अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ

Submitted by मार्गी on 8 October, 2015 - 01:37

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ

नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ

काल रात्री बैजनाथच्या कूमाऊँ मंडलच्या डॉर्मिटरीमध्ये माझ्यासोबत फक्त एक जण होता. छान झोप लागली. पहाटे उठून पाच वाजता तयार झालो. बागेश्वर देहरादून बस ५ वाजता बैजनाथवरून जाते, असं लोकांनी सांगितलं आहे. बाहेर पडून रोडवर येऊन थांबलो. पक्ष्यांचं कुजन! पहाटेची थंडी आणि धुकं! खूप वेळ थांबूनही बस आली नाही. आजूबाजूला फार थोडे लोक दिसत आहेत. हळु हळु वर्दळ वाढली. अधून मधून रस्त्यावरून वाहन जातं आहे. शेवटी एक जीप मिळाली. पण ही जीप मला फक्त ग्वालदामपर्यंत सोडेल. इथून ते वीस किलोमीटर दूर आहे. तिथून पुढचं वाहन मिळेल, असं कळालं.

१५ डिसेंबर २०१२! आज बैजनाथवरून ग्वालदाम- कर्णप्रयाग मार्गे जोशीमठला पोहचायचं आहे. पहाटेचं धुकं आणि ढगामध्ये प्रवास सुरू झाला. कूमाऊँमध्ये असलेलं वैजनाथ थोडं कमी उंचीचं ठिकाण आहे आणि ग्वालदाम सुमारे २००० मीटर उंचीवर आणि गढ़वालमध्ये आहे. म्हणून रस्ता चढाचा आहे. बघता बघता ढग रस्त्यावर आले! अप्रतिम नजा-यामध्ये जीप पुढे जाते आहे. उत्तराखंडमध्ये प्रवासात नेहमी साजेशी हिंदी गाणी सोबतीला आहेत! व्वा! साग्र संगीत प्रवास. मध्ये मध्ये छोटी गावं लागत आहेत. हा उपवनाचा भाग आहे. जसं ग्वालदाम जवळ येत गेलं, रस्त्याने ढगांचा भाग ओलांडून वरची पातळी गाठली. आता दूर चांगला बर्फ पडलेला दिसतोय. थंडीही जास्त वाजते आहे. जवळ जवळ एक तासानंतर जीपने ग्वालदामला सोडलं. सकाळचे साडेआठ वाजत आहेत. सर्वत्र स्वर्णिम दृश्ये आहेत! हिमालयातील अनेक हिमाच्छादित शिखरे इथून दृग्गोचर होत आहेत. . . हिमाच्छादित शिखर आणि मधल्या द-यांमध्ये नदीसारखे तरंगणारे ढग! शब्द अवाक्! थंडीचा कडाका वाढला आहे. बघतच राहावं असा नजारा. . .

ग्वालदाम उंचीवरचं एक छोटसं गाव आहे. एका हॉटेलच्या छतावर अद्भुत नजारा बघत चहा घेतला. इथून आता पुढची बस किंवा जीप मिळेल. थंडी तीव्र असल्यामुळे आता हातमोजे घ्यावे लागले. बरीच चौकशी केल्यावर कळालं की, इथून पोस्टाची एक मिनी बस काही‌ तासांनी कर्णप्रयागला जाईल. नंतर काही जीप धराली गावापर्यंत जाणा-या दिसल्या. वाट बघून एका जीपमध्ये बसलो. एकट्या माणसाला फिरताना बघून लोकांना आश्चर्य वाटत आहे. जीपमध्ये समोर बसलो आणि अपूर्व दृश्यांसह प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू झाला. ग्वालदामनंतर रस्ता खाली उतरतो. परत एकदा ढग आणि धुक्यामधून जीप निघाली. दृश्यता (व्हिजिबिलिटी) अगदी कमी आहे त्यामुळे वाहनं लाईट लावून जात आहेत. मध्ये क्वचित एखादं‌ घर/ मंदीर दिसत आहे. थोड्या वेळाने रस्त्यात परत ढग लागले. परत एकदा बर्फाच्छादित पर्वत आणि खाली ढगांची नदी! रस्त्यावर तुरळक वाहतुक सुरू आहे. मधोमध रस्ता थोडा कच्चाही आहे. डोंगर तोडूनच रस्ता बनवलेला दिसतोय. अगदी निर्जन रस्ता, सर्वत्र निसर्गाचा अविष्कार आणि रस्त्याला लागून उंच देवदार वृक्ष!!


स्वर्णिम ग्वालदाम!

सुमारे दोन तासांनी धराली गांव आलं. पिंडर नदीची गर्जना! इथून पुढे आता पिंडर नदी सोबत असेल. पिंडर अशी एकमेव नदी आहे जी कूमाऊँ मध्ये पिंडरी ग्लेशियरपासून येते आणि गढ़वालला जाते. पुढे कर्णप्रयागमध्ये हिचा अलकनंदेसोबत संगम होईल. धराली गांव छोटसं आहे. इथे सतलुज जल विद्युत निगमचं कार्यालयसुद्धा आहे. हवामान सुंदर आहे आणि सोबतीला पिंडर नदीचा निनाद! इथेसुद्धा पुढे जायला वाहन मिळालं नाही. त्यामुळे बराच वेळ थांबावं लागलं. भुईमुगाच्या शेंगा खाता खाता आणि मध्ये मध्ये चहा पीत नजा-याचा आस्वाद घेतला. कूमाऊँ आणि गढ़वालला जोडणारा हा एकमेव पहाडी रस्ता आहे. अन्य रसे आहेत पण ते मैदानी भागातून जातात.


धरालीजवळ पिंडर नदी

एक तासभर पिंडर नदीचा सत्संग केला. थोडे लोक आहेत, त्यांच्याशी गप्पा मारल्या. कर्णप्रयागला जाण्यासाठी अजून थोडे लोक थांबले आहेत. शेवटी ती मघाचीच पोस्टाची बस आली! कंडक्टरने विचारलंसुद्धा की, ग्वालदाममध्येच का बस घेतली नाहीस. पण वाटेत जीपमध्ये समोर बसून जो आनंद घेता आला, तो मिळाला नसता. असो. इथून कर्णप्रयाग फार लांब नाहीय. पण पहाडी रस्ता आणि मध्ये मध्ये रस्त्याचं बांधकाम/ रिपेअर काम सुरू आहे. लहानशी गावं लागत आहेत. पिंडर नदीच्या जवळूनच पूर्ण रस्ता जातो. ग्वालदामवरून दिसलेले हिमाच्छादित पर्वत थोडे जवळ आलेले दिसत आहेत. रस्त्यावरच्या गावांमध्ये एक खास बाब दिसली. अनेक ठिकाणी सोलार लाईटस आहेत. मध्ये मध्ये मंदीर तर सतत आहेत.

कर्णप्रयाग! प्रयाग अर्थात् संगम! कर्णप्रयागमध्ये अलकनन्दा आणि पिण्डर नद्यांचा संगम आहे. बसने कर्णप्रयागमध्ये संगमाच्या थोडं आधी उतरवलं. दुपारचा दिड वाजतोय. कर्णप्रयाग एक पहाडी गांव आहे! वस्ती डोंगरालगत आहे. जोशीमठला जाणारी बस घेण्यासाठी गांवातल्या बस स्टँडवर जायचं आहे. इथे बरीच गर्दी आहे. पादचारी पुलावरून नदी पार करून बाजारामध्ये पोहचलो. मुख्य स्टँडवर पोहचल्या पोहचल्या जोशीमठाची बस मिळाली. अर्थात् त्यावर ऋषीकेश- श्री बद्रिनाथ लिहिलं आहे. पण हिवाळ्यामध्ये बद्रिनाथपर्यंत वाहनं जात नाहीत. तिथे खूप बर्फ पडतो. बद्रिनाथमधली मूर्ती जोशीमठला आणली जाते. म्हणून ही बस जोशीमठपर्यंतच जाईल. पण जोशीमठ बद्रिनाथपासून फार लांब नाहीय. जेमतेम ३५ किलोमीटर असेल. कर्णप्रयागपासून जोशीमठ सुमारे ८२ किलोमीटर आहे. कदाचित आज जोशीमठला जाणारी ही शेवटची बस असावी. बस पूर्ण रिकामी आहे. चालक, वाहक आणि मी! फक्त तीन जण. हळु हळु गावांमधले प्रवासी बसमध्ये चढत आहेत.


कर्णप्रयाग


अलकनंदा

अलकनंदा! इथून पुढे सगळा रस्ता अलकनंदेसोबतच असेल. अद्भुत नजारा आहे. इथून चमौली जिल्हा सुरू झाला. चमौली शब्द चंद्र मौलीपासून बनला आहे. हा रस्ता पक्का आहे- राष्ट्रीय महामार्ग आहे पण अत्यंत दुर्गम भागातून जातो. नदीच्या रम्य दृश्यांचा आनंद घेत प्रवास सुरू राहिला. थोड्या वेळाने पिपलकोटीमध्ये बस नाश्त्यासाठी थांबली. मलाही खूप भूक लागली आहे. हॉटेलात आलू पराठा खाल्ला. टिव्हीवर मॅच सुरू आहे. खाता खाता स्कोअर बघितला. धोनी ९९ रन वर आउट झाला! मग पुढे निघालो.

हा सर्व रस्ता दुर्गम भागातून जातो. त्यामुळे अगदी अरुंद रस्ता तर आहेच, पण मध्ये मोकळी जागाही नाहीय. चारधाम यात्रेच्या दिवसांमध्ये इथे मोठा जाम लागत असणार. आत्ता तर थंडीमुळे ऑफ सीझन आहे. म्हणून बैजनाथमध्ये हॉटेलमध्ये डॉर्मिटरी रिकामी होती. आनि जोशीमठमध्येही थांबण्याची अडचण येणार नाही. आता बर्फाच्छादित शिखर जवळ येत आहेत. . जोशीमठच्या थोडं आधी तपोवन विष्णूगाड हायड्रो पॉवर प्रोजेक्टचं एक मोठं संकुल लागलं. किती दुर्गम जागी हे आहे बाप रे. . त्यात ग्राउंडही आहे आणि लोक व्हॉलीबॉल खेळत आहेत! इथून रस्ता जोशीमठसाठी वर चढतो. अतिशय दुर्गम रस्ता! संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोशीमठला पोहचलो. अंधार तर आधीच पडला आहे. जोशीमठ अगदी डोंगराच्या उतारावर वसलेलं एक गांव! वस्ती चढावर आहे. थोड्या अंतरावर अलकनंदा आहे.

इथे सहा वाजण्याच्या आधीच रात्र सुरू झाली आहे. अंधारात कुडकुडत हॉटेल शोधलं. थोड्याच वेळात गढ़वाल मंडल यात्री निवासमध्ये डॉर्मिटरी मिळाली. संपूर्ण डॉर्मिटरी रिकामी आहे! म्हणजे ह्या मोठ्या खोलीत मी एकटा झोपणार! दिवसभराच्या प्रवासाने थकवा आला आहे. जोशीमठमध्ये हे हॉटेल थोड्या चढावर आहे. येताना थोडं थकायला झालं. जोशीमठची उंची सुमारे २००० मीटर आहे, त्यामुळे हाय अल्टिट्युड सिकनेसची शक्यता नगण्य आहे. असो. काहीही खाण्याची इच्छा नाही. हॉटेलवाल्यांशी थोडं बोलून लवकर झोपलो.

... सुमारे अडीच वर्षांपूर्वी केलेल्या प्रवासाच्या पहिल्या दोन दिवसांचे अनुभव तर तेव्हाच लिहिले होते. पण हा तिस-या दिवसाचा भाग आता अडीच वर्षांनंतर लिहितोय. पण वाटतच नाही की ही एखादी जुनी गोष्ट आहे. सर्व गोष्टी नजरेसमोर तशाच आहेत. २०१३ च्या प्रलयाच्या आधी बघितलेल्या रम्य उत्तराखंडचे संस्मरणीय अनुभव!

पुढील भाग: अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, खूपच सुंदर वर्णन आणि फोटोही मस्तच ... Happy

एवढ्या दुर्गम भागात लोक कसे रहात असतील - मला याचे कायम आश्चर्य वाटते...
तसेच या भागात एवढी देवस्थाने कशी व त्यांच्या भरभरुन जाणार्‍या यात्रा याचेही आश्चर्य वाटते .... Happy

खुपच मस्त लेखन.. माझी पण खुप दिवसांपासुन असेच एकट्याने फिरायची प्रचंड इच्छा आहे. बघुयात कधी पुर्ण होतेय!!!

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!