अभिमान आहे मला ….

Submitted by कविता क्षीरसागर on 4 November, 2015 - 07:43

अभिमान आहे मला ….

गुरु पौर्णिमेचा तो दिवस होता. सकाळी सकाळी लगबगीने आमचे आवरून मी आणि जुईली बाबांच्या गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेलो . खरं तर एवढ्या सकाळी उठून जायचे अगदी जीवावर आले होते आणि ते ही सुट्टीच्या दिवशी , पण एकीकडे मोठी उत्सुकताही होती, बाबांच्या योगा क्लास बद्दल . गेले वर्षभर ते हा योगा क्लास - रोकडोबा मंदीर , शिवाजीनगर गावठाण , पुणे येथे विनामूल्य घेत होते. अगदी सुरुवातीला दोनच माणसांपासून सुरुवात करून तो त्यांनी २५,३० माणसांपर्यंत आणलेला होता. आम्ही आजवर तो क्लास , ते रोकडोबा मंदीर , त्यांचे विद्यार्थी हे काहीच पाहिलेले नव्हते . आता या ऐकीव गोष्टींचे प्रत्यक्ष दर्शन होईल या हेतूने मी तिथे गेले होते . तोवर माझा भाऊ प्रसाद , बहिण पुनम,अभयही स्नेहाला घेऊन आले .

तिथले ते प्रसन्न वातावरण , मंदिराचा रम्य परिसर आणि अतिशय आदराने माझ्या बाबांकडे पाहणारे हे सर्व लोक पाहून आम्हाला खुपच छान वाटत होते , नंतर एकेकजण आपला ह्या क्लासबद्दलचा अनुभव सांगू लागले , त्यांचे सारे अनुभव ऐकून भावंडे तर स्तिमितच होऊन गेलो , हा योगाक्लास , ओंकार साधना आणि माझे बाबा यांच्याबद्दल या सर्व मंडळीत इतकी अपर श्रद्धा निर्माण झाली होती की आपले अनुभव सांगताना त्यांच्या भावना अनावर होत होत्या , केवळ या क्लासला येउन योगा केल्यामुळे आपण रोगमुक्त , व्याधीमुक्त होत आहोत , आपली व्याधी कमी होऊ लागली आहे याची जाणीव होऊन ते सांगताना अनेकांना रडू कोसळले . त्या लोकांनी बाबांचे वारंवार आभार मानले , काहींनी तर अक्षरशः त्यांचे पाय धरले .

हा क्षण आम्हाला इतका वेगळा पण आनंददायी व अभिमानास्पद होता की आमचेही डोळे आनंदाने , कौतुकाने भरून आले. आईने हजारदा बजावून या कार्यक्रमाला आवर्जून या म्हणून आम्हा तिघा भावंडाना सांगितले होते आणि त्याप्रमाणे आम्ही तिघेही तो अद्भुतरम्य असा गुरुपौर्णिमेचा सोहळा पाहण्यासाठी हजार होतो याचे आता आम्हाला खूप समाधान वाटते . त्याक्षणी मी " श्री राजन काशिनाथ क्षीरसागर " यांची ज्येष्ठ कन्या आहे याचा खरोखर सार्थ अभिमान वाटला .

पण खरंच "अतिपरिचयात अवज्ञा " म्हणतात तसेच काहीसे माझ्या वडिलाबाबत झाले असे आता वाटते , कारण एरवी घरी इतके साधे , आमचे पट्कन ऐकणारे, सर्वाना मनापासून मदत करणारे आमचे बाबा बाहेर एवढे मोठे असतील याची आम्हाला खरच कल्पना नव्हती . बरं , हा मानमरातब फक्त या योगाक्लास पुरताच मर्यादित नव्हता तर ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतील त्या त्या क्षेत्रात होता , हे आत्ता , आम्हाला इतरांकडून कळत होते. कारण एक तर आम्हा मुलांचे वेगळेच जग होते आणि बाबा नेहमी त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असत . पण त्यामुळेच आता मला बाबांच्या एकूण जीवना बद्दलची , त्यांच्या बालपणाबद्दल , जडण घडणीबद्दल उत्सुकता वाटू लागली .

आणि मी ठरवले , की आता बाबांना बोलते करायचे . अगदी पहिल्यापासून म्हणजे पार त्यांच्या जन्मापासूनच्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या . मग एक दिवस वेळ काढून मी बाबांकडे गेले , तेव्हा बाबा एका मतीमंद मुलाला ओंकार शिकवत होते . तो मुलगा वयाने सुमारे २५, ३० वर्षाचा असावा पण त्याचे शब्दोच्चारण एखाद्या लहान मुलासारखेच होते. त्याची आई मोठ्या प्रेमाने आपल्या मुलाची ओंकारसाधना पाहत होती . तो मुलगाही त्याला जमेल तसे ओंकार म्हणत होता . थोड्यावेळाने त्यांचे ओंकार म्हणून झाल्यावर बाबांना नमस्कार करून तो जायला निघाला तेव्हा त्याची आई बाबांना म्हणाली - " गुरुजी , या ओंकार साधनेमुळे आता तो पुष्कळसा शांत असतो. आता तो कुणाला मारत मारत नाही . आम्हाला त्याच्यात पुष्कळ सुधारणा दिसू लागली आहे . आणि तुमच्याबद्दल तर त्याच्या मनात खुपच आदर आहे . " मां , चलो नं , गुरुजी के पास जायेंगे !" असे तो नेहमी म्हणत असतो . आता त्याला थोडा व्यायामही करायला शिकवा म्हणजे त्याचे हात पायही नीट वळू लागतील . " बाबांनी तिला " आपण नक्की तसाही प्रयत्न करून पाहू या " असे आश्वासन दिले . मग ते दोघे आनंदाने गेले

मला तर बाबांच्या जागी कोणी संत महात्माच बसला आहे की काय असे वाटू लागले . खरं तर आम्ही बाबांच्या भोळसट स्वभावाला आणि त्यांच्या व्यवहारशून्य वर्तनाला हसायचो , त्यांची खिल्ली उडवायचो पण तेच बाबा अशा रुपात पहिले की माझी मलाच आता लाज वाटू लागली .
असो … तर मी बाबांना, माझ्या येण्याचे कारण सांगितले तर ते म्हणाले " म्हणजे काय कविता , तू काय माझी मुलाखत वगैरे घेतेयस की काय ?"
मी म्हटले - " तसे समजा हवे तर . पण खरंच बाबा. आम्हाला तुमच्या बद्दल नीटशी माहिती आहे कुठे ? तेव्हा तुम्ही तुमचे शिक्षण , छंद , नोकरी या सर्वांबद्दल सविस्तर सांगा ना… "
आणि ते सांगू लागले . भरभरून सांगतच राहिले . काय सांगू नि काय नको असे त्यांना होऊन गेले . तेव्हा या पुढचे त्यांच्याच शब्दात ………
" मी राजन काशिनाथ क्षीरसागर . घरातला सर्वात मोठा मुलगा . माझा जन्म ०६/११/१९४१ रोजी पुरंदर तालुक्यातील मांढर या गावी झाला . माझ्या जन्मा अगोदर माझी आई रोज पहाटे खंडोबा मंदिरासमोर असलेल्या पिंपळाला १०८ प्रदक्षिणा घातल्या शिवाय भोजन करीत नसे , माझ्या अगोदरची भावंडे जगत नव्हती , त्यामुळे नवसा सायासाने , कठोर व्रत वैकल्य करून , कार्तिक वद्य चतुर्थीला माझा जन्म झाला . त्यामुळे माझे नाव "गणेश" असे ठेवले . घरात सर्व प्रेमाने मला "बाळराजा " असेच म्हणत . कालांतराने मी स्वतः काव्य करीत असल्याने "राजन" हे नाव तरुणपणात रीतसरपणे धारण केले . माझे वडील " काशिनाथ बाळकृष्ण क्षीरसागर " हे तिथले तलाठी होते . घरची बरीच मोठी शेती . सर्व भाऊ मिळून तेव्हा ते शेती पहायचे . आमच्या वडिलांना गावात खूप मान होता . अजूनही गावात क्षीरसागरांच्या शब्दाला मान आहे .

पुढे मी शिक्षणासाठी पुण्यात आलो . बी.ए. , बी. एड . केले , शिकत असतानाच " गुन्हा अन्वेषण विभाग , महाराष्ट्र राज्य , पुणे " येथे अंगुली मुद्रा तज्ञ " (Finger print expert ) म्हणून नोकरीला लागलो . महाविद्यालयीन जीवनापासूनच मला साहित्याची आवड लागली , श्री के क्षीरसागर , प्रभाकर ताम्हाणे या सारख्या मातब्बर साहित्यिकांच्या सहवासाने ती गोडी अजूनच वाढली . द मा मिरासदार , शंकर पाटील या सारखे मोठमोठे कथालेखक आम्हाला मराठी शिकवायला होते ही तर मेजवानीच होती . पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात राहत असल्याने अनेक साहित्यिकांना जवळून पाहण्याचा, ऐकायचा योग आला . गन्धालीचे दिनकर गांगल , रुद्र्वाणीचे जीवन किर्लोस्कर हे माझे तेव्हा पासूनचे मित्र . बरेच कार्यक्रम आम्ही एकत्र ऐकलेले आहेत .
तशी मला चित्रकलेची आवड होती. मी तेव्हा निसर्गचित्रे , नख चित्रे खूप काढत असे . संत सत्पुरुषांची रेखाचित्रे काढण्यात मला विशेष आनंद वाटायचा ."

" पण बाबा, तुम्ही तर छान छान भावगीते , भजनेही म्हणता. ती आवड तुम्हाला कशी काय निर्माण झाली ? तुम्ही गाणे कुणाकडे शिकला होतात का ?"
- मी मधेच त्यांना विचारले .
" अगं मला गाण्याची आवड अगदी लहान पानापासूनच होती . पूर्वी काही आत्तासारखे घरोघरी टीव्ही नव्हते . तेव्हा होते रेडिओ आणि ते ही सर्वांकडे नव्हते . पण आमच्याकडे एक ट्रांझिस्टर होता. त्यावरचे शास्त्रीय संगीत ऐकून ऐकून मलाही गोडी लागली . मी कधी गाणं गुणगुणू लागलो कि माझ्या आवाजाचे आई फार कौतुक करायची , प्रोत्साहन द्यायची . तेव्हापासून जरा आत्मविश्वास वाढला . पुढे पुण्याला आल्यावर अनेक दिग्गज गायक कलावंतांच्या मैफली ऐकण्याचा योग आला . त्यात भीमसेन जोशी , कुमार गंधर्व , प्रभा अत्रे , किशोरी अमोणकर , हिराबाई बडोदेकर , वसंतराव देशपांडे , मालिनी राजूरकर , पंडित जसराज यासारख्या नामवंत कलाकारांचे गाणे अगदी जवळून व मनापासून आवडीने ऐकले त्यामुळे गाण्याचा "कान" तयार झाला . आपणही शास्त्रशुद्ध गाणे शिकावे असे वाटू लागले . पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी मला गाणे शिकायला प्रर्वृत्त केले . मग मी त्यांचे शिष्य पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे गाणे शिकण्यासाठी जाऊ लागलो . तिथे अगदी घरगुती वातावरणात माझा रियाझ सुरु झाला . त्यात मी छान रमून गेलो . ते तर मला त्यांचा मुलगाच मानतात .

" हो. ते तर मला माहीतच आहे . समजा कधी तुम्ही महिन्याभरात त्यांच्याकडे गेला नाहीत तर लगेच त्यांचा फोन यायचा , ते आस्थेने तुमची चौकशी करायचे … बरं , हे झालं गाण्याबद्दल . पण तुम्ही यागा कडे कसे काय वळलात ? म्हणजे तसे आम्ही तुम्हाला आमच्या लहान पानापासूनच रोज व्यायाम करताना , सूर्यनमस्कार घालताना , फिरायला जाताना पाहिलेले आहेच . तुम्हाला व्यायामाची आवड होतीच हे माहितीय पण आता या व्यास त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन योगशिक्षक व्हावे असे तुमच्या मनात कसे आणि कधी आले ? "

" माझा पूर्वीपासूनच असा आहे की , मनात कोणती गोष्ट आली की ती होईपर्यंत मला चैन पडत नाही . ज्या ज्या चांगल्या गोष्टी मला कराव्याशा वाटल्या , शिकाव्याशा वाटल्या त्या वेळी मग मी कधी वयाकडे , पैशाकडे , लोक काय म्हणतील याकडे अजिबात न पाहता केल्या . म्हणून तर वयाच्या ६० व्या वर्षी ही मी संस्कार भारतीची रांगोळी शिकायला जाऊ शकलो . तबला शिकलो , रेकी, विपश्यना , निसर्गोपचार , कीर्तन या गोष्टी शिकलो . सतत काही न काही चांगले शिकत राहणे हा माझा स्वभावधर्म आहे म्हण ना ! मला सतत विद्यार्थी म्हणूनच राहायला आवडते .
त्यामुळेच मी जेव्हा काही योगोपचाराची पुस्तके वाचली , व्याख्याने ऐकली , प्रात्यक्षिके पाहिली तेव्हा मलाही त्याबद्दल ओढ वाटू लागली . पण तेव्हा नोकरी सांभाळून हे सर्व करणे शक्य नव्हते .

पण निवृत्त झाल्यावर मात्र मी स्वतःला त्यातच गुंतवून घ्यायचे ठरवले . नाशिक येथील श्री विश्वास मांडलिक यांच्या योग्शिबिरात दाखल झालो . मग त्यांच्या सर्व परीक्षा एका पाठोपाठ दिल्या. ते करत असतानाच निसर्गोपचार तज्ञ ही झालो . आणि आता गरजूंना विनामूल्य सेवा व मार्गदर्शन करत असतो . माझे योगावरती "अमृत योग साधना " नावाचे पुस्तक तर तुला माहीतच आहे . त्यासाठी श्री डोमाळे यांची खूप मदत झाली ."

" हो , मी वाचलेय ते पुस्तक , फारच अभ्यासपूर्ण व दर्जेदार लिखाण आहे तुमचे . खरच बाबा , मला तुमचा खूप अभिमान वाटतो . कारण निवृत्ती नंतर काही लोकांना आपला रिकामा वेळ अगदी खायला उठतो . पण तुम्ही मात्र त्याच वेळेचा किती छान सदुपयोग करत आहात. तुम्हाला आमच्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही . सारखे कुठेतरी शिबीर, भाषणे , कार्यक्रम ,कोर्स वगैरे काही न काही चालूच असते तुमचे. आत्ताच तुम्ही रेकी पण शिकलात ना !
बाबा खरं सांगू माझा या रेकी वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता . पण त्या "चिमणीच्या " घटनेनंतर मात्र त्यात काहीतरी तथ्य असेल असे वाटू लागलेय "

" कोणती घटना गं , मला माहित नाही " - माझा भाऊ प्रसादने विचारले , आमचे संभाषण चालू असताना तो कधी आला ते कळलेच नाही .
" अरे तेव्हा तू घरात नव्हतास . मी ,आई आणि जुईली (माझी मुलगी )होतो . घराच्या खिडक्या उघड्याच होत्या , एक चिमणी खिडकीतून आपल्या घरात शिरली . मला वाटतं ती बहुधा जखमी असावी , कारण तिला प्रयत्न करूनही उडता येत नव्हते . आम्ही सर्वांनी तिला बाहेर घालवायचा खूप म्हणजे खूपच प्रयत्न केला . पण त्या बिचारीला काही उडून बाहेर जाता येई ना . शेवटी आम्ही थकलो . जाऊ दे ! ती काय आपल्याला त्रास देतीय का ती ? असे म्हणत आम्ही तिच्या कडे दुर्लक्ष केले . जवळ जवळ तसा भराने बाबा आले . त्या चिमणीची आता परत फडफड सुरु झाली आम्हाला अगदी पाहवेना . बाबा तिच्याकडे पाहत आम्हाला म्हणाले " थांबा , मी तिच्यावर रेकी करतो . आत्ता ती उडून जाईल बघा " आणि खरंच , काय आश्चर्य ! . बाबांनी तिच्या पंखावर दोन फुट उंच हात धरून रेकी केली आणि अक्षरशः पाच मिनिटात ती चिमणी टुण टुण उड्या मारत आम्ही दार उघडेच ठेवले होते तिथे गेली . आणि मग उडून गेली . तिच्या पंखात एकदम कुठून शक्ती आली कुणास ठाऊक !"

" काय सांगतेस काय , हे मला माहित नव्हत - " प्रसाद म्हणाला - " इतर कोणी सांगितलं असतं तर माझा विश्वासच बसला नसता पण तू आता प्रत्यक्षच पाहिलंयस म्हणल्यावर मग काय प्रश्नच नाही . खरंच आपले बाबा ग्रेटच आहेत " - असे म्हणून तो परत बाहेर निघून गेला .

मलाही गप्पा मारता मारता कसा वेळ गेला कळलेच नाही . संध्याकाळचे पाच वाजले होते . जुईलीला शाळेतून आणायची वेळ झाली होती . या गप्पा सोडून जावेसे वाटत नव्हते. अजून बरेच कशी जाणून घ्यायचं होतं . आई बद्दल , त्यांच्या सह जीवनाबद्दल ते काही बोललेच नव्हते ….
पण असो , ते पुनः केव्हातरी …. माझ्या बाबांचे हे अनेकपदरी जीवन काही एका बैठकीत माझ्या हातात मावणारे नव्हते . तिथून निघताना त्यांच्या बद्दलच माझा आदर शतपटीने वाढला होता हे मात्र नक्की !

खरच बाबा , अभिमान आहे मला …. तुमची मुलगी असण्याचा …

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हणून तर वयाच्या ६० व्या वर्षी ही मी संस्कार भारतीची रांगोळी शिकायला जाऊ शकलो . तबला शिकलो , रेकी, विपश्यना , निसर्गोपचार , कीर्तन या गोष्टी शिकलो . वा!

आणि
सतत काही न काही चांगले शिकत राहणे हा माझा स्वभावधर्म आहे म्हण ना ! मला सतत विद्यार्थी म्हणूनच राहायला आवडते .
हे तर सगळ्यात ग्रेट!

आपल्याच बाबांची मुलाखत घेण्याची कल्पना मस्त आहे. खरोखर असे केले पाहिजे. अन्यथा अनेक गोष्टी आपल्याला न समजताच काळाच्या पडद्या आड जातात...
मुलाखत आवडली आहे.

खुप छान Happy

सर्वांचे मनापासून धन्यवाद …

मी बाबांची घेतलेली ही मुलाखत इथे प्रस्तुत करावी की नाही याबद्दल मला जरा संभ्रम होता .
पण तुम्हा सर्वांच्या प्रतिसादावरून तरी तुम्हा सर्वाना हे आवडलेले दिसतेय .
खूप खूप आभार .

खरेच माझे वडील हे एक अतिशय अभिमानास्पद आणि आदर्श असे व्यक्तिमत्व आहेत .
त्यांचा या (आताचे वय ७४) वयातही असलेला उत्साह खूप प्रेरणादायी आहे .
मागच्या वर्षी माझे आई वडील हिमालय शिखर ही पादाक्रांत करून आले .
त्यावरही त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिले आहे (माझी कैलास पर्वत मानस सरोवर तीर्थयात्रा )
या नावाचे .…….
I am really blessed to have them …