झोंबाड

Submitted by जव्हेरगंज on 28 October, 2015 - 19:09

आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला.

शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं.
"आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो. आणि अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो.

कोपऱ्यात धुणं ठेऊन शेलामायनं ऊदबत्ती पेटवली. देव्हाऱ्याच्या पुढं केळात खोचली. हाळदी कुकु लावुन फुलं ऊधळत निवद दाखवला. भक्तिभावानं होत जोडत माथा टेकवला. आभाळ फाटलं तरी शेलामायची रोजची पुजा कधी चुकली नाही. सकाळ संध्याकाळ तिचा पुजेचा कार्यक्रम ठरलेला. रुकडीआयची ती निस्सीम भक्त होती. घराम्हागं शेताच्या तुकड्यात एक छोटसं देऊळही तिनं बांधुन घेतलेलं. गळ्यात कवडीच्या माळा घालुन, सणावाराला परडी घेऊन घरोघरी ती जोगवाही मागायची.

चुल पेटवुन शेलामाय धुराड्यात सैपाक करत बसली. रुपीनं काटकुटं ऊचलुन तिच्याम्होरं सरपानाला ठिवलं. तिचं पांढरफटक कपाळ बघुन शेलामायला पुन्हा एकदा कससचं झालं. बाहेर पावसाचा जोर वाढला.
कंदिलाच्या मिनमीनत्या ऊजेडात रुपी भिताडाला टेकुन शुन्यात नजर लावुन बसली. अडीत-तीन वर्षाखाली तिचं लगीन झालेलं. पण आठवड्याभरातच नवरा खपलेला. तिला नवऱ्याचा चेहराही नीटसा आठवत नव्हता. त्याला नेमका कोणता रोग होता हे ही तिला नाही समजलं. पण तेव्हापासुन गोऱ्यागोमट्या रुपीचं काळं दिवस सुरु झालेलं. पुढं नुसताच अंधार वाढुन ठेवलेला. तिनं एकटक कुठेतरी बघत बसनं नित्याचचं झालं होतं.

"हाय का शेलामाय घरात?" दार ऊघडुन भाऊसाहेब आत आला. तशी रुपीची तंद्री भंगली.
"कोण भावसाब हायतं का?, या की" कंदिल ऊचलुन शेलामाय दरवाज्याकडं बघत नीट न्याहाळत म्हणाली.
"व्हय मीच हाय, जेवन झालं का रुपे?"
"न्हाय आजुन व्हय चय" रुपी खोल आवाजात बोलली. त्याचे तांबरलेले डोळे आणि हातातली बाटली तिच्या नजरेतुन सुटली नाही.
भाऊसाहेबनं आत येऊन टावेलानं डोकं पुसलं. दुसऱ्या खोलीत जाऊन कापडं पण बदलली. मग तिथच खाटंवर त्यानं ताणुन दिली.
शेलामायनं त्याला 'जेवायचं का?' म्हणुन पण विचारलं नाही. 'येवढ्या रात्री कसं आला?' हे पण विचारलं नाही. रुपीनं पण जास्त विचार केला नाही. भाऊसाहेब हा शेलामायच्या माहेरी नेहमी ऊठबस असणारा महत्वाचा माणुस. आपल्या लग्नाअगोदर ईकडं घरी नेहमी यायचा. नान्याला खेळवत बसायचा, फटफटीवरनं गावात फिरवुन आणायचा. पण आपलं हे असं झाल्यापासुन त्याचं घरी येणं जवळपास बंदच झालं होतं. आज तो बऱ्याच दिवसांतुन आला होता. ते पण येवढ्या रात्री. मुक्काम तर त्यानं आजपर्यंत कधीच केलेला न्हवता. रुपी विचारात हरवली.

"जेवुन घी गं पोरे, आन आज पलिकडच्या खुलीत झोप, भावसाब झोपल्यातं खाटंवरं" शेलामायचा सैपाक अजुन झालाही न्हवता. पण रुपीला तिनं गळ घातली.

जेवण ऊरकुन रुपीनं माजघरात अंधरुन टाकलं. हे माजघर अगदी छोटसं. तिथं बरच जुनं सामान रेचुन ठेवलेलं. घरात कोणीही पाहुणे आले तर रुपीची ही खोली ठरलेली. एरव्ही ती घरात खाटेवरच झोपायची.
मिट्ट अंधारात रुपी पावसाची रिपरीप ऐकत पडली. माजघरातली ईकनं बघुन तिला तिचा बाप आठवायचा. आठ दहा वर्षापुर्वी तिचा बाप वारीला गेला होता. टाळ, मृदुंग आणि किर्तनात त्याचा जीव हरपला. घरी आला तो देवाचा नाद घेऊनच. मग पुन्हा वनवासाला गेला. तिथनं आल्यावर दाढ्या वाढवुन, कपाळावर भगवा लावुन, गळ्यात माळा घालुन गावोगावी फिरत राहिला. मग त्याचं घरी येणं बंदच झालं. रुपीला त्याचाही चेहरा काहीकेल्या आठवेना.

बारका भाऊ नान्या घरी असल्यावर तिचा जीव रमायचा. मात्र तोही आता आजोळी गेला होता. नाही म्हणायला तिचा एक वर्गमित्र बाब्या जो पवाराच्या वस्तीत राहायचा तो अधुन मधुन तिचे हालहवाल विचारायचा. एरव्ही तिच्याशी बोलायला कुणीच नसायचं. घरात मायलेकी तरी किती बोलणार. रुपीचे दिवस असे हे मुकाट होत चाललेले.

घरात एकटी पडल्यावर भुतकाळातला सारा पट तिच्यासमोर ऊलगडत जायचा. रात्री तिला लवकर झोपही यायची न्हाय. मग जुन्या आठवणींना कुरवाळत ती पडुन राहायची. त्यात तिला मौज ही वाटायची. पण आज येवढ्या पावसात अवेळी आलेला भाऊसाहेब तिच्यासाठी एक भलमोठ्ठं प्रश्नचिन्हं घेऊन आला होता. ऊघड्या दरवाज्यातुन बाहेर कोसळणारा पाऊस बघत ती हा गुंता सोडवत बसली.

आधी हा भाऊसाहेब जेव्हा कधी यायचा, तेव्हा ऐण दुपारी दाराला आतुन कडी घालुन घरात झोपायचा. आपल्याला हे नवीन नव्हतं, पण शेलामायही कुठे नजरेस पडत नसायची तेव्हा आपला जीव खालीवर व्हायचा. मग बारक्या नान्याला खेळवत आपण गोठ्यातच बसायचो. ही आठवण खुपच जुनी. म्हणजे शेलामाय आणि भाऊसाहेब यांचं काही शिजत तर नसेल.
बाहेर पावसाचा जोर अजुनच वाढला. पण येवढ्या धुवाधार पावसात आणि वाऱ्याच्या घोंघाटात पलिकडच्या खोलीतुन आलेली बांगड्याची किणकीण, हपापलेले श्वास, आणि पायांची धुसमुस तिच्या कानात शिरत गेली. रुपीची रात्र अजुनच गडद होत गेली.

शेलामायनं तिला फसवलं होतं. शेलामाय ही एक निब्बर बाई होती. तिचा साजशृंगार बघुन गावकरी तिला नखरेल म्हणत. पण भांडखोर स्वभाव बघुन कोणाची तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची टाप होत नसे. रुपीला आपल्या आईचा अभिमान वाटायचा, पण आज तिनं सगळ्यालाच सुरुंग लावला होता. पलिकडुन येणाऱ्या हपापणाऱ्या श्वासांचा आवाज वाढतच चालला.

रुपीच्या रोमारोमात धुंदी चढत गेली. 'सुख' म्हणजे काय हे जिला समजलंही नव्हतं तिच्या बाजुलाच ते ऊपभोगलं जात होतं. शरीरात पेटलेली धग तिला सहन होईना. मग माजघरातनं ऊठुन ती बाहेर मोकळ्या अंगणात आली. गडद अंधारात एका दगडावर बसुन ती चिंब भिजत राहिली. याआधीही जेव्हा जेव्हा तिचं शरीर बंड पुकारायचं, तेव्हा ती पावसात भिजत राहायची.
पाऊस तिला आवडायचा, कारण पावसात तिचा निचरा व्हायचा.

भान हरपुन रुपी तशीच बसुन राहीली. प्रश्न असा होता की शेलामायनं आजपर्यंत लपवुन ठेवलेलं गुपित आज आपल्यापुढं का फोडलं?. शेलामाय खरचं नखरेल बदनाम बाई होती का? नवरा घरातुन निघुन गेल्यावरही तिचं फारसं बिघडलं न्हवतं.

घरामागच्या शेताच्या तुकड्यावरही पाटील नजर लावुन बसला होता. पण उलट तिनंच त्याच्याशी जमीनीचा सौदा सुरु केला. पाटीलही व्यवहार करायला घरी येत राहिला. पण शेलामाय त्याला खेळवत राहिली. शेतीची नांगरणी, पेरणी, खुरपणी सगळं त्याच्याकडुनचं करुन घेतलं. शेतीही ताब्यात राहिली, आणि पाटलासारख्या रांगड्या गड्याला अंगावरही घेत गेली. हा पाटीलही नंतर देशोधडीला लागला.

नवरा निघुन गेला म्हणुन शेलामायनं कधी दु:ख नाही केलं. संसाराचं वाटोळं झालं म्हणुन रडत भेकत बसली नाही. कमरेला पदर खोचुन संसाराचा गाडा दिमाखानं ओढत राहिली. गरीबीची कुठलीही धग आपल्या मुलांना जाणवु दिली नाही. पाहिजे तेव्हा नव्या गड्याला जवळ करत गेली, पाहिजे तेव्हा त्यांच्याशी मनासारखं खेळत राहिली.
कठोर परीस्थितीत शेलामाय आपल्या मर्जीनं जीवन जगत राहिली.

रूपीनं विचार करतचं राहिली. तिच्या बोडक्या जिवनात कुठुनसा येणारा एक अंधुकसा किरण दिसायला लागला. आपण आपल्या वैधव्याचं दु:ख करत किती बसायचं. जीर्ण कापड नेसुन रडत कुजत आयुष्य घालवत लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा किती झेलायच्या. आता या सहानुभूतीवर थुंकायलाच हवे. आपणही आता निलाजरेपणाने जगायलाच हवे. आपल्याही शरीरात आग आहे, आणि ती आपल्या मर्जीनं भागवण्याचा अधिकार आपल्याला आहे. ताठ मानेनं जगत, पाहिजे त्याच्याशी खेळत, मनसोक्त जगण्याची मजा आपणाला अनुभवायलाच हवी. ऊद्याच्या बदनामीला आजची जिंदगी ओवाळुन टाकायलाच हवी. भले कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्या. आयुष्यात चढउतार येणारचं, पण म्हणुन आजचा क्षणिक ऊपभोग तरी का सोडायचा. आज शेलामायनं कळत नकळत तिला एक धडा घालुन दिला होता.

समोरच्या वस्तीतला बाब्या आशाळभुत नजरेने आपल्याकडे बघतो. त्याच्या नजरा आपल्याला कळतचं नाही असं नाही. भर दुपारी उघड्याबंब शरीराने आपल्याकडे बघत राहतो. ऊद्या दुपारी जेव्हा घरी तो एकटाच असतो, तेव्हा त्याच्याकडे जायलाच हवे. रुपी खुदकन गालात हसली. तिला आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं.

पाऊसही आता ऊघडत चालला. पहाटेच्या गारठ्यात तिचा चेहरा टवटवीत झाला. मघापासुन हाताला झोंबणारे जास्वंदाचे एक चिंबाट फुल तिनं हलकेच तोडले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मित्रांनो!

कथेच्या नावाचा अर्थ काय ?>>>>>>>>

झोंबाड = भांडण , हाणामारी, युद्ध ( विचारांचं युद्ध या अर्थाने )

Happy

लेखनाची शैली जबरदस्त आहे तुमची. वर्णनातून पाऊस वाजायला लागला होता कानात. सगळी पात्र अक्षरशः जिवंत होतात. गोष्ट समोर घडायला लागते.
सुरेख! पुलेशु.. Happy

Mastach

Mastach

मस्त जमलिये...आवडेश..
पुलेशु..

तुमच्या सगळ्याच कथा वाचतीये. तुमच्या लेखनाला असलेला 'रीजनल' टच सॉलीड 'ओरीजनल' आहे.
माझ्यासाठी तुमच्या कथा कोणत्या अंगाने जातात, त्याचा शेवट काय होतो ह्या पेक्षा त्यात वापरलेले शब्द, घटना वर्णन करायची शैली हा 'एक्स-फॅक्टर' आहे. त्यामुळे कथेचं पुढं काय होणार ह्याचा अंदाज आला तर ते कोणत्या शब्दांत मांडलंय ह्यातली 'अनप्रेडीक्टेबीलीटी' मजा आणते. 'रीजनल' भाषेची कीक काही वेगळीच...ह्या कथेत झोंबाड, चिंबाट, खेळवाय मिळणार ह्या शब्दांनी मजा आणलीये... मस्त Happy

मस्त. मला आवडतात तुमच्या सगळ्याच कथा. छोट्याशाच असल्या तरी तुमची वातावरण आणि पात्र निर्मिती भारी असते!

>> मला आवडतात तुमच्या सगळ्याच कथा. छोट्याशाच असल्या तरी तुमची वातावरण आणि पात्र निर्मिती भारी असते!>> सहमत. पान पानभर लिहिण्याची काही गरजच नसते.

पान पानभर लिहिण्याची काही गरजच नसते. >> हा इथल्या चर्चेचा मुद्दा नाही. पण हे स्टेटमेंट खूपच जनरलाईझ्ड आणि बोल्ड आहे.
प्रत्येक लेखकाची आपली एक स्टाईल असते. काही कमी शब्दांत लिहितात, काही चॅप्टरच्या चॅप्टर वर्णन करात.
अनेक मराठी, नॉन मराठी, भारतीय, नॉन-भारतीय क्लासीक गणले गेलेल्या, आणि नसलेल्या देखील कथा-कादंबर्‍यांमधे पानंच्या पानं वर्णन केलेली असतात, आणि ती वाचलीही जातात आणि आवडतातही Happy

रार्, जनरलाईज्ड स्टेटमेंट करायचा उद्देश नव्हता पण तसं झालेलं असू शकतंच अनवधानाने. मला 'शॉर्ट अँड स्वीट' इतकंच अभिप्रेत होतं. जव्हेरगंज यांच्या आत्तापर्यंत वाचलेल्या गोष्टींना तशी गरज वाटली नाही.
पानंच्या पानं वर्णन केलेल्या कादंबर्‍या भारतीय्/नॉन भारतीय मी ही वाचलेल्या आहेत. ती त्या कथेची डिमांड असूही शकेल. मला स्वतःला शब्दबंबाळ लेखन वाचायला आवडतं की नाही हा वेगळा मुद्दा आहे. तेव्हा असो.

Pages