फाटक - ४

Submitted by घायल on 3 December, 2015 - 12:11

मागील भागासाठी येथे क्लिक करा

इन्स्पेक्टर आले होते आज.
पोलीसांपर्यंत कसं काय गेलं ?

वाकडी वाट म्हणावी तर एका बाजूला पडतं,,नै आपलं घर ?
कुणी चुगली केली का ?
किती प्रश्न विचारत होते ते कागलकर का कोण ते.

माझं दुर्दैव म्हणून डायरी मेजावरच राहीलेली होती. अलगदच त्यांच्या हाती पडली.
डायरी वाचताना चेहरा कसा होत होता त्यांचा जिंकल्य़ासारखा.
कोण आनंद होत होता त्यांना.

मग मी गप्पच बसलो. अगदी ठार बही-यासारखा. प्रश्न रीपीट केला की मला माहीत नाही एव्हढंच म्हणत राहीलो.
मग मला सुचलं ते.

इन्स्पेक्टरला सरळ वॉरंटच मागितलं. माझी चौकशी कशाबद्दल चालू आहे ते मला समजलं पाहीजे ही निर्वाणीची भाषा वापरली. त्याला ती अजिबात आवडली नाही हे दिसून येत होतं. कदाचित उट्टं काढल्य़ाशिवाय हा इन्स्पेक्टर स्वस्थ बसणार नाही असं वाटलं.

ही गंमत अशी सहजासहजी नको त्याच्या हाती लागल्याने जरा खट्टू झालं मन इतकंच.
कर म्हणावं चौकशी. काही काही सापडणार नाही. आता ही नवीन डायरी देखील अजिबात कुणाला सापडणार नाही.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

"मिसेस कागाळे, माफ करा तुम्हाला पुन्हा बोलावल्याबद्दल "
" हं. मला वाटतं, तुम्ही खरंच त्रास देत आहात मला "
" हे पहा, मी तुमच्या वडिलांकडे गेलो होतो. मला त्यांची देहबोली काही ठीक नाही वाटली "
" म्हणजे ? काय म्हणायचंय तुम्हाला ?"
" मिसेस कागाळे, तुम्ही इथे आल्यानंतर मुक्कामाला कुठे उतरलाय ?"
" हे पण तुम्हाला विचारून ठरवायचं का "
" तसं नाही, सांगतो. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या."
" माझ्या मामेभावाचा फ्लॅट आहे. एक चावी माझ्याकडे असते".
" नेहमी तिथेच राहता ?"
" बरेचदा "
" म्हणजे तुम्ही वडिलांबरोबर राहत नाही "
" तुम्हाला काय म्हणायचंय ?"
" मी काय म्हणतोय, ते तुम्हाला चांगलंच कळालंय मिसेस कागाळे "
" ............................................."
" हे पहा, या डायरीतला मजकूर आणि तुम्ही दिलेली माहीती अजिबातच जुळणारी नाही. तुम्ही खरं बोलताय असं गृहीत धरलं तर तुमच्या वडिलांना मदतीची गरज आहे. पण जर तुम्ही दिलेली माहीती चुकीची आहे हे आढळून आलं तर मात्र तुमच्या वडीलांची मदत कुणीही करू शकणार नाही "
" तुम्ही धमकी देताय मि.कागलकर "
" तुमचे मिस्टर वकील आहेत हे विसरलेलो नाही अजून मी. याला धमकी म्हणत नाहीत हे त्यांना विचारा हवं तर "
" मी निघू ?"
" मिसेस कागाळे, एव्हढा मोठा अपघात झाल्याची वर्दी न देणं, सर्वांना अंधारात ठेवणं, याचे अर्थ सुद्धा जमल्यास मिस्टर कागाळेंना विचारा. जर अशा केस मधे पोलिसांशी सहकार्य केलं नाही तर काय होतं हे तुम्हाला जास्त चांगलं समजावून सांगतील. तुम्ही फोनवर त्यांच्याशी बोलून घ्या. मी थांबतो हवं तर "
,
,
,
,
,
,
,,

" काय म्हणतात मिस्टर ?"
" विचारा काय विचारायचं ते ?"
"तुमच्या वडीलांचं दुसरं लग्न झालं होतं "
" मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते. नाही म्हणून "
" हो ते तर झालं. त्यांच्या संपर्कात ऋता पटवर्धन नावाची महीला होती का ? "
" नाही हो "
" आठवून पहा "
" नाही नाही "
" तुम्ही त्यांच्याकडे जात येत नाही, तर तुम्ही इतकं ठामपणे कस सांगू शकता ?"
" मी बाबांना ओळखत नसेन का ? त्यांच्या आयुष्यात अशी दुसरी बाई असती तर केव्हांच कळालं असतं "
" मग, ऋता पटवर्धन या बाइंचा उल्लेख त्यांच्या डायरीत कसा ?"
" मला याबद्दल काहीही माहीती नाही "
" मिसेस कागाळे, मी जेव्हां तुमच्या वडीलांकडे जाऊन आलो, तेव्हांपासून मला काहीतरी विचित्र जाणीव होतेय. तिथं काहीही आलबेल नाही हे माझं पोलिसी मन सांगतंय. तरी तुम्ही तिथे चक्कर मारत नाहीत हे खटकण्यासारखं नाही का ?"
" या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही "
" तुमच्या वडीलांना मदतीची गरज आहे , मिसेस कागाळे "
" हम्म "
" मी यासाठीच बोलावलं होतं तुम्हाला "

------------------------------------------------------------------------------------------

इन्स्पेक्टर कागलकर एकदम स्वच्छ माणूस होता. या खात्यात राहूनही त्यांचे हात रंगलेले नसल्याने कायम साइड पोस्टींग किंवा बंदोबस्ताची ड्युटी नशिबात आलेली होती. अर्थात दुस-याच्या भानगडीत नाक खुपसण्यापेक्षा जे मिळालंय ते काम मन लावून करणे याची सवय त्यांनी केव्हांच लावून घेतली होती. जेव्हां जेव्हां ट्रबल एरियात पोस्टींग झाली, तेव्हां त्यांच्या स्वभावानुसार सर्वांशी गोडीगुलाबीने बोलून, मदत करून, मुहल्ला कमेट्या स्थापन करून त्यांनी शांतता नांदेल असं काम केलं होतं.

केव्हांतरी कुणीतरी शिफारस केली म्हणून त्यांच्या या कामाचं कौतुक झालं. पण राष्ट्रपती पदकासाठी दुस-याचंच नाव गेलं. नेहमीप्रमाणे इथेही डावललं गेलं होतं. त्याचं दु:खं मानून चालण्यासारखं नव्हतं. जिथे भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असतो तिथे असा वेगळा माणूस नकोसा होणार यात शंका नसावीच.

इथे आल्यानंतर सुरूवातीला त्यांनी शिरस्त्याप्रमाणे कामं उकरून काढली. पण आता त्या बंगलीतल्या वृद्धाचं रहस्य त्यांन स्वस्थ बसू देत नव्हतं.

त्यांची मुलगी इथे येते पण त्यांच्याकडे जात नाही.
माणसांचा राबता नाही.
एकमेव मनुष्य त्यांच्याकडे डबा द्यायला जातो , तो ही फाटकातून परततो.

फाटक !

म्हटलं तर त्यांच्या आणि बाहेरच्या विश्वाला जोडणारा एक दुवा, म्हटलं तर मोडकळीला आलेलं , बिजाग-यांचा आवाज करत बंद होणारं नेह्मीसारखं फाटक !

नाही, नेहमीसारखं काहीच नाही इथे !
बोलताना वेडा वाकडा होणारा चेहरा, निस्तेज डोळ्यात अधूनमधून चमकणारी लकाकी, बोलताना रोखली जाणारी शून्यवत नजर.
बाहेरच्या माणसाची या विश्वात झालेली ढवळाढवळ कदाचित आवडली नसावी.

त्यातून ही डायरी.
ऋता पटवर्धन कोण ?
इशान गदगकर यांची कुंडली मांडण्याची वेळ आली होती.
कागलकरांमधला पोलीस आता जागा होत होता.

ब-याच वर्षांनी त्यांचं आवडतं काम त्यांना मिळत होतं. अचानकच !!

कागलकरांनी नकळतच ये शाम मस्तानी या गाण्य़ाची शीळ घालायला सुरूवात केली तसं गायकवाड चमकून त्यांच्याकडे बघू लागला.
साहेब खुषीत दिसतात.

आता प्रचंड काम येईल बहुतेक.
गायकवाडचा अंदाज खरा ठरणार होता.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरू आहे कथा. स्मित थोडे मोठे भाग टाका की. + १

आणि जास्त वेळ लावु नका ना नविन भाग टाकायला आधीची कथा विसरायला होतं त्यामुळे.

आधीच्या सर्व भागांच्या लिंक प्रत्येक धाग्यात सुरुवातीला दिल्या तर सोयीस्कर होइल. >>> + १००००
आणि जास्त वेळ लावु नका ना नविन भाग टाकायला आधीची कथा विसरायला होतं त्यामुळे. >>> + १००००

बरेच दिवसानी काहितरी मस्त वाचतेयं माबो वर

सर्वांचे आभार.
भाग छोटे आहेत ही तक्रार मान्यच आहे. एक वाचक म्हणून होणा-या गैरसोयीची पूर्ण कल्पना आहे.
एक सकस कथा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. कथानक साधारण कसे जाईल याचे तीन चार मार्ग असल्याने विचार जास्त होतो. जसा वेळ मिळतो तसा लिहून काढतो. पण सध्या आजारी पडून खूपच अशक्तपणा आल्याने मोठे भाग लिहीयचं ठरवूनही जमत नाहीये. मात्र पुढच भाग लिहीला नाही तर अपराधी वाटतं हे ही खरं.

तक्रार दूर करण्याचा प्रयत्न करतोच आहे. पुन्हा एकदा आभार.

हाही भाग मस्तच.. ओह तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, ठणठणीत बरे व्हा आणि मगच येऊ दे पुढचा भाग...!
पु.ले.शु.