ताडोबाचे वाघोबा

Submitted by आशुतोष०७११ on 3 November, 2015 - 12:36

ताडोबा अभयारण्य पावसाळ्यानंतर पुन्हा पर्यटकांसाठी १६ ऑक्टोबरपासुन खुले होणार ही बातमी वाचल्यासरशी मी ही १६ ऑक्टोबर याच दिवशी ताडोबाला सकाळची जंगल सफारी मिळतेय का याची चाचपणी चालू केली. ४-५ मित्रांनाही विचारुन बघितलं येण्याबद्दल. पण सगळ्यांचच तळ्यात मळ्यात चालू होतं.माझ्या दुर्दैवाने सकाळऐवजी दुपारची सफारी मिळत होती. १ल्या दिवसाच्या सगळ्या सकाळच्या सफारीज फुल्ल झाल्या होत्या.दुपारची का होईना पण १ल्याच दिवसाची सफारी मिळतेय म्हटल्यावर मी लगेचच बुक करुन टाकली, त्याच बरोबर पुढच्या ४ दिवसाच्या सफारीपण बुक केल्या. हॉटेल आणि रेल्वे बुकिंगला फारसे प्रयास पडले नाहीत.

हल्ली पावसाळ्यातपण स्पॉट बुकिंग देतं वन विभाग पण मर्यादित जिप्सीच सोडतात आणि त्याही काही ठराविक गेटनेच. वरुणराजाच्या कृपेवर ह्या सफारी अवलंबून असतात.

सप्टेंबरमध्ये आयत्यावेळी ठरवूनही सफारी, हॉटेल आणि रेल्वे बुकिंग मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानले. १५ ऑक्टोबरला छ.शि.ट.हून मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसने निघालो. गाडीही वेळेवर सुटली आणि दुसर्‍या दिवशी चक्क नियोजित वेळेआधी अर्धा तास नागपूर पोचली. नागपूर स्टेशनवर मॅक्स कॅबचा प्रशांत पिक अपसाठी येणार होता, त्याला आधीच कळवलं होतं दुरांतोने येत असल्याबद्दल, तो ही माझीच वाट बघत होता. बॅग डिकीत टाकून ताडोबाच्या रस्त्याला लागलो. जाता जाता वाटेत एका टपरीवर चहा झाला. प्रशांतशी गप्पा मारत मोहर्ली गावात पोचलो. युनायटेड २१ नामक रिसॉर्टमध्ये ५ दिवस राहणार होतो. १० च्या सुमारास रिसॉर्टवर पोचलो, हॉटेल व्हाउचर रिसेप्शनिस्टकडे देउन डायनिंग हॉलमध्ये जाउन ब्रेकफास्ट उरकून घेतला. रिसॉर्ट नवीनच बांधलं होतं, एकूण १५ तंबू होते, बाजुलाच कॉटेजेसचं बांधकामपण चालु होतं. माझ्यासाठी १०१ क्रमांकाचा तंबू राखुन ठेवला होता. बॅग ठेवली आणि तासभर ताणुन दिली. साडेबाराच्या सुमारास उठलो, मस्तपैकी आंघोळ केली, कॅमेरा, लेन्स, कॅमेरा बॅटरी वगैरे जामानिमा तयार केला. तोपर्यंत लंच रेडी आहे असा निरोप आला. जेवणानंतर सफारीसाठी तयार व्हायचं होतं. बाहेर उनही चांगलंच कडकडीत होतं. नागपूरचं उन चांगलंच भाजुन काढणार अशी लक्षणं होती.

सव्वा दोनच्या सुमारास रुपेश ड्रायव्हर जिप्सी घेउन आला. कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या घेउन जिप्सीत बसलो. रिसॉर्ट्पासुन नॅशनल पार्कचं गेट ४ किमीवर होतं. गेटवर पोचलो तर आधीच ७-८ जिप्सीज उभ्या होत्या. सफारी बुकिंग केल्याचा फॉर्म आणि ओळखपत्रं घेउन वनविभागाच्या ऑफिसमध्ये जाउन दुपारच्या सफारीसाठी नोंद करुन आलो. ऑनलाईन सफारी बुकिंग करताना ज्या ओळखपत्राची नोंदणी केलीय तेच ओळखपत्रं गेटमधुन आत जाण्यापूर्वी सादर करावं लागतं. दुपारच्या सफारीची वेळ ३ ते ६ आणि सकाळच्या सफारीची वेळ ६ ते १०.३० अशी होती. प्रत्येक जिप्सीसोबत वनविभाचा एक गाईड सोबत असतो. दुपारच्या सफारीसाठी दशरथ गाईड मिळाला होता. गेटवर नोंदणीवगैरे सोपस्कार आटोपून रुपेश आणि दशरथसोबत चहा घेतला. दशरथ मोहर्ली विभागातला एक जुनाजाणता गाईड आहे, दशरथ आहे आजच्या सफारीला म्ह्टल्यावर निर्धास्त होतो.

ताडोबा नॅशनल पार्कमध्ये जाण्यासाठी मोहर्ली, खुटवंडा, कोलारा, नवेगाव, पांगडी आणि झारी असे सहा गेट आहेत. त्यापैकी मोहर्ली गेटमधुन एकूण २७ वाहनांना एकावेळेस पार्कमध्ये जायची परवानगी आहे. बाकीच्या गेटमधुन ४, ६ आणि ९ एवढीच वाहने सोडतात.

ठीक ३ वाजता जिप्सीजना एक एक करुन आत सोडायला सुरुवात केली. आमचीही जिप्सी पार्कमध्ये प्रवेश करती झाली.
"आज सकाळीच ३ गाड्यांना सोनम आणि तिचे ३ बच्चे दिसले होते" दशरथने सांगितलं.
"सुरुवात तर चांगली झाली म्हणायची, आता बघुया सोनम दिसते का?" - मी.
"आधी सगळ्या वॉटरहोल्सना राऊंड मारुन येउ, मग कॉल कुठे येत असला तर बघु." - दशरथ
जामुनझोरा, पांढरपौनी ह्या एरियातुन फेरी मारुन आलो, ताडोबा तलावालाही फेरी मारुन आलो. पण सगळीकडे शांतता होती. बाकीच्या जिप्सीजमधली मंडळीही मान हलवून काहीच न दिसल्याच्या खुणा करत होती. दुपारची सफारी व्यर्थ जाणार अशीच चिन्हे होती. पावणेसहाच्या सुमारास परत फिरलो. दुपारच्या सफारीला काहीच पदरात पडलं नव्हतं. दुसर्‍या दिवशी नशीब साथ देइल ह्या आशेवर रिसॉर्टवर परतलो. जेवून झाल्यावर पावणेपाचचा अलार्म लावून झोपलो.

सकाळी पावणेपाचच्या गजराने जाग आली. सव्वा पाचच्या सुमारास संजु जिप्सी घेउन हजर झाला. साडेपाचच्या सुमारास गेटवर पोचलो,नेहमीचे नोंदणी सोपस्कार आटोपले. आज मनोहर होता गाईड. मनोहर आणि संजुसोबत चहा घेतला. ६ वाजता पार्कमध्ये प्रवेश केला. सगळे पाणवठे पालथे घातले. कुठेही कसलीही हालचाल नव्हती, सगळं जंगल एकदम शांत होतं. नाही म्हणायला हरणं, सांबर बागडत होती. त्यांचे काही फोटो घेतले.

Tadoba 1_RS.jpgTadoba 11_RS.jpgTadoba 9_RS.jpgTadoba 21_RS.jpg

ताडोबाच्या जंगलात काही मोठी कोळीष्टकं दिसली.

Tadoba 20_RS.jpg

सकाळच्या आणि दुपारच्याही सफारीत वाघोबा काही दिसले नाहीत. थोड्याशा नाराजीतच रिसॉर्टवर परतलो. प्रत्येक सफारीत काही ना काही नवीन बघायला मिळतंच. खरं सांगायचं तर वाघ दिसणं ह्यात नशीबाचा भाग जास्त. वाघाची बाहेर पडण्याची वेळ आणि आपली जिप्सी नेमकी त्याचवेळेस त्या ठिकाणी असणं हा केवळ योगायोग साधणं मस्ट. नाहीतर बर्‍याचदा ७-८ सफारी करुनही वाघ न बघितलेले लोकही भरपूर आढळतील.

दुसर्‍यादिवशी परत त्याच उत्साहात पार्कात शिरलो. ड्रायव्हर आणि गाईड तेच होते. फिरत असता एका जिप्सीच्या गाईडने 'तारा'ने एका सांबराची शिकार केल्याची बातमी दिली. बातमी दिलेल्या गाईडची जिप्सी जिथे उभी होती त्याच्याच बाजुला आम्हीही जिप्सी उभी केली. शिकार खाउन वाघ पाण्यासाठी बाहे पडणार एवढं निश्चित होतं, फक्त कधी आणि कोणत्या दिशेने बाहेर येइल ह्याची खात्री नव्हती. कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये वाघांना नावं ठेवण्याची कामगिरी गाईड्सची. ताडोबाच्या जंगलात सध्या 'तारा,सोनम,बजरंग,माया,शिवाजी,माधुरी,गब्बर,नामदेव'असे वाघ गुण्यागोविंदाने राहत आहेत. आमच्या जिप्सीला ३ वेळा सोनमने गुंगारा दिला. सोनम आणि ३ बच्चे काही जिप्सीजना नियमित दिसत होते. बजरंगची आणि आमची काही सेकंदांनी चुकामुक झाली. मनोहरच्या मते आपण ईथेच थांबु, तारा निश्चित बाहेर येइल पाणी प्यायला. मागेच नाला आहे. ईथुनच जाईल. अर्धा तास वाट पहात आम्ही बसुन होतो. रणथंबोर, कान्हा वगैरे जंगलात वाघ एखाद्या ठिकाणाहून चालु लागला की सांबर, भेकर किंवा लंगुर अलार्म कॉल देउन ईतर प्राण्यांना सावध करतात. ताडोबाला काहीवेळा कॉल शिवायच वाघ बाहेर पडल्याचं मनोहर म्हणाला. तसाही आमच्या हातात बराच वेळ होता, गेटबाहेर पडायला अजुन तासभर अवकाश होता. बाकीच्या जिप्सीज न थांबता जात होत्या. बराचवेळ कोणतीच जिप्सी फिरकली नाही, बर्‍यापैकी शांतता झाल्यावर 'तारा' बाजुच्या उंचच उंच गवतातुन अचानक समोर अवतीर्ण झाली. एक क्षण डोळ्यावर विश्वासच बसेना, लगेच कॅमेरा सरसावून भराभर फोटो काढले.

Tadoba 4_RS.jpg

केवळ २-३ मिनिटंच 'तारा'दर्शन झालं पण हेड ऑन आल्यामुळे फोटोही मनासारखे मिळाले. जवळजवळ तासभर वाट बघितल्याचं सार्थक झालं. 'तारा'ला सध्या कॉलर लावलीय. फोटोतही दिसतेय. दुपारच्या सफारीत परत व्याघ्रयोग असेल तर उत्तम म्हणत रिसॉर्टवर आलो. दुपारच्या सफारीत वाघ काही दिसला नाही पण गौर ( Indian Bison ), शिकरा, हरियाल ( महाराष्ट्राचा राज्य पक्षी ) असे काही पक्षी दिसले.

Tadoba 12_RS.jpgTadoba 13_RS.jpgTadoba 14_RS.jpgTadoba 18_RS.jpgTadoba 15_RS.jpg
शिकरा

Tadoba 17_RS.jpg
हरियाल

Tadoba 16_RS.jpg
लंगुर

Tadoba 2_RS.jpg

अजुन २ दिवस म्हणजे ४ सफारीज बाकी होत्या, 'तारा,सोनम,माया,बजरंग'यांच्या एरियात मी होतो. न जाणो कोण कधी दर्शन देइल? तिसर्‍या दिवशी माझी सकाळची सफारी खुटवंडा गेटमधुन होती. आधीच्या सगळ्या सफारीज मी मोहर्ली गेटमधुन केल्या होत्या. ह्या गेटला ड्रायव्हर आणि गाईड वेगळे होते. नेहमीप्रमाणे ६ वाजता गेटमधुन जिप्सीज पार्कमध्ये सोड्लया. ह्या गेटमधुन फक्त चारच जिप्सीज सकाळी आणि चार संध्याकाळी सोडतात. ह्यादिवशी पार्कमध्ये जायला फक्त माझीच जिप्सी होती. गाईड योगेश आणि ड्रायव्हर अनंत. ह्या गेटमधुन ताडोबाच्या जंगलातल्या मेनरोडवर ५ मिनिटात पोचलो. तसेच ताडोबाच्या तलावाच्या दिशे निघालो असता एका वळणावर समोरुन 'तारा'च चालत येत होती.

Tadoba 5_RS.jpg

अनंत्ने लगेच जिप्सी थांबवून रिव्हर्स घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात मागे वनविभागाची जिप्सी आल्यामुळे आम्हाला जिप्सी एका बाजुला घ्यावी लागली. 'तारा' आमच्याच दिशेन चालत येत असल्यामुळे फोटो काढतच होतो. जिप्सी एका बाजुला घेतल्यामुळे एक क्षण आमच्याकडे नजर टाकून 'तारा' आमची जिप्सी क्रॉस करुन पुढे निघुन गेली.

Tadoba 8_RS.jpgTadoba 6_RS.jpg

पार्कमध्ये शिरलयावर पहिल्या १० मिनिटातच 'तारा' दिसल्यामुळे सफारी सार्थकी लागली होती. पुढे जंगली कुत्रे ( wild dogs / Dhole ) दिसले.

Tadoba 10_RS.jpg

नंतरच्या सफारीत फारसे कोणी प्राणी दिसले नाहीत. नाही म्हणायला ताडोबा तलावातली सुसर दिसली.

Tadoba 3_RS.jpg

ताडोबा ट्रीप सार्थकी लागल्याच्या समाधानात रिसॉर्टवर परतलो, परतीच्या प्रवासासाठी बॅग भरायची होती, प्रशांत माझीच वाट बघत होता. वेळेत नागपूर गाठणं जरुरी होतं. पुन्हा एप्रिलमध्ये ताडोबा यायला हवं असं ठरवत निघालो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, मस्त !! कधीपासून प्लानिंग आहे नुस्तंच....
क्रमशः .. वॉव म्हंजे अजून फोटो पाहायला मिळतील..

तुम्हाला वाघ पाहायला मिळाले. एकदा नाही दोनदा! वाघही तृप्त आहे. शांतपणे पहात चालला(ली) आहे.
किती नशीबवान आहात...

(मी एकदाच वाघ पाहिला आहे आणि तो ही चवताळलेला हिंस्त्र, मुक्त,फार तर शंभर फुटांवर.
भीमाशंकर येथे भीती म्हणजे काय याचा प्रत्यय आला होता.
त्या नंतर मुक्त वाघ पाहायला मिळाला नाही.
आणि माझीही मुक्त वाघ पाहण्याची हौस फिटलीच आहे... Wink )

पटापट फोटो scroll करत गेले.तर वाघोबा एकदम धाडकन समोर आल्यासारख वाटल. Happy
मस्त प्रचि आहेत सगळे .आता वाचते.

पटापट फोटो scroll करत गेले.तर वाघोबा एकदम धाडकन समोर आल्यासारख वाटल.
>> अगदी अगदी ... कसला जबरी आलाय तो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

@वर्षुताई, कर एकदा ताडोबा ट्रीप प्लॅन. तुला निश्चित आवडेल.

@दिनेशदा, लेख पुर्ण केलाय उरलेले फोटो टाकून.

@अवल, तु अजुन ताडोबा गेली नाहीयस म्हणजे आश्चर्यच.

तोषा, अप्रतिम फोटोज.. Happy
बाकी फोटो आणि शब्दांनी फक्त तेवढच पोचवता येतं. अनुभव नाही.
पण आमच्याकरता हे ही नसे थोडके असं म्हणायला हवं. Happy खूप दिवसांपासूनची इच्छा आहे ताडोबाला जायची.
तसे आम्हीही भाग्यवान आहोतच.. गिरनारच्या जंगलात मेन गेटपासून ५ किमी वर असणार्‍या एका आश्रमात जाताना वाटेत अशीच एक सिंहीण एकदम उगवली होती. तु वर लिहिलयस त्याप्रमाणे डोळ्यावर विश्वासच बसेना. सटासट फोटो घेताना उगाचच धडधड वाढली होती. ती रात्र आम्ही जंगलातच राहिलो होतो.. त्या आश्रमात. त्या रात्री एक सिंहगणती करणारा अधिकारीही आला होता. पहाटे ३ वाजेपर्यंत त्याचे चित्तथरारक अनुभव आणि त्याने घेतलेले सिंहाचे व्हिडिओज यांनी आमचा अश्रमातला मुक्काम आणखी सार्थकी लावला होता. त्यानंतर जंगली श्वापदांच्या आवाजातही मस्त झोप लागली होती. Happy

छान फोटो. हेडऑन तारा, शिकरा, हरियाल, पोपट एकदम क्लिअर आले आहेत.

सगळे वाघ सारखेच दिसतात मग कुठली तारा, सोनम, बजरंग, माया, शिवाजी, माधुरी, गब्बर, नामदेव वगैरे कसं काय कळतं?

अश्विनी के -
सगळे वाघ सारखेच दिसतात मग कुठली तारा, सोनम, बजरंग, माया, शिवाजी, माधुरी, गब्बर, नामदेव वगैरे कसं काय कळतं? >>>>>>>
Tigers have narrow black, brown or gray stripes on their heads, bodies and limbs. Tigers can be differentiated easily since the pattern of stripes is unique to each individual.

( http://www.wwfnepal.org/what_we_do/species_in_nepal/tiger/ )

शशांक, धन्यवाद Happy कठिणच आहे तरी पण ना? तोंडवळा तर सारखाच असणार. कदाचित कर्मचार्‍यांना सारखं सारखं बघून कळत असेल. पण सिंहांचं काय? त्यांना कसं ओळखतात?

अवांतराबद्दल क्षमस्व.

अश्वे,
वाघाचा तोंडवळा सारखाच असला तरी चेहर्‍यावरच्या पट्ट्यांचे पॅटर्न्स भिन्न असतात. गाईडस ईतक्या वर्षांच्या अनुभवावरुन सहज ओळखतात.
प्रत्येक नॅशनल पार्कसमधल्या गाईडसनी वाघांना नावं दिलीत, उदा. रणथंबोरमध्ये सुलतान, नूर,लाडली.

गीरमध्ये सिंहांनाही राजु, मौलाना,शाम अशी नावं दिलीयत.

डिस्कव्हरी वरची रणथंबोरच्या सीता, चार्जर आणि त्यांची पिल्लं ही स्टोरी कितीही वेळा पाहिली तरी समाधान होत नाही Happy

सगळेच फोटो फार सुंदर आहेत! तारा कसली देखणी आहे. Happy

बाय द वे, एका गौरीनी तुम्हाला जीभ काढून वेडावूनपण दाखवलंय. Happy

Pages