बाँड : नो बडी डझ इट बेटर (स्पेक्टरच्या निमित्ताने)

Submitted by अमेय२८०८०७ on 22 November, 2015 - 00:45

(हे "स्पेक्टर"चे सविस्तर परीक्षण नाही केवळ स्पेक्टरच्या निमित्ताने मनात आलेले विचार आहेत)

कालच नवीन बाँडपट बघितला. याबाबतीत अंधभक्ती असल्याने चित्रपट आला की पाहायचा इतकेच ठाऊक आहे. मिथुनच्या असली चाहत्यांना जशी दिग्दर्शक, कहाणी, संगीत, नायिका यांची फिकीर नसते तसेच बाँड चाहत्यांचेही आहे. अनेक प्रसंगाखेरीस काय आणि कसे होणार हे माहीत असूनही प्रत्येकवेळी तितक्याच उत्कण्ठेने ते पाहणे हे फॅनक्लब सदस्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

याची सुरुवात मात्र पुस्तकांपासून झाली. कोल्हापुरात यशवंत पाटील नावाच्या माणसाची, इंग्रजी पुस्तकांची, अनेक पुस्तकप्रेमींना ईर्षा आणि हेवा वाटण्याजोगी व्यक्तिगत लायब्ररी होती. नव्वदीच्या काळात कुठलीही विशेष जाहिरात न करताही या लायब्ररीचे महिना वीस रूपये फी भरणारे चार-पाचशे सभासद होते. सर्व प्रकारच्या प्रसिद्ध लेखकांचे समग्र साहित्य पाटलांनी आस्थेने जोपासले होते. तिथे मला बाँड गवसला. 'कसीनो रोयाल' आणले त्या दिवसापासून इयान फ्लेमिंगने झपाटून टाकले. केबल टीव्ही नुकता सुरू झालेल्या आणि वैयक्तिक नेटवापर सुरू होण्याच्या अगोदरच्या त्या काळात रात्रिच्या शांत वेळी प्रचंड वेगवान आणि कल्पनाचातुर्याने ओतप्रोत भरलेल्या कथा वाचताना निराळी धुंदी येई. शेरलॉक होम्स, जीव्हज-वूस्टर, जेम्स बाँड या पात्रांविषयी त्या त्या लेखकांना पहिल्यांदा सुचले ते क्षण भाग्याचे. जगभरातील लोकांना विशुद्ध वाचनानंदाचे भरभरुन दान देणारे हे सर्व लिखाण. यांची सकस माध्यमांतरेही झाली पण इतक्या वर्षांनंतरही छापील शब्दाची मोहिनी आणि तजेला तितकाच टिकून आहे, या चमत्कारासमोर अगदी वंदन करावेसे वाटते.

बाँडनेही असाच अमाप आनंद दिला. पानापानातून अशक्य अतर्क्य गोष्टी सांगणारे ते चित्रदर्शी शब्द वाचताना उगीचच मुठी आवळल्या जात आणि श्वास फुलत असे. "ऑन हर मेजेस्टीज सीक्रेट सर्व्हीस"मधील बाँड आणि ट्रेसीची शर्यत वा स्कीइंग करत बर्फावरला पाठलाग, "थंडरबॉल"मधले अंडरवॉटर प्रसंग किंवा "मूनरेकर"मधले रॉकेट एक्झॉस्टमध्ये भाजून निघायचे वर्णन....पाने कधी उलटली जायची कळायचे नाही. स्वतः तिथे बाँडच्या शेजारी असल्याचा भास व्हायचा. त्याच्या प्रत्येक लकबीचे, सवयीचे अप्रूप वाटायचे आणि हे सर्व प्रचंड लई भारी आहे अशी खात्री पटायची.

चित्रपटांविषयी उशीराच कळले. घरातील डिशवर स्टार मूव्हीज दिसत नसे म्हणून त्यावेळी जुन्या इंग्रजी चित्रपटांचा एकमेव स्रोत म्हणजे टी एन टी चॅनेल. यावर बाँडपट लागत नसत त्यामुळे शॉन कॉनरी आणि रॉजर मूरच्या कहाण्या घरात मोठ्यांकडून ऐकल्या तेवढ्याच.

1962 सालच्या "डॉक्टर नो" पासून 1989 पर्यन्त वर्षा दोन वर्षाच्या काळात एकेक बाँडपट येत राहिला. 1989 नंतर मात्र पुढचा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सहा वर्षाचा काळ जावा लागला. 1995 ला आलेल्या "गोल्डन आय"द्वारे जेम्स बाँडने एक पिढी ओलांडली. पियर्स ब्रॉस्नन "रेमिंग्टन स्टील"मुळे आवडीचा होताच; चकचकीत टेकसॅव्ही बाँड म्हणून आणखीनच आवडू लागला.

या काळातच नोकरी लागली आणि सर्वात आधी अनेक दिवसांपासून जपलेल्या स्वतःच्या दोन सुप्त इच्छा मी पुऱ्या केल्या त्या म्हणजे फास्टर फेणेचा पूर्ण संच मिळवला आणि जेम्स बाँडच्या सर्व चित्रपटांच्या सीडीज विकत घेतल्या. पुढचे दोन तीन महिने नुसते बाँडच्या धुनकीत गेले. मालिकेतील सगळे चित्रपट एकापाठोपाठ एक बघत गेल्याने मस्त लिंक लागली. पुस्तक आणि चित्रपटातील साम्यफरक लक्षात आले. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली की लेखक बाप माणूस होता. त्याच्या शब्दांतील थरार जसाच्या तसा चित्रपटात आणणे कोणालाही पूर्णपणे जमलेले नाही.

डॅनियल क्रेगने पुढे हा वारसा छान चालवला. त्याचे पहिले तिन्ही चित्रपट मला फार आवडतात. "स्कायफॉल" तर पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट बाँडपटांच्या यादीत नक्की येईल. क्रेगने बाँडच्या व्यक्तित्वाला थोडेसे गंभीर केले. त्याचा बाँड जास्त व्यावसायिक वाटतो. शॉन कॉनरी हा बेंचमार्क असला तरी क्रेगनेही या भूमिकेवर छाप सोडलीच आहे.

"स्पेक्टर"ने मात्र निराश केले. मूळ कथासूत्र एकदम इंटरेस्टिंग आहे विशेषतः पॅरिस हल्ल्याच्या दुर्दैवी आठवणी ताज्या असल्यामुळे, पण हाताळणी अगदीच एखाद्या बॉलिवूडपटासारखी वरवरची आहे. सॅम मेंडेसने रोहित शेट्टीचा कॉरस्पांडन्स कोर्स घेतला होता का काय अशी शंका यावी इतका उथळ मामला आहे. क्रिस्टॉफ वॉल्टझ खलनायक असणार म्हणल्यावर उत्सुकता छान ताणली होती. "इन्ग्लोरियस बास्टर्ड्स"च्या कर्नल हॅन्सचा अधिक पॉलिश्ड आणि खुनशी अवतार पाहायला मिळणार असे वाटत होते मात्र बिचाऱ्याची भूमिकाच इतकी कच्ची लिहिलीय की दोन ऑस्करवाला वॉल्टझ काय चीज आहे हे एखादा संवाद सोडला तर अजिबात दिसून येत नाही.

रेफ फाईंझसुद्धा एक समर्थ अभिनेता, पण जुडी डेंचची एम् 17 वर्षे डोळ्यासमोर असल्याने बहुधा, त्याने साकारलेला एम् काहीसा फिका वाटतो. त्याला एम् म्हणून स्वीकारायला आणखी एखादा चित्रपट जाऊ द्यावा लागेल.

बाँड ललना म्हणजे कथेच्या दृष्टीने खरेतर मालवणीत "बांधाच्या भरीक" म्हणतात इतक्याच महत्त्वाच्या; त्यातून "ऑन हर मॅजेस्टी"वाली एक डायना रिग सोडली तर इतर कुणाच्या वाट्याला चांगली लिहिलेली भूमिकाही नाही. स्पेक्टरमधेही असाच मामला आहे पण क्रेग आणि लिया सेदोची (उच्चार चू भू दे घे) केमिस्ट्री बिलकुल रंग नही लायी. हिरोईन लैच विझलेली वाटते. यापेक्षा इन्ग्लोरियस बास्टर्ड्स मधल्या छोट्या भूमिकेतही ती जास्त चमकून गेली होती. खरेतर काहीतरी लाँग टर्म सुचवायसारखे पोटेंशियल होते या चित्रपटात, जे हल्लीच्या पोलिटीकली करेक्ट काळात यथोचितही ठरले असते, पण सेदो अभिनयात कमी पडल्याने ते कठीण वाटते . "माय कझिन व्हिनी" वाल्या मरिसा तोमेला एखादा बाँडपट मिळायला हवा होता असे उगीच वाटते मला.

बाँड-संगीत विशेषतः ओपनिंग गाणी हा तर स्वतंत्र लेखाचा विषय. स्पेक्टरचे गाणे चांगले आहे पण चित्रीकरणात ऑक्टोपसच्या तंगड्यांचा अतिरेक झाल्याने चित्रपट कधी सुरू होतो याचीच वाट बघत राहिलो.

एकूण स्पेक्टर हा बर्‍यापैकी वेगवान आणि चकचकीत असला तरी एकूण ओव्हर सिंप्लीफाईड कथावस्तूचा असल्याने स्कायफॉलनंतर थोडा कमी आवडलाय पण बाँडप्रेम काही कमी होणार नाहीच. चित्रपट आवडतात तोपर्यंत येणारा प्रत्येक बाँडपट पाहिला जाणार आणि धमाकेदार थीम म्युझिकच्या घोषासोबत काळ्या पांढऱ्या वर्तुळात पिस्तूल रोखत पडद्यावर येणारा बाँड दिसला की एक थरार उमटायचा तो उमटणार, हे तर ठरलेलेच आहे!

As Carly Simon told us long back, "Nobody does it better". Happy

-- अमेय

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंय.

शेरलॉक होम्स आणि जेम्स बॉण्ड मधे मात्र अभिजात शास्त्रीय संगीत आणि यो यो हनीसिंग इतका फरक वाटतो.

ह्म्म...सहमत आहे.थोडी निराशाच झाली.पण कदाचीत मी स्पेक्टरची तुलना आधीच्या बाँड पटांशी करतोय म्हणून असं वाटतय...
काही सिन्स हे अचानक उद्भवल्या-अवतरल्या सारखे वाटतात.

छान लिहिलेत Happy एक वेगळा चित्रपट म्हणून बघितला असता तर छान वाटला असता, पण मी स्कायफॉलच्या अपेक्षेने गेलो त्यामुळे बराच फरक वाटला.

खूपसारा भूतकालीन रेफरन्स जाणवत होता. काही काही गोष्टी न पटण्यासारख्या. पण मग त्या नसतील तर बाँडपट कसा Happy

एकदा पाहण्याजोगा.

पण एंडिंगनंतर खरंच प्रश्न पडलाय की स्पेक्ट्रे संपली, स्मर्ष येणार की संपणार सिरीज? हा सिनेमा एका लॉजिकल मुद्द्यावर येऊन थांबलाय.

मस्तच.

पियर्स ब्रॉस्नन मला जास्त आवडतो. तसे मी सर्वच बघितले नाहीत पण टीव्हीवर असतात आणि नवरा बघत बसतो. मी येता जाता बघते. क्रेग ठीकच वाटला.

डाय अनदर डे मधली हाल बेरी आवडते मला.

ब्रॉस्ननने मानधन वाढवून मागितलं आणि क्रेगची वर्णी लागली या रोलसाठी..
रॉजर मूर आणि सीन कॉनरी यांची आठवण करून देतात हे दोघे.

अन्जूताई

पियर्स ब्रॉस्नन मला जास्त आवडतो. तसे मी सर्वच बघितले नाहीत पण टीव्हीवर असतात आणि नवरा बघत बसतो. मी येता जाता बघते. क्रेग ठीकच वाटला. >>>>>>>>>>>>>>>>>>>.. प्रचंड अनूमोदन .

स्पेक्ट्र सोडला तर सगळेच्या सगळे स्वल्पट माझ्याकडे आहेत.
मी सुद्धा जाम पंखा आहेच म्हणुन तर हे नाव घेतलयं.

एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली की लेखक बाप माणूस होता. त्याच्या शब्दांतील थरार जसाच्या तसा पुस्तकात आणणे कोणालाही पूर्णपणे जमलेले नाही.<<< कंप्लीट सहमत!!!

लेख मस्तच जमलाय. मला स्कायफॉल आवडला. आधीचे बरेचसे बाँड मद्यंतरी स्टार मूव्हीजवर सलग रोज एक प्रमाणे दाखवले होते. रॉजर मूर आणि क्कॉनरीचे बाँड विशेस। आवडले. पण मला ब्रॉस्नन अतिचशय आवडला होता. त्याची स्टाईल आणि कूलनेस अफलातून होता.

क्रेग मला विशेष आवडला नाही. अभिनेता म्हणून ग्रेट आहे, पण बाँड म्हणून कुछ तो कमी वाटतो.

हो नंदिनी
(Actually थरार चित्रपटात आणणे जमलेले नाही, असे हवे. बदल केलाय)

ब्रॉस्नन मस्त स्टायलो वाटतो, मलाही आवडतोच.

ब्रॉस्नन (बाँडपटांतून) गेला आणि बाँडमधे काहीही राम राहिला नाही असं वाटायला लागलं Proud क्रेग अजिबातच आवडत नाही. पण तरीही स्पेक्टर पाहिला. ओके वाटला. स्कायफॉल बेटर होता.

अमेय....

"स्पेक्टर" अजून पाहिला नसल्याने तुमचा हा लेख पूर्ण वाचला नाही मी. अर्थात बॉन्डरावांसाठीच चित्रपट पाहात असल्याने त्यातील कथानक कसले आहे याच्यात आता उत्सुकता राहिलेली नसून ते कसे आणले वा मांडले गेले आहे पडद्यावर याचीच उत्सुकता प्रत्येक पटाच्या वेळी मनी येत असतेच. त्या पोटीच तर एजंट ००७ आपल्या सिनेजीवनातील एक अविभाज्य घटक बनून गेला आहे. शॉन कॉनेरी ते डॅनिअल क्रेग....सारेच्यासारे आमच्या नेहमीच्या उठबशीतील असल्याप्रमाणेच आम्ही त्यांच्यावर माया प्रकट करीत आलो असल्याने "जेम्स" च्या भूमिकेत कोण आले आहे याहीपेक्षा त्याने ती भूमिका कशी हाताळली आहे इकडेच लक्ष लागून राहिलेले असते.

स्पेक्टरने निराश केले असे तुम्ही जे म्हटले आहे त्याबाबत तुमच्याकडे कारण/कारणे असतील, असे असूनसुद्धा स्पेक्टर हा बॉन्डप्रेमींकडून पाहिला जाईल हे सत्यच.

(मरिसा तोमे चे नाव घेतल्याबद्दल आभारी आहे....अशा इच्छुक नावामध्ये मला जेनिफर लॉरेन्सचेही नाव घ्यावेसे वाटते.)

निरनिराळी गंजेट्स सामान्य माणसाच्या हातात पडेपर्यंत मजा वाटायची.बर्फावरची पळापळ,आइफल टावरवरून उडी इत्यादी अजूनही आवडतात.शत्रुकडची एक ललना बाँडला मदत करते हा कमकुवत धागा बय्राच ठिकाणी आहे.नाहीतर बाँड मेलाच. फोन बुथमध्ये त्याच्यामागे उभा असलेला लोखंडी दातवाला हा प्रसंग खरा भीतीदायक वाटतो.कथानकातला दम केव्हाच गेला आहे.आताचे अतिरेकी बाँडपेक्षा शंभरपट प्रगल्भ आहेत.

ह्म्म.. आता पाहून टाकीन बहुतेक.. स्कायफॉल नंतर हा पाहिला तरच जास्त आवडेल असे ऐकू येत आहे..

बाँड स्टाईल्,लूक्स्,अ‍ॅक्टिंग वाईज शॉन कॉनरी(द बेस्ट), पिअर्स ब्रॉझनन ऑल टाईम फेव.. क्रेग न्हायच आवडत..

क्रेगच्या सगळ्या पिक्चरचे दुवे एकत्र आणले आहेत. पुढच्या भागात क्रेग असायची शक्यता अगदीच धुसर..
काही सीन्स एकदम गरीब आहेत.

I think this is last bond movies for Creig. Hence all parts are referred. Personally like Creig more than any other Bond actors. He is very good actor also and his bond movies are having much better storyline than other. I like Spectre also.

लेख मस्त! पुस्तकांबद्दल + १
आमच पण खानदान बॉन्ड प्रेमी असल्यानी स्पेक्टर झळकल्याच्या पहिल्याच आठवड्यात पाहिला.
काही ठळक नोंदी
१ एम आवडला नाही
२ बॉन्ड हिरॉइन म्हणून मॅदेलिन स्वान तै शोभत नैत.
३ मारामार्‍या अगदिच रजनी स्टाइल . मोनिका बेलुसी तैना भेटायला येतो बॉन्ड तिथवर ठीक नंतर चा भाग बॉलीवूड्नी स्पॉन्सर केल्यासारखा .
आय मिस्ड द बॉन्ड गॅजेट्स. आय मिस्ड एम.
पण
अ‍ॅस्टिन मार्टिन बेस्ट.
डॅनियल क्रेग मस्त
स्पेक्टर च्या आधिच्या कारवाया चे संदर्भ लागले
स्पेक्टर नंतर बॉन्डपट म्हणून कसली वाट पहायची अशी जराशी हुरहुर वाटली.
ओव्हरॉल जरासा कचकड्याचा सिनेमा.

इन्ना ... नोंदीसाठी +१

अ‍ॅस्टिन मार्टिनला पाण्यात सोड्तो तेव्हा किती हळहळ वाटली .. टडोपा!!

मी बाँड पटांचा भक्त आहे त्यामुळे थिएटरला जाऊन बघणे भाग आहे. पण क्रेग बाँड झाल्या पासुन प्रत्येक सिनेमात बाँडच्या कॅरेक्टर ची जास्तीत जास्त वाट लावण्याची स्पर्धा लागली आहे. कॅसिनो रॉयल चांगला होता, पण त्यानंतर आलेल्या क्वांटम ऑफ सोलेस आणि स्कायफॉल नी निराशा केली.

ह्या सिनेमाबद्दल पण फार काही चांगले मत कोणाचे दिसत नाही, तरी बघायला जाणार ती गोष्ट वेगळीच. बाँडभक्तांचा असा गैरफायदा जर निर्माते घेत असतीत तर ती फसवणुक आहे.

आता म्हणे काळा बाँड असणार, मग मात्र मी हिंम्म्त करणार नाही तो सिनेमा बघायचे ( मी रेसिस्ट नाही ).

खरे तर मुळ निर्मात्याची मुलगी गेले चार सिनेमा बनवते आहे, वडीलांच्या आत्म्याला फार त्रास होत असेल. त्या पेक्षा तिचा सावत्र भाऊ ( म्हणजे सावत्र आई चा दुसर्‍या बापापासुन्चा मुलगा ) मायकल नी मधे जे बाँडपट बनवले होते ते उत्कृष्ट होते.

क्रेगच्या सगळ्या पिक्चरचे दुवे एकत्र आणले आहेत. पुढच्या भागात क्रेग असायची शक्यता अगदीच धुसर.. >> क्रेग नाहिये पुढे, त्याने सांगितलय कि त्याला कंटाळा आलाय. (कदाचित त्याला खास हिरॉईन्स देत नाहित म्हणून असेल :D) . "क्रेगच्या सगळ्या पिक्चरचे दुवे एकत्र आणले आहेत" हे बरोबर आहे फक्त तिसरा सिनेमा कळस न होता साफ झोपलाय त्याबाबतीमधे. दुसरा अधिक चांगला होता.

चला इतर पब्लिकला पण स्पेक्टर बोर झाला हे बघून बरं वाटलं नाहीतर १-२ आठवडे टॉप वर होता सिनेमा त्यामुळे वाटलं पबलिक प्रेमात पडलं म्हणजे आपल्यालाच बाँड बाबत विरक्ती आली की काय अशी शंका येउन गेली.
मलाही आश्चर्य वाटलं सिनेमा बघताना, अगदी नवोदित डायरेक्टर डायरेक्ट करतोय की काय अशी शंका आली बघताना. आता एकेक उदाहरण बघू. ******SPOILER ALERT********* (ज्यांनी बघितला नाहीये त्यांनी कृपया पुढे वाचू नये)

१) पहिल्या त्या मेक्सिको सिटी मधल्या त्या बॉंब स्फोटाच्या सीन मध्ये. सुरवात तर छान झाली. क्रेग हा इतर बाँड पेक्षा खुप खवळून आणि निर्दयपणे पाठलाग करुन अगदी चेचतो विलन लोकांना हा अनुभव आपल्याला आहेच आणी इथेही अशीच एक जबरी चेझ अनुभवायला मिळणार होती. ते मोठं भित्ताड त्याच्या बोडख्यावर पडता पडता राहतं तिथ पर्यंत मजा आली देखिल पण पुढे त्या हेलिकॉप्टरच्या सीन नी पार कचरा केला!
त्या सीन मध्ये क्रेग अक्षरशः चवताळून त्या विलनला आणि त्या पायलट ला धोपटत असतो. आता इथे गंमत अशी आहे ही बाँड म्हणजे शेवटी बाँड असतो त्यामुळे मानवजातीवर एखाद मोठ्ठं संकट येऊ घातलेलं असलं की तो बरोबर तिथे दत्त म्हणून जाऊन उभा राहुन आपल्या दिवंगत राजकुमारांसारखे विलन लोकांच्या संकटरुपी राकेटांमधली फ्युज कंडक्टरं काढून घेतोच घेतो ते पण इतक्या कूल पणे की जसं काय त्यानी झुडुपात अडकेलं मांजर सोडवावं अशी त्याची ख्याती आहे आणि म्हणूनच तो बाँड आहे! पण हाय रे कर्मा, ह्या हेलीकॉप्टरच्या सीन मध्ये त्या खाली उभ्या असलेल्या जनसमुदायाची आजिबातच काळजी/पर्वा दाखवलेली नाहीये. इन फॅक्ट तो चवताळून नुस्ता हल्ले करत अस्तो पायलट आणि विलन वर. ते हेलिकॉप्टर पार करामती दाखवणार्‍या प्लेन सारखं उलटं होतं पण पडत नाही हे आपण सोडून देऊ एक वेळ बाँडपट असल्यामुळे पण हा लॅक ऑफ कनसर्न फॉर ह्युमॅनिटी आजिबातच त्याच्या इमेजला शोभणारा नाही! तो सीन शूट छान आणि खुपच रियलिस्टिक घेतलाय पण बर्‍याच वेळा त्या बाँडच्या चवताळून केलेल्या हल्ल्यामुळे ते खाली पडता पडता वाचतं हे बघूनच तो सीन माझ्या डोक्यातून पुर्णपणे उतरला! क्रेग खरं हँड टु हँड कॉम्बॅट वाला आणि सॉव आणि स्मुथ पेक्षा जरा कणखर असा बाँड चितारतो हे कधी कधी छान वाटतं पण असा रानटीपणा म्हणजे बॉंडच्या बेसिकलाच हात घातल्यासारखं आहे.

२) पुढे त्या ट्रेन मध्ये तो टग्या विलन जेव्हा बाँड आणि याच्या फटाकडीवर आक्रमण करतो तेव्हा चक्कं ती फटाकडी येऊन त्या टग्याला गोळी मारते त्यामुळेच बॉंड वाचतो, नाहीतर त्याचा सुपडा साफच केला होता त्यानी! छ्या! हे काय शोभतं का बॉंडला? बाँड म्हणजे सगळ्यांचा विघ्नहर्ता! संकट कितीही आडदांड असलं आणि त्याच्या दोन चार फाईटी जरी खालल्या तरी सरशी शेवटी त्याचीच होते! हे असं पोरीबाळींनी येऊन तरण्याबाँड बाप्याला वाचवायच्या स्टॉर्‍या आम्हाला बघायच्या असत्या तर आम्ही शिंचं बाँड बघायला कशाला आलो असतो? त्या करता हंगर गेम्स वगैरे सिनेमे आहेत ना? कैत्तरी आपलं!

३) बाँड गर्ल (लिया सेयडु: ती अशक्य हॉट अ‍ॅन्ड व्हॉट नॉट अशी दिसलीये, पण त्याबाबत नंतर, सध्या बाँडची रेवडी उडवणे सुरु आहे त्यामुळे... Proud ) ला तो आडदांड टग्या त्या बर्फाळ डोगरांमधल्या रस्त्यानी घेऊन चाललेला असतो तो शॉट तर अक्षरशः वर अमेय नी लिहिलय तसा रोहित शेट्टी इन्स्पायर्ड शॉट वाटतो! म्हणजे अचाट अ‍ॅक्शन करता नाही तर बिन्डोकपणा करता! रोहित शेट्टी सुद्धा इतका बिन्डोकपणा करणार नाही.
हा बाँडभौ त्या गाड्यांचा पाठलाग करु करु त्या प्लेनचे पंख, चाकं वगैरे गमावतो, अगदी समोरासमोर धडक करु बघतो तो पर्यंत ठीक होतं पण पुढे! ते प्लेन अशा अवस्थेत बर्फावरुन घसरत घसरत पुढे जाऊन बरोबर त्या विलनच्या २ गाड्यांमधल्या एका गाडीला उडवतं!!!! कसं काय? डंब फ्रिकिन लक?!! why the xxck would we want to watch a bond movie if he starts taking out bad guys by dumb luck?!!! Don't we have Johnny English for that? Totally mental!

४) एक तर क्र्स्टॉफ वॉल्ट्झ आहे त्यामुळे खुप आशा निर्माण झाली की जबरी आणि माथेफिरु असा विलन बघायला मिळेल तर कसलं काय? सगळ्यात गरिब विलन करुन टाकला वॉल्ट्झचा! म्हणजे माथेफिरु पणा दाखवायला फारसे सीन दिले नाहीत म्हणून नाही तर ज्या सीन मध्ये बाँडची सरशी होते ते सीन इतके अशक्य गरीब आहेत की त्यामुळे त्या विलनची कौडीची सुद्धा इज्जत राहात नाही. आता मला सांगा, हा विलनांचा विलन, इतका श्रीमंत की त्याच्या चमच्यांकडे फरारी आहे तो माणूस बाँडला खुर्चीला बांधून ठेवताना, त्याच्या हातातलं घड्याळ कसं काय राहु देइल? पुर्वी जेव्हा रॉजर मूरच्या हातात ती डायलची सॉ असलेलं घड्याळ दाखवलेलं आहे तेव्हा त्याचे प्रतिस्पर्धी तितके डोक्यानी चलाख नसतात हे डायरेक्शन एकदम परफेक्ट आहे. इथे म्हणजे ह्या स सपोजेडली च्लाख आणि क्रुर विलन समोर एकदम बॉलिवूड स्टाईल ती हिरविण बाँडला मिठी काय मारते अन घड्याळ काय काढते! वाट्टेल ते सुरु आहे असं वाटत होतं तो शॉट बघताना. पुढे तो त्या टॉर्चर रुमच्या बाहेर पडतो तेव्हा मला वाटलं आता प्रचंड धुमश्चक्री होणार! म्हणजे आता बाँड २-३०० लोकांना तरी उडवेल कारण इतका हा जबरी विलन, त्याची ती इतकी जबरी फोर्ट्रेस त्यात बाँड एक स्फोटात टॉर्चर चेंबरच्या बाहेर, त्यानंतर एक १५-२० गोळ्यात ५-६ लोक मारतो आणि पुढे गॅस सिलिंडराच्या एक त्यातल्या त्यात मोठ्या स्फोटात अख्खी फॉर्टेस उडवतो! अरे काय चाललय हे? जरा तरी गर्दी वगैरे दाखवा ना? म्हणजे विलनकडे खुप लोकं आहेत हे दाखवायचा भास निर्माण करायचा प्रयत्न तरी करा!
त्याही पेक्षा कहर म्हणजे ह्या टॉर्चर शॉटच्या आधी तो विलन बाँड आणि त्याचं नेमकं काय कनेक्शन आहे ते सांगतो! ती यादों की बारात छाप स्टोरी एकून तर मला हसावं की रडावं कळेना! Lol अवघड आहे! हा पिकचर सॅम मेन्डेसनीच डायरेक्ट केलाय का अशी शंका येत राहते वारंवार. Sad

५) वर अमेय नी लिहिलय तसं राल्फ फाईन्झ (एम) ला पण टोटली वाया घालवलाय. त्या सी कडून त्याचा सारखा पोपट होत असताना मला खुप आशा होती की एम नी काहीतरी जबरी डोकं लावलेलं असेल जे शेवटी उघडकीस येइल, कसलं काय? सी त्याची सारखी इज्जत काढत राहतो अन पुढे जे काही होतं ते सगळं बाँड त्याच्या एकट्याच्या जोरावर जे काय करतो त्याच्या पुण्याईनी एम ला सी चा कचरा करायला मिळतो. टोटली दुय्यम आणि अगदी निरर्थक वाटावं असं पात्र रेखाटलय! त्यात तो सारखा सुनिल शेट्टी सारखा तोंडात बार/मावा/तंबाखु असल्यासारखा बोलत राहतो! अ आणि अ!

६) शेवटच्या शॉट मध्ये पण अशक्या बॉलिवुडगिरी, जी आजकाल बॉलिवुडवाले सुद्धा दाखवत नाहीत अशी दाखवलेली आहे. त्या बिल्डिंग मध्ये मॅडेलिन (सेयडु) ला कुठेतरी बांधलेलं असतं आणि ती बिल्डींग उडणार असते, तो चक्क तिला हाका मारायला लागतो! येवढ्या मोठ्या बिल्डींगमध्ये त्याला फक्त अंदाजाने किंवा प्रेमापोटी बहुतेक ती सापडते! अन ती त्याला सापडते तेव्हा ज्या बेफिकिरिनी तो त्या वायरी काढतो ते आजिबात म्हणजे आजिबात पटत नाही. अरे हिरवी वायर की लाल वायर वगैरे काही आहे की नाही? सरतेशेवटी तो विलन तिथे जमिनीवर पडलेला अस्तो तेव्हा एका बाजूला एम अन दुसर्‍या बाजूला मॅडेलिन असा टोटल बॉलिवुड ट्रॅप दाखवलाय आणी बाँड दोन्ही कडे बघून शेवटी मॅडेलिनला निवडतो ते बघून मलाच हाराकिरी करावीशी वाटत होती!

बुवा लईच चिरफाड करुन र्‍हायलांय की..

अगदीच वाईट सीन म्हणजे तो टग्या व्हिलन ट्रेन मधून बाहेर फेकला जातो त्यानंतरचा बॉण्ड आणि फटाकडी मधला संवाद.. त्यावेळेस फक्त का ही ही हां.... एवढेच उद्गार बाहेर पडलेत.

संकट कितीही आडदांड असलं आणि त्याच्या दोन चार फाईटी जरी खालल्या तरी सरशी शेवटी त्याचीच होते! हे असं पोरीबाळींनी येऊन तरण्याबाँड बाप्याला वाचवायच्या स्टॉर्‍या आम्हाला बघायच्या असत्या तर आम्ही शिंचं बाँड बघायला कशाला आलो असतो? त्या करता हंगर गेम्स वगैरे सिनेमे आहेत ना? कैत्तरी आपलं!

>>

कसलं लिहिलंय बुवा ... जबरदस्त हाणलीत.
Rofl Rofl Rofl

Pages