हंबरडा

Submitted by संतोष वाटपाडे on 29 October, 2015 - 00:33

फ़ोटोस टांगली माळ,
दिव्याचा जाळ,बोडके भाळ,लेकरे तान्ही..
जोडली तुझ्याशी नाळ,
सरकता काळ,तसा सांभाळ,करावा कोणी..
नांदलो उपाशी जरी,
आपल्या घरी,दुखवटा तरी,पाहिला नाही..
झोपला आज तू कसा,
सांग राजसा,तुला भरवसा,राहिला नाही॥

पांढर्‍या कपाळी खोक,
थांबले लोक,सावरु झोक,कुणाच्या साठी..
अर्ध्यात सोडुनी हात,
विझवली वात,तोडल्या सात,शेवटी गाठी..
मारते कधीची हाक,
ऐकुनी झाक,कोरडेठाक,राजसा डोळे..
हंबरे बिचारी माय,
चोळते पाय,मागती काय,पोटचे गोळे ॥

दुःखात शेत रापले,
रान तापले,पाय कापले,हारलो नाही..
खाण्यास नसे भाकरी,
सदा चाकरी,स्वतःच्या घरी,थांबलो नाही..
येतील सुखाचे दिवस,
बोलले नवस,संपली अवस,ढोरकामाची..
तोडलास का विश्वास,
घेतला फ़ास,सांग ही साथ,काय कामाची ॥

ऊठ रे ऊठ राजसा,
कोरडा घसा,आवरु कसा,हुंदका येई..
खुंटली एक कंठात,
हाक ओठात,जोडते हात,पिलांची आई॥

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह Sad

बापारे!
योगायोग म्हणू की काय?
आज सकाळीच आपली रचना 'आकांत'...पेटली दिव्याची वात जाहली रात कधीची काळी...वाचनात आली,आणि आता हा 'हंबरडा'!
त्यात भरीस भर म्हणून की काय,बेफिजी आणि निशिकांतजीनी नेमक्या याच विषयावर,आजच रचना पोस्ट केल्या आहेत!
सर्वांनीच वास्तव व्यथा अत्यंत बोलती...सलती अशी मांडली आहे! त्याबद्दल आभार!
धन्यवाद!

बापरे Sad
फारच वाईट हो.
आपण त्यांच्या करता फारस काही करू शकत नाही याच फार वाईट वाटत राव ! Sad