फुसके बार – १६ नोव्हेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 19 November, 2015 - 01:32

फुसके बार – १६ नोव्हेंबर २०१५
.
१) मॅगी बाजारात पुन्हा उपलब्ध झाली आहे असे दिसते. अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या आहेत अशी जाहिरात करताहेत. मग आधीच्या सॅंपल्समध्ये शिशाचा जो सोर्स होता, तो कसा नाहीसा केला, याचे उत्तर कसे मिळणार? कोण देणार? नेसले कंपनी तर आधीही शिसे नसल्याचाच दावा करत होती. शिसे नव्हतेच तर मग बंदी का आणली? कंपनीच्या झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण? नेसलेसारख्या कंपनीलाही सरकारी यंत्रणेसमोर तोंड दाबून मार सहन करावा लागतो का? सरकारही या मुद्द्यांना हात न घालता निव्वळ कोर्टबाजी करताना दिसत आहे. काय चालले आहे कळत नाही. रामदेवबाबांची उत्पादने बाजारात आणण्याचा हा डाव होता असे म्हटले जात होते. राज्य सरकार आता मॅगीवरील बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, ते काय आम्ही या प्रश्नी माघार घेतली नाही, हे दाखवण्यापुरतेच आहे की काय?

२) याच मॅगीची आता जाहिरात करणारी आई सांगते की मॅगी सगळ्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेली आहे. या जाहिरातीच्या शेवटी मात्र जेव्हा ती आई म्हणवणारी ‘मीही पास झाले’ असे म्हणते, तेव्हा मात्र तिच्या तोंडात मॅगीने इतकी वर्षे सर्वांना खाऊ घातलेला मैदा कोंबावासा वाटतो. गेल्या पिढीतील मॅगीचे व्यसन लागलेल्यांनी त्यांचा मैदा खाऊन झालेल्या मुळव्याधीची व डायबेटिसची बिले नेसले कंपनीला पाठवली तरी ते योग्य व्हावे. किती खोडसाळ जाहिराती कराव्यात याला काहीतरी मर्यादा हवी. कधी वाटते या जाहिरातींना प्रतिजाहिराती तयार करून उत्तर द्यावे. पण मग काही सेकंदांना किती लाख रूपये असा जाहिरातींचा दर आठवून गप्प बसावे लागते.

३) आम्ही काय उत्तर धृवावर राहतो, की तुमचे प्रिझर्वेटिव्जवाले व मैद्याचे उत्पादन ते केवळ दोन मिनिटात तयार होते म्हणून वापरावे? तुम्ही जाहिरातींचा मारा करून आमच्या सारासारविचार करण्याच्या क्षमतेचा नाश करणार व आम्हाला तुमचे गुलाम बनवणार, आमच्या आरोग्याची वाट लावणार, मैद्याबद्दल थोडी जागरूकता वाढल्यावर ‘अब मॅगी आटे से बनी’ म्हणून पुन्हा आमच्या डोक्यावर बसणार. आम्ही मूर्ख व तुम्ही हुशार हे तर सिद्ध झालेलेच आहे.

४) झी मराठीवरील कार्यक्रमात मालिकांशी संबंधित पुरस्कार जाहिर करत आहेत. लेखनाशी संबंधित पुरस्कार स्विकारताना सदर महोदयांना काही संकोच वाटत नसेल काय? एक तर सदर लेखक/लेखिका टीआरपीपोटी येणा-या जाहिरातदारांच्या दबावावरून कथेचा व संवादांचा सत्यानाश करत असतात हे आता उघड गुपीत आहे. कथेशी कोणत्याही मापदंडाने प्रामाणिक न राहता, स्वत:च्या कामाशी तडजोड करत निर्बुद्ध समाज निर्माण करण्याचे महान काम करणारे हे निव्वळ पोटार्थी लेखक कोणत्या भावनेने पुरस्कार स्विकारत असतात?

५) वेड्यासारखे बोलण्याची परंपरा शरद पोंक्षे यांनी या गोडसेफाशीदिनीही चालू ठेवली. मुद्दा काय, आपण बोलतो काय यांचा काही मेळ नाही. यापुढे गांधीजींचा स्मृतिदिन आणि गोडसेफाशीदिन या कमीत कमी दोन दिवशी तरी आपल्याला पोंक्षेंना झेलावे लागणार हे नक्की. या दोन्ही दिवसांचे नामकरण भविष्यात पोंक्षेझेलणेदिन असेही होऊ शकेल. कोणी तरी ‘वरचा मजा रिकामा’ या नावाचे नाटक काढून त्यात पोंक्षेंना मुख्य भूमिका द्यावी.

६) गांधीजी व त्यांचा मारेकरी गोडसे यांची कोणत्याही मुद्द्यावर बरोबरी होऊ शकत नाही असे एकीकडे म्हणायचे आणि टीव्हीवरील चर्चेत मात्र दोघांची छायाचित्रे एकत्र व शेजारीशेजारी दाखवायची हा प्रकार टीव्हीवाहिन्या केव्हा थांबवतील?

७) आपल्या बोलण्याकडे एखाद्याचे लक्ष नाही हे बोलणा-याला फार तर फार दोन वाक्यांनंतर कळायला हवे. पण उतारेच्या उतारे संपत आले तरी हे लक्षात न येणारे मठ्ठ लोक आपल्याला सिनेमात का दाखवले जातात?

८) लंडनमधील डॉ. आंबेडकर रहात असलेले घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतले व त्याचा राष्ट्रार्पण सोहळा पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फ़डणवीस व रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पार पडला. हे घर सरकारने विकत घेतले म्हणून आरडाओरडा करणा-यांनी सरकारने तसे काही केले नसते व त्या घराचा लिलाव होऊ दिला असता तरी आरडाओरडा केलाच असता. राज्य सरकारने त्यांच्या या मतलबी विरोधाकडे दुर्लक्ष करून ते घर विकत घेतले हे योग्यच केले. आता पुढे खरोखरच शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी तेथे राहतील व डॉ. आंबेडकराच्या चरित्रातून स्फूर्ती घेतील तेव्हा विरोधासाठी विरोध करणा-या या विरोधकांना मेल्याहून मेल्यासारखे होईल. रायगडावर केवळ फिरायला म्हणून जाणारेही असतात तसेच तिथल्या इतिहासापासून प्रेरणा घेणारेही काही जण असतात. तसेच.

९) भाजपचे सरकार आंबेडकर राहिलेले घर विकत घेण्याची घोषणा करते हेच काही जणांच्या पचनी पडले नव्हते. कॉंग्रेसवाले जसे स्टिरियोटाइप आरोप करत असतात, तसेच भाजपला मनुवादी म्हणण्याची फॅशन झाली आहे. मुळात ते घर घेण्याची गरज काय होती, आमचे लोक काय तेथे जाऊन शिकणार आहेत काय, तेव्हा आंबेडकरी जनतेच्या नावाखाली सवर्णांचा हा डाव आहे असे भन्नाट आरोप त्यावेळी केले गेले होते. मनुवादी हा काशीराम यांनी वापरलेला शब्द याबाबतीत चपखलच आहे याचे दाखलेही काही जणांनी दिले. काशीराम यांच्या दलितांचा उद्धार करण्याच्या मॉडेलचे त्यांच्याच शिष्या मायावती यांनी मातेरे केले. भ्रष्टाचार, बकालपणा आणि सूडशाही हे त्य मॉडेलचे मूर्त स्वरूप असल्याचे विसरून काही शब्द सोयीस्करपणे कसे वापरले जातात आणि एरवी सारासार विचार करण्याची वृत्ती कोणाचे तरी भलत्याच मुद्द्यावर समर्थन करण्याच्या नादात दगा कसा देते, याचा तो उत्तम नमूना होता. ‘आमचे’ लोक तेथे जाऊन राहणार आहेत काय, हा ‘आपल्या’ लोकांच्याबद्दल किती आत्मविश्वास आहे हे दाखवणारा प्रश्न तर जबरदस्तच होता.

१०) ‘घरात वित्त, शरिरात पित्त आणि परमार्थात चित्त हे नेमस्त (योग्य तेवढेच) असावे.’ हा मंगला गोडबोले यांच्या ‘अशी घरं- अशी माणसं’ या पुस्तकातील उल्लेख किती योग्य आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

४) अ. झी मराठीवरील कार्यक्रमात वहिनीने आपणच आपल्याच प्रत्येक मालिकेतल्या प्रत्येकाला काही ना काही पुरस्कार देणे किती निरर्थक आहे. आणि पुरस्कार तरी काय तर म्हणे "सर्वोत्कृष्ट सासरे" आणि "सर्वोत्कृष्ट सासू".. एपिसोडचे एपोसोड न दिसणारा आणि कधीतरी दिसतो तेव्हा सुनेच्या शिव्या खाणारा म्हातार बाबा म्हणजे सर्वोत्कृष्ट सासरा आणि महिनो न महिने चाललेल्या सुनेच्या बाळंतपणात तिची सदैव काळजी घेणार्‍या ६ बायका म्हणजे सर्वोत्कृष्ट सासवा. काही अर्थच नाही त्या पुरस्कारांना. त्या वाहिनीवर इतर अशा मालिकाही नाहीत कि अजुन इतर सासु सासर्‍यांशी तुलना व्हावी!
लोक बघतात आणि हे काहीही दाखवत रहातात. सादर केलेली अनेक नृत्ये हिंदी चित्रपटाच्या गाण्यांवर का केली असावी?

Happy

मालिका लेखकांना निव्वळ पोटार्थी लेखक म्हणणार्‍या मनोवृत्तीचा निषेध. बोलणार्‍यांनी त्यांच्यावर लेखनाचे जितके प्रेशर असते तितक्या प्रेशर मध्ये लिहून दाखवावे आणी मगच नावे ठेवावीत.
पोटार्थी लेखक पोटार्थी डॉक्टर पोटार्थी शिक्षक ... इतरांना नावे ठेवण्याची परंपराच चालू आहे.

ज्यांना मालिका आवडत नाहीत त्यांनी त्या पाहू नयेत. किंवा त्या मालिकांच्या न आवडलेल्या भागावर टीका करावी. परंतु त्या मालिका आवडणारा किंवा त्या मालिकांनी वेळ घालवणे किंवा त्यांनी सोबत करणे महत्त्वाचे असणारा मोठा प्रेक्षक वर्ग महाराष्ट्रात आहे. तो तुमच्या इतका बुद्धिवादी नसेल पण म्हणून तुम्ही त्यांना आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणार्‍यांना वाटेलतशी नावे का ठेवावीत.

७) आपल्या बोलण्याकडे एखाद्याचे लक्ष नाही हे बोलणा-याला फार तर फार दोन वाक्यांनंतर कळायला हवे. पण उतारेच्या उतारे संपत आले तरी हे लक्षात न येणारे मठ्ठ लोक ---- सगळीकडेच असतात हो, जौ द्या !!!!

वेल,
पोटार्थ्याला तसे म्हणण्यात वावगे काहीच नाही. पहायचे नसेल कि्वा आवडत नसेल तर पाहू नये हे म्हणणे सोपे. पण यांच्यामुळे एक बिनडोक, बथ्थड, मठ्ठ समाज घडत आहे. अशा मूर्खपणाने लिहिलेल्या मालिकांमुळे समाजावर कसा विपरित परिणाम होतो याचे अमेरिकेसह अनेक ठिकाणी अभ्यास झालेले आहेत.

त्यामुळे हे महाभाग कोणत्या प्रेशरखाली लिहितात यावरून त्यांचे कौतुक करण्याचे कारण नाही. ते किती भयानक लिहितात हे दाखवणे आवश्यकच आहे.

एरवी जवळजवळ सगळेच पोटार्थी असतात. पण मनोरंजनाच्या नावाखाली समाजाचे असे नुकसान करणा-यांबद्दल तेवढेच तिडकीने बोलले पाहिजे.

वेल, आणि समाजाच्या त्या भागाचे काय जे दिवसातून तास दोन तास दुरचित्रवाणीवर काहीतरी मनोरंजनात्मक बघायला मिळेल म्हणून बघायला जातात व सदैव ह्या असल्या मालिकाच चालू असल्यामुळे त्यांना स्वतःच्या मनोरंजनासाठी काहीच मिळत नाही. एवढेच नाही तर तुम्ही म्हणताय त्या भागात मोडणार्‍या घरातील इतर सदस्यांना तेच बघायचे असल्यामुळे चिडचिड होत असतानाही हे असले कार्यक्रम बघणे भाग पडते!