फुसके बार – २९ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 28 November, 2015 - 11:24

फुसके बार – २९ नोव्हेंबर २०१५
.
.
१) ज्योतिबा फुलेंना भारतरत्न पदवी देण्यात काही अडचणी येतील असे वाटते. शक्य असेल, तर त्यांना तो पुरस्कार मिळावाच. शक्य असेल, तर म्हणण्याचे कारण तसे झालेच, तर मग स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या महापुरूषांच्या नावांची रांगच लागेल.

बाकी त्यांनी व सावित्रीबाईंनी लोकांना केवळ साक्षर होण्यास नाही शिकवले, तर त्या माध्यमातून विचार करायला शिकवले ही बाब नेहमीच दुर्लक्षिली जाते, व ऐतिहासिक राजांच्याबाबतीत जे केले जाते, तसे त्यांच्या नावाचा केवळ जागर करण्यात धन्यता मानली जाते. एवढेच काय, त्यांच्या नावाचा गैरवापर करत भ्रष्टाचार करणा-यांपैकी काही जणांना आत जावे लागेल अशी चिन्हे आहेत. त्यांच्या कार्याची थोडी जरी चाड असेल, तर आज शिक्षणाच्या नावाखाली चाललेला बाजार बंद केला पाहिजे.

सावित्रीबाईंनी त्यांचे आयुष्य स्त्रियांसाठी वाहिले, पण त्यांच्यामुळे आज सहज शिकू शकत असलेल्या महिला ज्योती-सावित्रीबाईंचा मूळ संदेश विसरून भौतिक सुखांमध्येच अडकून बसल्या आहेत हे दुर्दैव.

काही जणांना माहित नसेल तर ज्योतिबा हे एक व्यावसायिकही होते. खडकवासला धरणाच्या बांधकामावेळी बांधकाम साहित्य पुरवणा-यांपैकी ते एक होते. आजच्या काळात ते असते, तर समाजसुधारक म्हणून सोडा, कंत्राटदार म्हणून तरी त्यांना कोणी उभे राहू दिले असते का अशी शंका वाटते.

यापूर्वी बकवास मालिका अगदी नियमाने व व्यसन लागलेल्यांबद्दल मी लिहिले होते. सामाजिक अभिसरणाचा पुरावा हवा असेल, तर सर्वच स्तरांमधील लोक या मालिका आनंदाने व आवडीने पाहतात. ज्योतीसावित्रींना या व अशा संकटांची काय कल्पना? या व अशा अनेक कारणांनी सुमारपणापाशी स्तब्ध झालेल्या समाजाला हलवून आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव नव्याने करून देण्यासाठी आणखी कोणी ज्योतीसावित्री हवेत आपल्याला.

२) मोहोळजवळ अंकोली नावाच्या छोट्याशा गावामध्ये आपली वडिलोपार्जित शेती करत त्याचबरोबर अनेक प्रयोग करणारे अरूण देशपांडे यांचा एक सुंदर लेख मिळून सा-याजणीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. देशपांडे एकेकाळी इंदिरा गांधींच्या सल्लागार मंडळावर होते असे ऐकले आहे.

अंकोली हे गाव मुख्य रस्त्यावर नाही. तेथे पोहोचल्यावर देशपांडेंच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिहिलेली पाटी वाचली. ‘आमच्या एका भावाने काही दिवसांपूर्वीच विष घेऊन आत्महत्या केली असल्यामुळे आम्ही सुतकात आहोत. तेव्हा आम्हाला डिस्टर्ब करू नये.” आम्हाला आश्चर्य वाटले. कारण प्रवासाला निघण्यापूर्वी सकाळीच त्यांना फोन केला होता. तरीही त्यांना त्रास नको म्हणून तसेच पुढे गेलो. तीन-चार दिवसांनंतर परतीच्या प्रवासातही तोच प्रकार. मग वेगळी शंका आली. त्यांना पुन्हा फोन केला. तेव्हा त्यांनी दुस-या प्रवेशद्वाराकडून आत येण्यास सांगितले.

विष घेऊन आत्महत्या केलेला त्यांचा भाऊ म्हणजे शेतकरी हे नंतर कळले. एकीकडे असे भाऊ आत्महत्या करत असल्यामुळे आम्ही दिवाळीसारखे सण साजरे करूच शकत नाही असे आत लिहून ठेवल्याचे आठवते. तुम्हाला श्रीपाद दाभोलकर, विनोबा भावे व बहुधा स्वामीनाथन यांची नावे माहित असतील तरच प्रवेश मिळेल, असाही फलक आत लावलेला आहे. तेथे भेट द्यायला आलेल्यांकडून त्यांना धनाची नाही तर श्रमदानाची अपेक्षा आहे असे ते म्हणतात. शिवाय त्यांच्याकडे भेटायला येणा-या गटांमध्ये अर्ध्यास अर्ध्या महिला हव्यात असाही त्यांचा आग्रह असतो.

मुंठापुराना हा त्यांचा सिद्धांत तर समजून घ्यायलाच हवा असा आहे.

मराठवाड्यातील एक गटही त्यादिवशी त्यांच्याकडे आला होता. त्यांच्यासमोर त्यांनी जे निवेदन केले त्यात काही गोष्ट खटकणा-या होत्या. निसर्ग जे देतो त्यापेक्षा तुम्ही काही वेगळे करायला जाल, तर त्यातून निसर्गाचा –हास होतो अशा आशयाचे निवेदन होते. अगदी वीज निर्माण करायला जी सोलार पॅनल्स लागतात, ती तयार करण्यास जेवढी उर्जा लागते, ती पाहता तो काही योग्य उपाय नाही असे काहीसे ते म्हणाल्याचे आठवते.

त्या भेटीदरम्यान पुरेसा वेळ नसल्यामुळे या व अशा विषयांवर त्यांच्याशी बोलता आले नाही. आता पुन्हा केव्हा सवड मिळेल पहायचे.

३) रेल्वेप्रवासामध्ये रिझर्व्हेशन नसतानाही आरक्षित डब्यांमध्ये जाणारे लोक बरेच असतात. दिवसाच्या प्रवासाचे सोडा, रात्रीच्या प्रवासामध्येही हा प्रकार चालतो. त्यात चोरीमारीच्या घटना घडतातच. कारण रात्रभर न झोपणे कोणालाच शक्य नसते. त्यामुळे मधल्याच स्टेशनवर उतरून दुस-याच्या सामानावर हात मारणे ही मोठी संधी असते. तरीही या प्रकाराबद्दल फार काही बोलले जात नाही आणि रेल्वेला या प्रकाराबद्दल कोर्टात खेचले जात नाही. आपल्यावरही कधीतरी आरक्षण नसताना तसे जाण्याची वेळ येईल अशी भावना यामागे असावी का?

४) अनेक ठिकाणी लग्नामध्ये किंवा त्यानंतरच्या रिसेप्शनमध्ये खाण्याचे इतके प्रकार असतात की एखादा खाद्यमहोत्सव चालू आहे की काय असे वाटावे. याबाबतीतील भपकेबाजीवर फक्त शीखांमध्ये काही प्रमाणात चर्चा चालू असते. आपण याबाबतीत मात्र एवढे मागे का? खर्च करणारा करतो, आपल्याला त्याचे काय, पटत नसेल तर जाऊ नये, एवढाच यावरचा उपाय आहे काय? संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करण्याच्या बाबतीत काय करता येईल?

५) ख्वाडा या चित्रपटापाठोपाठ धनगरवाडी हाही सिनेमा येत आहे. मागे भगतसिंगवरही अनेकांची अशीच मर्जी जडली होती. जणू कोणाचा भगतसिंग चांगला ते सांगा असा प्रकार झाला होता. शिवाय रंग दे बसंती चोला हे विनोदी नाचगाण्याचे गीत असल्याचाही नव्या पिढीचा समज झाला होता. तेव्हा आता पुन्हा एकदा व तेही लगेचच धनगरांवर सिनेमा काढण्याच्या ऐवजी कोणी तरी फॅंड्री २ काढायचा विचार का करत नाही? दगड मारल्यानंतर त्याला हवेतच थांबवून अनेकांची धडधड वाढलेली आहे, ती पुन्हा नॉर्मल करायची आहे की नाही? कोणी तरी नागनाथ मंजुळेंपर्यंत हा निरोप पोहचवेल काय?

६) महाराष्ट्र टाइम्समधील पुणे टाइम्सही पुरवणी म्हणजे निव्वळ कागद वाया घालवण्याच प्रकार असतो. कार चालू केल्यावर एअरकंडीशनर चालू केल्यावर काचा उघड्या ठेवाव्यात अशी व्हॉट्सअपवर फिरणारी तद्दन खोटारडी बातमी मागे एकदा छापली होती. कारण काय तर म्हणे कार तयार करताना जे प्लॅस्टिक वापरले जाते त्यातील काही घटक कॅंन्सर होण्यास कारणीभूत असतात, ते श्वासाद्वारे शरिरात जातात. आजही बॉलीवूडमध्ये कोणत्या हिरोच्या सिनेमांनी वर्षात किती कमाई केली याचे आकडे देणारी बातमी पाडली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भागतसिंगच्या एकाच वर्षात दोन की तीन आवृत्या आल्या होत्या. त्यात मूळ चित्रपटाच्या हक्कधारकानेही जुना चित्रपट रिलीज करून हात धुवून घेतला:) पण तात्पर्य मूळ चित्रपट कितीही बाळबोध असला या नव्या आवृत्त्यांपेक्षा उजवाच होता हे दिसून आले.