आज कार्तिकी एकादशी

Submitted by Rajesh Kulkarni on 22 November, 2015 - 01:10

आज कार्तिकी एकादशी
.

सकाळपासून प्रह्लाद शिंदे यांची विठ्ठलावरची गाणी रेडिओवर ऐकू आली. त्यावरूनच वाटले की आज एकादशी असेल. एके काळी त्यांची विठ्ठलावरची काही गाणी पाठ होती.

१) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांहून कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही.

२) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात.

शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे?

तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की हे आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली देणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात.

अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. आपण मात्र आपल्याला कोणाचे काही पटले नाही की त्याला नाठाळ समजून त्याच्या डोक्यात काठी मारायला तयार. किती सोपे. असो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users