भगवद्गीता - सोप्या मराठीत - ५

Submitted by एम.कर्णिक on 4 February, 2009 - 01:17

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
संन्यासयोग
नावाचा पांचवा अध्याय

अर्जुन म्हणाला,
कौतुक करूनी संन्यासाचे पुन्हा प्रशंसशी कर्म
नक्कि कोणते असे योग्य मज, सांग मला मर्म १

श्री भगवान म्हणाले,
संन्यास आणि कर्मयोग हे श्रेयस्कर दोन्ही
तरिही पार्था, कर्मयोग हा श्रेष्ठ त्यात जाणी २

महाबाहु, हे जाण, नसे जो कर्माचा द्वेष्टा
आणि ना धरी कर्मफलेच्छा असा ज्ञानि द्रष्टा
जरी कर्मसन्यासी असला तरि भेदातीत
निश्चिततेने पात्र व्हावया कर्मबंधमुक्त ३

सांख्य वेगळा, कर्म वेगळे मानति ते अज्ञ
सांख्य पाळुनि कर्माचाही लाभ मिळविती सूज्ञ ४

सांख्यातुन हो प्राप्त स्थिती जी कर्मांतहि मिळते
द्रष्टा तो ज्या सांख्य नि कर्म एकरूप दिसते ५

सन्यासहि हो दुष्कर, बसुनी कर्माव्यतिरिक्त
कर्मयोगी मुनिजनांस मिळते चिरशांती त्वरित ६

इंद्रियांवरी ताबा ज्याचा अन् आत्मा शुध्द
अशा कर्मयोग्यास न करते कर्मफलित बध्द ७

दर्शन, स्पर्शन, श्रवणोच्चारण, श्वसन आणि भक्षण
उत्सर्जन, निद्रा नि जागॄती, नयन उन्मिलन ८

या सर्व क्रिया आपआपल्या इंद्रियेच करति
हे जाणुनि तत्वज्ञ श्रेय कधि स्वत:स ना घेती ९

आत्मशांतिस्तव नि:संगपणे कर्मे आचरितो
त्याला कर्मातिल दोषांचा स्पर्शहि ना होतो
कमलपत्र पाण्यात राहुनीदेखिल शुष्क जसे
तसेच सार्‍या दोषापासुनि तो नर मुक्त असे १०

निरिच्छ करिती कर्मे करण्यासाठि आत्मशुध्दी
अपेक्षित जी इंद्रियांकडुन काया मन बुध्दी ११

योगी त्यागुनि कर्मफला चिरशांतीप्रत जातो
इतरजनांना फलप्राप्तीचा मोहच गुंतवितो १२

कामेच्छा काढून मनातून निष्कर्मी असतो
तो नऊ द्वारांच्या कायेमधि शांतीने वसतो १३

कोणाचे कतॄत्व, कर्म वा कर्मफलाची युती
ईश्वर ना घडवितो असे ही प्रकॄतिची निर्मिती १४

पुण्य कुणाचे, पाप कुणाचे, प्रभू नाही घेत
अज्ञानाच्या आवरणाने जन मोहित होत १५

ज्यांच्या अज्ञानाचा होई ज्ञानाने नाश
सूर्यासम ते ज्ञान देइ त्यां परमार्थ प्रकाश १६

त्या परमार्थामधी ठेविती निष्ठा, मन अन् मती
त्यांची पापे धुतली जाउनि मिळे पूर्ण मुक्ती १७

अशा ज्ञानियांची मग होते समदर्शी दॄष्टी
दिसोत त्याना नम्र, ज्ञानी, वा गाय, श्वान, हत्ती १८

समदर्शी ते इथेच राहुनि इहलोका जिंकती
दोषरहित अन् समान ब्रम्हामधे विलिन होती १९

हर्ष न मानति प्रियप्राप्तित, ना दुष्प्राप्याचा खेद
समबुध्दी निर्मोही अशाना मिळते ब्रम्हपद २०

विषयसुखाला गौण मानुनि आत्मसुखी होई
तो निर्मोही नरचि अक्षय सुखानुभव घेई २१

स्पर्शजन्य जे भोग, तयां ना आरंभ न अंत
दु:खद ते कौंतेया म्हणुनी त्यजति बुध्दिवंत २२

मरणांतापर्यंत आवरूनि सोशि कामक्रोध
असा योगी नर सुखी होतसे, पार्था घे बोध २३

अंतरातुनी सुखी, अंतरी पावे आराम
अशास लाभे प्रकाश आणि अंति परब्रम्ह २४

परब्रम्ह हो प्राप्त तयां जे ना मानति द्वैत
पापमुक्त होउनी जे बघती प्राणिमात्र हीत २५

कामक्रोध विरहीत संयमी आत्मज्ञानयुक्त
अशा मुनीना सहजच होते परब्रम्ह प्राप्त २६

बाह्मांगाला स्पर्श करोनी नेत्र स्थिर धरी
श्वासोच्छवासा रोखुन धरूनि प्राणायाम करी २७

अशा प्रकारे आवरि इंद्रिये मन आणि बुध्दी
इच्छा, भय, क्रोधातुन सुटुनी पावे तो मुक्ती २8

यज्ञतपाचा भोक्ता, ईश्वर, मी तिन्ही लोकांचा
मीच प्रियसखा, सुहॄद सगळया सजीव प्राण्यांचा
अशा मला ओळखील जो जो तो प्राणीमात्र
चिरशांती मिळण्यासाठी तो खचित होइ पात्र २९

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
संन्यासयोग नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला
**********
अध्यायांसाठी दुवे :
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

छान.

धन्स !!! Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

१)नक्कि कोणते असे योग्य मज, सांग मला मर्म.
उपरोक्त ओळित 'मज' व 'मला' जरा खटकलेच.

२)कर्मयोगी मुनिजनांस मिळते चिरशांती त्व्रित
मला वाट्ते 'त्व्रित' ऐवजि 'त्वरित ' आसावे ?

३)दर्शन, स्पर्शन, श्रवणोच्चारण, श्वसन आणि भक्षण
बहुदा वरिल ओळित 'श्रवण' व 'उच्चारण' या दोन वेगवेगळ्या क्रिया आसाव्या?

आत्मशांतिस्तव नि:संगपणे कर्मे आचरितो
त्याला कर्मातिल दोषांचा स्पर्शहि ना होतो
कमलपत्र पाण्यात राहुनीदेखिल शुष्क जसे
तसेच सार्‍या दोषापासुनि तो नर मुक्त असे ..... विशेष आवडले.
स्तुत्य उपक्रम! धन्यवाद.

जगू, विशाल आणि संदीपगुरू,
धन्यवाद.
१. अर्जुनाला 'माझ्यासाठी नक्की काय योग्य असेल ते मला सांग' हे म्हणायचे आहे. 'मज' हा शब्द 'माझ्यासाठी' या अर्थाने वापरला आहे.
२. होय, 'त्वरित' हेच अपेक्षित होते. Typo बद्दल दिलगिरी.
३. नक्कीच. मात्रा जुळण्यासाठी संधि केला आहे.
-मुकुंद कर्णिक

छान उपक्रम. प्रत्येक भागात मागील भागाचाही दुवा द्याल का?

अतीशय छान. किती साध्या आणि सोप्या शब्दात मांडले आहे.

-हरीश