मारुती !

Submitted by छायाचित्रकार on 12 September, 2015 - 14:03

मला मारुती हा देव प्रचंड आवडतो. एकदम straight forward. कसलीही ( खोटी म्हणजे देवाची भीती दाखवलेली ) व्रत वैकल्य नाहीत. कुठल्याही लांब लांब कथा नाहीत. साधू वाणी नाही. उगाच श्रावणातले सत्तेचाळीस सोमवार किंवा तेरा कडक चतुर्थ्या पाळा असले काहीही प्रकार नाहीत. एक साधं स्तोत्र जे समर्थांनी रचलेलं ‘ भीमरूपी महारुद्रा ‘ सारखं एक ताल ( rhythe) असेलेलं, त्यामुळे तेही आवडीचचं. अगदी शाळेपासून. जे चूक ते चूक आणि जे बरोबर तेच बरोबर अशी विचारसरणी असलेला असा साधा भोळा देव. बलोपासना शिकवणारा आणि त्याच बरोबर बुद्धी ही देणारा. पण त्यापेक्षा आवडतात ती मारुतीची स्थापना केलेली देवळ लहानश्या गावातली …
( मोठ्यानी हनुमान चालीसा स्पीकरवर लावणारी नव्हेत.) अशी देवळ कोकणात जागोजागी आढळतील. मला एकदा आठवतय, मी एकदा एकटाच आसूदला गेलो होतो. बऱ्याच वर्षापूर्वी आणि साधारण सात साडेसातला म्हणजे ( शब्दशः ) दिवेलागणीच्या वेळेला मी आणि जिथे राहिलो होतो त्या घरातील माझा छोटा मित्र ‘ विश्वनाथ’ असे सहजच चक्कर मारायला बाहेर पडलो होतो. त्या मिट्ट काळोखात( मी ) हळू हळू पावलं टाकत साधारण अर्ध्या किमी वरच्या एका छोट्याश्या मारुतीच्या देवळात जाऊन बसलो होतो. नुकतंच कोणीतरी तिकडे दिवा लाऊन गेलं होतं , आणि त्या मऊ प्रकाशानी तो लहानसाच गाभारा उजळून गेला होता आणि आजूबाजूला बागेत पसरणारा अंधार म्हणजे कातरवेळ असतानाची ती वेळ. तो काहीतरी बडबड करत होता आणि मी मधूनच एखादं वाक्य बोलत होतो. हे सोडल्यास आजूबाजूला इतकी जादुई शांतता होती, कि मला तिथून हलावसच वाटेना.
मन आपोआपच शांत होत होतं. मधूनच लांबवर कुठूनतरी स्तोत्र म्हणत असलेला आवाज कानावर पडे. देवळात दरवळणारा उदबत्त्यांचा वास, संध्याकाळचा गार वारा..आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा. काही हातांच्या अंतरावर रक्षण करत असलेला आमचा ‘ केशवराजा’ . मला त्या मारुतीचा हेवा वाटला !

( कोकणातल्या बहुधा सर्वच देवळात संध्याकाळी असा अनुभव येतोच येतो ) !

प्रसाद दाबके १४००८२०१५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users