खाद्यपदार्थांच्या वेष्टणावरील माहिती

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 4 December, 2015 - 12:27

खाद्यपदार्थांच्या वेष्टणावरील माहिती

काही वर्षापूर्वींची गोष्ट . मुंबई ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे एका ग्राहकाने अशी तक्रार केली की त्याने खरेदी केलेल्या टोमाटो केचपच्या बाटलीवर अपुरी माहिती असल्याने त्याला मनस्ताप झाला . झाले होते असे की त्याने काही दिवस केचप वापरल्यावर त्यात कांदा व लसूण असल्याचे त्याला समजले . मात्र बाटलीवर त्याचा उल्लेख नव्हता . तो जैन असल्याने त्याला हे पदार्थ वर्ज्य होते . आपण नकळत का होईना ते खाल्यामुळे त्याचे मन त्याला खाऊ लागले व परिणामी त्याला मनस्ताप झाला . केचपमध्ये कांदा व लसूण हे घटक असल्याचे लेबलवर छापण्याचे बंधन उत्पादकांवर घालावे अशी विनंती त्याने आपल्या अर्जात केली होती .तसे बंधन घालणे मंचाच्या अधिकारात नसले तरी विशेष बाब म्हणून मंचाने वेष्टणावर ही माहिती देण्याची सूचना उत्पादकाला दिली . प्रत्यक्षात फक्त महत्वाच्या घटक पदार्थांचीच माहिती वेष्टणावर देणे कायद्याने बंधनकारक असल्याने उत्पादाकाची काहीच चूक नव्हती . वेष्टणावरील माहिती वाचल्याने मनस्ताप झाल्याचे हे उदाहरण अपवादात्मक म्हणावे लागेल . एरवी खाद्यपदार्थाचे, विशेषतः पाव , लोणी , दूध , दही . इ. नाशवंत पदार्थांचे वेष्टण उघडण्यापूर्वी त्यावरील माहिती ( मुख्यतः date of packing व best before या तारखा ) पाहणे हे ग्राहकांच्या हिताचेच असते . हृदयरोगाच्या रुग्णांच्या दृष्टीने खाद्यपदार्थातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण आणि प्रकार ही माहिती महत्वाची असते . तर विशिष्ट घटकाची अलर्जी असेल तर वेष्टण वाचल्यामुळे एखाद्या ग्राहकाचा प्राणही वाचू शकतो . परंतु अनेक ग्राहक वेष्टणावरील किंमत आणि वजन या पलीकडे काही बघत नाहीत . त्यामुळे ग्राहकांना माहिती देण्याचा कायद्याचा उद्देश साध्य होताना दिसत नाही .

Standards Of Weights and Measures ( Packaged Commodity ) Rules नुसार प्रत्येक आवेष्टित वस्तूच्या वेष्टणावर काही माहिती छापणे बंधनकारक असते . उदा .वस्तूचे नाव , उत्पादकाचे नाव आणि पत्ता , नक्त वजन किवा नगांची संख्या, उत्पादनाचा किवा packing चा महिना व वर्ष , अधिकतम किरकोळ किंमत ( M.R.P.) ,वस्तूबद्दल तक्रार असल्यास ती करण्याचा पत्ता इ. याशिवाय खाद्यपदार्थांच्या बाबतीत अन्नसुरक्षा व मानके ( Food Security and Standards Act of India ) या कायद्याखालीही काही माहिती देणे आवश्यक आहे . त्यामुळे वरील माहितीखेरीज खाद्यपदार्थान्च्या वेष्टणावर त्यातील घटक पदार्थ , तो पदार्थ कोणत्या तारखेपर्यंत खाणे योग्य आहे , ( best before) तो कशा पद्धतीने साठवावा (storage instructions ) , इ. माहिती दिलेली असते . आजकाल वेष्टणावर पोषणमूल्यांचा तक्ताही ( nutrition table ) दिलेला असतो . त्यामुळे १०० ग्राम पदार्थापासून किती अन्नघटक व उष्मांक मिळतील याची माहिती मिळते . वजनावर नियंत्रण ठेऊ इच्छिणार्याना तो चांगलाच उपयुक्त असतो . एखादा पदार्थ बालकांसाठी किवा विशिष्ट अन्न घटकांची allergy असणार्यांसाठी योग्य नसेल तर तशी सूचनाही वेष्टणावर असते .

Maggi प्रकरणामुळे FSSAI चे नाव सामान्य ग्राहकांनाही माहिती झाले आहे . ग्राहक खरेदी करत असलेले खाद्यपदार्थ सुरक्षित असावेत , दिशाभूल करणारया (खाद्यपदार्थांच्या) जाहिरातींमुळे त्याचे नुकसान होऊ नये यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे . अन्न पदार्थांचे उत्पादन , साठवण , वितरण , विक्री इ.करणार्याना या नियामकाकडून परवाना घेणे किवा नोंदणी करणे बंधनकारक आहे . त्याच प्रमाणे कोणतेही नवीन आवेष्टित खाद्यान्न उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध करण्यापूर्वी नियामकाची मान्यता ( product approval ) घेणे आवश्यक आहे . ( रामदेव बाबा यांच्या नुडलस याच संदर्भात बातमीत होत्या. ) ही व्यवस्था आणि कायदे ग्राहकाच्या रक्षणासाठी कार्यरत असली तरी देशातील लाखो उत्पादक व उत्पादन केंद्रे , व उत्पादने यांच्यावर लक्ष ठेवणे त्यांना केवळ अशक्य आहे . या परिस्थितीत प्रत्येकाने असुरक्षित , अपाय कारक खाद्य पदार्थांपासून तसेच खरेदीतील फसवणूकीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी किमान वेष्टणावरील माहिती वाचणे आवश्यक आहे. .

मुंबई ग्राहक पंचायत , पुणे विभाग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

,वस्तूबद्दल तक्रार असल्यास ती करण्याचा पत्ता इ. याशिवाय
याचा अनुभव घेतला आहे.एका आयुर्वेदिक काढ्याची चव नेहमीसारखी लागली नाही.लेबलवरच्या इमेल पत्त्यावर कळवले तर त्याच दिवशी संध्याकाळी कंपनीचा माणूस येऊन बॅाटल घेऊन गेला आणि दोन दिवसांनी नवी बॅाटल देऊन गेला.सामान्य गिह्राइकांनी एवढं करायला काहीच हरकत नाही.