नावात काही तरी आहे...

Submitted by पल्लवी अकोलकर on 11 September, 2015 - 03:44

पुर्वीच्या काळी, सासर्‍यांना मामंजी म्हणत.
म्हणजे, कोणी सुनबाई आपल्या सासरेबुवांना ’मामंजी’ अशी हाक मारतांना, ऐकले नाही मी कधी.
परंतु, जुन्या कथा कादंबर्‍यामधे मात्र तसे वाचलेले आहे.
तसेच सासूबाईंना,
अहो आई, बाई, माई, आत्येबाई, अक्का किंवा तत्समच कुठल्याशा, आदरयुक्त नावाने हाक मारले जाई, किंवा अजुनही तशी पद्धत आहे.
माझ्या अंदाजे, स्वत:च्या नवर्‍यालाही, १९८० ते १९९० च्या काळापर्यंत, बर्‍याच मोठ्या प्रमाणात,
’अहो ऐकलं का...?’ असं, त्याचे नाव न घेता, त्याचा उल्लेख करण्याची व त्याच्याशी संवाद साधण्याची पद्धत होती, किंबहूना, आजही आहे.

त्यामुळे, साधारणपणे त्या काळापर्यंत, उखाणे घेण्यात एक वेगळीच गंमत असे.
’उखाणा घेणं’ म्हणजे एक छान निमित्तच असे, नवर्‍याचे नाव त्या कारणाने ओठावर आणण्याचे.
त्यामुळे, कोण्या वहीनींना, काकवांना अथवा मामी मावश्याना ’नाव किंवा उखाणा’ घ्या म्हणले की सर्वप्रथम, त्या नैसर्गिकरित्या लाजत असत.
मग बरेचसे आढेवेढे घेत. मात्र खुपच आग्रह केल्यानंतर, मनातल्या मनात थोडीशी उजळणी करत.
मग त्याआधी, डोक्यावरुन पदर घेऊन, हळू आवाजात, अतिशय काव्यमय पध्दतीने, सुंदर ओळींमधे दडलेले नवर्‍याचे नाव, व त्यापुढे आठवणीने ’राव’ हा शब्द लावून, तो उखाणा पूर्ण करत.
मग ते नाव, किंवा तो उखाणा ऐकणार्‍यांनाही, निश्चितपणे काहीतरी छान, आणि नेहमीपेक्षा वेगळे ऐकायला मिळाल्याचे समाधान मिळे.
उदा. ”महादेवाच्या पिंडीवर, बेल वाहते वाकून, ****रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून"
मग अशा सुंदर उखाण्यावरुन त्या स्त्रीला, अवखळपणाने चिडवले देखील जाई, आणि ती स्त्री तिच्या लग्नाला कितीही वर्षे झालेली असली तरी, अर्थातच पुन्हा (खरोखर) लाजे.
एका दृष्टीने, नवर्‍यावरचे प्रेम इतरांसमोर, उघड उघड व्यक्त करण्याची ती एक गोड संधीच असे.
नाव घेण्याच्या या प्रक्रियेने, वातावरणात एक प्रकारचा उत्साह, जल्लोष, आनंद तयार होई.

माझ्या आज्जीने एकदा मला, तिच्या स्वत:च्या लग्नातील, म्हणजे सुमारे ७० वर्षापूर्वी घडलेला किस्सा सांगितला.
त्याकाळी वय वर्ष १५ असणार्‍या या माझ्या आजीला, म्हणजे तेव्हाच्या नवर्‍या मुलीला तिच्या लग्नात उखाणा घेण्यास सांगितला.
मग, कोवळे वय असणार्‍या, बावरलेल्या या नवर्‍या मुलीच्या कानात, एकीने हळूच, काही ओळी सांगितल्या.
तेव्हा आजीने लग्नात घेतलेला उखाणा (साल १९४४) असा होता :-
"अभिमान नसावा रुपाचा, गर्व नसावा संपत्तीचा,
भास्कररावांना घास भरवते, वरण भात तुपाचा"
आता वरील उखाणा ऐकताना कितीही सुंदर वाटत असला तरी, प्रत्यक्षात मात्र हे ऐकून, ऐन लग्नात वातावरण तापले.
२१ वर्षांचे माझे आजोबा नामक नवरा मुलगा चिडला.
नवर्‍या मुलाकडची संतप्त झालेली मंडळी, मुलीकडच्याना जाब विचारु लागली, आम्हाला संपत्तीचा गर्व आहे, माज आहे असे तुम्हाला वाटतेय का?
नवरा मुलगा चिडलेला बघून हि लहानशी नवरी मुलगी घाबरुन रडायला लागली.
मग नवरीकडच्यानी, नवर्‍या मुलाची आणि त्याच्या लोकांची जाहीर माफी मागितली व नवर्‍या मुलीने केवळ कोणाच्या तरी सांगण्यावरुन हा उखाणा घेतला आहे, प्रत्यक्षात तिच्या मनात तसे काही नाही असे सांगून त्यांची समजुत काढली.
मग परत एकदा, नवर्‍या मुलीने, सावधपणाने दुसरा साधा सरळ उखाणा घेऊन ते लग्न सुखरुपपणे पार पाडले व पुढे सुंदर रितीने जवळपास ६२ वर्षे संसार करुन वंशवेल वाढवली.
(आज आमच्या निमित्तानेही ती वंशवेल फुलतेच आहे, म्हणून आजोबांचे आभार)

असो,
पण, आजकाल, खुलेआम प्रेम व्यक्त करण्याचे नियम खुपच शिथिल झालेले असल्याने, लाजण्याचे हे प्रमाण, थोड्याफार प्रमाणात, फक्त नव्या नवरी पर्यंतच सिमित असावे असे वाटतेय.
आता नाव घेण्याचा नाही, तर नावं ठेवण्याचा जमाना आलेला आहे.

का माहित नाही, पण पूर्वीच्या काळचे नवरेसुद्धा, आपापल्या बायकोचा चक्क, अहो किंवा ”अगं, ऐकलं का..?" अशा पद्धतीनेच उच्चार करत.
म्हणजे, बायका चारचौघात, ”हे मला म्हणाले...” अशा वाक्याने संभाषण करत, तर पुरुष, ”आमच्या ’हिला’ विचारावं लागेल”, अशा अर्थाने सगळ्यांसमोर सौभाग्यवतीचा उल्लेख करत असत.
पु.लं. नी तर, ”आमच्या ’हिच्या’ हातच्या थालीपीठाची सर कश्शाकश्शाला येणार नाही’’ हे वाक्य इंग्रजी भाषेत कसे म्हणावे बरे? या अर्थानेही कोटी केलेली आहे.
म्हणजे, माझ्यामते अगदी भांडण सुद्धा हि मंडळी, अशाच आदरयुक्त पद्धतीने करत असावीत.

परंतु आजकाल परिस्थिती हळूहळू बदलत आहे.
आता सासू-सासर्‍यांना आई-बाबा, मम्मी-डॅडी, किंवा मम्मा-पप्पा म्हणले जाते.
थोडक्यात, नवरा ज्या नावाने हाक मारतो, त्याच नावाने, पण आदराने (निदान त्यांच्या समोर तरी) त्यांना हाक मारले जाते.
त्यातून आता, जग आणखी थोडेसे मॉडर्न होत असल्याने, हल्ली नवर्‍याला, अरे, कारे म्हणण्याचे दिवस आले आहेत.
मग ते ’कांदे-पोहे’वाले लग्न असू दे नाही तर, ’प्रेमविवाह’वाले.
नवर्‍याचा उच्चार, बर्‍याच प्रमाणात ऐकेरी नावाने होऊ लागलाय.
त्यामुळे कदाचित, त्या दोघांमधलं नातं, पटकन अनौपचारिक होण्यास मदत होत असावी, असे वाटते.
हो नाही तर, ”मुन्ना के पप्पा, आये नहीं अभी तक ऑफिस से" किंवा, ”अजी, सुनते हो...?
असलं मजेशीर काहीतरी बोलण्यापेक्षा, चारचौघातही, नवर्‍याला नावानेच हाक मारणे पुष्कळच बरे.

मला यावरुन, एक जुना बाका प्रसंग/किस्सा आठवला.
एकदा आम्ही गावाला, रेल्वेने चाललेलो असतांना, एका स्टेशनवरुन आमची ट्रेन निघाली.
ते बघून, गाडीत आमच्या समोर बसलेली बाई एकदम घाबरुन गेली, कारण तिचा नवरा खाली स्टेशनवर उतरला होता.
आता, ट्रेन सुरू झाली तरी, हे साहेब डब्यात चढलेले दिसले नाही, म्हणून ती, ”अहो...अहो... अहो बंटीचे पप्पा” करुन खिडकीतून जोरजोरात ओरडायला लागली.
तिचे अशा पद्धतीने ओरडणे बघून, आम्हाला हसायला आले तरी, आम्ही सगळेच घाबरुन गेलो होतो.
आता काय करावे? चेन ओढावी का या विचारांत असतांनाच, हे बंटीचे पप्पा मागच्या डब्यांतुन येत येत आमच्या डब्यात (एकदाचे) आले व स्थानापन्न झाले व अशा रितीने, बंटीच्या मम्मीने सुटकेचा श्वास सोडला.
तात्पर्य काय, तर नवर्‍याला, त्याच्या नावाने हाक मारण्याची पध्दत किंवा सवय नसल्याने, अशा प्रसंगी पंचाईत होऊ शकते.

पण आता,
नवर्‍याला ऐकेरीवर आणल्यामुळे, साहजिकच, ’बाबा’ सुद्धा ऐकेरीवर आलाय.
आई-वडील, फक्त मात्यापित्याच्या भुमिकेपुरते मर्यादीत न रहाता, हळूहळू मित्रत्वाच्या भुमिकेत शिरत चाललेले आहेत.
माझ्या मैत्रिणींच्या मुलांना तर मी, त्यांच्या वडलांना, ’ए पप्पू, ए बाबू किंवा डॅडू’ म्हणून हाका मारताना ऐकलंय.
पप्पू किंवा बाबू म्हणजे काय? विचारले असता समजले, तो पप्पा आणि बाबाचा शॉटफॉर्म आहे.
यावर हसावे कि रडावे, मला अजुनही समजलेले नाहिये.
क्वचित उदाहरणांमध्ये तर, आई बाबा आता नावाच्या सुद्धा यादीत आलेले आहेत.
म्हणजे आई बाबाला, आई-बाबा न म्हणता, डायरेक्ट नावानेच हाक मारणे.
बघूया, पुढे भविष्यात काय काय गमती जमती होतील ते.

त्याहूनही पुढची जवळीक म्हणजे, अगदी ’सासूबाई’ सुद्धा ’ए आई’ ची जागा घेत आहेत.
आणि ’जावईबापू’ तर कधीचेच मुलाच्या भुमिकेत शिरलेले आहेत.

हं, आता काही जण नाक मुरडतायेत या असल्या, थोड्याशा भितीदायक वाटणार्‍या बदलांमुळे.
परंतु, अशा बदलामुळे नाते-सबंधांमधला आदर जराही कमी न होता, ते अधिकाअधिक दृढच होत जाणार असेल तर, ते निश्चितच स्वागतार्ह असावेत.
एखाद्या व्यक्तीविषयी, आदर वाटणे अथवा न वाटणे, हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर, आणि तिच्या स्वभावावर अवलंबून आहे.
हो नाही तर, नवर्‍याला, ’अहो’ अशी हाक मारुनही, बायका नवर्‍याला मुठीत ठेवू शकतात, हे आपण आजुबाजूला बघू शकतो.
त्यामुळे, ’ए किंवा अहो’ वर फक्त प्रेम अवलंबून नाही, तर ते एकमेकांविषयी मनातून आदर असण्याच्या गणितावरही आधारित आहे.
फक्त या गोंधळात,
ती, उखाणा घेण्याची...नाव घेण्याची गंमत तो हळवेपणा... नावं ठेवण्यावर तर जात नाहीये ना, याची दक्षता घ्यावी लागेल.
तर एकंदरीत, नाव घेण्यात आणि ठेवण्यात बरंच काही आहे बर का शेक्सपिअर साहेब, येऊन बघा एकदा आमच्या देशात.
असो,
कदाचित ”अगं आणि अहो”चा पॅटर्न येईलही परत काही पिढ्यांनंतर... पण तोपर्यंत मात्र नावाशीच जवळीक ठेवावी लागेल.
© पल्लवी अकोलकर
https://www.facebook.com/PallaviAnecdotes?ref=bookmarks

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवर्‍याचा उच्चार, बर्‍याच प्रमाणात ऐकेरी नावाने होऊ लागलाय. त्यामुळे कदाचित, त्या दोघांमधलं नातं, पटकन अनौपचारिक होण्यास मदत होत असावी, असे वाटते. >>>> हे अगदी पटल..

लेख आवडला. खास करुन सुरवातीचे नाव घेण्याचे वर्णन छान आहे Happy

माझ्या मैत्रिणींच्या मुलांना तर मी, त्यांच्या वडलांना, ’ए पप्पू, ए बाबू किंवा डॅडू’ म्हणून हाका मारताना ऐकलंय.
पप्पू किंवा बाबू म्हणजे काय? विचारले असता समजले, तो पप्पा आणि बाबाचा शॉटफॉर्म आहे.
यावर हसावे कि रडावे, मला अजुनही समजलेले नाहिये.>>> ह्यात एवढे हसण्यासारखे किंवा रडण्यासारखे काय हे मात्र कळले नाही. माझी लेक पण "ए बाबू" म्हणते. बाबाला लाडाने आणि प्रेमाने हाक मारण्याची ती एक पद्धत. उकारांत शब्द खास प्रेमाच्या माणसांसाठी असतात हसे - वैशू, मनू, आशू इत्यादी.

पल्लवी छान आढावा.. आढावाच नं.. ?? ए पप्पू,बाबू..डॅडू.. इ. संबोधनांमुळे एकेकाळचे अण्णा,दादा,बाबा इ. मंडळींशी किती आपुलकी, जवळीक निर्माण झालीये , हे पाहून( वाचून्/ऐकून) मला तरी बर्रं वाटतं बाबा!!! Happy
या नावांतही आहे नं काहीतरी.. प्रेम्,जिव्हाळा,आपुलकी.. इ.. अगदी आदर सुद्धा!!!

बाकी ते उखाणे घेतानाचं वर्णन मस्त लिहिलंयस.. इस्पेशली तुझ्या आजी च्या लग्नातील प्रसंग!!

आवडला लेख, छान लिहिता आपण ..

हल्ली तर अहो जाहो दूरची गोष्ट, पतीरांजाचे नाव सरळही न घेता मित्रांमध्ये घेतात तसे लाडातले शॉर्टकट मारायचा जमाना आला आहे.
आणि पुढच्या पिढीतल्या मुलांनी आपल्या बापाला ऋन्मेषच्या जागी रुनम्या हाक मारली तरी आश्चर्य वाटू नये.. आणि हे त्या बापांनाही चालून जावे

नवर्‍याचा उच्चार, बर्‍याच प्रमाणात ऐकेरी नावाने होऊ लागलाय. त्यामुळे कदाचित, त्या दोघांमधलं नातं, पटकन अनौपचारिक होण्यास मदत होत असावी, असे वाटते>>>>> अक्षरशः

माझ्या मुलीने मला एक नाव ठेवले आहे .
ती फार लहान असताना तिला हेमंत बोलता येत नसल्याने ती मेमे बोलू लागली.
मला ते नाव फार आवडले - एखाद्या आदिम शब्दासारखे ,सहज सरळ .
मग ती मला आजतागायत मेमे च म्हणते , त्यामुळे कधी कधी बायको आणि मेहुणा पण.
मला खरे तर हे नाव फार आवडले.

कधी कधी माल माझी मुलगी मोमो डकी ( तिच्या आवडत्या खेळण्यातल्या बदकाचे नाव) या नावाने पण ती बोलावते.आणि कधी कधी मेमडया पण !