सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १ . . .

Submitted by मार्गी on 24 November, 2015 - 05:10

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सिंहगड राउंड १ . . .

गेल्या महिन्यात चांगली सायकलिंग झाल्यानंतर आता सिंहगडावर जायचं आहे. ह्या दिवसांमध्ये मी जिथे राहतोय त्या डिएसके विश्व, धायरीपासून सिंहगड फक्त २१ किलोमीटर दूर आहे. इथून दिसतो आणि अगदी जवळ वाटतो. पण मध्ये खूप मोठा घाट आहे. सुमारे नऊ किलोमीटरमध्ये ६०० मीटर क्लाइंब आहे. त्यामुळे आधी जाण्याची हिंमतच होत नव्हती. तशी हिंमत आताही होतच नाहीय, पण आता सायकलचं वेडच लागलं आहे. सिंहगडाच्या जवळच्या रस्त्यांवर अनेकदा गेलो आणि सिंहगडाला बघत राहिलो. सिंहगड साद देतोच आहे.

सिंहगड! मराठी इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठिकाण! सतराव्या शतकामध्ये शौर्याचे किती अविष्कार इथे झाले! छत्रपती शिवरायांनी घेतलेला कोंडाणा! शत्रुच्या ताब्यात गेलेला कोंडाणा आणि मग १६७० मध्ये शिवरायांच्या स्वराज्यात झालेलं त्याचं पुनरागमन! त्यासाठी झालेला शौर्याचा प्रताप! त्याबद्दल जितका विचार करतो, तितका अस्वस्थ होतो. आणि सिंहगडाच्या आजच्या स्थितीबद्दल काय म्हणावं? सिंहगडाचा परिसर आज वाईट कारणांमुळे ओळखला जातो. हॉटेल, बार आणि कित्येक अवैध कामांसाठी तो प्रसिद्ध आहे. असो. पण हे सर्व असलं तरी सिंहगड ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी तीर्थ स्थान आहे आणि पुढेही राहील.

१५ ऑक्टोबरची सकाळ. सात वाजता निघालो. सकाळच्या शांततेत सायकल चालवणं किती अद्भुत अनुभव आहे! शांत रस्ता आणि फक्त सायकलच्या चाकांच्या घर्षणाचा मधुर स्वर! वा! पहिले अकरा किलोमीटर समतल रस्ता आहे. छोटे चढ- उतारसुद्धा येतात. अर्ध्या तासात खडकवासला डॅमजवळ पोहचलो. सुंदर नजारा! डॅममध्ये धुकं होतं! काही क्षण थांबलो आणि पुढे निघालो. मिलिटरी एरियामधून जाऊन सिंहगडाच्या पायथ्याजवळ पोहचलो. इथे नाश्ता करून घेतला. सोबत पाण्याच्या दोन बाटल्या आहेत. शिवाय बिस्किटंही आहेत. आता खरा घाट सुरू होईल. आधी पायवाटेनेसुद्धा एकदा गडावर गेलो आहे. ती पायवाट सरळ वर चढते तर रस्ता वळणं वळणं घेत वर जातो. दोन वर्षांपूर्वी जेव्हा बाईकवर लदाख़ला जाण्याचा विचार केला होता, तेव्हा प्रॅक्टिस ह्याच घाटात केली होती. कारण एक तर चढ मोठा आहे, रस्ताही थोडा खराब आहे. शिवाय त्याचं एलेव्हेशन इतकं जास्त आहे की, त्यावर मोठी बस किंवा ट्रकही जात नाहीत. फक्त लहान वाहनं आणि टेंपो जातात. त्यामुळे तेव्हा बाईकवरही आलो होतो. आता जेव्हा लदाख़ आणि सायकलने सम्मोहित केलं आहे, तेव्हासुद्धा सरावासाठी हेच चांगलं ठिकाण आहे. किंबहुना सिंहगडावर सायकल चालवणं ही लदाख़मध्ये सायकल चालवण्याची पात्रता आहे. सिंहगडामध्ये ९ किलोमीटरमध्ये ६३० मीटर चढ आहे जो खर्दुंगलाच्या एक चतुर्थांश येतो- खर्दुंगलामध्ये ४० किलोमीटरमध्ये २१०० मीटर चढ आहे आणि इतरही अनेक आव्हानं आहेत. सिंहगडावर त्या चढाची थोडी झलक नक्कीच मिळते. बघू कसं जमतं.


धुक्यामध्ये खडकवासला!

चढ सुरू झाल्या झाल्या अगदी खालच्या गेअरमध्ये सायकल चालवायला सुरू केली. अर्धा किलोमीटर गेलो. सायकल चालवणं कठिण होतं आहे. कसंबसं अजून एक किलोमीटर गेलो. फारच कठिण होतं आहे. जेमतेम दिड किलोमीटर सायकल चालवता आली. त्यानंतर पायी पायी जाण्याची वेळ आली. आणि तशीही सायकल पायी चालण्याच्या वेगानेच चालवता येत होती. थोड्या वेळाने परत प्रयत्न केला, पण पायांनी प्रतिसाद दिला नाही. जिद्द निरर्थक होती. म्हणून सरळ पायी पायी सुरू केलं. पहिल्या दिड किलोमीटरपर्यंत जेमतेम वीस मिनिटच सायकल चालवता आली. त्यानंतर इतकंच- "वहाँ हाथी न घोडा है, बस पैदल ही जाना है!”

मध्ये मध्ये थांबून आराम करावा लागतोय. थोडं थोडं पाणी पितोय. पुढे जाताना भितीसुद्धा वाटते आहे की, उतरताना ह्याच उतारावरून सायकल न्यायची आहे. आणि चढ जितका मोठा आहे, तितकाच उतारही मोठा असणार आहे! अर्थात् सायकलीचे दोन्ही ब्रेक वापरावे लागतील. त्याचीही थोडी भिती वाटली. पण पुढे जात राहिलो. सुंदर दृश्य दिसत आहे. रस्ता जसा वर चढत गेला, तसं खडकवासलाचं पाणीही दूरवरून दिसू लागलं. एका उंचीवर पोहचल्यानंतर आपण जिथून येतो, तो मार्गही दिसू लागतो. . असो.


सिंहगडाकडे येणारा रस्ता आणि मागे दूर खडकवासलाचं पाणी

आता सिंहगड जवळ येतोय. अर्धं अंतर ओलांडल्यानंतर दिलासा म्हणून दोन किलोमीटरचा किंचितसा उतार लागतो! दोन किलोमीटर सायकल स्वत:च चालली. आता फक्त साडेतीन किलोमीटर राहिले. पण हाच टप्पा सर्वाधिक अवघड गेला. वारंवार थांबावं लागलं. पायी जाणंही अवघड झालं. खरं तर पायी पायी जाण्यासाठी चढाच्या रस्त्याने काहीच फरक पडत नाही. पण इथे खूप वेळ लागतोय. शेवटी साडेदहा वाजता गडावर पोहचलो. चढाच्या नऊ किलोमीटरला अडीच तास लागले. सायकल फक्त वीस मिनिटच चालवली! वर पोहचल्यानंतरही मन अशांत राहिलं. आता उतरण्याचं टेंशन आहे! उतरतानाही सायकलिंगची परीक्षा आहे. कारण चढाइतकाच उतारही अवघड आहे!

सिंहगडावर फार वेळ थांबलो नाही. चहा पिऊन पाणी भरून घेतलं आणि परत फिरलो. आता उताराशी सामना आहे. दोन्ही ब्रेक लावून उतरायला सुरुवात केली. मध्ये मध्ये जिथे उतार जास्त आहे, तिथे पायी जातोय. ब्रेक्सनाही आलटून पालटून आराम देतोय जेणेकरून ते गरम होणार नाहीत. वेग अजिबात वाढू दिला नाही. हळु हळु उतार पार होतोय. ब्रेक्सना ब्रेक देत जात राहिलो. वाटेत मध्ये लागलेला दोन किलोमीटरचा हलका चढ सुखावणारा होता. आता अजून दोन पाऊल, थोडसं अंतर, असं करत करत एका तासात नऊ किलोमीटर उतरलो. उतरल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटलं. अजून एक मोठा नाश्ता केला आणि निघालो. जेवण केलं नाही, कारण अजून अकरा किलोमीटर सायकल चालवायची आहे. पुढचा प्रवास इतका जड गेला नाही. दोन तास चालल्याचाही फायदा झाला असावा. चालणं सायकलिंगला पूरकच आहे.


सिंहगडावर पोहचणारा रस्ता


सिंहगडाचा क्लाइंब

आता दोन वर्षांनंतर जेव्हा ह्या राईडचा विचार करतो, तेव्हा अनेक चुका दिसतात. सगळ्यात मोठी चूक ही, की मी अजिबात रेग्युलर नव्हतो. ६ आणि ७ ऑक्टोबरला दोन अर्धशतक केले होते. चांगला टेंपो तयार झाला होता. पण त्यानंतर आठवडाभर थोडीही सायकल चालवली नाही. रोज १५ किलोमीटर जरी चालवली असती, तरी सिंहगडाच्या ह्या राईडमध्ये अजून चांगली चालवता आली असती दुसरी चूक अशी की, सायकलिंगसोबत पूरक व्यायाम- योगासन- प्राणायाम केल्यामुळे बराच फरक पडतो- ते मी जवळ जवळ करत नव्हतो. त्यामुळे चढावर फक्त दिड किलोमीटरच सायकल चालवता आली.

आणि काही चुका अशा असतात की, त्या सुधारणं लांबच, त्या समजण्यासाठीही अनेक वेळेस चुकावं लागतं. उदाहरणार्थ पंक्चर काढणं हीच गोष्ट. जोपर्यंत आपण दहा वेळेस चुकीच्या प्रकारे पंक्चर काढत नाही, तोपर्यंत ते योग्य प्रकारे कसं काढावं, हे आपल्याला कळूच शकत नाही. ह्या चुकाही काहीशा अशाच होत्या. सायकलिंग सुरू ठेवल्यामुळे हळु हळु समज वाढत गेली. आणि रेग्युलरिटी नसणं खूप त्रासदायक असतं. हे जवळ जवळ धावत्या ट्रेनसारखंच आहे. जर ट्रेन धावत असेल, तर तिला पुढे नेण्यासाठी कमी ऊर्जा लागते. पण प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनला चलायमान करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. पूर्ण ट्रेन विरोधही करते ज्यामुळे ट्रेन सुरू होताना आवाजही होतो. किंवा बाईकमध्ये पहिल्या व दुस-या गेअरमध्ये जास्त शक्ती असते; तिसरा व चौथा हे गेअर्स फक्त वेग देण्याचं काम करतात. तेच सायकलबद्दलही आहे. पहिल्या दिवशी पहाटे पाचला उठून सायकल बाहेर काढताना प्रचंड अडचण होते. पण दुस-या दिवशी ते सोपं होतं. तिस-या, चौथ्या- पाचव्या दिवशी ते हळु हळु एफर्टलेस होत जातं. माझं चुकलं हे की, मी फक्त मोठ्या राईडचाच विचार करत राहिलो. दहा- पंधरा किलोमीटरच्या छोट्या राईडही नियमित प्रकारे केल्या नाहीत. पण चुका करणं हीसुद्धा चांगली गोष्ट आहे कारण त्याचा अर्थ होतो की, काही शिकतोसुद्धा आहे. आणि चुका करायला घाबरायचं‌ कशाला? जो पोहायला घाबरेल, तो ते शिकूच शकणार नाही. असो.

ह्या राईडमध्ये त्रास झाला, पण त्यामुळे मी किती पाण्यात आहे, हेसुद्धा कळालं. जर मला लदाख़मध्ये सायकल चालवायची असेल, तर स्टॅमिना प्रचंड वाढवायला हवा, हे कळालं. माझा सध्याचा स्टॅमिना १५% सुद्धा नसेल. ही स्पष्टता मिळणं, हा मोठा धडा होता. ह्या आणि इतर सायकल राईडमध्येही एक गोष्ट बघितली. सायकलिंग करताना खूप आनंद होतो; मजा वाटते; पण तरीही‌ त्या वेळी मन तिथे थांबत नाही. जसं सुरुवातीला वाटत होतं, कधी एकदा चढ येईल. नंतर वाटलं की, पायी पायी जाता तर येतंय, पण उतरताना कसं होईल. आणि उतरल्यानंतर वाटलं, कधी एकदा घरी पोहचेन! मन नेहमीच अस्वस्थ राहतं. पूर्ण राईडमध्ये कदाचित असा एखादाच क्षण असेल, जेव्हा मन खरोखर थांबलं‌ असेल व त्या क्षणाच्या स्थितीमध्ये स्थिर झालं असेल. . .

ही राईड माझ्यासाठी बेसलाईन ठरली. चांगला पाया मिळाला ज्या आधारे पुढे जाऊ शकलो आणि आव्हानांना सामोरं जाऊ शकलो.

पुढील भाग: सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . .

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायकलिंग करताना खूप आनंद होतो; मजा वाटते; पण तरीही‌ त्या वेळी मन तिथे थांबत नाही. जसं सुरुवातीला वाटत होतं, कधी एकदा चढ येईल. नंतर वाटलं की, पायी पायी जाता तर येतंय, पण उतरताना कसं होईल. आणि उतरल्यानंतर वाटलं, कधी एकदा घरी पोहचेन! मन नेहमीच अस्वस्थ राहतं. पूर्ण राईडमध्ये कदाचित असा एखादाच क्षण असेल, जेव्हा मन खरोखर थांबलं‌ असेल व त्या क्षणाच्या स्थितीमध्ये स्थिर झालं असेल. . . >> अगदी अगदी व्हायला झालं. चंचल मन.....

तुमच्या बरोबर सायकल भ्रमंती केल्याचा आनंद मिळतो.

मधले मधले फिलॉसॉफिकल परिच्छेदही अगदी अगदी!!

पुढील सफरींना शुभेच्छा.

>>>> वाटेत मध्ये लागलेला दोन किलोमीटरचा हलका चढ सुखावणारा होता. <<<<<
हे वाक्य अन इतर वर्णन वाचल्यावर महाजन बंधुंच्या भुतानमधिल "ड्रॅगन डेथ रेस" अशा काहीश्या नावाच्या रेसमधे त्यांना किती अडचणींना तोंड द्यावे लागले असेल ते थोड जाणवते. त्यांच्या ब्लॉगवरिल लेखात वर्णन आहे, पण रुट नजरेसमोर येत नव्हता, बघितला असण्याचा संबंधच नाही, पण इथे सिंहगडचा घाट माहित आहे, त्यामुळे वर्णन लग्गेच कळते, नजरेसमोर तो तो भाग उभा रहातो.

>>>> ही स्पष्टता मिळणं, हा मोठा धडा होता. <<<< अगदी अगदी.... फक्त अशी स्पष्टता, बहुतेक वेळा ती अडीअडचणींचीच असते, मिळाल्यावर नाऊमेद न होणे हे देखिल तितकेच महत्वाचे.

छान लिहीलय. वाचल्यावर वाटतय की आपणही एकदा इकडे जाऊन यायला हव. Happy