रेड आणि ब्राऊन राईसच्या पिठाची भाकरी

Submitted by हर्ट on 13 December, 2015 - 03:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

# एक वाटी रेड आणि ब्राऊन राईसचे पिठ (ह्यामधे मी रेड राईस अगदी एक दोन चमचे घेतला आणि उर्वरित ब्राऊन राईस घेतला. भारतामधे पिठाच्या गिरण्या खूप आहेत म्हणून ही भाकरी भारतामधे करता येईल. मोदक बनवता येतील. इथे सिंगापुरमधे चिनी स्त्रिया त्यांच्या लहान मुलांना ब्राउन राईसची पेज देतात. काही ठराविक दुकानांमधे हे पिठ मिळते.) दे दोन तांदूळ असे दिसतात. ह्यातील एक तांदूळ ब्राऊन राईस आहे. दुसरा मला माहिती नाही. माहिती काढेन. तोवर प्रतिक्षा करा.

# एक चमचा कुठलेही खायचे तेल
# चवीपुरते मिठ

क्रमवार पाककृती: 

१) सर्व प्रथम एक वाटी पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. त्यामधे एक चमचा तेल आणि चवीपुरते मिठ घाला. मी ऑलिव्ह ऑईल वापरले पण इतर कुठलेही तेल चालेल. अगदी तुपसुद्धा चालेल. (इथे मी चहाचे पातेले वापरले. कारण माझ्याकडे घरी तेवढे एकच पातेले आहे.)

२) पाणी खळखळ उकळी येईपर्यंत पेल्यामधे जेवढे पाणी घेतले तेवढेच पिठ घ्या. हे प्रमाण चुकायला नको. हे प्रमाण कमी अधिक झाले की उंडा बिघडतो आणि परिणामी भाकरी जमत नाहीत.

ब्राऊन राईसचे पिठ असे दिसते. पिठ पेल्यात काढताना तो ताटामधे ठेवून जर काढला तर पिठ सांडले तरी ओटा खराब होत नाही किंवा ताटामधे सांडलेले पिठ वापरता येते.

३) पाण्याला एक दोन उकळ्या आल्यात की लगेच आच मंद करुन पाण्यात पिठ घालावे. लगेच पळीने पिठ आणि पाणी एकत्रित करावे. प्रमाणे योग्य असले की उकड घट्टही होत नाही आणि पातळही होत नाही. ही उकड एका बाजूला सरकवावी. असे का त्याचे कारण मी पुढच्या क्रमामधे दिले आहे. इथे फोटोत मी तसे दाखवले आहे.

४) पातेल्याच्या ज्या भागावर उकड नाही तो भाग आचेवर यायला हवा. असे केले की एक दोन वाफ काढताना उकड करपत नाही. वाफ काढणे गरजेचे आहे कारण मग उंडा फार नरम होतो.

इथे खालच्या चित्रामधे बघा मी पातेले अगदी एका बाजूला ठेवले आहे आचेवर जेणेकरुन उकड करपणार नाही. अगदी पिठ पेरुन भाजी करतानासुद्धा मी एक वाफ काढतो. त्यासाठी मी हीच पद्धत वापरतो.

५) एक दोन वाफा आल्यात की उकड मळून घ्यावी. उकड मळताना हाताला पाणी लावत लावत उकड गरम असतानाच ती मळावी. उकड गार झाली की भाकरी फुलत नाही.

६) पोळपाटावर भाकरी लाटून घ्यावी. लाटताना परत तांदळाचेच पिठ वापरायचे. ती नाचणीच्या भाकरीसारखी अशी लाल दिसते.

७) फुलके आपण जसे भाजतो. आधी एक बाजू मग दुसरी आणि परत पहिली बाजू आचेवर धरतो किंवा तव्यावरच फुलवतो. तीच पद्दत इथेही अमलात आणायची. ही झाली पहिली भाकरी. ही भाकरी गरम गरमच छान लागते. नुसती तेलामिठाची चव देखील रुचकर लागते. ह्या भाकरीला पाणी लावायची गरज नाही.

वाढणी/प्रमाण: 
एका वाटीमधे तीन ते चार भाकरी होतात.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतेय भाकरी ! पण एक भाप्र ... रेड व ब्राऊन मध्ये काय फरक ? एकाच कुठल्याही पीठाचीही बनते का?

उकडी ची भाकरी गरम थापून फुगवता पण.. यापेक्षा मोठा सुगरण पण चा पुरावा दूसरा काय? चांगली रेसिपी आहे.

छान जमलीय. चवीला पण छानच लागत असणार.. चायनीज स्टिकी राईस म्हणतात तो आहे का हा ? पिठाला बर्‍यापैकी चिकटपणा आलेला दिसतोय.

छान.

सर्वांचे खूप खूप आभार.

दिनेशदा, वर मी बदल करुन ह्या तांदळाचे चित्र टाकले आहे. ते बघा. मी कंबोडियामधे स्टिकी राईस खाल्ला आहे. बाबूच्या आत तांदूळ भरुन तो बांबू वाफवतात.

मंजुताई आणि भुईकमळ, फक्त ब्राऊन राईसच्या पिठाची भाकरी बनवता येईल. उलट ती आणखी चांगली बनेल. करुन बघ आणि झब्बू टाक.

बी, तू फोटो टाकलास ते छानच केलेस. इथे वाईल्ड राईस म्हणून एक प्रकार मिळतो, त्यात असे मिश्र दाणे असतात. पण ते रंगाने काळे असतात. तूझ्या फोटोतले ब्राऊन दिसताहेत.

हा वाईल्ड राईस खरे तर राईस नसतोच, त्या एका प्रकारच्या गवताच्या बिया असतात, चवीलाही वेगळ्यास लागतात.
बेळगाव भागात देवभात म्हणून असा एक तांदूळ मिळतो, असे मी वाचले होते पण बघितला नाही कधी. मला नीट आठवत असेल, तर चितमपल्लींच्या लेखातही असा देवभाताचा उल्लेख वाचल्याचा आठवतोय.

सुरेख. क्या बात है.

कोकणातल्या लाल तांदुळाची करुन बघायला हवी. गावाहून कण्या आल्याकी त्याचा मऊभात करुन संपतो कधी ते कळतही नाही.

वा छान फुगलेय.

पूर्वी राता नावाचा लाल तांदूळ आमच्या घरी असायचा. त्याची भाकरी अशीच लाल व्हायची.
नाचणीचीही अशीच होते.
मी बर्‍याचदा नाचणी, तांदूळ मिक्स करते भाकरी. अशीच होते लालसर.

अरे वा! मस्त प्रकार बी..शिवाय पौष्टीक..:)
बी एक सांगावेसे वाटते, तु पक्का सुगरण आहेस...:)
कीत्ती छान लाटलीयेस भाकरी, शिवाय ओटा खराब न होण्यासाठी घेतलेली दक्षता.. कौतुकास्पद.

सर्वांचे खूप खूप आभार. फार प्रौत्साहन मिळते आहे अभिप्राय वाचून.
रानई, तुझे नाव फार सुरेख आहे. देवभाताबद्दल मला माहिती नव्हते पण तू खीरीचा उल्लेख केला म्हणून सांगतो इथे सिंगापुरात चिनी लोक ह्याच लाल तांदळाची छान खीर करतात नारळाचे दुध घालून.

भाकरई म्स्त दिसतेय. Happy आमच्याकडे गिरणीत ज्वारीचे पीठ जे मिळते ते जुने असते(विरी गेलेले, घारात ही कधी जुने होते) म्हणून मी त्यात थोडे तांदुळपीठ घालून कोमट पाण्याने भिजवले तर अशाच पाअतळ सुंदर भाकरीज झाल्या. Happy

पूर्वी राता नावाचा लाल तांदूळ आमच्या घरी असायचा. त्याची भाकरी अशीच लाल व्हायची.> जागू, तो
वेगळा.

बी Happy Happy Happy
ऋषींना हि खीर केली जाते. अदिवासी लोकं पिकवतात, प्राण्यांच्या मदतीशिवाय.
साजुक तुप , गुळ आणि पाणी. गरम असतांना दुध वरुन घ्यायचे.
यम्मी Happy Happy :स्मित:.