दु:ख

Submitted by भुईकमळ on 29 October, 2015 - 08:26

आला अंगणात
प्राजक्ताला पूर ,
दरवळे सूर
विरहाचा ...

झुरे धुसरात
मंद दीपमाळ
तशी मुकी कळ
कवितेत...

सखीने चोरली
बाभळी पैंजणे
काट्यांचे उखाणे
पावलांना ...

अदृष्टाची कीड
रांगते रक्तात
दु:ख पदरात
तान्हुलेसे ...

भोळ्या सावरीला
कोण लावी पिसे
प्राण हल्लकसे
रानोमाळ...

सासरी जाताना
नको डोळा पाणी
झडूदे कहाणी
पळसाची ...
...........माणिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users