एक पारव्याची जोड़ी

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 October, 2015 - 08:26

एक पारव्याची जोड़ी
वळचणीला घुमते
देहभान विसरून
प्रेमरसात नहाते

तिला आकृष्ट कराया
सखा फुलवतो अंग
ऐटदार चाल त्याची
भुलवते होण्या संग

तिही सहजासहजी
नाही लागत हाताशी
तिचा हट्ट त्याने घ्यावी
तिच्या लोळण पायाशी

मान करून तिरकी
रुंजी घालतो साजण
तेव्हा कुठे चोचीमध्ये
होते साखर-पेरण !

नवथर या प्रेमाची
गोष्ट पूर्णत्वाला जाते
काडी-काडी जमवाया
जोड़ी रानी भटकते

चिवचिवाट पिल्लाचा
जिव तिचा हरखतो
व्याकुळल्या ममतेला
म्हणे पान्हाही फुटतो

पंखांमध्ये येता बळ
पिल्लू झेपावेआकाशी
तीच पाराव्याची जोड़ी
पुन्हा घुमते दाराशी

-सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान अष्टाक्षरी>>>>+१

मस्त!