अंधाराच्या शलाका.

Submitted by Charudutt Ramti... on 15 November, 2015 - 05:32

आजकाल दिवे लागायला 'दिवे लागणीची वेळ झाली' एवढच एक कारण असत. एरवी दिवा असला काय आणि नसला काय, अंधार काही चुकत नाही. अंधाराच आणि माणसाच्या मनाच एक गूढ नात असाव. त्या शिवाय संध्याकाळ एवढी कातर झालीच नसती. माझीच नाही सगळ्यांचीच. मला कित्येक जणांनी सांगितलय "संध्याकाळी मला उगीचच खूप उदास वाटत. म्हणून मी संध्याकाळी बाहेर पडतो. घरी थांबातच नाही." मला हे वाक्य जगातील सर्वात नैराश्यपूर्ण वाक्य वाटत. मला स्वता:ला संध्याकाळी बाहेर फिरायला जाण्याच अजिबात वावड नाही. पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही...तो अनुत्तरितच राहतो. " संध्याकाळी घरात उदास का वाटावे? " आयुष्यातला आणखी एक दिवस संपत आला म्हणून ? की आयुष्यातली आणखी एक काळोखी रात्र समोर आली म्हणून ? कुणास ठाऊक ?

सहसा घरा बाहेर संध्याकाळ उदास भासत नाही. कधी कधी उल्हासित वातावरण असते तर कधी कधी उदासीन. उदासीन म्हणजे उदास नव्हे. उदासपणामधे खीन्नतेची छटा असते तर उदासीन पणा मधे 'निष्क्रियतेचि'

कधी काळी संध्याकाळी गावाबाहेर फिरायला गेलो तर निघण्यापुर्वी लक्ख: उजेड असे. पहाता पहाता नजरे समोरच शुभ्र आकाश आधी हळूहळू निळेपणाकड आणि नंतर काळेपणाकड झुकत असे. चालता चालता वाटायच 'आता पुरे. आता परत फिरल पाहिजे' यापेक्षा जास्त काळोखात खोल वर घुसत रहाण बर नव्हे. मागून एखाद वाहन वारा कपात येत असे तेंव्हा त्या वाहनाच्या दिव्याच्या उजेडात पडणारी आणि क्षणार्धात लहान होत जाणारी स्वता:चीच सावली दिसू लागली की मन परत एकदा कातर बनून तिजुन जात. दूरवर पसरलेला माळ आणि त्यापलीकडच क्षितिज या दोन्ही मधे एक विचित्रच पण गूढ अशी रम्यता होती. रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडात एखाद चींचेच किंवा पिंपळाच पान दृष्टीस पडल की मन अलगद बालपणी ऐकलेल्या भुतखेताच्या आणि पुनर्जन्माच्या गोष्टीत डोकावायच. आणि मग फांद्यांमधे उगाचच हालणार्या आकृत्या भासायच्या. हालणार्या आकृत्या भासायच्या. मनाला 'भयाचा' स्पर्श झाला की मग उलट पावली परत घराकडे फिरायच. परत येताना वाटे घरात मनास उदास वाटतय म्हणून बाहेर पडावे तर तिथेही मनाला भीतीनेच घेरलय!

मला आठवतय संध्याकाळची कधी काळी वीज गेली की मनाच्या उदासिनतेला एक वेगळीच झालर प्राप्त व्हायची. बाहेरून घरात येणारे कसले कसले आवाज बंद व्हायचे. पंखे, फ्रीझ, टीव्ही, सगळे कसे आपापल्याला मिळालेल्या जागेत निपचित पडून असत. 'कोमात गेल्यासारखे'. चोफेर अंधार व्यापून राहिलेला. त्या अंधाराला झाकण्यासाठी कुणीतरी क्षीणशी मेणबत्ती तेववत. एवढ्यात पचेक मिनिटांनी माझ्या आईची रामरक्षा सुरू होत असे. त्या रमरक्षेचे श्लोक माझ्या काळजात खोल पर्यंत जात. त्यातल्या एकाही श्लोकाचा अर्थ कधी कळत नसे. पण ती कंपन मात्र खोलवर कुठेतरी जाऊन आत भिडत असत. उगाचच हळव झाल्यासारख व्हायच. " राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे " आल की "र" वर्णाच्या अनुप्रासाचे अलंकार संपायच्या आत अचानक 'लाइट' यायची आणि मग आसमंतातले दिवे लुकलुकत तेजागाळू लागायचे. लाइट आली की कुठुनसा मुलाच्या घोळकयातून एकाच हल्लकल्लोळ माजायचा. उगाचच हळव झाल्यासारख व्हायच. " राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे " आल की "र" वर्णाच्या अनुप्रासाचे अलंकार संपायच्या आत अचानक 'लाइट' यायची आणि मग आसमंतातले दिवे लुकलुकत तेजागाळू लागायचे. लाइट आली की कुठुनसा मुलाच्या घोळकयातून एकाच हल्लकल्लोळ माजायचा. का होत असावा त्यावेळी लाइट परत आल्यावरती एवढा आनंद ? अंधाराचीच भीती ना ?

प्रकाशाचे प्रकार म्हणजे रंग. वेगवेगळे रंग. मनाला भावणारे रंग. कधी बोचणरे रंग. कधी शांत करणारे रंग कधी भडकपणा आणणारे रंग. पण अंधाराचे प्रकार ? हो मला तेही जाणवतात. प्रकाशाचे प्रकार असतात तसे अंधाराचे ही असतात. कधी भयप्रद तर कधी आल्हाददायी, प्रसन्न. चुकुन कधी पहाटे...अगदी पहाटे, जाग आली आणि अन्थरूणातून उठून खिडकीतून चोफेर नजर टाकली साडेतीन पावणेचार ला तर अंधार मुळीच भयावह नसतो उलट असलाच तर एकदम आल्हाददायक. आमच्या गावी रोज पहाटे एका मशिदितून बांग दिल्याचे आवाज यायचे. ती मशीद घराच्या अगदी जवळ होती. त्या मशिदिच्या टोकाला एक पांढरा अणुकुचीदार झेंडा असलेला एक घूमट होता. त्यावर एक हिरवी ट्यूबलाईट उभी करून लावलेली. पहाटे क्वचित जाग आली की मी बाल्कनीत जाऊन उभा राही. मग बरोबर पावणे चार वाजता तो बांग दिल्याचा आवाज कानावर पडे.
मग ती मशीद आणि तो घुमट माझ लक्ष वेधून घेई. जाणवे तो हिरव्या घूमटा भोवती पसरलेला तो अद्भुत अंधार. तो पहाटेचा अंधार मात्र कधीच कातर नसतो. पहाटेच्या वार्याच्या एखाद्या झुळुकीने मनाला सुंदर सा तजेला येत असे.

पहाटेच्या वेळी आणखी एक गंमत होत असे. आमच्या एथे ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा चमू भल्या पहाटे फिरायला जात असे. त्यांचीही वेळ अशीच चार पावणे चाराची. त्या ज्येष्ठ नागरिकांची एक लकब होती. ते लोक सकाळी मोठमोठ्याने कसले तरी श्लोक म्हणत जात. मनाचे श्लोक असावेत बहुधा. पण त्या श्लोकांचा नादही असाच वेड लावणारा. ते लोक बहुतेकवेळा हातात महाबळेश्वरी काठ्या घेऊन जात. बारीक नक्षीकाम केलेल्या अस्त्तात तसल्या. ते चालता चालता गंमत म्हणून हातातली ती काठी रस्त्यावर रोवल्यासारखी आपटत आपटत चालत असत. त्या काठी रोवल्याचाही आवाज त्या शांत पहाटेच्या अंधारात घुसत असे. माधेच एखाद कुत्र दचकून ओरडत असे. आमी मग पचेक मिनिटांनी परत पुन्हा सगळा गुडूप अंधार. मी मग हा सकाळचा अंक संपावायला असाच अर्धा पाऊण तास अंधारातच अंधारकडे पाहत उभा राहत असे. कधी आलीच तलफ तर अंधाराच्या सोबतीला चहा.

अंधाराचा आणखी एक गंमत्शीर प्रकार म्हणजे थिएटर मधला अंधार. बाहेरच्या उश्मयातून सुटका करून घेत त्या हॉल मधले फोमचे अस्तर लावलेले गुबगुबीत दार जोर लाऊन दोन्ही हाताने पुढे ढकलावे. आणि त्या थिएटर च्या लाल चुटूक गालिच्यावर नकोसे वाटत असताना पाय ठेवावा. त्या गालिच्यात पाय चांगला इंच दीड इंच आत घुसावा. टॉर्च च्या झोतात आपली जागा कुणीतरी आपल्याला शोधून दाखवावी. आपण त्या टॉर्च च्या उजेडात, आणि त्या भोवताली पसरलेल्या अंधारात एक एक पाऊल टाकत शोधून दाखवावी. आपण त्या टॉर्च च्या उजेडात, आणि त्या भोवताली पसरलेल्या अंधारात एक एक पाऊल टाकत आपल्या जगेकाडे जाऊन हळूच विराजाव. आजु बाजूला पर्फ्यूम आणि टॅल्कम चे मोहक वास दर्वळावेत.

लिपस्टिक्स आणि रूजने त्या अंधारातही नजरेचा ठाव घ्यावा. मध्येच पॉपकॉर्न च्या पिशव्यांचा तो 'चर्चर' आवाज. आणि हवाहवासा खमंग वास. वातावरण सगळ कस निखलस उल्हासित करून टाकणार. भिंतिंच्या मागून लपवून ठेवलेले ते दिवे. कधीच न दिसणारे. फक्त दिसतो तो त्यांचा मंद प्रकाश. आणि त्या प्रकाशाभोवतीचे ते सुबक आणि रेखीव डिझाईन्स चोफेर भिंतभर पसरलेले. बाहेरच्या उश्म्याचि जागा आता मंद गार वार्याच्या झुळुकीने घ्यावी. तळहाताचा स्पर्श आपला आपल्यालाच गार वाटू लागावा. पाचेक मिनिटांनी मग भिंतीवरचा एकेक दिवा मग हळू हळू मालवायला लागावा. पाहता पाहता मग त्या बंद आसमन्तात उरतो तो फक्त अंधार. त्या अंधारात असतो आल्हाद, उन्माद, वैभव आणि उल्हास. हे ही एक अंधाराचाच रूप. थोडस वेगळ. पण वेड लावणार!

चारुदत्त रामतिर्थकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

मी आपले बरेच लेख वाचून काढले काल दिवसभरात. साध्यासरळ शब्दाला/विषयाला घेऊन त्यावर लेखन खुलवण्याची तुमची हातोटी भारी आहे. अजून लिहत रहा.