तळ्याकाठच झाड

Submitted by भुईकमळ on 27 October, 2015 - 10:10

काय पहात असेल झाड दिवस रात्र पाण्यात
की जाणवत असेल त्याला
शेवाळाच्या पडद्यामागची
लवलवती मासोळी लगबग
उमटत असेल का तेव्हा त्याच्याही रंध्रांतून
स्पर्शाची नाजुक हुळहूळ
जेव्हा मुंग्यांची रांग सरकते हळुहळू
त्याच्या पानमोकळ्या अंगावरून …

झाड शोधत असेल का
पाण्यातील केशरचिंब मेघाकारात
मनातलीच उन्मनी चैतलिपी
म्हणूनच का जळी लहरतात
त्याच्या पर्णहीन फांद्या
उसने सांजफ़ुलोरे लपेटत भोवती …

की दिसत असेल त्यास
कुण्याकाळीचं अंधुकस ,
रात्रतळ्यात जाताना बुडून .
कधी किलबिलते दिवसही उगवलेले
त्याच्या पर्णगच्च अंगांगातून ! .

......................माणिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users