गुलाबेी निखारा

Submitted by संतोष वाटपाडे on 12 December, 2015 - 23:43

दिवेलागणीला चुलीतून येतो
मऊ भाकरीचा तसा वास तू
मला सोबती पाहुनी लाजलेला
गुलाबी निखारा असावास तू ।

कुठे मंदिरी माळरानी निनादे
मृदुंगासवे मुग्ध हरिपाठ तू
नदी बापुडी उचलुनी लेकरागत
जणू चालला एकटा काठ तू ।

कधी लागता ठेच पायास नकळत
अकस्मात येतोस ओठात तू
जखम चोळते लावते तेल आई
तिच्या भावव्याकूळ बोटात तू ।

फुले दरवळावी वनातील सारी
तसा वाटतो ईश्वरी गंध तू
जळे रात्रभर शांत तेलाविनाही
तशी वात देवालयी मंद तू ।

बिलगती तनाला कधी नाहल्यावर
तसा वल्कलांचा खुळा भास तू
कधी लागता हात वक्षास माझा
अचानक उसळतो असा श्वास तू ।

कधी धुंद लाटेमधे भासतो तू
कधी सागराच्या किना-यात तू
पिले पोसण्या वेदना सोसणा-या
मुक्या पाखरांच्या निवा-यात तू ।

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users