिकेअन असेल.

आणी गणपतीला काहीतरी वेगेळे नाव आहे.<< पिळियार. आमच्या तमिळनाडूमध्येही कार्तिकेयाचे दर्शन स्त्रिय अघेतात. इथे त्याचे दोन दोन विवाह झाले आहेत. देवसेना आणि वल्ली या दोन बायका.

वा ते,
छान लिहिलं आहेत. मात्र मला शेवटच्या परिच्छेदाचा अर्थ नीटसा कळला नाही. समजावून सांगाल का? मात्र वादंग होईल असं वाटत असेल तर विपुत सांगा.

जयंत.१ - आपण देवांचे ड्युएल आय डी नव्हे, तेहेतीस कोटी आय डी काढले आहेत.
सर्व संतांनी जीव तोडून एकच गोष्ट सांगितली. परमेश्वर एकच आहे. आणि तो फक्त भक्तीचा भुकेला आहे.
भक्ती स्त्रीने केली काय आणि पुरुषांनी केली काय. मात्र निर्मळ भक्ती करणं फारच अवघड असल्यामुळे त्याचा शो करणं फारच जरुरीचं झालं.
त्यासाठी तूप, तेल अभिषेक, उपास-तापास वगैरेंची फारच मदत होते. हे करता करता बायकांना एखादा रट्टा लगावता आला तर दुधात साखरंच!

हो पण ते सगळे वेग्वेगळे ना. आता बघा शंकर साहेब कुठेही आहे त्यांच्याबद्दल एकच कथा आहे तसे गणपती विष्णू कृष्णा इ. सगळेच साहेबलोकांची कथा थोड्याफार फरकाने एकच आहे फक्त कार्तिक साहेबांची कथा फारच वेगळी झाली आहे ते कसे हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

दारा म्ह्णजे पत्नी..संस्कृतमधे..

मार्ग आमुचा रोखु शकती ना धन ना दारा..या काव्यपंक्तींमधला शब्द दारा..

शेवट नाही पटला. बाकी लेख छान, मार्मिक.

इथे साऊथ इंडीयन लोकांचे कार्तिकस्वामी मंदीर आहे, तिथे स्त्रियांना मुक्त प्रवेश आहे, मराठी स्त्रियाच जात नाहीत, साऊथमधल्या जातात, माझी बहिण पण तिच्या मनात आलंकी जाते तिथे. त्रिपुरारी पोर्णिमेला मराठी स्त्रिया जातात आवर्जुन.

आहे ते कसे हे जाणून घ्यायची इच्छा आहे>>> रा. चिं ढेरे यांच्या लोकदैवतांचे विश्व या पुस्तकात याबद्दल खूप छान माहिती आहे. अवश्य वाचा.

पण कार्तिकेय वेगळा आणि मुरुगन वेगळा न? मुरुगन साउथचा सर्वोच्च देव होता, उन्नयनात कोठेतरी कार्तिकेयाचा अवतार होऊन बसल्याचे आठवते. संगम साहित्यातही त्यांचे उल्लेख आहेत असे तिथे लिहिलेले.

अवांतर, कार्तिकेय म्हणजे कृत्तिकेचा मुलगा, म्हणजे अंतराळातल्या कृत्तिका नक्षत्राचा कार्तीकेयाशी संबंध असावा का?

दाराः म्हणजे पत्नी.

त्या शेवटच्या प्यारामध्ये वाट्टेल ते ह्यांनी दारा: म्हणून घरादारा घेतले आहे. त्यांना असे म्हणायचे आहे की घराला व दारा पर्यायाने स्त्रीला बंधनात टाकू नका असा काहीसा अर्थ जुन्या काळी शनिशिंगनापूर वगैरेत असावा काय? आणि कालौघात तो घरादाराला बंधने म्हणजे (कुलूप) एवढाच रूढ झाला काय?

( तिथे चोर्‍या होतात हे मला माहिती आहे.)

तो जर अर्थ ( पत्नी) घेतला तर त्यात "अकलेचे धिंडवडे म्हणतात, ते हेच तर नव्हेत?" कसे लागू होते? इतकं हार्श होण्याची खरंच गरज असते का? Uhoh

त्या प्यार्‍यात फक्त "या शनिशिंगणापूरच्या सर्व गोंधळाचा अर्थ नव्हे?" हे शब्द आले नसते तरी वाट्टेल ते ह्यांना जे लिहायचे होते ते पूर्ण झाले होते. ( दाराच्या संस्कृत अर्थासहित)

Kartikeya (Sanskrit Kārtikēya "son of Kṛttikā" Tamil: Kārttikēyaṉ) (/ˌkɑrtɪˈkeɪjə/), also known as Murugan, Skanda, Kumaran, Kumara Swami and Subramaniya, is the Hindu god of war. He is the Commander-in-Chief of the army of the devas and the son of Shiva and Parvati

गुगलबाबा की जय

आता कार्तिकेय हा झाला उत्तरेमधला देव म्हणजे आर्यांचा देव पण त्याला महत्त्वाचे स्थान मात्र द्रविडांनी दिले आहे. हे कसे घडले ? आर्यांच्या ३३ कोटी देवांपैकी कार्तिकेय आणि गणपती यांनाच द्रविडांनी महत्त्व दिले आहे. त्यातल्यात्यात गणपती देवाला जवळपास सगळ्याच वंशाचे लोक मानतात त्यामुळे ते स्वाभाविक जरी गृहित धरले तरी द्रविडसंस्कृतीमधे कार्तिकेयला मानणे हे मीटरमधे बसत नाही. की कार्तिकेय हा द्रविडांचाच देव होता आनि त्याला उत्तरभारतीयांनी शिव पार्वतीचा दुसरा पुत्र म्हणून स्वीकार केला.

. हे कसे घडले ? >> अहो, त्यासाठीच तर पुस्तके वाचा म्हणून सांगितले ना. ढेरे यांच्या पुस्तकांत यावर सखोल विवेचन केले आहे.

रुढी-परंपरा कितीही आचरट, खुळचट आणि चुकीच्या असल्या तरी कित्येक लोकांच्या त्यामध्ये भावना गुंतलेल्या असतात. आज उठ आणि बदल रुढी असे होत नाही. सतीची अमानुष चाल बदलण्यासाठीसुद्धा कित्येक लोकांना आयुष्य खर्ची घालायला लागले आहे...आम्ही हे कधी लक्षात घेणार? आमच्याकडे आयुष्य खर्ची घालायचा पेशन्स आहे का?

पण शनीला इतका राग का स्त्रीयांचा?
एकंदर स्त्रियांचा राग येणारे देव कोणते?
कोणकोणत्या धर्मांत प्रार्थना स्थळी किंवा गर्भगृहांत किंवा सँक्टम सँक्टोरमच्या एकदम जवळ स्त्रियांना जाऊ देत नाहीत असा सगळाच विचार करुया ना!

काय शनीमहात्म्य चाललंय एवढं!
Happy

>>>> की कार्तिकेय हा द्रविडांचाच देव होता आनि त्याला उत्तरभारतीयांनी शिव पार्वतीचा दुसरा पुत्र म्हणून स्वीकार केला. <<<<<<
दुसरा? अहो कार्तिकेय मोठा, थोरला, अन धाकटा गणपति. Happy

कार्तिकेय , शन्कर- पार्वतीचा मुलगा, त्याला कृत्तिकानी ( सहा स्त्रीया) साम्भाळले, म्हणून तो कार्तिक. पण शनीला स्त्रीयान्चा राग आहे असे मी पण कुठेच नाही वाचले. मारुतीचे ठीक आहे, त्याने आधीच मी ब्रम्हचारी राहीन असे सान्गीतले. पण शनीबाबत तसा उल्लेख कुठे दिसला नाही.:अओ:

Pages