धुरा

Submitted by दाद on 3 February, 2009 - 23:49

संपूर्ण गाडीरस्ताभर, विठा गप्प होता. नेहमी सारख्या गावाच्या, घरच्या, शेतीच्या, स्वत:च्या घरच्या गोष्टी सांगत नव्हता. संभाजीरावसुद्धा आपल्याच विचारात होते. जमेल तितका आवाज स्थिर ठेऊन ’कसाहेस विठा?’ अशी एका वाक्यात विचारपूस केल्यानंतर बाळासाहेब थिजल्यासारखे गप्पं झाले होते.

वाड्याच्या देवडी दारात कुळंबिणींनी पायावर पाणी घातलं. धाकट्या सुनबाईला ओवाळणीसाठी पुढे घालून आईसाहेब मागे डोक्यावरला पदर थरथरत्या हातांनी सावरत उभ्या होत्या.

’औंक्षवंत व्हा’, पाया पडणार्‍या मोठ्या मुलाला तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्यांनी आशिर्वाद दिला, ’हाता-पायावर पाणी घ्या, बाळासाहेब आणि... आणि... घरच्या लक्ष्मीकडे....’

सोप्यावर जमा झालेल्या घरातली माणसं, गडी माणसं, ह्यांच्या उपस्थितीला न जुमानता आईसाहेबांच्या तोंडून हुंदका बाहेर पडलाच. त्यांना एका हाताने सावरत मान खाली घालून संभाजीराव माजघरात आले.

मागच्या परड्यात डोणीजवळ थंडगार काळ्या दगडावर उभे रहात त्यांनी डोणीतून पाण्याने भरलेला तांब्या उचलला आणि पायावर पाणी घेतलं. दोन दिवसांच्या प्रवासाने तळावलेले पाय थंडावले अन नकळत डोळे मिटले. पायावर पडणार्‍या पाण्याच्या धारेला हिरव्या लाजर्‍या चुड्याची किणकिण असल्यासारखं वाटलं.... डोईवरला पदर सावरत, ओठांच्या कोपर्‍यावरून हसू हनुवटीच्या गोंदवणात उतरणार नाही अशी काळजी घेत, खाली वळवलेल्या नजरेचं माणूस, आत्ता पंचा पुढे करेल असं वाटलं त्यांना.
एक सुस्कारा सोडून.... आपल्याच खांद्यावरल्या पंचाने चेहरा पुसताना त्यांनी डोळेही टिपले. उणापुरा पंचवीस-तीस वर्षांचा संसार म्हणायचा. त्यातही सहवास किती म्हणायचा?

काहीकाही गोष्टी आपण अशा वागवतो की, त्या उतरवल्या तरी त्यांची सावली सुद्धा ओझं बनून वावरते, आजूबाजूला. सैन्यातल्या नोकरीतली निवृत्तीपूर्वीची शेवटची रजा घेऊन आलेल्या संभाजीरावांना खान्द्यावरल्या पट्टीवरचे चांद-तारे, छातीवर डावीकडे लटकवलेले बिल्ले.... तिथे नसतानाही त्यांचं ओझं जाणवलं.... धाप लागल्यासारखा श्वास ओढून घेत ते पडवीत शिरले.

गोरज वेळा... संध्याकाळची काहीच चुकार किरणं अजून मागच्या अंगणात ऊन-सावलीचा एकच शेवटचा डाव खेळण्याच्या घाईत होती. घरच्या गड्यांनी गुरं कधीच रानाहून वळवून आणली होती. दावणीला शिंग खटखटवीत उमदी जनावरं घरातलं कुणी मायेचं येऊन पाठीवर थाप घालायची साद घालत होती.
संभाजीरावांची चाहूल लागून गोठ्यातली कपिला हंबरली... एरवी तिच्या पाठीवर हात फिरवल्याविना, इतर गाई-गुजींची चौकशी केल्याविना, गवताचा एकेक कवळ आपल्या हाताने त्यांना घातल्याविना, त्यांचं पाऊल घराकडे वळलं नसतं. शेती-वाडी, गुरं, इथलं रान, गडी माणसं... ह्या सार्‍यापासून लांब, देशाच्या वेशीवर कुठेतरी असले तरी... ह्या सार्‍यांची स्वप्नं पडायची.... हे नांदतं गोकूळ फार जवळचं होतं त्यांना.

पण... आज? आत्ता? ...आत्ता नाही. ह्या सगळ्याहून अधिक जवळचं, मायेचं माणूस असाध्य रोगानं अंथरूणाला खिळलं होतं. अशाच काही वर्षांपूर्वी ह्याच गोरजवेळेला, संध्याकाळच्या सोनसळी उन्हात त्यांनी हाती धरून लक्ष्मी घरात आणली होती.
*****************************************
संभाजींना आठवलं,... लग्नाच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सत्यनारायण. पण आधी सकाळी घराण्याच्या रीतीनुसार, घरच्या शस्त्रांची पूजा. पेशव्यांच्या आधी पासून घोरपडे घराण्यात घरच्या पुरुषांनी शस्त्र धरलेलं, युद्धात नाव गाजवलेलं. त्या काळापासूनची तलवार, खंजीर, अन आताची बंदूक अशी शस्त्रं घरात होती. शिलंगणाला पुरूषांनी पुजायची अन लग्नाच्या दुसर्‍यादिवशी, घरच्या देवीच्याही आधी, नव्या सुनबाईनं ह्या शस्त्रात्रांची पूजा करायची.
पूजेची तयारी बघायला म्हणून आलेल्या अन देवघराच्या दाराआड उभे राहून लक्ष्मीला न्याहाळणार्‍या संभाजींना दिसलं... किती हळूवारपणे लक्ष्मीनं पदरानं तलवारीचं पातं पुसलं, अन चौरंगावर ठेऊन वाकून नमस्कार केला.... हिरव्याकंच चुड्याची किणकिण थांबायच्या आधीच पदर कसला अन कुणी आजूबाजूस नाही ह्याची चाहूल घेत.... तलवार पेलली.... तिचा पवित्रा, जोश, चेहऱ्यावरचा शौर्याचा भाव, त्वेषाचा आवेश... इतकं लोभस होतं, की न राहवून संभाजीराव पुढे झालेच....

'अग्गो बाईssss'.... म्हणून क्षणार्धात लाजून पदर डोक्यावरून घेत पळून जाणारी लक्ष्मी आपल्याला जास्तं आवडली की, देवघरात तलवार हाती घेतलेली?
...त्यानंतर तिची अनेक रूपं बघितली पण ही दोन.... अनेक अनेक वर्षं संभाजींच्या सोबत राहिली.

संभाजींना आठवलं... त्यांच्या रेजिमेंटमधल्या मित्रांनी ’हनिमून’ची डोक्यात भरवून दिलेली कल्पना. मग ’त्या म्हाबळेसूराकडच्या हनुमानाला’ जोडीनं जाऊन येतो... अशी आईसांची पर्वानगी घेऊन, येताना आटवनीनं परसाद आणण्याचं वचन देऊन, लक्ष्मी बरोबर केलेला एकमात्रं प्रवास.
तिथं पोचल्यावर, एस्टी थांबल्यावर तिनं, ’देऊळ कुटंशी?’ म्हणून केलेली विचारणा, मग तिच्या डोळ्यात बघत त्यांनी केलेला खुलासा, तिचं ’जा|sssवा तिकडं...’ म्हणून लाजून पळून आंब्याच्या झाडाखाली ओंजळीत चेहरा लपवून उभं रहाणं.... स्वप्नातल्यासारखे तिच्याबरोबर घालवलेले तीनच दिवस! केलेला अन फेडलेला प्रत्येक नवस!

त्यानंतर आपली पंजाबच्या, कच्छच्या सीमारेषांवर एकामागोमाग एक कमिशन्स झाली. घरी फारसं यायला जमलं नाही. इथलं सगळं तिच्यावर सोडून देशाची चिंता वहायला मोकळे झालो होतो आपण....

सहवास म्हणायचा तो आठवणींतच जास्तं.... देशासाठी लढण्यात आयुष्य गेलं आजवरचं.... लुटुपुटीचंही का होईना पण घरधनिणीशी भांडायलाही वेळ झाला नाही.... सटी-सहामाशी यायचं... आले आले म्हणेपर्यंत परत जायची वेळ यायची. एव्ह्ढ्या भल्या थोरल्या कुटुंबातल्यांचं, पावण्या-रावण्यांचं, कौतुकानं त्यांना भेटायला आल्या-गेल्याचं करताना त्यांनाही अन तिलाही... एकमेकांसाठी कुठे वेळ मिळाला?

पहिल्यांदाच घरी आले तोपर्यंत रेजिमेंटमधल्या इतरांसारखं शहरी बोलणं सुरू झालं होतं. त्या रात्री, तिनं घातलेली गळ, ’इतं आमच्यासंगं हितलीच बोली बोलायची बगा... त्ये तुमचं श्यारी बोल्णं?.... काय सुदरंना आमास्नी.... घरचीपण सगळी कुचमत्यात मंग तुमच्यासंगं बोलाया, बगितलंत न्हाई?... अन.... मग आप्लं माणूस आप्लं वाटंना... तर काय!’

तरी, मिळाल्या वेळात ते तिला बघितलेलं, अनुभवलेलं... आपल्या परीनं सांगायचे... नवीन भूमी, नवीन लोक, नवं आकाश, ऋतू बदलणारं... कधी किट्ट काळ्या टेकाडावर येऊन बसलेला एकांडा पूर्ण चंद्र, तर कधी रोरावत जाणारी सतलज.... कधी नजर जाईल तिथवर हिरवीगार शेतं तर कधी सावळ्या वाळूच्या मैदानात तीनच हिरवळींचं गोंदवण... अगदी लक्ष्मीच्या हनुवटीवरल्यासारखं.... असंच काही बाही...
... अन त्या बरोबर आवर्जून हे सुद्धा... सारखं सारखं.... ’मेजर, तुमी असायला हवे होतात’.
त्यांचं तिला एकांतात मेजर म्हणणं आणि तिनं कौतुकानं, किंचित लाजत आपल्यामते कडक्क सॅल्यूट ठोकणं...

*****************************************
पावलांचा जराही आवाज न करता ते लक्ष्मीच्या खोलीत आले. खुर्चीत वाचत बसलेल्या नर्सबाईंना कळलंही नाही. पण एकटक, खिडकीबाहेरच्या आकाशात काहीतरी शोधणार्‍या लक्ष्मीची नजर मात्रं क्षणात वळली.

’तुम्ही? कदी आलात? आन लडाई? मला सांगितलंसुदिक न्हाई कुणी’, एक एक शब्दं बोलताना लागणारा श्वास ऐकू येत होता. संभाजीराव का इतक्या गडबडीने परत आलेत, ते लक्ष्मीला व्यवस्थित ठाऊक होतं. आपल्यापरीने ते दडवण्याचा प्रयत्नं करत होती लक्ष्मी. संभाजीरावांना बघून नर्स गडबडीने बाहेर गेली.

’कुणी कशाला सांगायला हवं? तुमाला कळलंच की, हे आत्ता? आनि लडाईचं म्हनशीला तर त्या मेजरसायबांना सांगुन आलो का, आमच्या मेजर सायबांचा हुकुम हाये, का आटवन येतेय आमची, तर लगोलग हाजिर व्हा!’, पलंगावर तिच्या शेजारी बसत संभाजीराव म्हणाले.

’तर? कुनाला वाटल, आगदी बायकूच्या अर्द्या शब्दात...’, कृत:कोपाने नेहमीसारखा मानेला सुर्रेख झटका न देता, श्रमाने नुस्तेच डोळे मिटत लक्ष्मी म्हणाली.

तिचा हात हातात घेत संभाजीरावांनी मायेनं भरल्या स्वरात विचारलं, ’आता कसं वाटतय लक्ष्मी?’

’बरी हाय, की. दुकनं आपलं त्ये.. न्हेमिचंच... ’, हळूवारपणे पण जमेल तितक्या गडबडीने त्यांच्या हातातून हात काढून घेत लक्ष्मी हसली.

पूर्वी हसली की डाव्या गाली खळी पडायची. आजारपणात चेहरासुद्धा इतका चोपला होता की शोधूनही संभाजीरावांना खळी काही दिसेना. त्यांचं असं शोधत एकटक तिच्याकडे बघणं लक्षात येऊन लक्ष्मीने हलकेच मान फिरवली.

’उंद्या उजाडंस्तवर चिरंजीव येतात म्हनं... मग आमच्याकडे बगाया वेळ होणार न्हाई तुमाला.... त्ये काय? तुमचं लाडकं शिलेदार.... आमी काय?’, संभाजीराव हसून म्हणाले.

’तुमी दोडकं तर.... जावा, चा-पाणी झालं नसल तर उरकुन या.... जावा. आमी जात न्हाई कुटं.. हितच हाओत’, आपल्यामते विनोद करून हसली लक्ष्मी.

*****************************************
’बाई, लापशी घेता? काहीतरी खात रहायला हवं. शक्ती कशी येणार नाहीतर?...’, नर्सबाई आपल्यापरीने समजवत होत्या. गेल्या अनेक दिवसांसारखच आजही लक्ष्मीचं ’नको नको’च चालू होतं.

’बाई, द्या ते भांडं माझ्याकडं आणि घरात जरा, मुरावळ्याची फोड मागितली म्हणून सांगा’, संभाजीरावांकडे भांड देऊन बाई निघून गेल्या.

लक्ष्मीनं, ’अवो तुमी? तुमी कशापाई?.. मी घ्येते... आजच जरा चव न्हाई तोंडाला...’, असलं काहीबाही बोलयचा प्रयत्नं केला. तोपर्यंत मुरावळ्याची वाटी आली होती.
ते दोन्ही जवळच्या टेबलावर ठेवीत त्यांनी दार लावलं आणि पलंगावर बसले.

काही न बोलता, लापशीचा चमचा पुढे केला. ’आत्ता? तुमी? नको.. नको...’, लक्ष्मीनं पुढे काही बोलण्यापूर्वी हळव्या स्वरात संभाजीराव म्हणाले, ’इतकंही करू देणार नाहीस?’

पुढे एक शब्दं न बोलता लक्ष्मीने लापशीचा घोट घेतला. तोपर्यंत मुरावळ्याच्या वाटीत बोट घालून बोटावर खार घेऊन संभाजीरावांनी तिच्या ओठांपर्यंत आणलही होतं. नकळत जीभ बाहेर काढून तिनं चव घेतलीही.
आंबट, गोड चवीसहं अत्यानंदाने तिचे डोळे मिटले. अनेकानेक वर्षांच्या वठल्या झाडाला हिरवा शहरा यावा तशी ती मोहरली...

........क्षणात अल्लड नवी नवरी होऊन स्वयंपाकघराच्या पडवीत ताकाच्या उभ्या रांजणाजवळ पदर कसून उभी होती. उभ्यानेच एका पायाचा रेटा रांजणाच्या चुंबळीला देऊन लयीत ताक घुसळणं चालू होतं, मधेच कौतुकाने रवी वर उचलून, तिच्यावर जमा होणारे लोण्याचे कण निरखणं चालू होतं... शेजारच्याच खांबाला टेकून संभाजीराव येऊन कधी उभे राहिलेत अन निरखतायत तिला कळलच नाही... वाटीत मुरावळा घेऊन, त्यात बोट घालून चाटीत.

पुढे जे घडलं ते आईसा खिडकीतून बघतायत ते दोघांनाही माहीत नव्हतं... आपापली उष्टी बोटं आपल्याच कपड्यांना पुसताना... आईसांचे शब्दं ऐकू आले, ’उरलच असं तर आणा लोनी आता घरात सुनबाई... बोके सोकावलेत. आणि तुमी, बाळासाहेब, आपल्यात मुरावळा लोण्यासंग खात न्हाईत....’
स्वयंपाक घरात नजरेला नजर दिली नाही तरी सासूबाई ओठांच्या कडेतून हसत होत्या, ते लक्ष्मीला न बघताही दिसत होतं. दुपारची पंगत वाढायला लक्ष्मी जाऊ धजलीच नाही.
.....
तो क्षण ओसरला आणि इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला. दु:खासारखं सुखही फार सोसता येत नाही... मन हल्लक झालेलं असलं की सुखाची काडीसुद्धा भाराने कोसळवते.
त्यांच्या उष्ट्या बोटासहं तो कणखर हात, त्यातल्या मायेच्या उबेसह आपल्या दोन्ही हातात घट्ट धरण्याचा आटोकाट प्रयत्नं करीत लक्ष्मी खदखदू लागली. तशीच तिला जवळ ओढीत संभाजीरावांनी मिठीत घेतली. आणि त्यांचाही संयम संपला... बांध फुटून पाणी चहू दिशांनी वहावं तसं झालं.

एकमेकांना सावरत, डोळे पुशीत भानावर आले तेव्हा लक्ष्मी खूप थकली होती... ते जाणवून संभाजीरव म्हणाले, ’थकलीस... पडतेस जरा? मी इथे... बाहेरच आहे...’ अन हळूच उठू गेले.

सगळा जोर लावून त्यांचा हात घट्टं धरून ठेवीत लक्ष्मी निकराने म्हणाली, ’आता जावू नगा कुटं... इथंच माझ्यापास थांबा...’

’असंच बरं... तुझ्या मनासारखं’, म्हणत पलंगाच्या पाठीला टेकून बसले. अर्धवट बसल्या अवस्थेत लक्ष्मी त्यांच्या छातीवर डोकं टेकून पडून राहिली.

’तुमी आलासा, आता मला चिंता न्हाई... कशाचीच’, मधेच डोकं उचलीत लक्ष्मी पुटपुटली.

’आत्ता? आनि तुमी कुटं पळून चाललात, मेजर? कमिशन हाती घ्येतलं त्ये पूर्णं केल्याबिगर? आस्सं कसं होईल? ऑ? मी कुटं जात न्हाई आणि तुमीबी कुटं जात न्हाई... कळ्ळं?’, संभाजीरावांनी अत्यंत कसोशीनं स्वर संभाळत लक्ष्मीला खोडून काढली... तिच्याभोवतीची हाताची कवळ घट्ट करीत म्हणाले, ’तशी आर्डरच समजा...’

आळेबळे हात उचलीत लक्ष्मीनं डोक्याशी नेऊन सॅल्यूट केला. तो हात तसाच धरून ठेवीत त्यांनी तिला थोपटलं आणि लक्ष्मी परत त्यांच्या छातीवर डोकं ठेवून पडून राहिली.

*****************************************
किती आघाड्या संभाळल्या हीनं! पहिल्या बाळाच्या वेळचं नासवणं, बाबासाहेबांचं अंथरूणाला खिळणं, त्यांचा मृत्यू, धाकल्याचा अपघात, मधल्यानं इस्टेटीवरून केलेली भांडणं, एकुलत्या एका नणंदेचं लग्नं, तिची माहेरपणं, बाळंतपणं, आपल्या मुलाचं शिक्षणं, आजारपणं, येण-जाणं.... अन... अन... स्वत:चं कॅंन्सरसारख्या आजाराशी युद्ध... एकडाव जिंकलेलं... अन ह्याखेपी?
संभाजीरावांना स्वत:लाच त्या प्रश्नाचा घाव उरात खोल खोल बसला.... अजून उत्तर दिलं नव्हतच, तरी.

कसं सांभाळलं असेल हिनं? आपण नसताना किती आघांडींवर कशी झुंजली असेल? घरातल्यांची मर्जी, प्रेम मिळवणं कठीण नव्हतं. पण घाव-डावही काही कमी नव्हते.

मधल्याने इस्टेटीवरून भांडण काढलं. एक दिवस शेतातला मूळवसाचा दगड तो हलवतोय म्हणताना लक्ष्मी अनवाणी शेतावर धावली होती. ऐकलं की, वेळेस तिथल्याच एकीच्या हातातला विळा हाती घेऊन त्याच्या कामकर्‍यांना धमकावलंही होतं.

बाबांच्या दुखणाईत, एक पाय कापून काढायचा ऑपरेशन सारखे अवघड निर्णय, त्यातच आईसांना संभाळणं, धाकट्याच्या अपघातानंतर त्याला गावात काढून दिलेलं गॅसच्या एजंन्सीचं दुकान, आणि आपल्याच नात्यातली गुणी मुलगी शोधून त्याचं लावून दिलेलं लग्नं...
कशाकशाला मागे राहिली नाही... आपण असतो तर हेच केलं असतं का? कदाचित नाही... हिनं जास्तच हुशारीनं केलय.

घरातल्यांचं केलं असं नाही तर, पुढं सरून, कूळ म्हणून आयुष्यभर खपलेल्या कुशाबाच्या लेकीचं लग्नं लावून दिलं. पुढं ती विधवा होऊन माघारी आल्यावर एक शिवण मशीन घेऊन देऊन पोटाला लावलिन.
गावात बालवाडी सुरू केलीये, दूधकेंद्रावर जाणाऱ्या घरा-घराच्या दुधाचा, साखरकारखान्याला जाणार्‍या उसाचा वरघाट अन भाव ठरवण्यात हिचा पुढा आहे.
मुलाचं शिक्षणं तालुक्याला ठेऊन करवलं. घराण्याच्या रितीप्रमाणं त्याला सैन्यात जायला तयार केलान.... कसं केलं असंल? कचरलं नसंल आईचं काळीज हिचं?

तो काय, मी काय.... आम्हा शिलेदारांची आघाडी ठरलेली, दिलेला हुकुम जीवाच्या करारावर पाळायचा, शत्रूच्या खेळी माहीत आणि लढाईचं शिक्षणही होतं...

पण हिचं काय? दररोज एक नवीन आघाडी, नवीन खेळी, लढायचं ते ही आपल्याच माणसांशी, आपल्याच माणसांसाठी...
घायाळ झाली नसंल?
नसायला काय झालं? आपल्यालाच ठावं आहे. मधल्याने हिच्याविषयी पिकवलेलं खोट-नाटं. ते ही वीष पिऊन बाबांच्या शेवटच्या दिवसांत आण घालून हिनंच ना आणलन त्याला घरी, वडलांना भेटायला?

कुणाला दाखवल्या असतिल जखमा...
आपण आलो तेव्हा तेव्हा आपल्या वाट्याला निव्वळ निर्मळ झर्‍यासारखं हासूच मिळालं. त्यातच मिसळली आसणार हिनं स्वत:ची आसवं.... आपल्यालाच वेचता आली नाहीत, ती.

लक्ष्मीला झोप लागली होती. किती शांत?
नुक्ती लढाईवरून परतून आल्यासारखा, आजाराचे घाव वाजलेला चेहरा... थकल्या-भागल्या रेषांचा, तरी समाधानी मिटल्या डोळ्यांचा, सांडेल न सांडेल असं हसू ओठांवर घेतलेला.... चेहरा!
जणू काही उरलेलं सारं त्यांच्या ओटीत घालून, ह्या दुखण्याच्या जगापासून दूर कुठेतरी निखळ आनंदाच्या गावात निवांत नांदावी... तशी, गाढ झोप.

त्यांना त्यांचे मेजर साहेब आठवले.... फुटलेल्या बॉम्बच्या तडाक्याने कोथळा निघालेले... किती शांत दिसत होते... जणू त्यांना विश्वास होता... की त्यांच्याविनाही जिंकतीलच त्यांचे शिपाईगडी.
त्यांचं एक तत्वज्ञान होतं... आपण लढावं... अगदी तळहातावर शीर घेऊन लढावं. लढाई जिंकणार काय? हारणार काय? ह्या लढाईचा परणाम काय? आपल्यामागं कोण लढंल? आपला चिरा कुठं, पणती कोण लावंल? असले निरर्थक प्रश्नं खर्‍या शिलेदाराला कधीच पडत नाहीत. तो फक्तं लढतो.... कारण, त्याला ठावं अस्तं की, आपल्यामागं ही लढाई जिंकस्तोवर लढणारे आहेत, जीवाची कुर्बानी देणारे आपल्यासारखेच जवान गडी आहेत... तेव्हा मर्दानो, लढा!

न राहवून त्यांनी तिचा कृश झालेला हात आपल्याच हाताने आपल्याच हृदयावर ठेवला... तिच्यातूनही आर-पार होत त्यांना जाणवणारी त्यांच्याच काळजाची धडधड.... नव्हे कळ... ही... काळजाची कळ आत्ता जाणवतेय तितकी पूर्णं, तितकी जिवंत कधीच नव्हती...
नव्हती कशी?... एकटे असताना, प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा लक्ष्मी आठवली, तेव्हा तेव्हा हीच धडधड अगदी कंठाशी येऊन नाही भिडली?

लक्ष्मीची झोप चाळवल्यासारखी झाली. तिनं मान वर करून त्यांच्याकडे बघितलं, हलकं हसली... आणि...
*****************************************
.....आणि काहीच नाही. लक्ष्मीनं त्यांच्याच कुशीत पहाटे सरत्या रात्रीसारखा काढता पाय घेतला... हलकेच त्यांनाही कळू न देता, गेलीही.

हल्लकल्लोळ उठलेल्या वाड्याला पाठी टाकून ते चालू लागले... पांढर्‍या शुभ्र सदर्‍यावर पडलेला कुंकवाच्या डागावरून हळूवार हात फिरवीत....
हे एक नवीन कमिशन होतं...
.... हे जमेल आपल्याला? तिच्यासारखं निगुतीनं सगळं करायला जमेल? तिच्यासारखं एकाचवेळी अनेक आघाड्या संभाळत येतील आपल्याला?...
मेजर...
....त्यांची मेजर आत्ताच धारातिर्थी पडली होती.... तिची धुरा त्यांना पेलायची होती... तिचा विश्वास सार्थ करायचा होता...

समाप्त

गुलमोहर: 

नेहेमीप्रमाणे सुंदर. एकदा वाचुन मन भरत नाही. परत वाचणार आहे आरामात..

दाद, सुरेख कथा. खूप आवडली. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

किती सुरेख लिहिलं आहेस! खूप आवडली कथा.

दाद हळूवार कथा.. फार आवडली. Happy
----------------------
एवढंच ना!

छानच

सुरेख वर्णनशैली!

अतिशय भावनाप्रधान आणि मनाला स्पर्श करणारी कथा.

दाद........ तुला एक कड्डक सॅल्युट Happy

सुबक, हेलाउन टाकणारी जबरस्त गोष्ट आहे. दाद खुप खुप छान लिहीलय. क्या बात है! जीओ!

नेमकी कथा. आटोपशीर. आवडली.

दाद,
खूप आवडली ही कथा..

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

>>गोरज वेळा... संध्याकाळची काहीच चुकार किरणं अजून मागच्या अंगणात ऊन-सावलीचा एकच शेवटचा डाव खेळण्याच्या घाईत होती. घरच्या गड्यांनी गुरं कधीच रानाहून वळवून आणली होती. दावणीला शिंग खटखटवीत उमदी जनावरं घरातलं कुणी मायेचं येऊन पाठीवर थाप घालायची साद घालत होती.

अतिशय सुंदर! कथा छान आहेच. पुन:पुन्हा वाचावीशी वाटणारी..

किती हळुवार लिहीतेस गं, शब्दा शब्दाला डोळे पाणावतात आणि समोरची अक्षरे धुसर व्हायला लागतात.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

धन्यवाद, सगळ्यांचे आभार.
पंजाबच्या भटकंतीत ट्रेनमधे एक मध्यमवयीन पंजाबी फौजी भेटले. संभाजीरावांसारखीच शेवटची सुट्टी घेऊन घरी चाललेले. माझ्या नवर्‍याने माझ्याबद्दल थोडं(सच) "असं-तसं" बोलताच... बहुतेक त्यांच्या काळजाचा टवका निघाला असावा. आधी माझ्या नवर्‍याला झापलन. मग खूप बोलले ते अंकल. आपल्या शेती-वाडीबद्दल, पत्नीबद्दल. तिच्या कामाबद्दल, त्यागाबद्दल... 'तिच्यासारख्या गृहिणी आहेत म्हणून फौज चालू आहे'!
हे कुठेतरी ह्या कथेचं बीज आहे.
खरच त्या घरच्यांचे शतशः धन्यवाद, ज्यांनी आपल्या वीरांची घरं संभाळली... निश्चिंत मनाने त्यांना देशाचं कुंपण संभाळण्यासाठी मोकळं केलं...

दाद,
प्रसंग फुलवतांना तो घडणार्‍या स्थळाचं, पात्राच्या लहानसहान कॄतींच तुमचं वर्णन एवढं नक्षीदार असतं आणि त्या बाजाचे, त्या काळातले/परिस्थितीमधले शब्द आणि दाखले एवढे चपखल असतात की पात्राचं व्यक्तीमत्व शब्दागणिक घडत आणि उलगडत जातं. त्यासाठी एखादाही वेगळा शब्द खर्ची घातल्यासारखा कधीच वाटंत नाही. अप्रतिम !
खूप आवडली कथा.

-----------------------
2b || !(2b)

लिहायला शब्दच नाहित . आगदि सुरेख .

अतिशय सुंदर वर्णनशैली !! खूप आवडली ही कथा.. Happy

अप्रतिम सुंदर आणि हळूवार कथा. दाद, खुपच आवडली 'धुरा'.

अतिशय सुरेख..
सगळे क्षण किति अलगद पणे पन मनाला भारावुन नेणारे असे टिपले आहेस.... वर्णन करायला शब्दच नाहित माझ्या कडे......

Pages