जाहिरीतीबाबत नीरक्षीरविवेक करायला हवा

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 5 September, 2015 - 11:53

आजच्या बाजारपेठेतील अटीतटीच्या स्पर्धेमध्ये आपले उत्पादन खपवण्यासाठी आक्रमक विक्रीतंत्र वापरणे हा युगधर्मच झाला आहे. विशेषतः जाहिरातीत अवास्तव दावे करण्यात उत्पादक अनेकदा विधिनिषेध बाळगत नाहीत असे दिसते. त्यामुळे जाहिरातींबाबत ग्राहकाला नीरक्षीरविवेक करावा लागतो. अमुक बिस्किटे खाणारी मुले (ओव्हर ) स्मार्ट बनतात, तमुक चहा घरी वापरल्याने गृहस्थाला उत्कृष्ट कर्मचारयाचा पुरस्कार मिळतो अशा जाहिराती आपण मनावर घेतही नाही. परंतु एखादा वाहन उत्पादक आपले वाहन एका लिटरमध्ये सरासरी ८७ कि. मी. धावते असा दावा करतो, त्यावेळी ग्राहक त्या जाहिरातीकडे आकर्षित झाला नाही तरच नवल !

दिल्लीचे पंकजकुमार हे अशाच जाहिरातीने प्रभावित होऊन त्यांनी कंपनीच्या स्थानिक वितरकाकडून जाहिरातीतील स्कूटर विकत घेतली. प्रत्यक्षात त्यांनी स्कूटर वापरायला सुरवात केली तेव्हा ती लिटरमध्ये सरासरी ६५ कि. मी. धावते असा त्यांना अनुभव आला. कंपनीने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी नवी दिल्ली येथील ग्राहक मंचाकडे ग्राहक संरक्षण कायद्याखाली तक्रार केली. मंचाच्या आदेशानुसार कंपनीच्या प्रतिनिधीने स्कूटरचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तेव्हा एका लिटरमध्ये ७५ किं.मी. अशी सरासरी पडली. तरीही जाहीरातीतील दाव्यापेक्षा ही सरासरी कमी असल्याने उत्पादकाने आपल्या स्कूटर बद्दल केलेला दावा अवास्तव होता अशी मंचाने नोंद केली. व ही अनुचित व्यापारी प्रथा ताबडतोब बंद करावी तसेच तक्रारदाराला रु. १०,००० /- नुकसानभरपाई द्यावी असा आदेश मंचाने दिला.

वरील निर्णयाविरुद्ध उत्पादकाने दिल्ली राज्य आयोगाकडे केलेल्या अपिलात "काही तथ्य नाही " असा शेरा मारून आयोगाने ते निकालात काढले. त्यावर उत्पादकाने दिल्ली येथील राष्ट्रीय आयोगाकडे सुधारणा अर्ज दाखल केला. आयोगापुढे उत्पादकाच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की जाहिरातीत नमूद केलेले अंतर हे आदर्श परिस्थितीत अनुभवाला येते. त्यातील महत्वाचे घटक म्हणजे फक्त एकच व्यक्ती वाहनावर बसलेली पाहिजे, योग्य टायर प्रेशर, योग्य वंगण, वाहनाच्या वेगातील सातत्य, रस्त्याची परिस्थिती, वाहन चालवण्याची पद्धत इ. त्यामुळे प्रत्यक्ष मिळणारे मायलेज हे आदर्श मायलेज पेक्षा ३० % कमी होऊ शकते. आयोगापुढे सादर केलेल्या सर्व जाहिराती बारकाईने पाहिल्या असता त्यापैकी फक्त एका जाहिरातीत "एक लिटरमध्ये वाहन सरासरी ८७ कि. मी . धावते" या वाक्याखाली अगदी बारीक अक्षरात "वाहन आदर्श परिस्थितीत चालवले असता" असे छापलेले होते. मात्र आदर्श परिस्थिती म्हणजे काय हे त्यात स्पष्ट केले नव्हते. अन्य जाहिरातीत अशी कोणतीही सूचना छापलेली नव्हती. शिवाय "एका लिटर मध्ये ८७ कि.मी." हा दावा अवास्तव आहे असे जिल्हा मंचाच्या निकालपत्रात नमूद केलेले असल्याने त्याचा आधार राष्ट्रीय आयोगाने घेतला. व असे खोटे दावे करून आपले उत्पादन विकत घेण्याच्या भरीला ग्राहकांना पाडणे ही अनुचित व्यापारी प्रथा स्वीकारल्याबद्दल उत्पादकाला दोषी धरले. आयोगाने जिल्हा मंचाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करून उत्पादकाचा अर्ज निकालात काढला. इंग्रजीत फसवणूक करणे याअर्थी "taking for a ride " असा वाक्प्रचार आहे. तो या प्रकरणाला चपखल बसतो.

ललिता कुलकर्णी

पूर्व प्रसिद्धी https://punemgp.blogspot.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण.
एखाद्या जाहीरातीत 'एक लिटर अस्सी किलोमीटर' वाचलं की आता डोळ्यासमोर येईलचः चांगल्या एसी लॅब मध्ये स्टँड्वर गाडी उभी केलीय आणि कोणीतरी चालू करुन साधारण १० मिली पेट्रोल जाळून त्यात काटलेले अंतर काढले आणि नंतर त्याला १०० ने गुणून १ लिटर अस्सी किलोमीटर ची जाहिरात बनवली.
हे म्हणजे बरंचसं 'वाघोली अनेक्स' ला असलेल्या स्किमची जाहिरात 'पुणे स्टेशनपासून दहा मिनीटाच्या अंतरावर' अशी करण्यासारखं आहे.