जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो

Submitted by जव्हेरगंज on 8 November, 2015 - 14:57

जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो
कढईतली मोहरी चुर्रर करते
हळद मीठ तेल टाकुन शेंगदाने खरपुस भाजले जातात
मी बाहेरच बसलेला असतो पेपर वाचत
कांद्यापोह्याच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा गाठोडी ईकडे तिकडे सरकतात
पोटमाळ्यावरची झुरळं तर्रर पळतात
झाडू बादली पाणी घेऊन भिंत पुसली जाते
मी खालीच ऊभा असतो स्टुल घेऊन
जळमटं काढायच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा साखरेचं माप होत असतं
तेव्हा मालक सुर्रर करत चहा पितो
डाळी तांदुळ कडीपत्ता पिशवीत कोंबुन भरला जातो
मी तिथेच ऊभा असतो काऊंटरजवळ
बिलाच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा माहेरचा पाहुणा घरी येतो
सगळा शिणवटा अर्रर करुन पळुन जातो
पुरणपोळी आंबरस चकल्या ताटात आग्रहाने वाढल्या जातात
मी पाटावर बसुन असतो हवापाण्याच्या गप्पा करत
निरोपाच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा म्हैस दावणीची सुटते
तेव्हा वाडी फुर्रर करते
लगबग धावपळ घाई करत वेसण घातली जाते
मी सावलीत पडलेला असतो उंबराच्या झाडाखाली
निद्रेच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा जोंधळ्यावर कणसं फुटायला लागतात
तेव्हा पाखरं भुर्रर करत ऊडत येतात
गोफण दगड मचाण बुजगावणंसुद्धा मारा करतं
मी दंडावर ऊभा असतो बैलांना पाणी पाजत
ऊनं ऊतरायच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा पाऊस वादळी पडतो
तेव्हा आभाळ टर्रर करुन फाटत जातं
वीजा वारा ऊन आकाशात कडाडुन खेळत सुटतं
मी भिजुन बसलेला असतो ओसरीवर कुडकुडत
ऊफाळत्या चहाच्या प्रतिक्षेत

जेव्हा जेव्हा मला ऊशीर होतो
तेव्हा रात्र किर्रर होते
पणती ऊदबत्ती समई लावुन घराची ऊजळणी होते
तु प्रसन्न बसलेली असते अंगाईगीत म्हणत
माझ्या प्रतिक्षेत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

__/\__

छान