वाट चालण्या अंधाराची

Submitted by निशिकांत on 5 October, 2015 - 12:30

सांजवलेल्या आयुष्या चल वाट चालण्या अंधाराची
पुरे उजळणी गतकालाच्या वैभवशाली कर्तृत्वाची

भूक, वेदना, पाप, पुण्यही नष्ट जाहले मृत्यू होता
आत्म्याने का वाट बघावी? पिंडदान मिळण्या श्राध्दाची

कुठून आला? कसा मिळवला? प्रश्न केवढे गौण जाहले?
घरात पैसा अमाप असणे, बाब वाटते अभिमानाची

तेल वड्याचे वांग्यावरती काढायाचा प्रघात म्हणुनी
नोकरदारांवरती खटले, सुटका होते पण नेत्याची

आत्मवृत्त मी उगाच लिहिले, पाठ फिरवुनी वाचक गेले
कोण वाचतो भग्न कहाणी पराजिताच्या मनोगताची?

उत्तरार्ध येण्याच्या आधी, पाश तोडले जर असते तर
आली नसती वेळ आज ही अशी शेवटी कण्हावयाची

तू गेल्यावर असे वाटले जीवनात ना राम राहिला!
आज कळाले आठवातही उर्जा असते जगावयाची

गरीब जनता शतदा मरते जगता जगता मरण्याआधी
श्राध्द करावे कुठल्या दिवशी? हीच कसोटी पंचांगाची

बंडखोर "निशिकांत" असोनी, अंगिकारली स्थितप्रज्ञता
मावळताना आस न उरते, जगावयाची, मरावयाची

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>आत्मवृत्त मी उगाच लिहिले, पाठ फिरवुनी वाचक
गेले
कोण वाचतो भग्न कहाणी पराजिताच्या
मनोगताची?>>>व्वाह!

>>>तू गेल्यावर असे वाटले जीवनात ना राम राहिला!
आज कळाले आठवातही उर्जा असते जगावयाची>>>छान!

>>> गरीब जनता शतदा मरते जगता जगता मरण्याआधी
श्राध्द करावे कुठल्या दिवशी? हीच कसोटी
पंचांगाची>>>मस्तच!!

उत्तरार्ध येण्याच्या आधी, पाश तोडले जर असते तर
आली नसती वेळ आज ही अशी शेवटी कण्हावयाची

तू गेल्यावर असे वाटले जीवनात ना राम राहिला!
आज कळाले आठवातही उर्जा असते जगावयाची<<< चांगले शेर!

बंडखोर "निशिकांत" असोनी, अंगिकारली स्थितप्रज्ञता
मावळताना आस न उरते, जगावयाची, मरावयाची<<< दुसरी ओळ मस्त

कोण वाचतो भग्न कहाणी पराजिताच्या मनोगताची?<<< मस्त ओळ