फुसके बार – ३० नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 29 November, 2015 - 13:30

फुसके बार – ३० नोव्हेंबर २०१५
.
.

१) नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर विविध देशांमधील रेल्वे प्रवासाबद्दल कार्यक्रम दाखवत आहेत. त्यात थायलंडमध्ये एका ठिकाणी शब्दश: भर मार्केटमधून जाणारी ट्रेन आहे. फळे-भाजीचे स्टॉल्स, खाण्यापिण्याचे स्टॉल्स असलेले अगदी वर्दळीचे मार्केट. ट्रेन येण्याची वेळ झाली की अगदी काहीच सेकंद आधी आपापल्या वस्तु ट्रॅकवरून काढून घेतात. सगळे कसे शिस्तीत चालते. प्रत्येक दुकानदाराला या ट्रेनच्या वेळेची कल्पना असते. दिवसातून आठ वेळा ट्रेनची ये-जा होते. प्रत्येकवेळी कोणताही गोंधळ न होता, ट्रेन येण्याच्या काही सेकंदच आधी आपापले सामान हलवणे, ट्रेन गेल्यावर पुन्हा पूर्ववत करणे हा उद्योग दररोज चालू असतो.

आपल्याकडील ट्रेन्सबद्दलही त्यात दाखवले आहे. प्रचंड गर्दीने भरलेल्या गाड्या दररोज चालतात. आपल्याकडे ट्रक ओव्हरलोड झाले तर त्याविरूद्ध दंडात्मक कारवाई होते. कारण त्यामुळे त्या ट्रकलाच नव्हे, तर ते ट्रक ज्या रस्त्यावरून धावतात, तेथील वाहतुकीलाही त्यामुळे धोका असतो. त्याच प्रकारे या ट्रेन्स अशा प्रकारे नेण्यामुळे त्यातून प्रवास करणा-या प्रवाशांना काही धोका नसतो का? रेल्वे कंपनी अशा प्रवासाला परवानगी देत एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळते का, हे प्रश्न विचारले जात नाहीत. आपल्याकडे अशा प्रकारे दररोज चाळीसजण मृत्युमुखी पडतात असे या कार्यक्रमात सांगितले. ही फिल्म केव्हा बनवली असेल कोणास ठाऊक, पण त्यानंतर या संख्येत वाढ झाली असण्याचीच शक्यता अधिक. याबद्दल फार आवाज उठवला जात नाही, हे वास्तव. रोज मरे त्याला कोण रडे, हे आपण याबाबतीत प्रत्यक्ष पहात आहोत.

याच कार्यक्रमात स्विट्झर्लडमधील ट्रेन्स तेथील हिवाळ्यात होणा-या बर्फवृष्टीतही कशा प्रकारे चालू ठेवल्या जातात, त्यामागची प्रगत अभियांत्रिकी वगैरे गोष्टीदेखील दाखवल्या.

सर्वात कौतुक केले गेले ते आपल्याकडचे रामेश्वर बेट जोडणा-या रेल्वेचे. खोल समुद्रात उभे केलेल्या कॉलम्सवर उभा केलेला हा पूल. पम्बम ब्रिज असे त्याचे नाव. मागे एका चक्रीवादळात हे कॉलम्स वाचले, मात्र पूल पडला. तर आपल्या जिद्दी अभियंते-मजुरांनी केवळ ४६ दिवसांमध्ये तो पुन्हा बांधून काढला. अशी कमाल आपल्याकडेही होऊ शकते. त्याकाळी रामेश्वरला जोडणारा वाहनांसाठीचा पूल होता की नाही माहित नाही. त्यामुळे निकडीचा परिणाम म्हणून की काय कोणास ठाऊक, पण इतक्या कमी काळात हे काम पूर्ण करणे हा विक्रमच असला पाहिजे. या पुलाची देखभाल हादेखील रेल्वे कर्मचा-यांसाठी फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यांच्याकडून या पुलाला अगदी प्रेमाने जपले जाते.

फिलिपिन्स व कंबोडियामधली तर त-हाच न्यारी. तेथे सरकारी ट्रेनच्या रूळांवर बांबू व हलक्या धातुच्या फ्रेमपासून बनवलेले खासगी पोर्टेबल सांगाडे रुळांवर चालवले जातात. कधी हाताने ढकलत, तर कधी डिझेल इंजिन लावून. ट्रेन आली की सराइतपणे तो सांगाडा रुळांवरून बाजुला काढला जातो. या प्रकारात कधीकधी अपघातही होतात. दुस-या व्यक्तीची तशीच खासगी ट्रेन मध्ये आली, तर एकच रूळ असल्यामुळे त्याला ओव्हरटेक कसे करणार? तर समोरचा माणूसही समजुतदारपणे त्याच्या ‘गाडी’चा सांगाडा बाजुला करतो. सगळे कसे राजीखुशीने. रात्रीच्या वेळी हाच सांगाडा रुळाच्या बाजुला काढून त्याचे डायनिंग टेबल केले जाते.

अशी माहितीप्रद चॅनल्स आपल्यासाठी सहजपणे उपलब्ध होणे हा जागतिकीकरणाचे जे काही चांगले परिणाम झाले आहेत त्यातला एक नक्की आहे.

२) टीव्हीवरील काही जाहिरातींमधील नवरे बायकोसाठी सरप्राइज म्हणून कार, मोबाइल फोन घेताना दाखवतात. नव-यांची त्या बाबतची निवड बायकोला पटलीच पाहिजे असते, असा त्यांचा आग्रह असतो. बरे, या वस्तु अशा नाहीत, की बायकोला आवडल्या नाहीत तर बदलून आणाव्यात. तेव्हा हा नवरा बायकोला घेऊन या वस्तु निवडण्यासाठी बाजारात जातो आणि त्यादरम्यान त्याची बायको काही फिचर्सबद्दल शंका विचारते, अशा जाहिराती या गाढवांकडून केव्हा पहायला मिळतील? अशा खरेदीसाठी बायको नव-याला घेऊन जाते, हे पाहता येणे ही तर फार दूरची गोष्ट झाली.

३) छत्तीसगढमध्ये हॉकीची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रायपूरसारख्या शहरी भागात त्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे, तरी तेथे असलेले नक्षलवाद्यांच्या प्रभावाचे वातावरण पाहता हे मोठेच धाडस म्हणावे लागेल. काल अर्जेंटिनाच्या खेळाडुंच्या बसला एक दगड लागल्यामुळे आतापर्यंत ही स्पर्धा सुरळीत चालली होती, त्याला गालबोट लागले. तरी यापुढे आणखी काही गंभीर घडून नये म्हणून आयोजकांना व रमणसिंग सरकारला आणखी काळजी घ्यायला हवी.

४) महात्मा फुलेंच्या नावाचा समता पुरस्कार अरूंधती रॉय यांना दिला तो भ्रष्टाचारशिरोमण्यांच्या दावेदारांमधील भुजबळांच्या हस्ते. महात्मा फुले तर धन्य झालेच असतील, शिवाय असहिष्णुता हा शब्दच अपुरा पडेल इतके भयानक वातावरण देशात आहे असे तारे तोडत अरूंधती रॉय यांनीही आग लावण्याची संधी सोडली नाही. महापुरूषांच्या नावाने असले धंदे करणा-यांना चाप बसवायला हवा.

५) इम्तियाझ अलीचा सिनेमा म्हणजे पहावा की नाही याचा पुन्हा विचार करावा लागावा अशी परिस्थिती. मागच्या रॉकस्टार सिनेमातला हिरो का बंड करत असतो हेच शेवटपर्यंत कळत नाही. यावेळचा ‘तमाशा’ त्यामानाने चांगला. वेगळी हाताळणी. लहानपणापासून कानावर पडणा-या पौराणिक म्हणा किंवा इतर गोष्टींमधले प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे करण्याची सवय दाखवणे ही कल्पना भन्नाट. पण यावेळी रणबिर कपूरकडून त्याच्या ‘पार्ट टू’चा अभिनय करून घेण्यात दिग्दर्शक कमी पडतो. एकट्या दीपिकानेच एकाच वेळी छान दिसायचे व अभिनयही करायचा असा प्रकार. त्यामुळे नक्की काय दाखवायचे आहे हे स्पष्ट करण्यात इम्तियाझ अली पुन्हा कमी पडतो.

बाकी पालकांनी मनासारखे करिअर करू न देण्याचा व त्याच्या परिणामांचा प्रकार तर एव्हाना घिसापिटा झालेला आणि त्यातही तो येथे अतिशय कल्पनाशून्यपणे हाताळलेला.

बॉंडचे सलग वीस सेकंदांचे चुंबनाचे दृश्य गाळले म्हणे. पण तमाशातली तीन-चारवेळा थोडा थोडा वेळ घेतलेली चुंबने चालतात असे दिसते.

६) मूळ नाटकाचा प्लॉट भोंगळ असल्यामुळे, गाणी माहित असल्यामुळे, झगमगाटाच्या आड सुबोध भावेंचे दिग्दर्शकीय दारिद्र्य झाकण्याचा बराच अनुभव असल्यामुळे आणि सूर निरागस हो या सुंदर सुरूवातीनंतर मध्येच गणपती बाप्पा मोरयाचा कोरस ऐकल्यावर तो सूर भयानक हो झाल्यामुळे कट्यार ऑप्शनला टाकली आहे. नाटकाचे महत्त्व गाण्यापुरतेच होते, तर नाटक पाहण्यापेक्षा ती गाणी ऐकलेलीच बरी असा प्रकार होता. तसेच यातली गाणी ऐकली. एकूण येथेही जुनी गाणीच नव्यावंर मात करतात. सवयीचा भाग असेल कदाचित. नाटकापेक्षा सिनेमाचा प्लॉट कसा आहे वगैरेसाठी सिनेमा पाहण्याची तूर्त गरज वाटत नाही.

६) मागे एका मराठी चॅनलवर बाजीराव-मस्तानीतल्या पिंग्याच्या गाण्याच्या स्टेप्सवर देवदासमधील डोला रे डोला गाणे वाजवून दाखवले होते. त्या स्टेप्स इतक्या बेमालूम मिसळलेल्या दिसत होत्या की जणु ते गाणे दुस-या सिनेमसाठीच बनवले होते.

हॉलीवुडमध्ये उत्तमोत्तम ऍनिमेशनपट असतात. त्यातील पात्रांचे केवळ चेहरे बदलून व संवाद बदलून एखादा पूर्ण भारतीय वाटेल असा ऍनिमेशनपट तयार करता येईल का?

७) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या आड येण्याचा दांडगटपणा

उद्धव ठकवणारे हे आपल्या आमदारांची फौज घेऊन मराठवाड्याच्या दौ-यावर गेलेले आहेत. इतरत्र उतू जाईल इतका भ्रष्टाचार करून त्यातला अंशत: निधी शेतक-यांना शेळ्या व आर्थिक मदत देत जनतेची सहानुभूती मिळवायची हा प्रकार चालू केलेला आहे. मागेही शेतक-यांना आर्थिक मदत देण्याचा प्रकार केला होता. हा पैसा येतो कोठून? मुळात ही मदत सरकारी आहे की पक्षाची आहे हेही कळत नाही.

याच दौ-यात ठकवणारे यांनी सरकारी अधिका-यांना दमात घेतले व त्यांनी वेळेत कामे केली नाहीत, तर त्यांना शिवीशेण पद्धतीने अद्दल घडवण्यात येईल अशी जाहीर धमकीदेखील दिली.

तिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोल्हापूरात अनधिकृत मंदिरावर कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या अधिका-यांविरूद्ध तेथील आमदारांनीच आंदोलन केले. शिवाय महाआरतीचा तमाशा केला. मागे हे महाआरतीचे तंत्र वापरूनच या लोकांनी धार्मिक भावना भडकवायचा उद्योग केला होता. तसेच सुधींद्र कुलकर्णींना काळे फासल्याचे ठकवणारे यांच्यासह अनेक नेत्यांनी समर्थन केले होते.

या सर्व प्रकारांवरून ठकवणारे यांचा कायद्याच्या राज्यावर विश्वास नाही असे स्पष्ट दिसते. अर्थात ही काही या लोकांची पहिली वेळ नाही.

सदर आमदारांना तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत अडथळा आणल्याबद्दल आत टाकायला हवे. अशी कारवाई झाली तर यांचे टाळके ठिकाणावर येईल व पुन्हा जाहीर गुंडगिरी करण्यापूर्वी ते थोडा तरी विचार करतील.

आजकाल असहिष्णुतेविरुद्ध उठसुट कंठशोष करणा-यांना ही उघडउघड चाललेली गुंडगिरी दिसत नाही हीदेखील कमालच म्हणायला हवी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंबर २ - आक्षेप मान्य.. परंतू ज्या सोपेपणाने नवरा त्याची कार विकून दोन नव्या कार घेतो तो सोपेपणा त्या कंपनीची सर्वीस वापरून मिळतो एवढेच त्यांना दाखवायचे आहे.. सो बायकोला नाही आवडली कार तर हाय काय अन नाय काय विकून टाका अन घ्या अजून एखादी कार.. Proud Wink Lol

बाकी सर्व लिखाण मार्मिक! Happy

राकु, अमृत नावा च्या मागच्या पिढीच्या मासिकात 'मी हे वाचले आहे, तुम्ही? "या नावाचे एक सदर असे. त्यात अशा छोट्या छोट्या ट्रिविआ असत. त्या फॉर्मची आठवण येते. मात्र त्यात मतांऐवजी फक्त हटके अशा फॅक्ट्स असत