अंधारात हरवलेला चार्ल्स (Movie Review - Main Aur Charles)

Submitted by रसप on 2 November, 2015 - 00:05

चार्ल्स शोभराज.
जगभरातल्या सगळ्यात सुप्रसिद्ध गुन्हेगारांपैकी एक आणि भारतातला तर बहुतेक सर्वाधिक सुप्रसिद्ध गुन्हेगार. सहसा गुन्हेगार कुप्रसिद्ध असतात, पण चार्ल्स सुप्रसिद्धच होता. ऐंशीच्या दशकात जेव्हा त्याच्या बातम्या वृत्तपत्रांचे मथळे बनत होत्या, तेव्हा त्या प्रत्येक बातमीगणिक तो लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत होता. त्या काळातल्या अपरिपक्व लहान व तरुण मुलांना तर 'चार्ल्स शोभराज' ह्या नावाभोवतीचं वलय वेगळंच वाटत होतं. मला आठवतंय, जेव्हा मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं, तेव्हा किती तरी दिवस मला ही व्यक्ती कुणी तरी गुप्तहेर किंवा राजकुमार वगैरे आहे असं वाटत होतं ! सामान्य लोकांत बनलेल्या त्याच्या ह्या प्रतिमेसाठी पूर्णपणे 'श्रेय' माध्यमांना देण्यापेक्षा मी असं म्हणीन की चार्ल्सने माध्यमांचा उत्तमप्रकारे, चाणाक्षपणे वापर करून घेतला होता. 'मैं और चार्ल्स' मध्ये जेव्हा एक वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी चार्ल्सविषयी बोलताना म्हणतो, 'चार्ल्स वोह कहानियाँ लिखता हैं जिन्हें वोह बेच सके' तेव्हा त्यातून हेच समजून येतं की हा गुन्हेगार इतर गुन्हेगारांपेक्षा खूप वेगळा होता. तो अभ्यासू, अतिशय चतुर, निडर, प्रचंड आत्मविश्वास असलेला आणि खूप संयमही असलेला - त्या 'वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी' च्याच शब्दांत - एक असा लेखक होता, जो लिहिण्यासाठी पेन व कागद वापरत नव्हता, तर स्वत:चं आयुष्यच वापरत होता !

चार्ल्स शोभराजच्या करामतींवरून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपापला कार्यभाग उरकला. अनेक चित्रपटांतही त्याच्या क्लृप्त्या बेमालूमपणे वापरल्या गेल्या आणि काही व्यक्तिरेखाही ढोबळपणे त्याच्यावर आधारून उभ्या केल्या गेल्या. मात्र थेट चार्ल्सवरच चित्रपट बनवणे आजपर्यंत शक्य झालं नव्हतं कारण चाणाक्ष चार्ल्सने आपल्या जीवनकहाणीचे हक्क विकत घेण्यासाठी लावलेली बोलीच तोंडचं पाणी पळवणारी होती. मात्र 'मैं और चार्ल्स' बनवताना हे हक्क घेण्यात आले तत्कालीन दिल्ली पोलीस कमिशनर 'आमोद कांत' ह्यांच्याकडून. पण चित्रपट काही श्री. कांत ह्यांच्या दृष्टीकोनातून कहाणी सांगत नाही. तो पूर्णपणे चार्ल्सचाच चित्रपट आहे. तो 'मैं और चार्ल्स' नसून ' मैं और कांत' आहे.

'प्रवाल रामन' हे रामगोपाल वर्माच्या 'फॅक्टरी'चं एक उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. 'डरना मना है', 'डरना जरुरी है' आणि '404' हे त्यांचे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. पण 'चार्ल्स'ची कहाणी सांगताना त्यांनी वेगळीच धाटणी निवडली आहे. हे जे कथन आहे ते काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या दिबाकर बॅनर्जींच्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' च्या सादरीकरणाशी थोड्याफार प्रमाणात साधर्म्य सांगतं. हा चित्रपट पहिल्यांदा बघतानाच दुसऱ्यांदा पाहिला पाहिजे. नाही तर दुसऱ्यांदा बघूनही पहिल्यांदा पाहिल्यासारखा वाटेल. म्हणजे, तो बघण्यापूर्वी चार्ल्सविषयीची माहिती असणं आवश्यक आहे आणि तिला एक उजळणी देणंही. ही एक परीक्षा आहे. ह्या पेपरला बसण्यापूर्वी अभ्यास करणे गरजेचं आहे. (आणि ते केलं नसेल, तर कॉपी करण्यासाठी सोबत कुणी तरी असणं तरी आवश्यक !)
किंचित कर्कश्य पार्श्वसंगीत, हळू आवाजातले संवाद, संवादात इंग्रजीचा भरपूर वापर आणि संपूर्ण चित्रपटात सतत असलेला अंधार ह्यामुळे आधीच अंमळ क्लिष्ट सादरीकरण आणखी क्लिष्ट वाटायला लागतं. चित्रपट उरकतो, आपल्याला काही तरी वेगळं, नवीन पाहिल्यासारखं वाटतं, पण त्याने समाधान झालेलं नसतं. म्हणूनच 'मैं और चार्ल्स' सर्वांच्या पसंतीला उतरेल, ह्याची शक्यता कमी आहे.

चार्ल्सचा गुन्हेगारी जगतातला प्रवास हा भारतासह जवळजवळ १०-१२ देशांतला आहे. मात्र चित्रपट भारत व थायलंडव्यतिरिक्त इतर देशांना स्पर्श करत नाही. तो त्याच्या आयुष्यातल्या त्याच टप्प्याबद्दल सांगतो ज्या टप्प्यात श्री. आमोद कांत त्याच्याशी संबंधित होते. मात्र ह्यामुळे चार्ल्स पूर्णपणे उभा राहत नाही आणि मुख्य व्यक्तिरेखेचाच आगा-पिच्छा समजून घ्यावा लागत असल्याने चित्रपटच अपूर्ण ठरतो.

ही मुख्य व्यक्तिरेखा कितीही अपूर्ण असली, तरी रणदीप हुडा कमाल करतो. त्याचा चेहरा चार्ल्स शोभराजशी किती मिळता जुळता आहे, हे चित्रपट पाहताना जाणवतं. अर्थात, त्याचा मेक अप व गेट अप त्याला हुबेहूब 'चार्ल्स' बनवतो, पण मूळ चेहराही बऱ्यापैकी साम्य सांगणारा आहे. त्यामुळे ह्या भूमिकेसाठी इतर कुणीही अभिनेता इतका फिट्ट ठरला असता का, ह्याचा संशय वाटतो. बोलण्याची अ-भारतीय ढब (बहुतेक फ्रेंच) त्याने अप्रतिम निभावली आहे. शोभराजच्या ज्या 'चार्म' बद्दल सगळे बोलतात, तो 'चार्म'सुद्धा त्याने दाखवला आहे. त्याचं व्यक्तिमत्व कुणालाही भुरळ पाडेल असं खरोखर वाटतं, त्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे भाळलेल्या 'मीरा शर्मा'ची आपल्याला दयाच येते.

cs_1443000967_1443000974.jpg

'मीरा'ला साकारणारी रिचा चढ्ढासुद्धा लक्षात राहते. तिचं 'मसान'मधलं काम मला तरी पूर्ण मनासारखं वाटलं नव्हतं, पण इथे मात्र ती 'मीरा' म्हणून कम्फर्टेबल वाटते.

आमोद कांत ह्यांच्या भूमिकेत अजून एक गुणी अभिनेता 'आदिल हुसेन' दिसून येतो. कर्तव्यदक्ष आणि चार्ल्सला अचूक ओळखणारा त्याच्याच इतका चलाख व अभ्यासू पोलीस ऑफिसर आदिल हुसेननी उत्तम वठवला आहे. चित्रपटाच्या कहाणीचं वलय चार्ल्सभोवती आणि पर्यायाने रणदीप हुडाभोवती असल्याने आमोद कांत व पर्यायाने आदिल हुसेन सहाय्यक किंवा दुय्यम ठरतात, हे दुर्दैवच.

टिस्का चोप्रा कांतच्या पत्नीची तिय्यम भूमिकेत मर्यादित दिसते आणि त्यामुळे विस्मृतीत जागा मिळवते.

इन्स्पेक्टर सुधाकर झेंडे, ज्यांनी प्रत्यक्षात चार्ल्सला गोव्यात जाऊन पकडून मुंबईला आणलं होतं, 'नंदू माधव' ह्यांनी साकारला आहे. अजून एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर, ज्याला कुठे तरी बहुतेक ह्याची जाणीव असते की त्याने चार्ल्सला पकडलेलं नसून, चार्ल्सने स्वत:च स्वत:ला पकडवलं आहे, त्यांनी सफाईने साकारला आहे. 'चार्ल्स'सोबतच्या त्यांच्या अनेक नजरानजर त्यांनी आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी समजून अक्षरश: जिंकल्या आहेत.

आजकालच्या बहुतांश चित्रपटांप्रमाणे, संगीत कुठलेही मूल्यवर्धन करत नाही. उलटपक्षी पार्श्वसंगीत अधूनमधून त्रासच देतं.

कथा-पटकथालेखन (प्रवाल रामन) बहुतेक जिकिरीचं होतं. कारण २ तासांत चार्ल्सची पूर्ण कहाणी सांगणं अशक्यच असावं. त्याचं आयुष्य खरोखर इतक्या नाट्यमयतेने भरलेलं आहे, म्हणूनच तर त्याने त्याचे हक्क विकण्यासाठी भरमसाठ बोली लावली आहे ! कदाचित हा विषय दोन-तीन भागांत सांगण्याचा असावा. तरी थोडा सुटसुटीतपणा असता, तर आणखी मजा आली असती, हे मात्र नक्कीच.
काही संवाद चुरचुरीत आहेत आणि एकंदरीतच जितके ऐकू येतात तितके सगळेच लक्षवेधक आहेतच ! ह्यासाठी रामन ह्यांचं अभिनंदन !

main-aur-charles-poster.jpg

एकंदरीत, 'मैं और चार्ल्स' हा काही एन्टरटेनर नाही. हा चित्रपट प्रायोगिकतेच्या सीमारेषेवर 'मुख्य धारा' व 'डॉक्युमेंटरी' ह्यांच्यात 'सी-सॉ' खेळतो. ही खेळ जे एन्जॉय करू शकतात, त्यांना चित्रपट पाहवतो. बाकी लोक मात्र, दुर्दैवाने 'The End' ची वाट पाहत बसतात. कारण ह्या चित्रपटाच्या अंधारात कहाणीचा गुंता सोडवणं कठीणच आहे !

रेटिंग - * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-main-aur-charles.html
हे परीक्षण ०१ नोव्हेंबर २०१५ च्या दै. मी मराठी लाईव्ह मध्ये प्रकाशित झाले आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार्ल्स सोभराजने गाजवलेले दिवस माझ्या चांगल्याच लक्षात आहेत. गोव्याला ज्या हॉटेलमधे त्याला पकडले तिथे त्याचा पुतळाही आहे. हा चित्रपट बघायला हवा.

याच कथाभागावर किंवा त्याच्या अटकेवर, लोकसत्ताच्या तात्कालीन संपादकांनी एक नाटकही लिहिले होते पण त्यावरही ते अपूर्ण आहे, अशीच प्रतिक्रिया आली होती. ते फारसे चाललेही नाही.

ह्म्म्म.. परिक्षणातही फारसे काही हाती लागले नाही. Happy

चार्ल्सला गोव्यात पकडणारे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे. चार्ल्सने स्वतःच पकडवुन घेतले हे माहित नव्हते. तेव्हा झेंड्यांचा खुप गौरव झाला होता. अर्थात त्याने जरी स्वतःच स्वतःला पकडवुन घेतले असले तरी झेंड्यांची कामगीरी कमी होत नाही. त्यांनी पुस्तकही लिहिलेय बहुतेक यावर.

Does this movie has any reference to Madhukar Zende era? or it is based on only Amod Kant Version?

सगळंच कसं माहित असेल? Uhoh
मला ही चार्ल्स शोभराज हे नाव फक्त ऐकून माहित आहे. लहानपणी मी पेपर अथ पासून इतीपर्यंत वाचत असे तरिही त्यात कोणतीही बातमी वाचल्याचं आठवत नाही.

मला ही लहानपणी या नावाबद्दल फार चर्चा व्हायची ते आठवतआहे पण फारसे डिटेल्स आठवत नाहेत.

याचा चेहरा चार्ल्स शोभराजशी किती मिळता जुळता आहे, हे चित्रपट पाहताना जाणवतं. अर्थात, त्याचा मेक अप व गेट अप त्याला हुबेहूब 'चार्ल्स' बनवतो, पण मूळ चेहराही बऱ्यापैकी साम्य सांगणारा आहे. >>>
ट्रेलर आणि फोटोज पहाताना जाणवतं ही . रणदीप हूडा आवडतो त्यामुळे बघणार .

रीया - तुम्हाला अरुण गवळी माहीत नसतात, शोभराज माहीत नसतो. हे असे कसे हो अरेरे

अ.ग., चा. सो. वगैरे मंडळी जेव्हा पेपरात गाजत होती तेव्हा रिया वगैरे मंडळी एकतर जन्माला आली नव्हती किंवा आली तरी रांगत होती. अजुन तिस वर्षांनी याकुब मेमन वर चित्रपट आला तर तुमच्या मुलांना याकुब मेमन कोण माहित नसेल.

आणि जेव्हा रिया वगैरे लोक पेपर वाचु लागले तोपर्यंत पत्रकारितेनेच वेगळे रुप धारण केलेले. आता सगळुया पेपरात एकच हिरो किन्वा विलन नसतो तर पेपर मालकाची जी विचारसरणी आहे त्याप्रमाणे कुठल्या बातम्या छापायच्या किंवा कुठल्या गाळायच्या हे ठरते, एकच व्यक्ती हिरो म्हणुन एका पेपरात छापुन येते तर विलन म्हणुन दुस-या पेपरात. असो.

रीया - तुम्हाला अरुण गवळी माहीत नसतात, शोभराज माहीत नसतो. हे असे कसे हो अरेरे
>>>
साधना +१
अरुण गवळी ऐकून माहीत आहे . तो म्हणजे डॅडी हे माहीत नव्हतं
माझ्या आयुष्यात त्यांपेक्षा महत्वाची मंडळी असल्याने मला नाहीत हो माहिती ही मंडळी. माफ करा.
मला इंद्राणी मुखर्जी बद्दल विचारा बरं मी नक्की सांगेन. माझ्या मुलांना ती मोठी झाल्यावर विचाराल तर त्यांना इंद्राणीबद्दल माहीत नसेल कारण एकतर ती आत्ता जन्मलेली नाहीत आणि जन्मतील तेंव्हा मी इंद्राणी मुखर्जीपेक्षा राणी मुखर्जी, प्रणव मुखर्जी, जतिंद्रनाथ मुखर्जी यांच्याबद्दल माहीती सांगेन...इंद्राणी बद्दल नाही. अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट!

कोणत्या काळात होता हा शोभराज?
गूगलवर हे दिसलं - Date apprehended: July 1976
या काळात आमच्या जन्माचं प्लॅनिंगपण झालेलं नसावं कारण तेंव्हा माझ्या आई बाबांचं लग्नही झालेलं नव्हतं Proud

रिया.. +१ Biggrin

१९७६ नंतर १० वर्षांनी सुद्धा आपल्या जन्माचं प्लानिंग झालेलं नव्हतं रिया. आहेस कुठे? Lol

Bgh ki :D

पाहायचा आहेचं हा चित्रपट. तुम्ही लिहिलेलं परिक्षण आवडलं. चित्रपटाच्या सगळ्या बाजूंचा छान आढावा घेतला आहे.

"हा चित्रपट पहिल्यांदा बघतानाच दुसऱ्यांदा पाहिला पाहिजे. नाही तर दुसऱ्यांदा बघूनही पहिल्यांदा पाहिल्यासारखा वाटेल. म्हणजे, तो बघण्यापूर्वी चार्ल्सविषयीची माहिती असणं आवश्यक आहे आणि तिला एक उजळणी देणंही. ही एक परीक्षा आहे ".>>>> हे वाचताना आठवलं की प्रवाल रामन आणि रणदीप हूडा दोघांनी या चित्रपटाच्या एका प्रमोशनल इंटरव्यू मधे सांगितलेलं होतं की या चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना स्पून फिडिंग नाहियं कारण त्यांच्या मते प्रेक्षक हुशार असतात Happy

ज्या गोष्टींसाठी चित्रपट पाहायचायं त्या म्हणजे प्रवाल रामन यांचं दिग्दर्शन, रणदीप हूडाचा चार्ल्स आणि आदिल हुसेन !
प्रवाल रामन यांचा '404' चित्रपट आवडलेला .खूपच चांगला सायकोसोमॅटिक थ्रिलर होता तो.

शोभराजचं तुरूंगातून पलायन ही बातमीवर लहानपणी ऐकलेली चर्चा मला अजुन आठवते. त्याने काहीतरी विषारी मिठाई वाटली अन मग ड्यूटी ऑफिसरचा गणवेश घालून, जिप मधुन ताठ मानेने, एक हात बाहेर काढून पळून गेला होता..(चुभुदेघे)

>> या काळात आमच्या जन्माचं प्लॅनिंगपण झालेलं नसावं कारण तेंव्हा माझ्या आई बाबांचं लग्नही झालेलं नव्हतं <<

नो ऑफेन्स इन्टेन्डेड.
पण, माझ्याही जन्माचं प्लॅनिंग झालेलं नव्हतं. माझ्याही आई-वडिलांचं लग्न १९७६ नंतरचं आहे. जन्म झाला नव्हता, म्हणून नावही ऐकलेलं नसणं ही काही चांगली गोष्ट नाही. कारण शोभराज हा काही कुणी साधा-सुधा गुन्हेगार नव्हता. आमोद कांत ह्यांनी अनेक हाय प्रोफाईल केसेस हाताळल्या आहेत. पण आजही ते शोभराजविषयी काय बोलतात, हे गुगल करून पाहावे. प्रश्न चांगला किंवा वाईटाचा नाही. 'प्रॉमिनन्स'चा आहे. तो प्रॉमिनन्ट होता आणि त्यामुळे त्याविषयी माहिती असायला हवी.
अर्थात, ती नाही म्हणजे खूप काही वाईट झालं असंही नाही. कारण अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात. मात्र जेव्हा अशी एखादी महत्वाची व्यक्ती, घटना आपल्याला माहित नाही, असं समजतं; तेव्हा त्याविषयी लगोलग अधिकाधिक माहिती मिळवून स्वत:ला अपडेट व अपग्रेड करत राहणं महत्वाचं.

नो ऑफेन्स इन्टेन्डेड.

सगळंच कसं माहित असेल? >>>>>>>>

अहो सगळेच माहिती असेल असे वाटतच नाही, पण प्रत्येक क्षेत्रात बर्‍यावाईट पद्धतीने प्रसिद्ध असणारी अगदी थोडी लोक असतात, त्यांची नावे लोकांना ऐकुन तरी माहीती असतातच. हिंदी सिनेमा माहीती आहे पण शारुख माहीती नाही असे होते का?
मुंबईच्या गँग चा विषय आल्यावर दाऊद आणि अरुण गवळी ह्यांची नावे माहीती सर्वात पुढे असणारच ना. तसेच शोभराज हा गेल्या काही दशकात ला अतिप्रसिद्ध गुन्हेगार होता.

या काळात आमच्या जन्माचं प्लॅनिंगपण झालेलं नसावं कारण तेंव्हा माझ्या आई बाबांचं लग्नही झालेलं नव्हतं>> ह्याच लॉजिक ने नेहरु, सावरकर, टिळक, हिटलर, चर्चिल, सैगल, रफी, राजकपूर, ध्यानचंद माहीती असायचे काही कारण नाही.

ह्याच लॉजिक ने नेहरु, सावरकर, टिळक, हिटलर, चर्चिल,>>>>>>>>>> ऑ?? शाळेत अरुण गवळीचा धडा होता हे माहीत नव्हतं. आणि बाकीचे - सैगल, रफी, राजकपूर, इइ. घरातील मोठ्या माण्सांमुळे- टीव्ही मुळे कळतात. अरुन गवळीबद्दल मोठी माणसे खास काही सांगतील असं वाटत नाही. आणि रीया जर का मुंबैइत असती तर समजु शकतो पण ती पुण्यात असल्याने अरुन गवळीबद्दल ची क्रेझ , दगडी चाळ हे माहीत नसणं शक्य आहे.

अरुण गवळी किरकोळ होता. तो मुंबईकरांना नक्कीच माहित आहे. पण शोभराज ग्लोबल होता. दोघांत जाम फरक आहे.

आमोद कांत -
"I have never come across a character as dirty as Charles in my life; he was such a tedious character. I have handled cases such as the Jessica Lall case, the Rajiv Gandhi assassination, the BMW case, the Lalit Maken case, the Harshad Mehta case and many others. I have come across many difficult characters during my service, but I have not come across a more intriguing character than Charles."

http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Ra...

माहित नव्हतं हे ठिक आहे पण आता गूगल आहे. माहिती करून घेत जावी!!

चित्रपट हूडासाठी पहावासा वाटतोय.