फुसके बार – १० डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 9 December, 2015 - 14:35

फुसके बार – १० डिसेंबर २०१५
.

१) भुपिंदरसिंगला कोणतेही गाणे म्हणायला दिले तरी ते त्याच्या भारदस्त आवाजामुळे फारच गंभीर वाटते.

तसे करण थापर टीव्हीवर एखाद्या रोमॅंटिक चित्रपटाबद्दल कधी बोललाच, तरी अॅटमबॉंब पडून गेल्यावर जे गंभीर वातावरण असेल त्याबद्दल तो बोलत आहे असे वाटेल.

२) टी२०च्या आगामी विष्वचषकाच्या निमित्ताने भाडेकरू असलेल्या एक मुलाची व वयस्कर घरमालकाची जाहिरात दाखवली जात आहे. दोघांमध्ये बरेच वाद झालेले असतात, मुलाने त्यांना बरेच भलेबुरे ऐकवलेले असते. त्यामुळे त्याला पुन्हा जागा देण्यासाठी घरमालक अजिबात तयार नसतात. हा ब-याच गयावया करत असतो. पण घरमालक बधत नाहीत. मग हा मागच्या विश्चचषकाच्या वेळी दोघांनी मिळून एकत्र सामने पहात त्यांच्या संघाला कसे ‘जिंकवून’ दिलेले असते याची आठवण करून देतो. घरमालक बंद केलेला दरवाजा उघडतात.

एरवी जाहिरातींचा तिटकारा असला तरी ही जाहिरात फार छान तयार केली आहे. मुलाचा अभिनय लाजबाब.

३) इंट्रोस्पेक्शन

एका वक्त्यांना मध्येमध्ये उगाचच इंग्रजी शब्द टाकायला आवडे. स्पेक्टॅकल्स या शब्दाच्या ऐवजी त्यांनी टेस्टिकल्स हा शब्द वापरल्याचे तर मी स्वत: ऐकलेले आहे. या दोन्ही शब्दांमध्ये तसे फार साम्य नाही तरी.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यु फिल्म देणार अहेत म्हटले होते तोही त्यातलाच प्रकार.

आता हा प्रकार थोडा वेगळा आहे. मुलांना उपदेशपर व्याख्यानात व्याख्याते अनेकदा म्हणत होते की ‘ते मुलांचे इंट्रोस्पेक्शन करतील’. समोरची मुले म्हणजे २१-२२ची होती. ‘मधूनमधून मुलांचे इंट्रोस्पेक्शन करण्याची नितांत गरज असते’, वगैरे. मध्यांतरामध्ये मी त्यांना त्याबद्दल म्हटलेसुद्धा इंट्रोस्पेक्शन हे आपले आपण करायचे असते. तुम्हाला मुलांचे इव्हॅल्युएशन म्हणायचे आहे का? त्यांचा विश्वास न बसल्यामुळे त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. कदाचित याच शब्दावर ब-याच लढाया मारलेल्या असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत होता. त्यामुळे त्यांचे हे अभिनव इंट्रोस्पेक्शन व्याख्यान संपेपर्यंत चालूच राहिले.

हा 'टंग ऑग स्लिप' प्रकार अनेकदा पाहण्यात येतो, पण भलत्याच अर्थाच्या शब्दाच्या वापराच्या आग्रहाला काय म्हणावे?

४) डेंग्यु (डेंगी)

पुढच्या आठवड्यात आमच्या जवळपास राहणा-या एकाजणांकडे मुलाचे लग्न आहे आणि त्याच्या आईंना डेंग्यु झाल्यामुळे त्या रुग्णालयात आहेत. महापालिका कर्मचा-यांना रूग्णालयाकडून त्याबाबत कळल्यानंतर महापालिकेने त्यांच्या घराच्या आसपास तपासणी केली. नंतर काही ठिकाणी नावापुरती फवारणी केली. एकाजणाकडे डेंग्युच्या अळ्या सापडल्या. कारण तर कळले, पण उपाय काय? नुकसानभरपाई मागू शकत नाही शेजा-यांकडे या हलगर्जीपणाबद्दल. त्यात पुणेकर. आमचाच डास तुम्हाला चावला याचा पुरावा मागायला कमी करणार नाहीत.

डेंग्यु जीवघेणा ठरू शकतो. त्याबद्दल पुरेशी जाणीव अजूनही दिसत नाही. शेजा-यांना थोडा राग आला तरी वेगळ्या भाषेत त्यांच्याकडे हा विषय काढत न बदलला जाणारा पाण्याचा साठा तर कोठे नाही ना याची खात्री करून घेतली पाहिजे. आणि कितीही बाळबोध वाटले तरी रात्री मच्छरदाणी वापरायला हवी.

५) सलमानखानवरच्या खटल्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे. या खटल्यातील मुख्य साक्षीदार असलेल्या रविंद्र पाटील यांच्या आयुष्याची कशी धुळदाण उडाली नव्हे उडवली गेली याचे किस्से सर्वांनी वाचलेले आहेत. आता त्यांची उलटतपासणीच घेण्यात आली नव्हती हे निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यावरून सलमानवरील खटल्यातील त्याच्याविरूद्धचा मोठा पुरावा दुबळा झाल्याचे समजले जात आहे. रविंद्र पाटील तर आता नाहीत. पण ते जिवंत असेपर्यंत त्यांची उलटतपासणी का घेण्यात आली नव्हती याची तपासणी कोण करणार? त्यांच्या मृत्युची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालय देणार का?

अशा सेलिब्रिटींविरूद्ध साक्ष द्याल तर असेच आयुष्यातून उठाल, पोलिस खाते तर तुमच्या मदतीला येणारच नाही, उलट न्यायालयदेखील तुमच्या रक्षणासाठी काहीही करणार नाही हाच संदेश खालच्या न्यायालयाने दिलेला आहे. उच्च न्यायालय याची नोंद घेऊन काही पावले उचलणार का?

६) एका कार्यक्रमाकरता पुण्यातल्या कॉलेजमध्ये गेलो होतो. कार्यक्रम झाल्यावर तेथील कॅंटीनमध्ये बसलो असता खालील संवाद कानावर पडला. आता जेवण झाल्यावर सुप काय मागवतेस गं? तर तिची मैत्रीण म्हणाली, व्हाय ऑलवेज द युजुअल सिक्वेन्स? ही विचारते, म्हणजे काय? त्यावर ती विचारते, तमाशा सिनेमा पाहिला नाहीस का? त्याची टॅगलाइन आहे की व्हाय ऑलवेज द सेम स्टोरी?

अशा गोष्टीही मुले आत्मसात करू शकतात हे या प्रसंगावरून कळते. आणि आपण म्हणतो की समाजात जे घडते तेच चित्रपटात दिसते. येथे मात्र चित्रपटाचे प्रतिबिंब आपल्यावर पडलेले दिसते. कोणाला पटो वा न पटो, मुले अनुकरण करतात हेच वास्तव आहे. त्यामानाने तर हे फार छोटे उदाहरण.

७) कादंबरी कदम ही मराठीतील एक गुणी अभिनेत्री आहे. सुरूवातीच्या मराठी मालिकेनंतर ती वकिलांवर आधारित असलेल्या एका हिंदी सिरियलमध्ये दिसली. आताही एखाद्या मराठी नाटकातून दिसते. तिला अधिकाधिक चांगल्या म्हणजे सकस भूमिका मिळणे हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी व अर्थात चांगल्या मराठी सिनेमासाठी आवश्यक आहे.

८) बुलेट ट्रेनसाठी भारत जपान सरकारशी करार करणार असल्याची बातमी वाचली. आपल्याकडे अनेकदा घातपाताने ट्रेनचे अपघात घडवून आनले जातात. अशा परिस्थितीत असे तंत्रज्ञान आत्मसात करून वापरात आणण्यासाठी भारत सज्ज आहे का?

की रेल्वेचे प्रचंड विस्तारलेले जाळे पाहता दिसणारी घातपाताची प्रकरणे तुरळक आहेत म्हणून बुलेट ट्रेन भारतात येण्यास हरकत नसावी?

९) पुण्याची मेट्रो- पांढरा हत्ती?

पुण्याच्या मेट्रोचा खर्च वाढतच चाललेला आहे. अजुन कशाचाच कशाला पत्ता नाही तरी. आता मुंबईतल्या मेट्रोचे भरमसाट वाढलेले दर पाहता तिथल्या या सेवेचा लाभ घेणारे प्रवासी कोणत्या आर्थिक वर्गातले आहेत आणि त्या तुलनेत पुण्यातल्या टिनपाट पीमटीने प्रवास करणा-यांना मेट्रोचा प्रवास परवडणार आहे का याचा अभ्यास केला गेला आहे का? त्यांनी पीएमटीनेच प्रवास करावा अशी अपेक्षा असेल, तर मग उरलेला मोठा वर्ग स्वत:च्या दुचाकी वा कार वापरण्याची सवय असलेला आहे. हा मध्यमवर्ग वा उच्च मध्यमवर्ग मेट्रोचा वापर करण्याकडे वळेल असा विश्वास सरकारकडे आहे का?

भारतात विविध ठिकाणी झालेल्या मेट्रो प्रकल्पांची व्यवहार्यता तपासली गेली आहे का? व त्यातही पुण्यासारखी रचना असलेल्या शहरात मेट्रो यशस्वी झाली आहे का हे पाहिले गेले आहे का?

की कितीही महाग सेवा उपलब्ध करून दिली तरी सुरूवातीच्या आरडाओरड्यानंतर ती लोकांच्या अंगवळणी पडतेच असा अनुभव आहे?

मुंबईची मोनोरेल फ्लॉप झालेली आहे असे वाचतो. त्यामानाने तिथल्या मेट्रोचा काय अनुभव आहे? तिथले दर भरमसाट वाढवण्याच्या रिलायन्सच्या कार्यपद्धतीवरून इतर ठिकाणी कोणता धडा घेतला जात आहे? थोडक्यात, पुण्याची मेट्रो हा पांढरा हत्ती बनणार नाही ना?

+++++++++++++++

सकारात्मक कमेंट्स करणा-या सदस्यांसाठी निवेदन:

गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर मायबोलीच्या काही सदस्यांनी निव्वळ टवाळखोरी चालू केलेली आहे. एखाद्याने विषयाला सोडून कमेंट करणे व इतरांनी मग त्यावर पुढे तशाच कमेंट करणे असा प्रकार चालू आहे. येथे एखाद्याला ब्लॉक करणे अथवा विषयाला धरून नसलेल्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नसल्याचा गैरफायदा काही सदस्य घेत आहेत. काही जण मी लिहूच नये किंवा दुसरीकडे कोठे तरी लिहावे असा आग्रह अजुनही धरत आहेत. यातला विकृत आनंद व त्यातून मिळणारे समाधान त्यांना जरूर मिळू देत. काही सदस्य मात्र विषयाला धरून कमेंट करत असतात व मी काहीवेळा त्यांच्याशी त्यांच्या मतांबद्दल चर्चाही करतो. परंतु येथे टवाळखोरी इतकी वाढलेली आहे की मला अशा सकारात्मक कमेंट शोधणेच अवघड होऊन बसते आहे.

तेव्हा सकारात्मक कमेंट्स करू इच्छिणा-या सदस्यांना माझी विनंती आहे, की ऍडमिनने अशा टवाळखोरीच्या विकृतीचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या कोणत्याही पोस्टवर काही कमेंट करू नये. आपण माझ्या पोस्ट वाचण्यासाठी वेळ दिलात एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे व त्यासाठी मी आपला आभारी आहे. कमीत कमी मी तरी कोणत्याही कमेंटची नोंद घेऊ शकणार नाही.

मायबोली हे इतर काही संस्थळांप्रमाणे टवाळखोरांचा अड्डा नाही अशी माझी समजूत असल्यामुळे मी येथे लिहित राहिलो आहे. मी कोणाच्याही पोस्टवर जाऊन घाण करत नाही, इतरांकडूनही माझी तेवढीच माफक अपेक्षा आहे. परंतु गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आले आहे. या बाबतीत मी व्यक्तीश: फार काही करू शकत नसल्यामुळे हे निवेदन करत आहे.

वास्तविक या टवाळखोरांपैकी एकहीजण माझ्या पोस्टकडे फिरकला नाही तरी मला काडीचाही फरक पडत नाही. परंतु येथे त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्यांना त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे आहे. या प्रकारातून मायबोलीची प्रतिष्ठा वाढणार असेल तर त्यांनी तसे जरूर करत रहावे. माझी हरकत नाही. तेव्हा टवाळखोरांनो, वर म्हटल्याप्रमाणे तुमची विकृती येथे जरूर दाखवा. तुम्हाला कसलेही भय नाही. तुम्हाला कसलीही लाजलज्जा असेल याची मला अपेक्षाही नाही. तेव्हा तुमचे चालू द्या. उलट हे निवेदन पाहिल्यावर तुम्ही आणखीच चेकाळाल याची मला खात्री आहे.

यापुढे येथील माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये मी हे निवेदन टाकत जाणार आहे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टंग ऑग स्लिप >>>>> Slip of tongue
( इंग्रजी कसे असावे हे तुमच्या धाग्यावर तुम्हीच ठरवणार हे मान्यच आहे. पण इतरेजन वापरत असलेले शब्द मोठ्या मनाने मान्य झालेच तर ... या विचाराने एक दुबळा प्रयत्न केला आहे ).

कपोचेसाहेब, धन्यवाद. मी स्मायली वगैरे वापरत नाही. जो उल्लेख आहे, ती माझी चूक समजा व मोठ्या मनाने माफ करा, किंवा त्या मुद्द्याच्या धर्तीवर गंमतीने लिहिले आहे असे समजा. किंवा तुम्ही सांगूनही मी ती एडिट करत नाही यावरूनही तुम्ही ठरवू शकाल.

पुण्याच्या मेट्रोचा खर्च वाढतच चाललेला आहे. अजुन कशाचाच कशाला पत्ता नाही तरी<<< Lol

तुम्ही सांगूनही मी ती एडिट करत नाही यावरूनही तुम्ही ठरवू शकाल.<<< Lol

>>>कितीही महाग सेवा उपलब्ध करून दिली तरी सुरूवातीच्या आरडाओरड्यानंतर ती लोकांच्या अंगवळणी पडतेच असा अनुभव आहे?<<< अगदी बरोबर. नुसती महाग असेच नाही तर कितीही बिनडोक सेवा! पुण्यातील बी आर टी ने वाहतुकीचा सत्यानाश केला आहे पण काँग्रेसच्या कलमाडींनी तुरुंगात जाण्याआधी तेवढे एक पापकर्म स्वतःच्या खात्यात जमा केलेच.

काँग्रेसच्या कलमाडींनी तुरुंगात जाण्याआधी > अरेच्चा, पण पुणेकरच त्यांना आपले म्हणुन निवडुन द्त होते ना?? Uhoh