दुरावा….. भाग २.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 9 October, 2015 - 03:40

पहिल्या भागाची लिंक http://www.maayboli.com/node/55968

दुरावा….. भाग २

सचिन तिथल्या वातावरणात रुळत गेला. एक महिना सरला. आज पहिला पगार हातात येणार होता, पण नेमका आज उशीर झालेला, तो घाईतच ऑफिसमध्ये पोहोचला, त्याच्या डेस्क जवळ गेला आणि....... समोर त्याचे सिनिअर्स एका मुलीशी बोलताना दिसले. त्याने पाहिलं आणि ओरडलाच, "मधुराssssss" ऑफिस मधले सगळेच जण त्याच्याकडे वळून बघत होते . मधुराचा पहिला दिवस होता ऑफिसचा आणि हा असा ओरडला जणू हे बालपणीचे लंगोटी यार. दोघेही थोडे वरमले. ती त्याला बघून कशीबशी हसली . "सॉरी" म्हणत तो त्याच्या जागेवर बसला. त्याने स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारली आणि कामाला लागला. इकडे सिनिअर ने मधुराला मार्गदर्शन केल आणि आपल्या जागेवर निघून गेला. तो दूर गेलेला पाहताच ती लगेच सचिनकडे वळली आणि म्हणाली, "काय हे? अस ओरडतात का? आणि माझ नाव अजून आहे लक्षात ? कस काय?" हि आता परत आपली खेचणार हे समजल त्याला पण त्याने काहीतरी भलताच प्रश्न केला तिला . "तू विसरलीस मला? ... म्हणजे माझ नाव?" ती काहीच न बोलता विषय टाळत म्हणाली , "कस आहे रे इथल वातावरण सचिन ? तुझा एखादा ग्रुप झाला असेल तर प्लीज मलाही येऊ देत हं " थोडासा हसला तो आणि म्हणाला , "खूप कॉर्पोरेट आहे सार. कामाशी काम; पण लंच ब्रेकमध्ये धमाल असते . दोन-तीन जण आहेत आपल्यासोबत, एक मुलगीही आहे. रमशील हळू हळू”. त्याच्या ‘आपल्यासोबत’ या शब्दाचा खूप आधार वाटला तिला. मनातून त्याचा मनमोकळा स्वभाव तिला खूप भावला. इंटरव्ह्यू च्या दिवशीही त्याने तिला सपोर्ट करण्याचा केलेला प्रयत्न तिला आठवला. तितक्यात मिसेस बापट HR म्यानेजर तिथे आल्या, "मधुरा वेलकम आणि थ्यांक यु देखील. काही अंतर्गत कारणांमुळे सिलेक्शन साठी उशीर झाला तरी तू लगेच जॉईन झाल्याबद्दल." "थ्यांक यु तुम्हाला म्यांम, मला एवढ्या मोठ्या फर्मची एमप्लोई बनण्याची संधी दिल्याबद्दल." त्यांनी तिची पाठ थोपटली आणि तिथून निघून गेल्या. सचिन आणि मधुराने कामाला सुरुवात केली. तिच अस मध्येच जॉईन होण आणि त्यामागच कारण सगळच न विचारता त्याला कळाल होत. तसही मधुराची नजरही त्याला शोधत होतीच, नाही दाखवलं तरी थोडस "बर" त्या दोघांच्या मनाला वाटत होत. नवीन मैत्रीची, प्रेमाची कि नात्याची सुरुवात झाली होती एवढ मात्र नक्की.
दोघांच एकमेकांच्या सोबतीने काम चालू होत. त्यातून बर्याचदा एकत्र घडवून आणलेला बस प्रवास सोबतीला होताच. ऑफिसमध्ये एकत्र असतानाचा वेळ हा कामातच जास्त निघून जायचा, फारस बोलण अस त्याचं होतच नव्हत. त्यामुळे प्रेमाचा अंकुर वगैरे फुटायला फारसा काही चान्सच नव्हता, पण जे काही क्षण ते अपघाताने सोबत असत ते क्षण फार भुर्कन उडून जायचे आणि हा अपघात घडत होता फक्त बसमध्येच. पहिल्या अजब भेटीचे पडसाद असतील कदाचित पण त्यामुळेच ते दोघ नकळत एकमेकांना जास्त वेळ देण्याचा आणि एकमेकांविषयी जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले होते. दिसायला दोघेही चांगलेच होते, म्हणजे "अनुरूप " म्हणतात तसेच काहीसे. दोघेही सावळे, नाकी डोळी नीट. आता फक्त हृदयाच्या तारा जुळण आणि त्यातून सूर उमटण गरजेच होत. लहान सहान गोष्टीतून ते एकमेकांना पारखायला लागले.
सकाळी सव्वा आठ ते साडे आठ च्या दरम्यान येणारी बस त्या दोघांची ठरलेली. पहिले काही दिवस चुकामुक झाली पण पुढे ताळमेळ बरोबर जुळवून आणला त्या दोघांनी. पण बसच ती. सगळ्या कॉमन पब्लिकची. नेहमीच गर्दीत एकत्र जागा कुठे मिळायची ? कधी ती बसायची तर कधी तो उभा राहायचा आणि कधी त्याला बसायला मिळाल तर ती उभी रहायची. त्याने शिष्टाचार, ओळख म्हणून अनेकदा तिला त्याची सीट देऊ केली होती आणि तिने नेहमीच ती ठामपणे नाकारली होती. त्यामागच तीच कारणही पटण्यासारखच होत.
सगळ्यात पहिल्यांदा तो जेव्हा तिला म्हणाला होता, "अग तू बस ना, मी राहतो उभा. " तेव्हा ती म्हणाली होती, "का?, स्त्री पुरुष समानता .. आणि मला सांग आता माझ्याऐवजी दुसरी कोणी अनोळखी मुलगी उभी असती तर दिली असतीस का सीट? नाही ना ? मग ? आणि मी कुठे म्हातारी आहे कि आजारी आहे? बिनधास्त-तंदुरुस्त आहे; मी राहीन उभी तुझ्याशी गप्पा मारत. वेळ लगेच निघून जाईल आणि….. बस कुठे रे धक्के आणि ब्रेक मारताना स्त्री पुरुष बघते? सगळ्यांना सारखेच दचके बसतात. तू आरामात बस." या एवढ्या मोठ्या स्पष्टीकरणानंतर त्याने पुन्हा तिला कधी "तू बस" अस सांगायचं नाही हे मनाशी पक्क केल होत पण बसमधल्या लोकांची मानसिकता बघून त्याला नेहमीच FORMALITY म्हणून का होईना तिला विचाराव लागायचं आणि ती हसून नकार द्यायची. पुढे पुन्हा असा काही प्रसंग आला कि त्यांची चर्चा सुरु व्हायला लागली. स्त्री पुरुष समानता यासारख्या गंभीर विषयावर. तिला स्त्री नेहमीच झाशीची राणी लक्ष्मि बाई वाटायची तर तो नेहमीच स्त्रीला दुर्बल समजायचा. मग त्यातूनही भांडण आणि असच भांडताना बसने दिलेला ब्रेक आणि तीच ते उभ राहिल्याने कोलमडण, मग तिला सावराव म्हणून त्याने तिचा नकळत पकडलेला हात ... तिला सावरायला दिलेला आधार. ती अस काही झाल्यावर मनात थोडस हसत, "बर बर ... ते सार जाऊदेत " म्हणत तिने त्याच्या हातातून सोडवलेला हात आणि बदललेला विषय. असच काहीस होत राहायचं त्या दोघांमध्ये, एकमेकांना अनुभवण्यासाठी तेवढ पुरेस असायचं मग.
कधी अर्धा नाहीतर पूर्ण प्रवास दोघांनाही उभ राहून करावा लागायचा. अर्थात बसचा प्रवास तोही उभ्याने ..धक्के तर लागणारच , त्यातूनही तो तिला सांभाळण्याचा प्रयत्न करायचा .. नकळत ..पण तिच्या लक्षात यायचंच ते. त्या त्याच्या काळजीने तिला तो जवळचा वाटू लागला होता. बालपण, शाळा मग कॉलेज.. घरातील वातावरण, नातेवाईक, गाव, सध्याच्या घडामोडी ... किती काय काय दोघ बोलायचे पण एकमेकांबद्दल नक्की काय भावना आहेत ते सांगण बाजूला ठेवून.
त्यातूनही ती जर लेडीज सीट वर बसली तर तिच्या बाजूला उभ राहून बोलायचीही संधी उपलब्ध नसायची, मग तो दुरूनच तिला न्याहाळायचा. कधी जवळच्याच एखाद्या सीटवर असायचा तर कधी लांब. एक दिवस काय तर म्याडम कंडक्टर शी गप्पा मारत होत्या. तो बिचारा टाक टुक करत तिकीट पंच करत होता आणि या त्यांची चौकशी करत होत्या "आज हे का बर? मशीन कुठे गेली तुमची ? "
"मशीनच ती...बिघडली. माणस बिघडतात तर त्यांनी बनवलेल्या मशिनी कशा बिघडणार नाहीत? पण सवय बदलली होती.. आता जून तिकीट द्यायचं म्हणजे जुनी मोडलेली सवय परत लावल्यासारख झाल, वेळ लागणारच."
"अच्छा म्हणजे 'आधुनिक' तिकीट काढायच्या पद्धतीने धोका दिला तर? हा हा हा "
"हसा तुम्ही.. तुम्हाला काय तिकीट मिळाल्याशी मतलब.. दोन्ही बाजूंनी आम्हालाच त्रास. आधी हि मशीन शिकताना त्रास झाला आता शिकलो तर परत जुनी तिकीट पंच करून आयत्या वेळेला काढून द्यायचा त्रास. रिटायरमेंट जवळ आली तरी शिकतोच आहे अजून." हे कंडक्टर च वाक्य. सचिनला सगळ आठवत होत. "माणस बदलतात" या कंडक्टर च्या एका वाक्यावरून त्या दोघांनी चर्चा केली होती. परिस्तिथिनुसार बदल हे होतातच. मग चूक कोणाची माणसांची कि परिस्तिथिचि? अस कुठे कुठे पोहोचल होत संभाषण.

दिवस धावत पळत चालले होते. बघता बघता दीड वर्ष होत आल. ऑफिसमध्ये ५-६ जणांचा ग्रुप असला तरी ह्या दोघांची गट्टी वेगळीच जमली होती.. आणि मग हे दोघ सगळ्यांसोबत असूनही एकमेकांबरोबरच्या विश्वात फिरत राहायचे. ते दोघ नाही पण आता त्यांचा ग्रुपच त्यांना चिडवू लागला होता. सचिनचे मित्र तर, "अरे एकदा विचारून तर बघ" असे मागे लागले होते. सचिननेही विचार करून "हो, मी तिच्या प्रेमात पडलोय" यावर शिक्कामोर्तब केल होत. तीच बोलण, वागण, हसण, स्वभाव सगळच त्याला आवडू लागल होत आणि कित्येकदा तिने खास त्याच्यासाठी केलेले आलू पराठे म्हणजे अगदी तिच्या हाताची चवही त्याला आवडली होती. पण प्रेम फक्त एका बाजूने असून चालत नसत ना? ते दोघानाही व्हाव लागत, तर गाडी पुढे धाऊ शकते. सचिन यापूर्वी कधी प्रेमाच्या भानगडीत पडला नव्हता. मी भला माझा अभ्यास आणि माझ काम, करिअर भल हाच त्याचा दृष्टीकोन होता. पण तिच काय ??... तिच सगळ्याच बाबतीतल तत्वज्ञान थोड वेगळ असायचं कधी त्याला ते आवडायचं तर कधी अजिबात पटत नव्हत.. आता प्रेमाच्या बाबतीत नवीन काही ऐकवेल अशी थोडी भीतीही मनात होती... प्रेम म्हटलं कि बाकी सगळीकडे "शेर" म्हणून फिरणारे पण अगदीच "फिके " पडतात तसच त्याच झाल होत. वेगवेगळे तर्क तो लावत होता ... या इतक्या वर्षात आपण तिच्याकडे हा असा विषय का कधी काढला नाही याच देखील त्याला आश्चर्य वाटत होत ...ती आधीच कोणाच्या प्रेमाबिमात पडली असेल तर? ? तर मग काय?? माघार ... तरीही माघार का असेना ती घेण्यासाठीही एक पाऊल पुढे टाकण गरजेच होतच. मनात काहीसा ठाम निर्णय घेऊनच सचिन त्या रात्री झोपला होता. अगदी बसमध्ये नाही पण ऑफिसमध्ये कुठल्या तरी छोट्याशा ब्रेकमध्ये तिला विचारायचच अस काहीस त्याने निश्चित केल. अर्थात डायरेक्ट अस प्रपोस वगैरे नाही पण तिच्या मनात आपल्याबद्दल नक्की काय आहे किंवा दुसरा कोणी तिच्या मनात आहे का? हे जाणून घ्यायचं अस मिशन त्याने ठरवलं. यामध्ये देवाने साथ देऊन बसमध्ये एकत्र बसायला मिळाल तर फारच बर... असा काहीसा विचार करून तो वाट बघत राहिला.. सकाळची .. रात्री कधीतरी झोप लागली...

दिवस उजाडला, बसही मिळाली, ती हि होती आणि तो हि होता.. पण... गर्दी होती आणि ती त्याच्या सोबत नव्हती. खिडकीजवळच्या सीटवर ती… इयर फोन लाऊन, डोक मागच्या दांड्यावर टेकवून, शांत डोळे मिटून गाण ऐकत बसलेली. तो मात्र उभा होता.. तिच्या चेहऱ्याकडे बघत आणि तिला पाहता पाहता त्याच्या लक्षात आल..तिच्या मिटलेल्या पापण्यातून ओघळलेले अश्रुंचे दोन थेंब. ते पाहून तो कावराबावरा झाला. तिला त्या क्षणी संभाळण शक्यच नव्हत आणि मुळात तोही ढासळला होता. त्याच्या मित्राच झालेलं ब्रेक अप आणि त्यानंतर त्याची झालेली अवस्था ... सारखीच...तोही असाच एकटा कोणत्या जुन्या जमान्यातील स्याड गाणी ऐकत रडत राहायचा. मागचा पुढचा कोणताच विचार न करता याने तर्क लावला... हीच नक्कीच ब्रेक अप झाल असणार... पण मग आपण काय कराव ... किंवा हीच त्याच्याशी भांडण झाल असणार म्हणजे तिच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी आहे? का? म्हणजे काय चाललाय यार ... त्याला काहीच कळत नव्हत. रात्रीही त्याच्या मनात अशा शंका आल्या होत्या आणि आता त्याने त्या शंकाच खर्या मानायला सुरुवात केली.

अचानक त्याच वागण बदलल.. रोज "मधुरा; हे अस करायचं, ते तस व्हायला हव" अस बोलणारा तो एकदम शांत झाला. लंच ब्रेकमध्येही तिला टाळत इतरांमध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्या गप्पा आणि तितकेच वाद घालणारे ते दोघे एकदम अपरीचीतासारखे वागू लागले. सचिनच तिच्यापासून दूर जाण्याच कारण केवळ त्याच्यापुरतच मर्यादित होत, त्याने ते कोणालाच सांगितलं नाही, त्यामुळे नक्की काय झालय? याच उत्तर फक्त तोच सांगू शकत होता. त्यातून सचिनने कहर केला म्हणजे तो नेहमीची ठराविक बस सोडून दुसर्याच रूटने येऊ लागला. मधुराला त्याच हे वागण त्रास देत होत, बदललेल्या वागण्यापेक्षा तो दाखवत असलेला परकेपणा तिला सहन होत नव्हता. नेहमीच एकत्र असायचे ते .. बस, ऑफिस आणि घरी आल्यानंतरही काहीना काही कारणाने त्यांच फोनवर बोलण व्हायचच. तिलाही पहिल्यांदाच ठामपणे काहीतरी जाणवत होत. त्याच्या न बोलण्याने तिच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी. "हेच प्रेम आहे का?, मला एवढा त्रास का होतोय ? तो नीट बोलतही नाहीये, भांडतही नाहीये, अस अचानक कोणी वागत का..? त्याचा प्रेमभंग झाला तर नसेल ..असा कसा विचित्र वागायला लागला अचानक?" "एवढ बोलायचो आम्ही, त्याला एकदाही त्याच दुसर्या मुलीवर प्रेम आहे हे सांगता आल नाही का? कि दुसर काही कारण असेल?" तिचे प्रश्न आणि तिला त्याची उत्तर हवी होती. तिच्या डोक्यात वेगळे विचार येत होते आणि तीच हृदय तिला काहीतरी वेगळच सांगत होत. तिने ठरवलं त्याला उद्या काहीही करून विचारायचच. असेल त्याच प्रेम पण म्हणून मैत्रीही तोडायची?

एक महिना सरला.. सचिन हल्ली अर्धा तास आधीच ऑफिसमध्ये येउन बसायचा. मधुरानेही तेच केल.. त्यादिवशी तीही लवकर पोहोचली ऑफिसला.. ३-४ स्टाफ आणि शिपाईच हजर होते. मधुराला एवढ्या लवकर तिथे पाहून सचिन चपापला, अशी अचानक ती समोर आली आणि त्याला त्या क्षणी तिला टाळण अशक्य झाल. तिनेच बोलायला सुरुवात केली...

ती- हाय, गुड मोर्निंग
तो- हम्म .. गुड मोर्निंग.
ती- मी लवकर कशी आणि का आले? विचारणार नाहीस?
तो- असेल तुला काही काम...म्हणून ...
ती- व्वा, सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत तुझ्याकडे .. पण माझ्याकडे नाही येत काही प्रश्नाची उत्तर आणि तेच तुला विचारायचय ..
तो- नाही सांगणार मी काहीच कारण तू कधीच सांगितलं नाहीस मला काहीच.
ती- काय बडबडतो आहेस? का एवढा परकेपणा दाखवतो आहेस?
तो- परकेपणा तू आणला आहेस मी नाही... गोष्टी लपवून...
ती- मी काय लपवलं? तूच सगळ सिक्रेट ठेवलं आहेस.
तो- तू मला सांगितलं नाहीस तुझ्या आयुष्यात "कोणीतरी" आहे ते...?
ती- काय?
तो- मराठीत बोललो मी...
ती- तुझ डोक फिरलंय का?
तो- बघा... आत्ताही विषय टाळत आहात तुम्ही...
ती- तुम्ही? तुला हा साक्षात्कार कोणी करून दिला... कि माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे..?
तो- कोणी काही करून द्यायची गरज नाही, मी आंधळा नाहीये... मला दिसत सगळ. त्यादिवशी बसमध्ये रडत होतीस तू.. गाण ऐकत... अस कोण वागत माहितीय का? जीवाभावाच कोणीतरी लांब जात तेव्हा. मला एकदा तरी सांगायचस... माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला ना?
ती- काय? मी काय केल? तुझी स्वप्न? अरे मूर्ख माणसा.. त्यादिवशी बसमधून तू उतरलास आणि सरळ निघून गेलास... तेव्हाच विचारायचस न ?
तो- (आता काय सांगू हिला?) मग आत्ता सांग न... माझ्या अशा वागण्याच उत्तर समजेल कदाचित तुला.
ती- अरे काय समजणार? त्यादिवशी बसमध्ये जागा नव्हती, मी गाणी ऐकताना प्ले लिस्टमधल हॉलिडेच "नैना अश्क़ ना हो" हे गाण लागल. तुला माहितीय ना माझा भाऊ आर्मीत आहे ते...त्याची आठवण आली म्हणून रडू आल. आणि तू .... तू वेडा आहेस खरच... आणि तू इतके दिवस माझ्याशी बोलला नाहीस..? त्यावरून? तू कसा राहू शकलास?

आता मधुराच्या डोळ्यात पाणी साचल होत. कदाचित मनातल्या अबोल भावना तिच्या डोळ्यात दाटून आल्या होत्या. सचिनसुद्धा गहिवरला. खरच किती मूर्ख होतो आपण.. तरीही त्याने पुन्हा विचारलच, "आत्ता जे डोळ्यात पाणी आलय ते माझ्या अशा मूर्ख वागण्यामुळे कि तुझ्या भावामुळे?" त्याच्या त्या एवढुश्या झालेल्या चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली, "तुझ्यामुळे... स्टुपिड..किती मिस केल तुला" "I AM REALLY SORRY ग, मीही खूप मिस केल तुला" अस बोलत तो तिच्याकडे थोडा वेळ बघतच राहिला.. तिलाही पुढे काही सुचलच नाही .. नुसतच हसून ते नेहमीच्या गप्पात रंगून गेले... इतक्या दिवसांचा BACK LOG बाकी होता... भरून काढायचा... त्यांचा ग्रुप ऑफिसमध्ये पोहोचला तोपर्यंत हे दोघे एकमेकांच्या विश्वात रंगून गेले. " पुन्हा मैत्री जमली वाटत" पण अजूनही प्यार का इजहार हुआ नही था| या एका महिन्यात त्या दोघांना एकमेकांबद्दल असलेल अबोल प्रेम मात्र नक्की जाणवलं होत.. पण पुढाकार घेऊन ते मान्य करण अजूनही बाकी होत.

ऑफिस जॉईन करून आता दोन वर्ष झाली. त्या दोघांची कामातली प्रगती पाहून दोघानाही पर्मनंट करण्यात आल. आता मिळकतहि वाढली होती. करिअरची, नोकरी ची गाडी रुळावर आली. सहा महिन्यांपूर्वी फसलेला प्रपोस चा प्रस्ताव सचिनने पुन्हा मधुरापुढे ठेवण्याच ठरवलं. मधुराही आता सचिनची स्वप्न पाहू लागली होती... तो विचारणार कधी? त्याच्या मनात मी नसेन तर? नाहीतर मीच एकदा पुढाकार घेऊन विचाराव का? असा विचार ती करत असतानाच एक दिवस सचिन समोर येउन म्हणाला, " मधुरा सोमवारी थोडी लवकर निघशील का ग घरातून ? नेहमीच्या बसऐवजी अर्धा तास आधीच्या बसने जाऊयात ना " तिने "का?" विचारल्यावर त्याने सांगितलं, "तू ये तर..." तिनेही फारसे आढेवेढे न घेत म्हटलं, "येईन. पण नाही जमल तर रात्री मेसेज वर कळवेन". तो "ठीक आहे" म्हणाला आणि पुढच्या तयारीला लागला. आता ‘ती’ उद्या रविवारी पूर्ण दिवसभर विचार करत राहणार हे माहित असूनही त्याने तिला सांगितलंच नाही काय कारण आहे तिला बोलवण्याच ते. " थोडा इंतेझार उन्हे भी तो करने दो, पता चलेगा हम कितने अलग हैं | " असा काहीतरी विचार करत तो हसत निघून गेला. मधुराकडे फक्त सोमवारच्या सकाळची वाट बघण्यापलीकडे पर्याय नव्हता.

क्रमश:

.........मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा भाग संध्याकाळी.+11111

Vaat pahatoy.... khup aavadale katha...