तो आरशात बघतो

Submitted by ज्योति जोशी on 10 October, 2015 - 21:11

तो आरशात बघतो..
पण समोरचा चेहरा ओळखीचा नसतो
ही व्यक्ती कोण?
रिकाम्या रिकाम्या नजरेची, शून्यात बेरीज झालेली..
कृश चेहरा, भकास भकास सुर्कुत्यांच्या प्रश्न्चीन्हात अडकलेला!
हा कोण.. हा कोण?
कां मी चुकीच्या आरशात बघतोय?
डोळ्यांतून सतत पाणी गळतय
पण ते अश्रू नसतात.
नाक सतत ठिबकतय पण सर्दी नाहीं,
तोंडात लाळ साठ्तेय पण तिच काय करायचं?
घशातला आवंढा गिळता येत नाहीं.
चेहऱ्यावरच्या स्नायुंना हसायला जमत नाहीं!
हा कोण? हा उदास कोण?
मला तर हा माहीतच नाहीं
खोलीत फोटो आहेत ते मात्र ओळखीचे वाटतात
कदाचित फोटोतला माणूस इथे रहात नसावा?
मग तो गेला कुठे?
हा उपरा? प्रतिबिंबात चोमडा?
सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायला हवीत!
पण त्या साठी ते प्रश्न विचारायला पाहिजेत आधी.
मग ती वाचा कुठे हरपली?
जुना आरसा शोधायलाच हवा. जुना आरसा शोधायलाच हवा!
त्या फोटोतल्या माणसाने आणखी काय काय चोरून नेलंय!

-----ज्योती जोशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users