सिनेमा नावाचे शस्त्र

Submitted by बावरा मन on 21 November, 2015 - 06:28

मागच्यावर्षी 'द इंटरव्ह्यू ' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता . दोन अमेरिकन पत्रकार किम जॉन्ग या हुकुमशहाची मुलाखत घ्यायला उत्तर कोरीयात जातात आणि सीआयएच्या मदतीने किम जॉन्गचा काटा काढतात असं या सिनेमाचं कथानक होत . चित्रपट विनोदी होता आणि यथातथाच होता . पण यात दाखवलेला किम जॉन्ग कसा होता ? स्त्रीगुण अंगी असणारा , गोष्टी गोष्टीवर धाय मोकलुन रडणारा आणि बावळट असा . अमेरिकेचे शत्रु समजल्या जाणाऱ्या नेत्याचे हॉलीवूडच्या सिनेमात असे 'कॅरीकेचर' बनण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही . यापूर्वी पण 'हॉट शॉट ' नावाच्या चित्रपटात सद्दाम हुसेनचे असेचं विनोदी चित्रण करण्यात आले होते . २०१२ साली प्रदर्शीत झालेल्या 'द डिक्टेटर' नावाच्या चित्रपटात अलादीन नावाचा हुकुमशहा जनरल गद्दाफीच अर्कचित्र होता . वर उल्लेखित सर्व चित्रपट हे विनोदी होते आणि वरवर पाहता ते निरुपद्रवी वाटु शकतात . पण खरेच तसे आहे का ? हॉलीवूडचे चित्रपट जगभरात कोट्यावधी प्रेक्षक पाहत असतात . त्यांच्या 'अचेतन ' जाणिवांवर याचा काहीच परिणाम होत नसेल का ? शीतयुद्ध जोमात असताना प्रदर्शित झालेल्या 'रॉकी ' चित्रपटात सिल्वेस्टर स्टॅलोन जेंव्हा रशियन भूमीवर जाऊन आपल्यापेक्षा आडदांड रशियन प्रतीस्पर्ध्याला धूळ चारतो तेंव्हा हॉलीवूड उर्वरित जगाला कोण जास्त श्रेष्ठ आहे याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असतं . अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात हॉलीवूडला एक अस्त्र म्हणून वापरलं . शस्त्रास्त्र आणि अण्वस्त्र याबाबतीत अमेरिकेच्या तडीस तोड असणारा रशिया याबाबतीत मात्र अमेरिकेसमोर खूपच तोकडा पडला . रशियाचा पाडाव होण्यात आणि बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत पडण्याच्या ऐतिहासिक घटनेत एका हॉलीवूड चित्रपटाचा छोटा वाटा आहे असे कुणी म्हंटले तर लोक त्याला वेड्यात काढतील . पण ही वस्तुस्थिती आहे . १९८३ साली तात्कालीन अमेरिकन अध्यक्ष रेनॉल्ड रिगन यांनी रशियन क्षेपणास्त्र प्रणालीला शह म्हणून 'स्टार वॉर्स ' या क्षेपणास्त्र प्रतिरोधक कार्यक्रमाची घोषणा केली . अमेरीकेला प्रतिशह देण्यासाठी रशियाला आपल्या संरक्षण खर्चात वाढ करणे भागच होते . लष्करीदृष्ट्या भक्कम पण आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर झालेल्या रशियाला हा बोजा परवडणार नव्हता . जेंव्हा १९८९ साली तात्कालीन 'सोवियेत युनियन ' कोसळले तेंव्हा त्यामागे अतिशय खंगलेली अर्थव्यवस्था हे एक महत्वाचे कारण होते . अर्थव्यवस्था कोसळण्याला हा वाढीव संरक्षण खर्च काही प्रमाणात कारणीभूत होता . वास्तविक पाहता रीगन यांचा 'स्टार वॉर्स ' हा कार्यक्रम फक्त कविकल्पना होता . स्वतः एकेकाळी आघाडीचे हॉलीवूड नट असणाऱ्या रिगन यांना ही कल्पना 'स्टार वॉर्स ' आणि इतर काही हॉलीवूड चित्रपटांवरून सुचली होती असा दावा अनेक अमेरिकन तज्ञांनी केला आहे . अगोदरच आर्थिकदृष्ट्या विकल असणाऱ्या रशियन अर्थव्यवस्थेला वाढीव खर्चाच्या खोल खोल पाण्यात ओढून नेण्याची रिगन यांची योजना यशस्वी झाली आणि रशियन अर्थव्यवस्थेच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचा मान या अंगी नाट्य पुरेपूर मुरलेल्या या माजी हॉलीवूड नटाला मिळाला .पुढचा इतिहास सगळ्यांना माहीतच आहे .

आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जगभरात आपली मांड पक्की बसवण्यासाठी अमेरिकेने आपल्या 'सॉफ्ट पॉवर' चा पुरेपूर वापर केला आहे . 'सॉफ्ट पॉवर' ही संकल्पना सर्वप्रथम जोसेफ नॉय या अमेरिकन अभ्यासकाने मांडली . राजकारणातली उद्दिष्ट्ये कोणतीही आर्थिक आणि लष्करी ताकत न वापरता साध्य करण्याची एखाद्या देशाची क्षमता म्हणजे 'सॉफ्ट पॉवर' . एखाद्या देशाची 'सॉफ्ट पॉवर' म्हणजे त्या देशाची सांस्कृतिक मुल्ये , त्या देशाची कला आणि संस्कृती , खाद्य संस्कृती आणि यासारखे अनेक घटक . आपल्या आजूबाजूच्या परिघाचे जाणीवपुर्वक निरीक्षण केले तरी अमेरिकेचा याबाबतीतला वरचष्मा सहज लक्षात येईल . केएफसी , कोकाकोला-पेप्सी , मॅकडोनाल्ड यांच्याबरोबरीनेच हॉलीवूड हा पण अनेक भारतीयांच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे . अनेक अमेरिकन सिरियल्सला भारतात प्रचंड लोकप्रियता लाभली आहे . त्यातूनच अमेरिकेची 'पृथ्वीवरचे नंदनवन ' अशी प्रतिमा बनली आहे . हॉलीवूडने कायमचं आपल्या चित्रपटातून आक्रमक उजव्या अमेरिकन राष्ट्रवादाचा प्रचार केला आहे . जगावर आलेले प्रत्येक संकट निवारण्याची जबाबदारी या जगाचा स्वघोषित नेता म्हणून आमचीच आहे अशी भूमिका अमेरिकन चित्रपट मांडत आलेले आहेत . 'इन्डीपिंडेंस डे ' सारख्या चित्रपटात अमेरिका कशी इतर देशांची तोंडदेखली मदत घेऊन अतिशय शक्तिशाली परग्रहवासियांचा पराभव करते हे दाखवण्यात आले होते . आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असणाऱ्या 'इस्लामिक' दहशतवाद्यांचा बीमोड धीरोदत्त अमेरिकन नायक एकटाकी कसा करतो हे अनेक चित्रपटातून पाहता येत . हॉलीवूड चित्रपट अमेरिकन सरकारचे परराष्ट्र धोरण कसे पुढे रेटतात याचा ज्याला अभ्यास करायचा आहे त्याने अमेरिकन चित्रपटातील खलनायकांचा अभ्यास करावा . ह्या खलनायकांच्या चरित्रनिर्मितीवर अमेरिकेच्या परराष्ट्रधोरणाचा ठसा स्पष्ट उमटलेला दिसतो . ८० च्या दशकातला खलनायक हा क्रुर , आडदांड असा रशियन असायचा . शीतयुद्धकाळात रशियन लोकांची जी विशिष्ट नकारात्मक प्रतिमा अमेरिकन माध्यमांनी बनवली त्यातून रशिया अजूनपण पुरतेपणी सावरला नाही . १९९० सालानंतर अमेरिकन चित्रपटात खलनायक हा दाढीवाला आणि कट्टर इस्लामिक बनत गेला . ९/११ च्या अमेरिकन भूमीवर झालेल्या हल्ल्यानंतर तर जवळपास प्रत्येक चित्रपटातला खलनायक हा आशियाई मुस्लिम दाखवण्याची चढाओढ अमेरिकन निर्मात्यांमध्ये सुरु झाली . गेल्या काही वर्षात मात्र त्यांची जागा चीनी किंवा कोरियन खलनायक घेत आहेत . अमेरिकन संरक्षण विभाग 'पेंटागॉन' ची स्वतःच्या मालकीची चित्रपटनिर्मिती संस्था आहे यावरून काय अर्थ घ्यायचा तो समजावून घ्यावा .

तर अशा या अमेरिकेला आणि हॉलीवूडला पहिल्यांदाच तडीस तोड उत्तर देणारा प्रतिस्पर्धी तयार होत आहे . तो प्रतिस्पर्धी म्हणजे चीन . चीनी खाद्यसंस्कृती अगोदरच जगभरात लोकप्रिय झाली आहे . आता चीनी चित्रपट पण अमेरिकन आणि युरोपियन मार्केटवर चढाई करण्यास सिद्ध झाले आहेत . सध्या चीनी चित्रपट अमेरिकेत भरपूर गल्ला गोळा करत आहेत . 'कुंग फु पांडा ' सारखा अमेरिकन निर्मिती असणारा पण चीनी जीवनशैलीभोवती फिरणारा चित्रपट अमेरिकेत उत्पन्नाचे उच्चांक तोडतो हे प्रतिमात्मक आहे .जॅकी चेन, दिग्दर्शक आंग ली यासारखे बरेच चीनी वंशाचे दिग्गज अमेरिकेत चीनी संस्कृतीचा प्रसार करण्यात महत्वाचा वाटा उचलत आहेत . ऑस्कर्स पुरस्कारांमध्ये पण चीनी चित्रपट आपली उपस्थिती दाखवून देत आहेत . २००८ च्या भव्यदिव्य ऑलिम्पिकपासून चीनने आपल्या 'सॉफ्ट पॉवर' च्या आक्रमक प्रचाराची मुहूर्तमेढ रोवली . तर 'सॉफ्ट पॉवर'च्या आक्रमक युद्धाची युद्धभूमी तयार झाली आहे . ही लढाई जो जिंकेल त्याचे जगावर वर्चस्व राहील हे निश्चित .
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अतिशय मर्यादा असणारा चीन भारतासारख्या लोकशाही देशाच्या याबाबतीत अनेक योजने पुढे आहे ही बाब वेदनादायक आहे . चित्रपट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर 'प्रपोगंडा' चे साधन होऊ शकते यावर आपल्या राज्यकर्त्यांनी आणि देशातल्या इतर लोकशाही संस्थांनी कधी विचारच केला नाही ही बाब खेदजनक आहे . काहीही विशेष प्रयत्न न करता अनेक आशियाई आणि मध्यपूर्वेच्या देशात भारतीय चित्रपट लोकप्रिय आहेत . अनेक देशात भारतीय चित्रपट हीच आपली ओळख आणि 'सांस्कृतिक राजदूत' आहेत . भारत -चीन संबंध , भारत पाकिस्तान संबंध आणि एकूणच भारत देशाची प्रतिमा यात सिनेमाने मोठी भूमिका बजावली आहे . पण तो एका स्वतंत्र आणि मोठ्या लेखाचा विषय आहे .

आपल्याकडे 'प्रपोगंडा' म्हणजे काही तरी वाईट गोष्ट अशी प्रतिमा जनमानसात विनाकारण आहे . यापुर्वीपण 'भांडवलशाही 'म्हणजे अतिशय वाईट गोष्ट असा एक देश म्हणून आपला समज होता . 'प्रपोगंडा' म्हणजे आंतरराष्ट्रीय संबधात उद्दिष्ट साध्य करून घेण्याचे एक साधन आहे . हे पहिले अमेरिकेने आणि आता चीनने सिद्ध केले आहे . आपले याविषयीचे पूर्वग्रह बाजूला सारून आपण त्यासाठी एक देश म्हणून कधी वाटचाल सुरु करणार हा लाखमोलाचा प्रश्न आहे .

(लेख पुर्वप्रकाशित आहे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळा विषय हाताळला आहे. पुर्वी असे फार जाणवायचे नाही पण आता हा गोबेल्स टाईपचा प्रचार फार जाणवू लागलाय. भारतालाही हे सहज शक्य झाले असते.. पण... असे प्रयत्न थोडके आणि तोकडे पडताहेत. बाहुबलीची कथा कशीही असो, त्यातले स्पेशल इफेक्ट्स कुट्ठेच कमी नव्हते.

मेहनती कलाकार आणि दिग्दर्शक आपल्याकडेही आहेत, त्यांना अशक्य असे काही असणार नाही पण मुख्य अडचण बहुदा आर्थिक असावी आणि मग प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही, असेही कारण आहेच. ( खरं तर ते दूष्टचक्र आहे. )

चीनबाबत म्हणाल तर त्यांचे चित्रपट नाही पण इतर कार्यक्रम मी नियमित बघतो. अत्यंत सुंदर रितीने ते सादर होतात. भाषा कळत नसली आणि सबटायटल्स नसली तरी त्याचा अस्वाद मी घेऊ शकतो.

अमेरीकन्स आणि अमेरिकन मीडीया आत्ममग्न असतात असं म्हणता येईल फार तर. पण अमेरिकन सरकारच्या इशा-यावर चित्रपट निर्मिती केली गेली असेल हे पचनी पडायला जडच आहे. रीगन यांच्या स्टार वॉर्सबाबतचं निरीक्षण योग्य वाटतंय. हे वाचनात आलेलं आहे. पण फक्त या एका कवीकल्पनेमुळे सोविएत संघ कोसळला हे म्हणणं परिस्थितीचा विपर्यास आहे.

रशियन साम्राज्यातली राष्ट्रं सीआयए ने पोखरली नव्हती का ? असंतोष नव्हता का ? इतकं सोपं असेल का सगळं ?

ईंटरेस्टींग लेख आहे. सगळाच पटला असे नाही, पण आवडला.
अमेरीकेला सुपरपॉवर आणि पृथ्वीतलावरचे नंदनवन असे दाखवले जाते हे खरेय.
भारत मात्र असे चित्रपट कधीच बनवत नाही. वा भारतात असे चित्रपट बनत नाहीत.
तसे या हॉलीवूडी चित्रपटात भारत दाखवलाच तर तो बकाल वस्ती किंवा प्रचंड गर्दी किंवा गारुडी पुंगी वाजवतोय आणि नाग डोलतोय अश्या सिंबॉलिक प्रकारे दाखवून भारताची इमेजही तशीच राहील हे बघतात. अगदी ठरवून गेम केल्यासारखे.

कापोचेंशी सहमत.

अमेरिकेचा, सीआयए चा काही अजेंडा टोटली असू शकतो. पण हॉलीवूड वाले अ‍ॅक्टिवली त्यात भाग घेत आहेत हे far-fetched लॉजिक आहे. सरकारने सक्ती केली तेव्हा एक दोन वेळा हॉलीवूड वाले सामील झाले, पण एरव्ही बहुतांश वेळा ही सगळी हॉलीवूड गँग साधारण पणे 'बंडखोर' मोड मधेच काम करते. आपल्याकडचे उदाहरण द्यायचे म्हंटले तर एफटीआयआय वाले मोदी सरकारला सामील आहेत म्हंटल्यासारखे आहे. बाकी अमेरिकन नायक सगळे प्रश्न सोडवणे हे चित्रपट अमेरिकेत चालवायचा असल्याने कमर्शियल इक्वेशन च्या दृष्टीने आवश्यकच आहे. आणि कोणत्या देशातील कथानकांत भलत्याच देशाचा नायक सतत दाखवतील? उलट अमेरिकन लष्कर, सीआयए, एफबीआय यांच्या कामकाजावर उघड टीका जितकी हॉलीवूड मधे होते तितकी क्वचितच इतर कोणत्याही देशात होत असेल. सीरीयाना, बोर्न सिरीज, चार्ली विल्सन्स वॉर, अ फ्यू गुड मेन सारखे आपल्याच देशाची प्रतिमा बिघडवणारे असंख्य चित्रपट तेथे तयार होतात व इतर कोणत्याही देशात होणार नाही इतकी उघड चर्चा या गोष्टींबद्दल चालते.

रशिया, चीन च्या तुलनेत केवळ लोकशाही व खुल्या वातावरणामुळे अमिरिकेच्या काड्यांबद्दलची माहिती जास्त उघड होते, जास्त उपलब्ध असते. त्यामुळे नॅचरली त्यांच्यावर जास्त ठपका ठेवला जातो. बाकीच्या महासत्ताही कमी अधिक प्रमाणात हेच करतात. उलट मला असे ठामपणे वाटते की अंतर्गत चेक्स अ‍ॅण्ड बॅलन्सेस मुळे ब्रिटन अमेरिकेसारखे देश हे रशिया-चीन वगैरेंपेक्षा कमीच प्रमाणात हे करू शकत असतील (जेथे दोघांनाही समान संधी असेल तेथे).

रेगनने जर खरोखर स्टार वॉर्स त्याकरता वापरले असेल तर ती ब्रिलियंट स्ट्रॅटेजीच म्हंटली पाहिजे. आणि असले प्लॉय सगळे देश वापरतात. खुद्द आपण बांगलादेश युद्धाच्या वेळेस ते जितका जास्त वेळ चालेल तितके पाक चे कंबरडे मोडेल व तो पुन्हा लौकर उठू शकणार नाही हे माहीत असल्याने ते जास्त दिवस चालले तरी चालेल अशा धोरणाने लढवले होते.

दुसरे आशियाई मुस्लिम व्हिलन असण्याबद्दल - हॉलीवूड वाले हे प्रखर लिबरल्स असण्याबद्दल प्रसिद्ध/कुप्रसिद्ध आहेत. हे लोक उलटे स्वतःची तशी इमेज दाखवण्याबद्दल जागरूक असतात. रशियन व्हिलन्स दाखवणे त्यांना सोपे होते कारण त्यात त्यांच्या लिबरल इमेज ला धक्का बसत नव्हता. पण इतर कोणत्याही समाजाबद्दल्/गटाबद्दल आवर्जून हे करणे ते लोक टाळतात. मला तरी मुस्लिमांची इमेज कोठेही आवर्जून वाईट दाखवलेली फारशी दिसली नाही.

चीन बद्दलचा मुद्दाही तसाच खूप ताणलेला वाटतो. चीन चे म्हणून जी दोन नावे लोकप्रिय आहेत ती हाँगकाँग व तैवान मधले आहेत, आणि यातील तैवान बर्‍यापैकी मेनस्ट्रीम चीन च्या विरोधी आहे. कुंग फू पांडा लोकप्रिय होण्यात तो पिक्चर चांगला असणे हाच मुख्य भाग होता. चीन बद्दलचे अमेरिकन मत खूप सुधारले वगैरे असे काही त्यातून झालेले नाही.

आणखी एक मला आश्चर्य वाटते ते म्हणजे अमेरिकेला जेव्हा रशिया-चीन ई काही शह-काटशह देतात तेव्हा त्याबद्दल लिहीताना एक "कशी जिरली" चा टोन जाणवतो. अगदी लोकसत्तेच्या अग्रलेखांतही तो अनेकदा दिसलेला आहे. हे देश जगाचे कल्याण करायला निघालेले नाहीत. उद्या चीन च्या स्पाय एजन्सीने एखाद्या देशातील अतिरेक्यांना मदत केली तर ती आपल्याला अनेक दशके कळणारही नाही - तेथे सरकारवर टीका करणारे काही प्रसिद्धच होत नाही.

@कापो - तुम्ही जस म्हणता की पण फक्त या एका कवीकल्पनेमुळे सोविएत संघ कोसळला हे म्हणणं परिस्थितीचा विपर्यास आहे.

हे असे विधान मी केलेले नाही . मी याबाबतीत असे लिहिले आहे

अर्थव्यवस्था कोसळण्याला हा वाढीव संरक्षण खर्च काही प्रमाणात कारणीभूत होता .

त्या प्रतिसादात 'काही प्रमाणात ' 'छोटा भाग ' असे काही शब्द प्रयोग आहेत .सोवियतच विघटन व्हायला अनेक बाकीची कारण होतीच . पण हॉलीवूड चा 'काही ' हातभार होता अस म्हंटल आहे . ते एकच कारण आहे असे म्हंटल नाही

रशियाचा पाडाव होण्यात आणि बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत पडण्याच्या ऐतिहासिक घटनेत एका हॉलीवूड चित्रपटाचा छोटा वाटा आहे असे कुणी म्हंटले तर लोक त्याला वेड्यात काढतील . पण ही वस्तुस्थिती आहे . १९८३ साली तात्कालीन अमेरिकन अध्यक्ष रेनॉल्ड रिगन यांनी रशियन क्षेपणास्त्र प्रणालीला शह म्हणून 'स्टार वॉर्स ' या क्षेपणास्त्र प्रतिरोधक कार्यक्रमाची घोषणा केली . अमेरीकेला प्रतिशह देण्यासाठी रशियाला आपल्या संरक्षण खर्चात वाढ करणे भागच होते . लष्करीदृष्ट्या भक्कम पण आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर झालेल्या रशियाला हा बोजा परवडणार नव्हता . जेंव्हा १९८९ साली तात्कालीन 'सोवियेत युनियन ' कोसळले तेंव्हा त्यामागे अतिशय खंगलेली अर्थव्यवस्था हे एक महत्वाचे कारण होते . अर्थव्यवस्था कोसळण्याला हा वाढीव संरक्षण खर्च काही प्रमाणात कारणीभूत होता . वास्तविक पाहता रीगन यांचा 'स्टार वॉर्स ' हा कार्यक्रम फक्त कविकल्पना होता >>>

हे तुम्हीच लिहीलंय ना लेखात ?.

@फारएन्ड - यात अमेरिकी सरकारचा हात आहे असे नाही . कडवा उजवा अमेरिकी राष्ट्रवाद अस्तित्वात आहेच . अनेक हॉलीवूड दिग्दर्शक पण या विचारसरणीचे आहेत . दिग्दर्शकाचा bias त्याच्या चित्रपटात अनेकदा उतरताना दिसतो त्यामुळे त्यांच्या चित्रपटातून ते अनेक देशांच्या प्रमुखाची खिल्ली उडवताना दिसतात किंवा त्यांना खलनायक म्हणून रंगवतात . हॉलीवूड चित्रपट जगभरात पहिले जातात त्यामुळे हे असे चित्रण जगभरात पोहोन्चते . त्यातून या नेत्यांची किंवा त्यांच्या देशाची इमेज विशिष्ट प्रकारे बनत जाते . इथे मला वाटते की चांगले किंवा वाईट अशा terminology च्या पलीकडे जाऊन विचार करावा . पण हॉलीवूड ची अजून पण एक बाजू आहे . ज्यात अनेक चित्रपटात ते स्वतःच्या राष्ट्राध्याक्षांची खिल्ली उडवतात . आपल्या देशाच्या युद्धखोर धोरणांवर टीका करतात . हे मान्य आहे . कधी कधी सर्वसामान्य आयुष्यातले नियम आंतरराष्ट्रीय राजकारणात पण लागू होतात असे मला वाटते . वर्गात एक देखणा , श्रीमंत हूड पोरगा असतो . वर्गातले सर्व पोर त्याच्याकडे असुयामिश्रीत रागाने बघत असतात . मला वाटत इथे अमेरिका हा तो पोरगा आहे . त्यामुळे अमेरिकेवर जास्त टीका होते . गुणात्मक दृष्ट्या अमेरिका रशिया किंवा चीन पेक्षा वेगळी मुळीच नाही . इथे मला वाटते की चांगले किंवा वाईट अशा terminology च्या पलीकडे जाऊन विचार करावा . आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले देशहित जपणे हे सगळ्यात मोठे objective असते . by hook or by crook . तिथे तत्व , ethics जपण शक्यच नाही . वर मी अमेरिकन संरक्षण विभाग 'पेंटागॉन' ची स्वतःच्या मालकीची चित्रपटनिर्मिती संस्था आहे असा उल्लेख केला आहेच . अमेरिकी सरकार हॉलीवूड वर नियंत्रण कस ठेवत या विषयावर एका चांगल्या लेखाची लिंक देतो .
https://www.wsws.org/en/articles/2005/03/holl-m14.html

हा लेख वाचला आणि आवडला.
मला स्वतःला जग संकटात पडलं आणि पाच अमेरिकन माणसानी सर्व ठीक केलं वाले पिक्चर कितीही सुन्दर असले तरी झेपत नाहीत.

@ऋन्मेऽऽष परिस्थिती बदलत आहे . भारतियांच अनेक अमेरिकी सिरियल्स आणि चित्रपटात सकारात्मक चित्रण दाखवत आहेत . द सिम्पसन्स मध्ये अपु हे पात्र होमर च मित्र आणि एक चांगला माणूस दाखवलं आहे . big bang theory किंवा archies सारख्या कार्टून मध्ये भारतीय पात्र महत्वाची आहेत . एकूणच भारतीय लोकांची मिळून मिसळून राहण्याची वृत्ती आणि बदलत्या राजकीय समीकरणात अमेरिका आणि भारत याचं जवळ येण याला कारणीभूत असाव अस वाटत

शियाचा पाडाव होण्यात आणि बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत पडण्याच्या ऐतिहासिक घटनेत एका हॉलीवूड चित्रपटाचा छोटा वाटा आहे असे कुणी म्हंटले तर लोक त्याला वेड्यात काढतील . पण ही वस्तुस्थिती आहे . १९८३ साली तात्कालीन अमेरिकन अध्यक्ष रेनॉल्ड रिगन यांनी रशियन क्षेपणास्त्र प्रणालीला शह म्हणून 'स्टार वॉर्स ' या क्षेपणास्त्र प्रतिरोधक कार्यक्रमाची घोषणा केली . अमेरीकेला प्रतिशह देण्यासाठी रशियाला आपल्या संरक्षण खर्चात वाढ करणे भागच होते . लष्करीदृष्ट्या भक्कम पण आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर झालेल्या रशियाला हा बोजा परवडणार नव्हता . जेंव्हा १९८९ साली तात्कालीन 'सोवियेत युनियन ' कोसळले तेंव्हा त्यामागे अतिशय खंगलेली अर्थव्यवस्था हे एक महत्वाचे कारण होते . अर्थव्यवस्था कोसळण्याला हा वाढीव संरक्षण खर्च काही प्रमाणात कारणीभूत होता . वास्तविक पाहता रीगन यांचा 'स्टार वॉर्स ' हा कार्यक्रम फक्त कविकल्पना होता

त्या प्रतिसादात काही शब्द ठळक केले आहेत . ते बघावेत . सोवियतच विघटन व्हायला अनेक बाकीची कारण होतीच . पण हॉलीवूड चा 'काही ' हातभार होता अस म्हंटल आहे . ते एकच कारण आहे असे म्हंटल नाही

@कापो - तुम्ही जस म्हणता की पण फक्त या एका कवीकल्पनेमुळे सोविएत संघ कोसळला हे म्हणणं परिस्थितीचा विपर्यास आहे.

हे असे विधान मी केलेले नाही . मी याबाबतीत असे लिहिले आहे

अर्थव्यवस्था कोसळण्याला हा वाढीव संरक्षण खर्च काही प्रमाणात कारणीभूत होता .

संपादन त्या प्रतिसादात 'काही प्रमाणात ' 'छोटा भाग ' असे काही शब्द प्रयोग आहेत .सोवियतच विघटन व्हायला अनेक बाकीची कारण होतीच . पण हॉलीवूड चा 'काही ' हातभार होता अस म्हंटल आहे . ते एकच कारण आहे असे म्हंटल नाही

वरील प्रतिसादातील मूळ रचनेप्रमाणे सदर प्रतिसाद दिलेला होता. मूळ प्रतिसाद बदलल्याने त्याला दिलेले उत्तर आणि बदललेला प्रतिसाद यांची संगती लागेलच असं नाही. तरी मूळ प्रतिसाद कायम ठेवावा अथवा संपादीत भाग जो उत्तरानंतर संपादीत केला गेला आहे तो ठळक करावा ही विनंती.

तुम्ही पुढे असे लिहीलेले आहे.

स्वतः एकेकाळी आघाडीचे हॉलीवूड नट असणाऱ्या रिगन यांना ही कल्पना 'स्टार वॉर्स ' आणि इतर काही हॉलीवूड चित्रपटांवरून सुचली होती असा दावा अनेक अमेरिकन तज्ञांनी केला आहे . अगोदरच आर्थिकदृष्ट्या विकल असणाऱ्या रशियन अर्थव्यवस्थेला वाढीव खर्चाच्या खोल खोल पाण्यात ओढून नेण्याची रिगन यांची योजना यशस्वी झाली आणि रशियन अर्थव्यवस्थेच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचा मान या अंगी नाट्य पुरेपूर मुरलेल्या या माजी हॉलीवूड नटाला मिळाला .पुढचा इतिहास सगळ्यांना माहीतच आहे .

यावरून छोटा भाग किंवा काही जे असेल ते अत्यंत महत्वाचे होते असा अर्थ ध्वनित होतो हे तुम्हाला मान्य आहे का ?

दिलेल्या उदाहरणांमुळे रसभंग होतो हे मान्य असेल तर तुमच्या लेखाच्या आशयाकडे आपण वळूयात .

नाही नाही तस काही नाही . मी वर 'स्टार वॉर्स ' चा उल्लेख केला आहे . अगोदरच शस्त्र स्पर्धेमुळे विकल झालेली रशियन अर्थव्यवस्था त्यामुळे अजूनच गाळात गेली . तो एक 'पुश ' होताच . पण विघटनामागे अनेक महत्वाची geo political कारण होती त्यात हा अजून एक धक्का . उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी या अर्थाने

दुस-या महायुद्धाआधीचे जग ब्रिजगधार्जिणे आणि ब्रिटनविरोधी असं विभागलेलं होतं. तेव्हां ब्रिटीश सिनेमेही आताच्या अमेरिकन सिनेमांप्रमाणेच असत. ब्रिटनचा सूर्य अस्तास जाऊन अमेरीका महासत्ता म्हणून उदयास आल्यानंतर हॉलीवूडच्या सिनेम्यांना लोकप्रियता मिळाली. हॉलीवूडचे विषय देखील सुरुवातीला अमेरीकेच्या प्रगतीला सुसंगत असे होते. सायन्स फिक्शनच्या कथा, मासिकं, मालिका आणि सिनेमे यांना लोकप्रियता मिळण्यामागे अमेरीकेची भरारी हा सुद्धा घटक होता.

तुम्ही पुढे प्रतिसादात जे म्हटलं आहे की अमेरिकन दिग्दर्शक या विचारसरणीचे होते ते मान्य केलं जाऊ शकतं. पण सुरुवातीस सुचवल्याप्रमाने सीआयएच्या मर्जीप्रमाणे हॉलीवूड सिनेमे काढेल हे मान्य होऊ शकत नाही. उलट कुठलेही निर्बंध नसल्याने स्वदेशाच्या नीतीची भलावण करणारे सिनेमे त्यांनी काढले असतील. कुणाच्या मर्जीने नव्हे.

याउलट रशियन महासत्तेने अमेरिकेच्या पुढे दोन पावलं असूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या बंदीमुळे तिथे सिनेसृष्टी विकसित होऊ शकली नाही. काही रशियन दिग्दर्शकांनी चिडून देश सोडला. काहींनी कामच बंद केलं. तिथे अनेक प्रतिभाशालति, सर्जनशील असे कलावंत होते ज्यांची मुस्कटदाबी झाली. काही रशियन सिनेमे अत्युच्च दर्जाचे होते. मानवी मूल्यांवर निघालेले सिनेमे आहेत काही.

पुण्यातल्या राहुल सिनेमामधे एक सिनेमा आला होता. समिक्षकांनी कौतुक केलं म्हणून पाहीला. तोवर पोस्टरवर गौरवर्णिय दिसले की सिनेमा इंग्रजीच असणार या समजाला धक्का बसला. सिनेमा रशियन भाषेत असावा असं शेयनामावलीवरून कळालं. सबटायटल्स होती. हा पहिलाच प्रसंग वाचून पाहण्याचा. या सिनेमात एक चुंबनदृश्य होतं. काही उत्कट संवाद असावेत. पण रेकॉर्डिंग स्टुडीओतून अचानक रेल्वेलाईनच्या बाजूला रेकॉर्डिंग केलं जावं तसं या दृश्यात घडलं. अचानक हमिंग असलेलं डबिंग ऐकू आलं. चुंबनदृश्यादरम्यान नायक नायिकेला विचारतो की तुझा कम्युनिझम वर विश्वास आहे ? पुन्हा चुंबन.... आणि नायिका उत्तरते " जगाच्या अंतापर्यंत "

आख्ख्या थेटरात हशा पिकला. नंतर कळलं की अशा सीन्सला तिथे कात्री लावली जात नाही पण संवाद बदलले जातात. तसेच सेन्सॉर बोर्डाच्या मनाला येईल तेव्हां कम्युनिझमची महत्ता सांगणारे संवाद सिनेमात टाकले जातात. अशा बथ्थड वातावरणात कोण सिनेमे काढणार ?

फक्त सोव्हिएत युनियनच नाही तर पूर्व युरोपातील जे देश सोव्हिएत युनियनच्या गोटात होते तिथे हीच परिस्थिती होती. पोलंड, चेकोस्लोव्हिया, रुमानिया असे देश १९८३ - ८४ च्या दरम्यान जनमताच्या रेट्यामुळे सोव्हिएत युनियनपासून फारकत घेऊ लागले.

चीनने तर ब्रुसलीकडे असलेल्या माहीतीवरून तो चीनविरुद्ध सिनेमा बनवू शकतो या संशयाने त्याची हत्या घडवून आणली असे म्हटले जाते. शाओलीन टेम्पल ही युद्धकलेचं शिक्षण देणारी संस्था, संघटना चीनने निघॄण हत्याकांडं घडवून संपवली. दलाई लामांना निर्वासित व्हावं लागलं. कारण चीनमधे असलेल्या माओवादाला धार्मिक सत्ता धोकादायक वाटेल यात नवल नाही. त्यामुळं तिथल्याही नागरिकांना दडपशाही जाणवत असणारच. अशा वातावरणातले सिनेमे हे फक्य कुंगफू, युद्धकला आणि इतर गोष्टींभोवती फिरतात ज्यात टीका असणार नाही. तरीही काही सिनेमे जागतिक दर्जाचे झाले. यावरून या कलावंतांना मोकळं वातावरण मिळालं तर ते नक्कीच हॉलीवूडला टक्कर देऊ शकतात असं वाटत ं.

अमेरिका योग्य की रशिया की चीन हा वेगळा मुद्दा आहे.

रोनाल्ड रीगनच्या स्टार वॉर्स या कल्पनेचा उल्लेख तुम्ही केला आहे पण प्रतिसादात ती बाब नाकारत आहात. त्यामुळे वरच्या प्रतिसादात तो उल्लेख टाळला.

याबाबतीतली वस्तुस्थिती काय आहे ?

रीगन यांनी स्टार वॉर्सचं सूतोवाच केलं होतं. त्या योजनेबद्दल अगदी आपल्या सकाळ, केसरी, मटा,लोकसत्ता मधूनही भरभरून छापून आलं होतं. या मागे मीडीया मॅनेजर्स असू शकतील. संपूर्ण जग अमेरिकेच्या छत्राखाली घेण्याचा हा कार्यक्रम होता. त्यामागे रशियाला शह देणे हा उद्देश होताच.

पण प्रत्यक्षात अमेरिकेला ते शक्य होतं किंवा नाही हे केजीबी ला ठाऊक नसेल असं नाही. त्यामुळे त्यांच्या नीतीला भुलून रशियाने चुकीची पावले उचलली असावीत हा सुद्धा अमेरीकन प्रचाराचा भाग असण्याची शक्यता आहे. याला कारन अमेरिकेतल्या निवडणुका. रीगन यांच्या काळात त्यांची लोकप्रियता घसरल्याचे जनमत चाचण्यांचे अंदाज प्रकशित झाले होते. पुढे येणा-या निवडणुकांत त्यांच्याच पक्षाचे सरकार असावे यासाठी रीगन प्रशासनाची वाहवा करणारं कँपेन चालवलं गेलं. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रचार असावा ही शक्यता वाटते.

हूल देऊन अर्थव्यवस्थेला सुरुंग लावून घेण्याइतकं सोव्हिएत नेतृत्व बालीश नसावं.

बावरा मन, पोस्ट समजली. तो लेख वाचून प्रतिक्रिया द्यायची होती त्यामुळे वेळ लागला. तुमचे पॉईंट्स लक्षात आले. पण हा लेख वाचल्यावरही मला असेच वाटले की जर अमेरिका जर हे करत असेल हे गृहीत धरायला हरकत नाही की जगात हे सर्वत्र चालत असेल. तो त्या वेबसाईटवरचा लेखही जरा सोशालिझम च्या बाजूने लिहीलेला वाटला. हे लष्कराच्या बाबतीत असे give and take होत असेल यात शंका नाही - कारण चित्रण ऑथेण्टिक वाटायला हवे तर मिलीटरी कन्सल्टंट कडून चेक करणे आवश्यक आहे, पण कथेत जर मिलीटरीवर टीका असेल तर त्यांनी हरकत घेणे साहजिक आहे. त्यावरून शेवटी निर्माता/दिग्दर्शकाच्या निगोशिएशन कौशल्यावर ते अवलंबून असेल.

प्रोपोगंडाच्या बाबतीत चीन पुढे आहे असे का वाटते त्याबद्दलही जरा काही अजून माहिती असेल तर आवडेल. कारण मला जे येथे चित्र दिसते त्यात भारताची इमेजही तितकीच चांगली आहे. टुरिस्ट प्लेस म्हणून चीन बद्दल उत्सुकता जास्त असेल भारतापेक्षा पण भारताबद्दल पूर्वीच्या त्या गारूडी, साप, रस्त्यावर फिरणारे हत्ती वगैरे इमेजेस खूप मागे पडल्या आहेत गेल्या ४-५ वर्षात.

पण एकूण लेखाचा पर्स्पेक्टिव्ह पहिल्यांदा वाचताना लक्षात आला नव्हता, तो तुमच्या नंतरच्या त्या पोस्ट मुळे आला.

पण भारताबद्दल पूर्वीच्या त्या गारूडी, साप, रस्त्यावर फिरणारे हत्ती वगैरे इमेजेस खूप मागे पडल्या आहेत गेल्या ४-५ वर्षात. >>

फा हे विधान देखील 'सिनेमाचा तत्कालिन जगतावर प्रभाव' दाखवते. गेल्या १०-१२ वर्षात जग इंटरनेट मुळे जवळ आले आहे. त्यामुळे गोष्टी बदलल्या. लोकं ये जा करू लागले त्यामुळे आणखी बदलल्या. पण रुरल अमेरिकेमध्ये भारताची प्रतिमा अजून काही फार चांगली आहे असे नाही. ती बनली ती ह्या पिक्चर / डॉक्युमेट्री वगैरे मुळेच.

लेखाबद्दल ..

बावरा मन लिहितात तसे रॉकी किंवा अनेक सिनेमातून रशियान व्हिलन (म्हणजे तत्कालिन अमेरिकेचा शत्रू) दाखवने हे होतेच. तसेच त्यांच्या लेखातून असे कुठे असे ठोसपणे मांडलेले दिसत नाही की अमेरिनेने प्रोपगंडा साठी दिग्दर्शकांना तसे करायवयास भाग पाडले किंवा ह्या मुळेच विघटन वगैरे झाले. त्यांचा मुद्दा असा आहे की उजव्या राष्ट्रवादामुळे हॉलिवूडवर आपोआपच प्रभाव पडला.

मे बी थोडे नीट शब्दात मांडता आले असते.

सोवियेट युनियनच्या विभाजनाला रेगन डाॅक्ट्रिन (स्टारवाॅर्स) काहि प्रमाणात कारणीभुत असु शकेल, परंतु माझ्यामते '८२ नंतर झालेले नेत्रुत्वातले बदल (ब्रेझनेव, आंद्रोपोव इ. चं निधन आणि गार्बाचोवचा उदय) आणि अफगाण युद्धात झालेलं नुकसान, हे दोन फॅक्टर नजरेआड करुन चालणार नाहि...

केदार - हो त्या मताशी सहमत आहे.

पण दुसर्‍या पॉइण्टबद्दल - उजव्या राष्ट्रवादाचा प्रभाव हॉलीवूड वर कितपत पडला आहे मला कल्पना नाही. हॉलीवूड वाले बहुतांश डावे/लिबरल्स जास्त आहेत. आता अमेरिकेत रिपब्लिकन्स्/कॉन्झर्वेटिव्ह्ज संख्येने भरपूर असल्याने त्या मानाने हॉलीवूड मधेही थोडेफार असणारच, पण एकूण जितका उजव्या विचारसरणीचा असेल तितकाच किंबहुना जास्तच प्रभाव डाव्या विचारसरणीचा आहे असे मला वाटते.

हॉलीवूड वाले बहुतांश डावे/लिबरल्स जास्त आहेत >>

डावे नाही. लिबरल आहेत. दोन्हीत खूप फरक असतो. मी सो कॉल्ड उजवा आहे, पण मी देखील लिबरल आहे.

डावे म्हणजे साम्यवादी. अमेरिकेत साम्यवादी अभावानेच आढळतात. फिलिप रॉथची ट्रिलॉजी वाचच. इनफॅक्ट अमेरिकेत एकेकाळी साम्यवादी चळवळीत भाग घेणे हा गुन्हा असायचा. त्यामुळे डावे हा प्रकार तिथे नव्हताच. आहे ते लिबरल्स आणि उजवे. आणि उजवे लिबरल. Happy

ओये ते माहीत आहे रे (म्हणजे दोन्हीत फरक आहे हे आणि तू उजवा आहेस हे ही Happy ). मी काही डावे व काही लिबरल अशा अर्थाने म्हणत आहे. डाव्यांतही नॉन लिबरल कडवे असतात हे माहीत आहे. फिलिप रॉथ ची ट्रिलॉजी वाचलेली नाही पण मध्यंतरी हॉलीवूड वर कम्युनिझम च्या बाबतीत आणलेले प्रेशर व त्यात बर्‍याच लोकांनी सरकारला सहकार्य करणे वगैरे वाचलेले आहे, त्यामुळे जनरल आयडिया आहे.

रूढ अर्थाने डावे येथे नाहीत किंवा किमान उघडपणे नाहीत हे बरोबर आहे.