तरसलं तन मन....

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 October, 2015 - 13:36

तरसल तन-मन...

आरं पावसा पावसा
तुज लहरी तंतर
पानी पानी काळजाचं
कदी कोरडा फत्तर !

आला म्हागच्याबारीला
पार धुडगुस केला
मह्या कपाळीचा टिळा
पिकासंगतीन नेला

त्याच्या वाड-वडीलाचं
भिडं आभाळा शिवारं
भाऊबन्दकीत काही
बाकी गिळं सावकार

रोडावलं सर्जा-राजा
वटीमंदी तान्ह प्वॉर
कशी आडोश्यान राहू
पार निखळल दारं

हाय मला सवयीच
प्वॉटा काडीन चिमटा
आटलेल्या पान्ह्यावर
कसा जगवू दिवटा ?

आरं पावसा पावसा
डोळा दाटू आल घनं
त्याच्याइन तुज्याइन
तरसल तन-मन

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा कवितेला खुप छान / सुंदर कसं म्हणावं हा मला खरं तर प्रश्न पडला होता.
हृदयस्पर्शी हाच शब्द योग्य आहे इथे.

रचना उत्तम आहे. आशयगर्भ आहे.
तरसलं हा शब्द मराठी आहे? तरसा है चे मराठी रूप वाटते. तरासलं मात्र चालेल. त्रासलं चं ग्रामीणीकरण.

रॉबिनहूड: बरोबर, तो मूळ मराठी शब्द नाही तरी, विदर्भात मात्र तो मराठीत वापरतात. तसेच फत्तर सुद्धा वापरतात.
खानदेशात पण बहुतेक वापरत असावेत.