फुसके बार – ०१ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:44

फुसके बार – ०१ डिसेंबर २०१५
.

१) दृश्यम या आताच्या वर्षात गाजलेल्या सिनेमातील काही चूका याआधी दाखवल्या होत्या. आता या सिनेमाचा शेवट टीव्हीवर पाहताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. एकतर त्याच्या घराच्या परसात पुरलेला मृतदेह घरच्यांना न कळताच एकट्याने पुन्हा उकरून काढणे म्हणजे दिव्य. तो मृतदेह घरच्यांच्याही नकळत तेथून हलवून पोलिस स्टेशनच्या बांधकामामध्ये पुरला हे गृहित धरले, तरी कोठल्यातरी प्राण्याचा मृतदेह घरातल्या खड्ड्यात पुरण्याची काय गरज होती? तो उकरलेला खड्डा तसाच बुजवला असता तरी चालले असते की. तेवढेच कुठल्या तरी मृत प्राण्याचा देह शोधून आणण्याचे काम तरी वाचले असते बिचा-याचे.
तर तो मृत प्राणी दाखवला होता तो आपल्यासाठी, हुश्श म्हणून सुस्कारा सोडण्यासाठी. कथेत त्याची काहीच गरज नव्हती.

२) घटस्फोट घेणा-या पालकांवर काढलेले किंवा कथेचा तसा एक भाग असलेले अनेक सिनेमा आहेत. पण केवळ त्यात भरडल्या जाणा-या मुलांच्या भावविश्वावर आधारलेला, म्हणजे मुलांच्या नजरेतून काढलेला एखादा सिनेमा आहे काय? या एकाच विषयावर दीडएक तासाचा सिनेमा काढणे हे खरे तर दिव्यच.

३) चित्रपटगृहात वाजवल्या जाणा-या राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिले नाही, म्हणून मुंबईतील एका चित्रपटगृहातून एका कुटुंबाला बाहेर काढण्यात आल्याची घटना आज घडली. आता ही बाब अशीही नाही, की पुन्हा एकदा राष्ट्रगीत वाजवून त्या कुटुंबाला उभे राहण्याची संधी देता आली असती. त्यात ते कुटुंब निघाले मुस्लिम.

टीव्हीवरील चर्चेत एमआयएमच्या आमदार इम्तियाज जलील यांनी बोलण्याच्या ओघात राष्ट्रगीताला नौटंकी म्हटले. चर्चेतील इतरांनी त्याला आक्षेप घेतला तरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची तसदी आमदारांनी घेतली नाही. आता त्या कुटुंबाला, जलील यांना पाकिस्तानात पाठवा वगैरे सुरू होईल. ते कुटुंबही बहुधा टीव्हीकॅमे-यांना सापडणार नाही कदाचित, त्यामुळे त्यांनी ठरवून तसे केले का किंवा त्यांचा दुसरा काय हेतु होता हेही कळायचे नाही.

आधीच चर्चेला विषय कमी आहेत, यात आणखी एकाची भर.

आता मनोरंजनासाठी आलेल्या प्रेक्षकांवर चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवून उभे राहण्याची वेळच का आणावी, तो नियमच बदलून टाकावा का, वगैरे चर्चा झडतील. आज ते मुस्लिम कुटुंब होते, उद्या केवळ मौजमजेच्या मुडमधील इतर कोणी असे केले तरी आश्चर्य वाटायला नको. कोणतेच नियम पाळण्यासाठी नसतात हे आपण वारंवार दाखवतो, तेव्हा हा प्रकार बिगरमुस्लिमांकडूनही नक्की होणार, म्हणून म्हणतो. अर्थात कोणीही असे वागले तरी ती चूकच.

४) अब्जाधीश मनोज भार्गव तासभर सायकलिंग केल्यावर घराची गरज भागवता येण्याइतकी वीज तयार करता येईल अशा यंत्राची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करणार आहेत. येत्या चार महिन्यात ही यंत्रे उपलब्ध होतील. अर्थात त्यावर एअरकंडिशनर चालणार नाहीत इतक्यात. भारतात बनवल्यास सुमारे बारा हजार रूपयांत हे यंत्र तयार होईल असे त्यांना वाटते. पण या प्रकारामध्ये तयार झालेली वीज साठवण्यासाठी लागणा-या बॅटरींची किंमत व शिवाय या बॅटरीज काही काळानंतर बदलाव्या लागतात, त्याचा खर्च, याची कल्पना भार्गवसाहेबांना नसेल असे वाटत नाही. हे तंत्रज्ञान भारतभर आणि जगभर उपलब्ध करून द्यावे असा त्यांचा मानस आहे. मला वाटते की त्यात बॅटरीचा मोठाच अडसर येऊ शकतो. त्यावरचा उपाय न शोधल्यास हे सायकलचे सांगाडे पडून राहतील. तसे व्हायला नको.

शिवाय आता जे मॉडेल दाखवले जाते, त्यात हे यंत्र आरामखुर्चीत बसल्यासारखे चालवायचे आहे. त्या परिस्थितीत सलग तासभर ते चालवणे सोपे होणार नाही. कदाचित याबाबतीतील अनुभवावरून त्यांना त्यात बदल करावे लागतील.

लोकोपयोगी असलेले आणखी तीन वेगवेगळे प्रकल्पही त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडची चार बिलियन डॉलर एवढी रक्कम ते लोकोपयोगी कामासाठी देण्यास ते तयार आहेत. त्याबाबतीत ते सांगतात की आजही त्यांचे राहणीमान फारच साधे आहे व त्यांना एवढ्या संपत्तीची गरज नाही.

५) हिंदूंना गाय पूज्य आहे, तेव्हा ते तिला मारू शकणार नाहीत, हे माहित असल्यामुळे एका यवन आक्रमकाने युद्धाच्या वेळी रणांगणावर गायी सोडल्या होत्या. तेव्हा आपल्या हातून गोहत्येचे पातक होईल या भितीने त्या धन्य हिंदू राजाने शरणागती पत्करली असा इतिहास आहे.

अशा प्रकारच्या धार्मिक आस्थांमुळे, मग भलेही त्या खुळ्या असेनात, कसे नुकसान होते याचे एक उदाहरण इस्लाममध्येही दिले जाते. लैलत-अल-हरीर नावाच्या युद्धात इमाम अली मुआविया विरुद्ध जिंकायच्या बेतात असताना अम्र इब्न अल-आस यानं मुआवियाला सल्ला दिला की सैनिकांच्या भाल्यांवर कुराणाच्या आयत लिहिलेले कापड (मुसहफ) लावा. झालं! इमाम अलीे म्हणाले अरे, ही फक्त एक हलकी युक्ती आहे, याला बळी पडू नका! पण प्रत्यक्ष इमाम अली, रसूलल्लाहचे उत्तराधिकारी लढा म्हणत असताना त्यांच्या बहुतांश सैनिकांनी शस्त्र खाली ठेवली. कुराणच्या आयतांचा अपमान कसा करणार? यामुळे अजेय इमाम अलींना अपमानास्पद तडजोडीला तयार व्हावं लागलं.

आपल्याकडे आताही अशी उदाहरणे दुर्मिळ नाहीत. शिवसेनेचाही अगदी प्रथमपासून तोच कावा आहे. भगवा झेंडाच स्वत:चा म्हणून मिरवला की त्यांचा निषेध करणा-यांना त्याबद्दल काहीच करता येत नाही. एरवी इतर पक्षांचे झेंडे निषेध म्हणून जाळता येतात. निषेध करण्याबद्दलच नाही, तरी एरवीही लोकांच्या भावनांशी जोडण्याचाच उद्योग आहे तो. यांनी जगभर हिंदू धर्माला बदनाम करण्याचा चंगच बांधला तरी सामान्यांच्या मनात मात्र यांचे गुंड भगवे घालून, भगवा झेंडा घेऊन फिरतात तेव्हा हेच हिंदू धर्माचे पाईक आहेत असा समज होतो.

६) ठष्ट हे संजय पवारांचे नाटक पुन्हा एकदा रंगभुमीवर येत आहे ही आनंदाची घटना आहे. मागच्यावेळी पुण्यातील एका वाचनालयाने पुढाकार घेऊन या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले होते, तेव्हा फारच थोडी तिकिटे विकली गेल्यामुळे त्यांची पंचाईत झाली होती. आता तसे व्हायला नको.

पवारांना या नाटकाबद्दल मॅजेस्टिकचा जयवंत दळवी पुरस्कारही नुकताच मिळाला आहे.

ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी ठष्ट म्हणजे ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट. अतिशय जिव्हाळ्याचा व वास्तववादी विषय आहे.

७) त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटगृहात वाजवल्या जाणा-या राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिले नाही, म्हणून मुंबईतील एका चित्रपटगृहातून एका कुटुंबाला बाहेर काढण्यात आल्याची घटना आज घडली. आता ही बाब अशीही नाही, की पुन्हा एकदा राष्ट्रगीत वाजवून त्या कुटुंबाला उभे राहण्याची संधी देता आली असती. त्यात ते कुटुंब निघाले मुस्लिम.
<<
राष्ट्रगीताचा अपमान कुणीही करू नये. त्यातून कुणालाही सूट नाही.

त्या कुटुंबाचं वागणं बेजबाबदार आहेचा.

पण बाहेर कढणा-यांची देशप्रेमाची हौस फिटणे त्याहून जास्त महत्वाचं आहे, आता आयुष्यात दुसरं काही केलं नाही तरी चालेल.

राष्ट्रगीताच्यावेळी उभे राहणे बंधनकारक नाही हे वाचून आश्चर्य वाटेल. एक्सप्रेसमधील ही बातमी वाचा.
http://indianexpress.com/article/explained/standing-for-anthem-theres-no...

मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया दौऱ्याच्या सुरूवातीलाच विचित्र स्थितीचा सामना करावा लागला. मॉस्को पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला जात होता. सुरूवातीच्या सॅल्यूटनंतर अधिकाऱ्याने पंतप्रधानांना पुढे चलण्यासाठी इशारा केल्यानंतर पंतप्रधान चालू लागले. नेमक्या त्याच वेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले. रशियाचे अधिकारी मात्र आपापल्या जागेवरच थांबले परंतु मोदी मात्र चालतच राहिले.