फुसके बार – १३ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 12 December, 2015 - 13:11

फुसके बार – १३ डिसेंबर २०१५
.

१) संजय भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्याचा कार्यक्रम आयोजित करून पेशव्यांच्या वंशजांच्या नावाखाली अतिउत्साही लोकांनी अशोभनीय वर्तन केले आहे. पेशव्यांच्या वंशजांना तो चित्रपट आधी दाखवावा अशी मागणी करताना त्यांची राणे वगैरे गुंडाच्या पंक्तीत बसायची इच्छा आहे काय? दोन गाण्यांवरून चित्रपटाच्या कथानकामध्येही काही विपरीत असू शकण्याची त्यांची भीती अनाठायी आहे असे म्हणता येत नाही. पण त्यांनी त्याकरता न्यायालयाचा मार्ग ठोठावावा. असे प्रतिकात्मक पुतळे जाळण्याचे उद्योग करून बाजीरावाची शोभा करू नये असे वाटते.

२) चेन्नईच्या पुरामध्ये मदतकार्य करण्याच्या बहाण्याखाली चोरी करणा-या संघ स्वयंसेवकांना तेथील स्थानिक लोकांनी चांगलेच बुकलले असे दाखवणारे एक बनावट चित्र नुतेच प्रसारित झाले होते. हे बनावट चित्र तयार केल्याबद्दल उत्तर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष निर्मल खत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्षपदावरील व्यक्ती असे प्रकार करत असेल तर ते खरोखरच धक्कादायक आहे. हे चित्र प्रसारित करून आपल्याकडेही काही लोकांनी हात धुवून घेतले होते. मागे मनमोहनसिंग, सोनिया यांचे अभद्र संबंध दाखवणारी बनावट चित्रेही प्रसारित केली जात होती. असे विकृत प्रकार थांबवण्यासाठी प्रभावी उपाय योजले जायला हवेत. शिवाय व्हॉट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून केल्या जाणा-या खोडसाळपणाचे कर्ते शोधणे फार अवघड नाही, फक्त त्यांच्यावर कारवाई करण्याची इच्छा हवी.

३) उच्च न्यायालयात सलमानखानला निर्दोष म्हणून मोकळे सोडणारे न्या. जोशी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. तसे करणे खचितच योग्य नाही. त्याच्या पत्नी अनघा जोशी यांच्या नावाने एक संदेश व्हॉट्सअपवर फिरत आहे. तो खरोखरच त्यांचा आहे की नाही हे माहित नाही. हा संदेश खाली दिला आहे.

सलमान खानच्या हिट &रन खटल्यामधे तो निर्दोष सुटला. खूप ऊलटसुलट प्रवाद, चर्चा विविध प्रसार माध्यमांमधून ऐकायला आणि वाचायला मिळाल्या. फेसबुक आणि त्यावरील आपले समुहसुद्धा त्यात आले. सलमानला निर्दोष सोडणे हा उच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत धाडसाचा आहे. ह्या निर्णयावर प्रतिक्रीया देणे हा आपला हक्क आहेच कारण आपल्यापैकी प्रत्येकालाच बोलण्याचे, विचाराचे स्वातंत्र्य आहे. पण एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रीया देताना कोणावर लांछन लावणे, शंका घेणे योग्य नाही असं मला वाटतं. एका न्यायमूर्तीची पत्नी म्हणून, ती सुद्धा Justice A.R.Joshi यांची पत्नी म्हणून मी काही कमेंटस् वाचते तेव्हा माझ्या मनात येतं, "खरंच कोणती बरं गृहीतकं मांडली असतील बरं या सा-यांनी कमेंट करण्यापूर्वी?" कोणी म्हणालंय 'न्यायदेवतेच्या डोळ्यांवर कापडी पट्टीमागे नोटांचे वस्त्र, कोणी म्हणालंय न्यायदेवता लाचखोर असते तो देश रसातळाला जातो सांगायला चाणक्यच हवा असं नाही, कोण म्हणतं पैसा हेच सर्वस्व,कोणी म्हणतं इतर अपिल्स पेंडींग असताना हे अपिल सुनावणी होऊन संपले देखिल,कोणाला वाटतं आजच्या काळातही चमत्कार होऊ शकतात तर कोणाला वाटतं न्यायासाठी न्याय कधीच नसतो....असो... ह्या सगळ्या कमेंटमागे जेव्हा न्यायमूर्तीच्या प्रामाणिकपणाविषयी शंका घेतली जाते तेव्हा मात्र मला मनातलं लिहावंच असं तीव्रतेने वाटलं. ज्यांना या निर्णयाविषयी अधिकाराने बोलायचे आहे त्यांनी या निकालपत्राचा खरंच बारकाईने अभ्यास करावा. हे निकालपत्र समोर एकही लिखित मुद्दा न ठेवता सलग पाच पाच तास आणि सलग तीन दिवस तेही डायसवरून म्हणजे भर न्यायालयात माझा नवरा त्याच्या दोन स्टेनोज ना आलटून पालटून देत होता. त्याच्या जवळ रेफरन्सला काही असेल तर ते होते याच प्रकारच्या खटल्यांबाबत सुप्रीम आणि हायकोर्टस् नी दिलेले निर्णय(नंबर्स,तारखा). या खटल्याशी निगडीत सुमारे १२-१५००० पाने हा माणूस अक्षरशः अहोरात्र वाचत होता. याव्यतिरिक्त त्याच्या न्यायालयाच्या कक्षेत येणारे इतर खटले,आयत्या वेळी स्थापन होणारे डिव्हीजन बेंच आणि तिथले खटले ऐकत होता. निर्णय देत होता. हे करत असतानाच रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांचा पालक न्यायमूर्ती (guardian judge) म्हणून तिथल्या न्यायाधिशांच्या अडचणी सोडवत होता, मार्गदर्शन करत होता. त्यांच्या कार्यशाळा घेण्यासाठी तिथे जात होता. गेल्या २३ वर्षात माझ्या नव-याने एकाही व्यक्तीगत समारंभास हजेरी लावली नाही.अपवाद फक्त ह्यांच्या आईचा मृत्यू,माझ्या आई वडीलांचा मृत्यू आणि आमच्या मुलीचा विवाह. रात्री १ते दीड पर्यंत वाचन करणे पहाटे पाच-साडेपाचला उठून पुन्हा वाचन, थोडा व्यायाम,पूजा,जेवण करून कोर्ट. रात्री आठपर्यंत घरी आल्यावर दहा वाजेपर्यंत हा माणूस आमचा. मग तो आणि त्याचे पेपर्स ही दिनचर्या. खरं तर या गोष्टी इतक्या विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नव्हतीच पण कमेंटस् च्या जखमाच इतक्या जबरदस्त झाल्या आहेत ना! आणि झालंय काय एकाच समूहात असल्यानं एका कुटुंबातले सदस्य असल्यासारखेच आहोत नाही का? त्याच हक्काने मन मोकळं करतेय. आणि सांगू का, जो माणूस त्याच्या २३वर्षाच्या नोकरीतली १५हून अधिक वर्ष NDPS(अमली पदार्थ विरोधी) आणि Anti Corruption (भ्रष्टाचारविरोधी) साठी विशेष न्यायाधिश म्हणून काम करतो त्याच्याच निकालावर पर्यायाने न्यायव्यवस्थेवर शंका घेतली जाते यापरतं दुर्दैव ते काय! कोणता खटला कोणत्या जज्ज समोर कधी बोर्डावर यावा हे व्यवस्थापन करणारी न्यायालयीन यंत्रणा वेगळी आहे त्यामुळे हे अपिल इतक्या लवकर कसं जज समोर आलं यावर काहीच सांगता येणार नाही मला. भांगेतही तुळस असते अशी किंवा याहूनही छान छान लिहीणारी बरीच माणसं समूहावर वाचलीयत मी. शेवटी एकच लिहीते सरकारच्या कृपेने माझ्या नव-याला भरपूर वेतन मिळते. बरोबर इतर सोयीसविधाही मिळतात. दोघांच्याही कोकणस्थी संस्कारांमुळे ह्या वेतनातला ७५%अधिक बचतच होते. अजून एक गोष्ट. याच आठवड्यात नवरा निवृत्तही होतोय. तेव्हा आत्ताच्या वेतनाच्या ६०-७०पट रकमेचा चेक तोही tax free हातात येईल. अजून काय हवंय म्हातारा म्हातारीला? या आर्थिक बाबीसुद्धा सांगायची हौस मुळीच नव्हती पण नव-यानं नाही का केलं धाडस तसंच माझंही हे धाडसच. यावरही आता कमेंटस् येतीलच पण मनाला एक समाधान निश्चितच आहे की आजवर माझ्या नव-याने नेहेमी सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून आणि कायदे-नियम योग्य पाळून न्यायदानाचं पवित्र कार्य केलं आहे. - अनघा जोशी

४) किसान या वाहिनीची जाहिरात करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी भरमसाठ रक्कम वसूल केली यावरून वादंग निर्माण झाले होते, पण या वाहिनीवर काही खरोखर उद्बोधक कार्यक्रम दाखवले जातात असे दिसते. आज आवळ्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगाबद्दल माहिती दिली जात होती. आवळ्याची कॅंडी तर आपल्याला माहित आहे, पण त्याचबरोबर आवळे वाळवून त्याची पावडर करण्याची पद्धतही दाखवली. कोणी शेतकरी हे कार्यक्रम पाहून त्यापासून स्फुर्ती घेत असतील अशी आशा.

५) वर उल्लेख केलेल्या आवळ्यावरून आठवले, सी जीवनसत्व असलेल्या फळांच्या तुलनेत फक्त आवळ्यातीलच हे जीवनसत्व तो गरम केला तरी नष्ट होत नाही असे म्हटले जाते. हे कितपत खरे आहे?

६) मदर इंडिया फक्त सिनेमातच असते. आपल्या दिवट्याने गेली १३ वर्षे आपण दारू पिऊन भरधाव गाडी चालवत काही जणांना आयुष्यातून उठवले ते कबूल तर केले नाहीच, उलट कायद्याची ससेहोलपट करत देशाच्या नाकावर टिच्चून स्वत:ला निर्दोष ठरवून दाखवले. तरीही एक माऊली अजूनही गप्पच आहे.

७) लठ्ठपणामुळे स्वत:च्या तब्येतीची आबाळ होते, त्यातून उत्पन्न होणा-या विविध आजारांमधून देशाच्या आरोग्यसेवेवर मोठाच ताण पडतो, अशी अनेक कारणे पाहता जाडपणावर कायद्याने काही निर्बंध घालता येतील काय? तसा कायदा झालाच, तर त्यायोगे कोणती कारवाई किंवा शिक्षा योग्य राहील? कमीत कमी ओबेसिटी टॅक्स तरी लावता येईल काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओबॅसिटी टाळणे सर्वान्नाच शक्य नाही आहे... अनेक घटक कारणीभुत आहे. ज्यान्च्याकडे पैसा आहे त्यान्ना वेगवेगळ्या आहाराचा आणि व्यायामाचा पर्याय आहेत. ज्यान्च्या कडे पैसा नाही किव्वा कमी आहे तेच लोक बहुतान्श जन्क फुड कडे वळतात.

आरोग्य (यात ओबॅसिटी अन्तर्भुत) आणि आर्थिक स्तर यान्चा जवळचा सम्बन्ध आहे.

वर उल्लेख केलेल्या आवळ्यावरून आठवले, सी जीवनसत्व असलेल्या फळांच्या तुलनेत फक्त आवळ्यातीलच हे जीवनसत्व तो गरम केला तरी नष्ट होत नाही असे म्हटले जाते. हे कितपत खरे आहे?>>

मला यातलं ज्ञान अजिबात नाही. एकदा केंद्र शासनाच्या म्हैसूरस्थित एका सुप्रसिद्ध लॅबच्या संशोधनाबद्दल एका कॉन्फरन्स मधे माहीती मिळाली. त्यांनी ताजा आवळा आणि त्यापासून बनवलेले प्रक्रियायुक्त उत्पादनांची तुलना केली. ताज्या आवळ्यापासून मिळणारे सी जीवनसत्त्व १०० टक्के असं गृहीत धरलं तर मुरांब्यापासून आठ टक्के , आवळा कँडी पासून पाच टक्के, आवळा सुपारीपासून १ टक्के आणि च्यवनप्राशपासून ०.५ टक्के सी जीवनसत्त्व मिळते असे निष्कर्ष त्यांना मिळाले.गुग्लुकॉन सी बद्दलचे आकडे लक्षात नाहीत. पण ते ही असेच कमजोर असल्याचे कळाले. इतरही जीवनसत्त्वांची हीच कथा आहे. ज्या फळात पाणी असते त्यांच्यातली जीवनसत्ते प्रकियेमुळे, शिजवण्याने नाहीशी अथवा कमी होतात. फळांच्या सालीचे महत्व या भाषणात कळाले.

( च्यवनप्राश ऐवजी चुकून भलतेच लिहीले होते. मयेकरांना लक्षात आणून देण्याबद्दल धन्यवाद)
ताज्या फळांना पर्याय नाही हे त्यांनी आवर्जून सांगितलं. याच भाषणात फळांच्या सालीचं महत्त्वही कळालं. लद्दाख मधे मिळणा-या खुर्मानी या फळापासून या संस्थेने विकसित केलेला ज्यूस आता बाजारातही मिळतो.

अन्य अभ्यासकांचे स्टडी पेपर्स

१. http://www.fruitandvegetable.ucdavis.edu/files/217102.pdf
२ टेस्ट सॅम्पल्स, मेथडस याबद्दलचा अहवाल इथे आहे. त्यासोबत अन्य काही संदर्भ खाली दिलेल्या लिंक्स मधे आहेत. वेगळी माहीती. https://www.researchgate.net/publication/10779919_Determination_of_total...

लठ्ठपणाचे प्रमाण कमी झाले तर मुंबईच्या लोकलमधील किमान फर्स्टक्लासमधील गर्दी कमी होईल. जोडीला आजकालच्या शोल्डर बॅग्जचेही काही करता आले तर आणखी बरे. शाळकरी मुलांच्या दप्तरांप्रमाणे या बॅगांचही काही करायला हवं. इतके सगळे लोक लॅपटॉप कॅरी करत असतील तर त्यावरही उपाय हवा.

धन्यवाद कपोचे. बाजारात मिळणा-या अनेक च्यवनप्राशमध्ये आवळा नसतोच हे मी काही थेट उत्पादकांकडून ऐकले आहे. असलाच तर अगदी नावापुरताच असतो. जसे आवळ्याच्या तेलामध्येही तो नसतो, केवळ फ्लेवर असतो.
बाकीआवळा उकडल्यावर त्यातले क जीवनसत्व कसे सुरक्षित राहिल याची शंका होतीच. पण याबाबतीतील चुकीची माहिती सर्रास दिली जाते. त्याबद्दल जाग्ृती करायला हवी व आवळ्याचे गरम करता केलेले पदार्थ घेतले हवेत. अर्थात अावळा निव्वळ सुकवला तरी ताज्या आवळ्यापेक्षा त्याचे गुणधर्म कसे बदलतात हे पहावे लागेल. अन्यथा ताज्या आवळ्याला पर्याय राहणार नाही.
लडाखमध्ये मिळणारे खुमानी हे फळ म्हणजे आपण ज्याला जर्दाळु म्हणतो ते. त्यातले कडवट असलेल्या फळांपासून तेल तयार होते, ते सांधेदुखीवर, स्नायुदुखीवर उपयोगी असते.

फळे ताजी कापून खाणे.

धान्येही उकडू शिजवुन खावेत. दळा , मळा , पोळे करा वगैरे खरे तर नको. गव्हाच्या पोळीपेक्षा खीर खावी.

पण्सवय मोडणे मुश्किल आहे.

साखरेचा मधापेक्षा कमी घट्ट/जाड पाक करून तो थंड करून त्यात ताज्या किसलेल्या आवळ्यांचा रस आणि ताज्या लिंबांचा रस व आले किसून त्याचा रस मिठासह घातला तर 'क' जीवनसत्त्वाचा नाश कितपत होईल? तसेच हे सरबत तिकाऊ असते पण जितके जास्त दिवस ठेवावे तितके अधिक प्रमाणात 'क' जीवनसत्त्व नष्ट होईल हे बरोबर आहे ना?

आवळ्यात 'प्रचंड' प्रमाणात व्हिटामिन सी आहे आणि आवळा शिजवल्यावरही ते कायम राहतं, हा एक गैरसमज आहे. आवळ्यात मोठ्या प्रमाणात अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स असतात आणि शरीराला ते हितकर असतात, हे मात्र खरं आहे.
आवळा आणि व्हिटामिन सी यांच्याबद्दल गैरसमज पसरला तो डॉ. राव या भारतीय शास्त्रज्ञामुळे. १९६०च्या सुमारास त्यांनी 'नेचर'मध्ये एक पेपर प्रकाशित केला. त्यात 'आवळा शिजवला तरी व्हिटामिन सी तसंच राहिलं' हे सांगितलं होतं. पुढे तीसपस्तीस वर्षं कोणीही हा समज दूर करायचा प्रयत्न केला नाही. १९९६-१९९९च्या सुमारास बीएआरसीच्या दोन शास्त्रज्ञांनी आवळ्याचा रस गॅमा किरणांपासून बचाव करू शकतो का, याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की, आवळ्याचा रस गरम केला, किंवा शिजवला की त्यात व्हिटामिन सी नव्हतं. मग डॉ. राव यांनी प्रकाशित केलेल्या निष्कर्षांचं काय?

घोळ झाला होता तो एचपीएलसीमुळे. म्हणजे लिक्विड क्रोम्याटोग्राफीमुळे. आवळ्यात असलेले अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स (पॉलिफिनॉल्स) आणि व्हिटामिन सी यांच्या रचनेत साम्य असल्यानं एचपीएलसीमध्ये त्यांचे बॅण्ड्स ओव्हरलॅप होतात. डॉ. राव यांना वेगळे पॉलिफिनॉल्स ओळखता आले नाहीत. त्यांनी त्या सगळ्यालाच व्हिटामिन सी असं समजून टाकलं. प्रत्यक्षात ते व्हिटामिन सी नव्हतं, तर पॉलिफिनॉल्स होते.

बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी आवळ्याचा रस वापरून जे प्रयोग केले, त्याचे निष्कर्ष फक्त व्हिटामिन सी वापरून आले नाहीत. म्हणजे गॅमा किरणांचा रोध पॉलिफिनॉल्स करत होते. व्हिटामिन सीचा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. किंबहुना शिजवलेल्या आवळ्यात व्हिटामिन सी नव्हतंच. पॉलिफिनॉल्स होते.

http://www.ingentaconnect.com/content/asp/jnn/2005/00000005/00000010/art... हे काम करत असताना मला आवळ्याच्या रसामुळे ज्या आकाराचे नॅनोकण मिळाले, ते आकार व्हिटामिन सी वापरून मिळाले नाहीत. हा आवळ्याचा रस त्यातले मायक्रोब्स मरावेत म्हणून मी योग्य ती प्रक्रिया करून वापरला होता. कंट्रोल एक्स्पेरिमेंटात फक्त व्हिटामिन सी वापरून माझं द्रावण फ्लॉक्यूलेट होत होतं. व्हिटामिन सी रिड्यूसिंग एजंट म्हणून जरूर काम करतं, पण माझ्या प्रयोगात मात्र रिडक्शन आणि कणांना आकार देणं ही कामं व्हिटामिन सी करत नव्हतं. आवळ्याच्या रसामुळे मात्र सुंदर हिरवट पिवळ्या रंगाचं द्रावण मिळत होतं, ज्यात त्रिकोणी-पंचकोनी आकाराचे नॅनोकण होते. म्हणजे मी रिड्यूसिंग एजंट म्हणून जो आवळ्याचा रस वापरत होतो, त्यात व्हिटामिन सी नव्हतं. त्यामुळे शिजवलेल्या आवळ्यात 'मोठ्या प्रमाणात' व्हिटामिन सी असतं, हा निश्चित गैरसमज आहे, जो एचपीएलसीमुळे आणि डॉ. रावांचे निष्कर्ष आहे तसे स्वीकारल्यामुळे झाला आहे.

मात्र व्हिटामिन सीमध्ये काही अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म असतात. पॉलिफिनॉल्स आणि व्हिटामिन सी एकमेकांच्या मदतीनं आवळ्यासारख्या फळामध्ये नष्ट न होता राहू शकतात. यासंदर्भातल्या पेपरांच्या लिंका इथे नंतर टाकेन. वर उल्लेखलेल्या पेपरांच्या लिंका माझ्या पेपरात आहेत. बीएआरसीचा पेपर ऑनलाईन उपलब्ध नसावा. अतिशय महत्त्वाचं असं ते संशोधन त्यांनी इम्पॅक्ट फॅक्टर नसलेल्या एका जर्नलात प्रकाशित केलं होतं.

३) उच्च न्यायालयात सलमानखानला निर्दोष म्हणून मोकळे सोडणारे न्या. जोशी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. तसे करणे खचितच योग्य नाही. त्याच्या पत्नी अनघा जोशी यांच्या नावाने एक संदेश व्हॉट्सअपवर फिरत आहे. तो खरोखरच त्यांचा आहे की नाही हे माहित नाही. हा संदेश खाली दिला आहे.

>>>

हा संदेश त्यांचाच आहे. फेसबुकवरील एका क्लोज्ड फेसबुक ग्रूपवर त्यांनी तो टाकला होता व तिथे टाकण्याआधी त्यांनी स्वत: तो मला पाठवला होता त्यामुळे मी त्याच्या खरेपणाची हमी देऊ शकतो.

त्या क्लोज्ड ग्रूपवरुन कुणा बेजबाबदार सदस्याने तो जालावर टाकला असावा व अशा पद्धतीने व्हॉट्सॅप वर व मायबोलीवर तो आला असावा.

तथापि, सौ. अनघा जोशी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय तो संदेश इथे टाकणे हे चूक असून सरदहु धागाकर्ता व संकेतस्थळावर कायदेशीर कारवाई होऊ शकते याची संबंधितांनी नोंद घ्यावी,

धन्यवाद चिनूक्स सविस्तार माहितीबद्दल. आवळ्याच्या पदार्थांच्या आरोग्यासंबंधीच्या उपयुक्ततेबद्दलचे गैरसमज आजही प्रचलित आहेत. मी इतर कमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे गरम न करता आवळा सुकवला तरी त्यातील उपयोगी घटक नाहीसे होतात का, किंवा ते टिकवून ठेवण्यासाठी काय करावे याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञांनी करायला हवे. कदाचित त्यासाठी नव्यानेसंशोधन करावे लागेल. त्याचीखरोखर गरज आहे.

नानापंत,
व्हॉट्सअपवरील संदेशांचा कॉपीराइट असतो का याची मला काही कल्पना नाही. त्यांची मूळ पोस्ट कोठली आहे याचीही मला कल्पना नाही.
मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे अनघा जोशी यांच्या पोस्टमध्ये कोणाची बदनामी करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. ना ती येथे देण्यामागे माझा तसा हेतु आहे. शिवाय ती पोस्ट सोशल मेडियामध्ये कितीतरी ठिकाणी प्रसारीत झालेली मी पाहिलेली आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख काढण्यास सांगण्याचे काय प्रयोजन असावे हे कळत नाही.
कारण काहीही असले तरीगैरसमज नसावा.

-

नानापंत,
ती पोस्ट काढण्याची मला आवश्यकता वाटत नाही. शिवाय जोशी यांनी स्वत: त्याबाबत काही जाहीर आक्षेप घेतल्याचे माझ्या पाहण्यात नाही. जाहीर आक्षेप म्हणण्याचे कारण मी म्हटले तसे सोशल मेडियात ही पोस्ट सर्वदूर पसरली आहे. तेव्हा तुम्ही म्हणता तसे त्यांच्या क्लोज्डग्रुपमधल्या कोणी ती पोस्टबाहेर टाकली याचा शोध घेणे उचित.
आधी म्हतल्याप्रमाणे मी कोणाचा अधिक्षेप केल्याचे मला तरी वाटत नाही. शिवाय माझी पोस्ट ही फक्त माझी व माझीच जबाबदारी समजली जावी.

-

चिनूक्स, सुरेख माहीती. धन्यवाद.

हे नानापंत कोण आहेत ? त्यांना अनघा जोशींनी माहीती उडवायला सांगितलेय हे कसे कळणार ? त्यांच्या परवानगीशिवाय पोस्ट कॉपी करणे चूक आहे हे मात्र बरोबर. शिवाय ती पोस्ट त्यांचीच आहे कि नाही याची खात्री नसताना कॉपी करणेही चुकीचेच आहे. माहीती विश्वासार्ह हवी. अर्थात कुलकर्णींच्या माबोवॉलवर असल्याने मायबोलीचे परंपरागत संकेत इथे लागू होतील का याबद्दल शंकाच आहे.

कमाल आहे कपोचेसाहेब. अजुनही माझ्यावर घसरण्याची संधी तुम्ही सोडत नाही अाहात. असो. व्हॉट्सअपमधील फॉरवर्डेडमेसेजची परवानगी कोणाकडून व कशी घ्यायची हे सांगितले असते तर बरे झाले असते. मी त्याचा संदर्भही दिला आहे. लपवाछपवी केलेली नाही.

राजेशजी, विशेषतः अशा प्रकारच्या संवेदनशील केसमधे, अशा प्रकारचे फॉरवर्ड

(१) त्याच्या स्त्रोताची सत्यता पटल्याशिवाय आणि / किंवा
(२) ते फॉरवर्ड सत्य असल्यास, त्याच्या लेखकाच्या पुर्वपरवानगीशिवाय

ते कुठेही अन्यत्र टाकू नये हा साधा संकेत आहे (तो जरी आपल्याला फॉरवर्ड स्वरूपात आलेला असला तरी, मग तर आपण तो पाठवणार्‍यालाच जाब विचारायला हवा). तो संकेत तुम्ही दुर्दैवाने पाळलेला नाही.

अर्थात, एकदा मजकूर व्हायरल झाला की त्यावर कुणाचेच नियंत्रण राहत नाही. तेव्हा ही बाब लक्षात घेऊन लेखिकेचा कल दुर्लक्ष करण्याचाच असेल तर मला नवल वाटणार नाही.

पहा, विचार करा.

<<मात्र, उद्या त्या पोस्टलेखिकेने कारवाई करायचे मनात आणल्यास तुमच्यासाठी व संकेतस्थळासाठी किती मोठी अडचण उभी राहू शकते याचा अंदाज आपल्याला का नाही?>>
------ अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कुठलाही मजकूर electronic माध्यमात टाकायच्या आधी विचार व्हायला हवा... अशा सन्वेदन विषयाबाबत तर प्रत्येकानेच (मुळ लेखकाने, लेखिने) गन्भिर असायला हवे. नन्तर डॅमेज कन्ट्रोल ला अर्थ नाही...

नानापंत,
तुम्ही संकेताचा उल्लेख केला आहे. मीही त्याबद्दल वर लिहिलेच आहे. उदय यांनीही लिहिले आहे.
कालपासून दोन-तीनवेळा कारवाईची धमकीही देऊन झाली. येथे टाकल्या जाणा-या प्रत्येक मजकूराची शहानिशा येथील संपादकांनी आधीच करावी अशी तुमची अपेक्षा आहे की काय? तुम्ही तर तुमचे नावही सांगत नाही, जोशींची व तुमची ओळख कशी समजावी?
मी आधीच म्हटल्याप्रमाणे मी ज्याचा उल्लेख करतो त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी.
तेव्हा आता यापुढे यावर लिहित नाही.

राजेशजी, माझे नाव सांगितले किंवा नाही सांगितले तर काय फरक पडणार आहे? तुमचे नाव राजेश कुलकर्णी कशावरुन असे विचारले तर? पण असो. तो विषय नाही. माझी व सौ. अनघा जोशी यांच्याशी ओळख आहे का व असल्यास कशी काय आहे हे कसे समजावे हे प्रशासकांनी चौकशी केल्यास व तशीच वेळ आल्यास सांगेन.

येथे टाकल्या जाणा-या प्रत्येक मजकूराची शहानिशा येथील संपादकांनी नव्हे तर लेखक/धागाकर्ता यांनी करायची असते. मी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या संवेदनशील केसमधे तर जास्तच. पण जबाबदारी धागाकर्त्याबरोबरच संकेतस्थळावरदेखील येतेच.

पण..........पण.........पण..........वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आपल्यला माबोचे व आंतरजालीय संकेत लागू पडत नसावेत.

या विषयावर मी ही अधिक काही लिहीत नाही.

आवळ्यात 'प्रचंड' प्रमाणात व्हिटामिन सी आहे आणि आवळा शिजवल्यावरही ते कायम राहतं, हा एक गैरसमज आहे.

चिनुक्स धन्यवाद. मी ही या गैरसमजात आहे/होते.

साखरेचा मधापेक्षा कमी घट्ट/जाड पाक करून तो थंड करून त्यात ताज्या किसलेल्या आवळ्यांचा रस आणि ताज्या लिंबांचा रस व आले किसून त्याचा रस मिठासह घातला तर 'क' जीवनसत्त्वाचा नाश कितपत होईल

विटामिइन सी बद्दल जे वाचनात आलेय त्यावरुन जीवनसत्व शिल्लक राहणार नाही असे वाटतेय.

नानापंत,
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. माझी ओळख तुम्ही जरूर खोटी समजा, तुमची तर मूलभूत ओळखही येथे नाही हे तुमच्या लक्षात येते का?
संवेदनशील वगैरे म्हणत तुम्ही उगाच पराचा कावळा करत आहात. यात काय संवेदनशील आहे मला कळत नाही. बाकी आंतरजालीय संकेतांची मला जाण नाही असे तुम्ही समजत असताल तर हरकत नाही. तुम्ही त्या समजुतीत रहा.
वेळ आलीच तर जोशीमॅडम व मी पाहून घेऊ. तुम्ही काळजी करू नका. यात मी काहीही चुकीचे केलेले नाही याची मला खात्री आहे. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगितलेच आहे. त्याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.
नमस्कार.

बरं Proud Lol