बॉयहूड - इंग्रजी चित्रपट

Submitted by दिनेश. on 25 October, 2015 - 17:44

बॉयहूड.. गेल्या वर्षीचा एक चित्रपट.
या चित्रपटाची कथाकल्पना ऐकल्यापासूनच मला हा बघायचा होता.
रिचर्ड लिंकलेटरची हि कल्पनाच मूळात विलक्षण होती आणि ती त्याने प्रत्यक्षात आणली, हे त्याहून विलक्षण आहे.
हा चित्रपट तब्बल बारा वर्षे निर्मितीअवस्थेत होता आणि तो इतर कुठल्याही कारणासाठी नव्हे तर तिच त्या कथेची मागणी होती.

हि कथा आहे मेसन ( एलार कोल्ट्रेन ) या मुलाची, किंवा त्यापेक्षा त्याच्या वयात येण्याची. प्रत्यक्ष एलार सात वर्षाचा असल्यापासून तो अठरा वर्षाचा होईपर्यंतची हि कथा. आणि ती त्याच्याच त्या त्या वयात चित्रीत झालीय. लिंकलेटरने केवळ कथाकल्पना मनात योजली होती आणि शेवटच्या सीनची निश्चिती केली होती. बाकी कथा जसजसे चित्रीकरण होत गेले तसतशी रचलीय. दरवर्षी काही दिवस चित्रीकरण करण्यात आले आणि एक एकसंध
चित्रपट निर्माण झाला.

मी कथा म्हणतोय खरा, पण या चित्रपटाला तशी कथा नाहीच. वर लिहिल्याप्रमाणे त्याचे वयात येणे, आणि ती प्रक्रिया हिच कथा. या बारा वर्षात त्याचे आयूष्य काही सरळमार्गाने जात नाही. किंबहुना काहीच सुरळीत चाललेले नाही. पण तरीही काळ थांबत नाही, मेसन मोठा होत राहतोच.

सुरवातीला आपण बघतो ते, मेसन आणि त्याची बहिण सामंथा ( लोरेलेई लिंकलेटर, दिग्दर्शकाची मुलगी ) त्यांच्या आईसोबत ( अप्रतिम, ऑस्कर विजेत्या भुमिकेत पॅट्रीशिया आर्के ) रहात असतात. त्यांचे बाबा ( एथन हॉक ) वेगळे राहतात तरी मुलांना भेटायला येत असतात. मुलांशी त्यांचे फारच मैत्रीपुर्ण संबंध आहेत पण सध्या त्यांचे आयुष्य भरकटलेले आहे. नोकरी नाही. दोन्ही मुलांची जबाबदारी आईवर आहे.

आईला शिक्षण पुर्ण करून, नोकरी करणे भाग आहे. त्यामूळे ती आपल्या आईच्या शहरात जायचे ठरवते, कारण मुलांकडे आजी बघेल व तिला आपले शिक्षण पुर्ण करता येईल. त्या दरम्यान ती आपल्या प्रोफेसरशी लग्न करते. त्याची दोन मुले व मेसन आणि सामंथा छान रुळतात, तेवढ्यात कळते कि प्रोफेसर साहेबांना दारुचे व्यसन आहेत. परत ते वेगळे होतात. मग आई आणखी एक लग्न करते, तेही मोडते... पण या सगळ्यात मेसन आणि सामंथा मोठे होत असतात आणि आइचे त्यांच्यावर बारीक लक्ष असते.

दोघांचे बाबाही त्यांना नियमित भेटायला येत असतात आणि तेही एका मुलीशी लग्न करतात. ती मुलगी आणि तिचे आईबाबा स्वभावाने फार चांगले असतात आणि मेसन आणि सामंथा यांच्याशी छान नाते जोडतात.

या दोघांचे शिक्षण चालू असते. अमेरिकेत तरुणांच्या जीवनात येणार्‍या गोष्टी म्हणजे डेटींग, नशीले पदार्थ, सेक्स
या सगळ्यातून ते जातात तरी आपले शिक्षण पूर्ण करतात, आणि एका अत्यंत सुरेल वळणावर चित्रपट संपतो.

मी सर्व कथा जरी लिहिली असली तरी त्यातून या चित्रपटाबद्दल फारसा बोध होणार नाही, कारण याचे बलस्थान आहे ते त्याच्या हाताळणीत. आणि यातल्या प्रत्येक प्रसंगाशी, संवादाशी मी रिलेट होऊ शकलो.

आणि मला वाटतं, वयात आलेले, वयात येणारे, वयात येणार्‍या मुलामुलींना बघणारे असे सर्वच हा अनुभव घेऊ शकतात. याचे चित्रीकरण त्या त्या काळात झालेय हे वर लिहिलेच आहे, पण त्यात घाईगर्दी नाही. प्रत्येक टप्प्यावरचा एक महत्वाचा प्रसंग आपल्यासमोर सलग सादर होतो. आणि याच कारणासाठी मी या चित्रपटाशी
रिलेट झालो. कारण मी माझ्या कुटुंबापासून बरीच वर्षे दूर आहे. माझे जाणे होते ते वर्षभराने. त्या दिवसातच
मला माझी मानसकन्या आणि लेकच नव्हे तर भाचरे, मावस मामे भावंडे, पुतण्या वगैरे भेटतात. प्रत्येक भेटीत त्यांच्यात झालेला बदल मला जाणवतो. आणि त्यांचे मोठे होणे मला स्वीकारणे अवघड जाते कारण ते स्वीकारल्यावर, माझेही वाढते वय मला स्वीकारावेच लागते. असे द्वंद्व मी अनेक वर्षे अनुभवले. दोन्ही गोष्टींचा
स्वीकार करायला मी आताआताच शिकलो. खुपदा वाटले कि या सगळ्यांचे सानपण मी जपून ठेवायला हवे होते, पण ते कसे शक्य आहे ?. हे जपून ठेवणे म्हणजे काय ते या चित्रपटात कळते आणि तसा विचार करणे म्हणजे काळाला जखडून ठेवणे, आणि असा काळाला जखडता येत नाही, कारण काळानेच आपल्याला जखडलेल्र असते, असा एक सुंदर विचार, या चित्रपटाचा शेवट आपल्याला सांगतो.

सात वर्षे ते अठरा वर्षे या काळात मुलांत खुपच बदल होत जातात. विचारात आणि शरीरातही. सातव्या वर्षी गोंडस दिसणारी बाळे अठराव्या वर्षी रुबाबदार तरुणतरुणी होतात, पण मधला काही काळ असा असतो, ज्या काळात उंची वाढलेली असते, गालाची हाडे बाहेर येतात, चेहर्‍यावर मुरुमे येतात, आवाज फुटायला लागतो. आणि हेच सगळे या चित्रपटात आपण बघतो. आणि नकळत आपल्यात झालेले बदल आपण आठवू लागतो.

बहुतेक पुरुषांनी किती केस वाढलेत ते शोभतात का, मुलींसारखा काय चालतोस, जरा पुरुषासारखा वाग, तोंडातल्या तोंडात काय बोलतोस, नीट स्पष्ट बोलत जा, हि काय वेळ आहे घरी यायची, तूझी आई वाट बघतेय.. असे वाग्बाण, वाढत्या वयात झेललेले असतात. मेसन ते सर्व झेलतोच, आणि आपण सर्वांनी जसा त्रागा केलेला
असतो, तसा तोही करतोच. लहान वयात फक्त आईसमोर आणि मग मिसरुड फुटल्यावर थेट बाबांसमोर.

तरीही मेसन खुप लव्हेबल आहे कारण तो विचारी आहे. आईचे त्याच्यावर उत्तम संस्कार आहेत. खरकटी डिश तशीच टाकू नकोस, धुवून ठेव, असे आई सांगते तेव्हा तो ती धुतो. आपल्या पायावर ऊभे रहायचा प्रामाणिक
प्रयत्न करतो. त्याच्यातले पोटेन्शियल ओळखून त्याला उत्तम सल्ला देणारे लोक भेटतात. त्यांचे तो ऐकतो.
त्याच्या फोटोग्राफीला सिल्व्हर मेडल मिळाले म्हणून शिक्षिका त्याचे कौतूक करते, पण तरीही ते इतर नऊ जणांना मिळालेले आहे, या वास्तवाची त्याला जाण आहे. त्याचे पाय जमिनीवर आहेत.

खरे तर तो कुठे अभिनय करतोय असे वाटतच नाही. त्या त्या वयातला मुलगा त्या त्या वयात जसा वागेल, तसाच तो वागतो.

कथेच्या हाताळणीत दिग्दर्शकाने कुठेही स्पून फिडींग केलेले नाही, कुठेही कुठले वर्ष चालू आहे, मेसनचे वय काय आहे, असल्या पाट्या नाहीत ( पण चित्रपट कालानुक्रमेच आहे, कुठेही फ्लॅशबॅक नाही ) अचानक मेसन आपल्यासमोर वाढत्या वयात आणि वेगळ्या अवतारात येतो आणि प्रसंग पुढे चालू होतो. अरे हा काय तो मेसन, केवढा मोठा दिसतोय, असा विचार करायला आपल्याला फार अवधी मिळतही नाही.

एखादा अपवाद सोडला तर बहुतेक प्रसंग जेवढे त्याच्यासमोर घडले असतील असेच आहेत. त्याचा त्याने लावलेला अर्थ आपल्याला कळतो, पण प्रत्यक्ष काय घडले असेल याचे ज्ञान आपल्याला त्याच्या माध्यमातूनच होते. खरे तर हि एक चांगली बाब आहे कि फोकस कायम त्याच्यावरच आहे. पण अगदी काढायचीच म्हंटली तर एक खोट
जाणवते, कि त्याच्या बरोबरच मोठी होणारी त्याची बहिण सामंथा हिच्याकडे किंचीत दुर्लक्ष झालेय.

त्या दोघांच्या आईच्या भुमिकेतील पॅट्रिशिया बद्दल लिहावे तितके थोडेच. तिची भुमिकाही सुंदररित्या लिहिली
गेलीय. मुलांसाठी तिचे खपणे त्याच बरोबर आपल्या आयुष्याशी झगडणे हे तिने अप्रतिम रित्या दाखवलेय आणि तिचा शेवटचा ( चित्रपटातील ) प्रसंग तर प्रत्येक आईला भिडेल.

बाबांच्या भुमिकेतील एथन पण खुप लव्हेबल. अगदी शेवटपर्यंत तो मुलांशी उत्तम मैत्रीपुर्ण संबंध राखतो. तो कधीही खलनायक वाटत नाही, तरी त्याचे आणि आईचे का पटले नाही, असे मेसन जेव्हा विचारतो त्यावेळी
आपले काय चुकले हे प्रामाणिकपणे सांगतो. आपण केलेल्या चुका तूम्ही करू नका, असेही सांगतो.

काही काही प्रसंग तर इतके टची झालेत ना कि आपण तिथे आपल्यालाच कल्पू लागतो. वयात आलेल्या मुलीला
तो काय काळजी घ्यायची हे सांगतो तो प्रसंग, त्यात मुलीचे लाजणे आणि मेसनला ऑकवर्ड वाटणे, हे मला फार
भिडले.

खुपदा एखादा चित्रपट पिरियड फिल्म म्हणून निर्माण केला जातो त्यावेळी तो काळ ऊभा करण्यासाठी दिग्दर्शकाला खास प्रयत्न करावे लागतात आणि प्रेक्षक म्हणून आपणही त्यात काही चुका राहिल्यात का ते शोधत राहतो. इथे मात्र ते सर्व नैसर्गिकरित्याच घडलेय. कथेच्या ओघात हॅरी पॉटर, स्टार वॉर्स पासून ओबामाची निवडणूक, इराक वॉर हे संदर्भ आपसूक आणि अगदी सहज येतात. सर्वच भुमिकातले कलाकार कायम राखल्याने त्यांना त्या त्या वयाचे दाखवणेही अगदी सहज साध्य झालेय. कालानुसार घडलेल्या सुधारणा म्हणजे फोनपासून आयफोनपर्यंत, असेही सगळे सहजच आलेय.

सर्वच मोठ्या बहिणींना आपला लहान भाऊ मठ्ठ आणि वाबळट वाटतो तसाच सामंथालाही वाटतो. त्याला डोमिनेट करायची एकही संधी ती सोडत नाही. पहिल्या दोन प्रसंगात तर ढमाई प्रचंड आवडते, पण पुढे मात्र ती मागे पडल्यासारखी वाटते.

संवाद तर अगदी सहजसुंदर आहेत ( तेही इथे लिहायचा मोह होतोय.. पण आवरतो. )

अजून बघितला नसेल, तर आवर्जून बघाच.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुंदर, ओघवतं लिखाण. बघायला हवा हा चित्रपट. >>>>> अंजूतैंना पूर्ण अनुमोदन .... Happy

आभार, हा चित्रपट भारतात रिलीज झाला होता का याची कल्पना नाही. पण डिव्हीडी उपलब्ध आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांसोबत पहा. त्यापेक्षा लहान मुलांनी बघू नये असे काही नाही यात, पण त्या त्या अनुभवातून त्यांना स्वतःला जाऊ द्या, असे नक्कीच सांगेन.

वाह, दिनेशदा, किती सुंदर लिहिलेय ! वाचायला सुरुवात केली अन शेवटालाच थांबलो.

<< मी कथा म्हणतोय खरा, पण या चित्रपटाला तशी कथा नाहीच. वर लिहिल्याप्रमाणे त्याचे वयात येणे, आणि ती प्रक्रिया हिच कथा.>>

<< याच कारणासाठी मी या चित्रपटाशी रिलेट झालो. कारण मी माझ्या कुटुंबापासून बरीच वर्षे दूर आहे. माझे जाणे होते ते वर्षभराने. त्या दिवसातच मला माझी मानसकन्या आणि लेकच नव्हे तर भाचरे, मावस मामे भावंडे, पुतण्या वगैरे भेटतात. प्रत्येक भेटीत त्यांच्यात झालेला बदल मला जाणवतो. आणि त्यांचे मोठे होणे मला स्वीकारणे अवघड जाते कारण ते स्वीकारल्यावर, माझेही वाढते वय मला स्वीकारावेच लागते. असे द्वंद्व मी अनेक वर्षे अनुभवले.>>

<< ....... काही काही प्रसंग तर इतके टची झालेत ना कि आपण तिथे आपल्यालाच कल्पू लागतो.>>>
अगदी समर्पक !!!

सिनेमा नैसर्गिक व्हावा म्हणुन तब्बल बारा वर्षे चित्रिकरण करणे म्हंजे चित्रपट कलेशी अत्युच्च बांधिलकी !
काही लोकांची कला बांधिलकी बद्दल काय बोलावे ते कळत नाही ! शब्दातीत !

विशेष धन्यवाद, चेतन सुभाष गुगळे हा धागा मला आवर्जून मेल करुन पाठवल्याबद्दल !

परत आभार..

खरे तर यात "फॉर मेन ओन्ली" अश्या काही बाबी आहेत, पण ते सांगण्यात मजा नाही. प्रत्येक पुरुषाला त्या जाणवतील आणि मला खात्री आहे त्यांना आपल्या लहानपणातले "ते" क्षण आठवतील.

दिनेशदा, फारच सुंदर ओळख करून दिलीत या चित्र॑पटाची. आता हा पाहिला नाही तर आपण खूप काही मिस करू असच वाटतय.. नक्की बघणार. Happy

सुंदर परीचय दिलात, चित्रपट तुमच्या आत पोहोचलाय हे जाणवते लिखाणातून आणि तसेच ते आमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलात ..