मी कुठेच नसतो

Submitted by रोहिणी निला on 1 September, 2015 - 23:53

रोजचीच चौकोनी खोली दुर्बिण घेऊन पाहत बसतो
भिन्ती आल्या जवळ तरीही जवळपास मी कुठेच नसतो

कोपर्यातली खिडकीही मग आभाळाला घेऊन येते
गजांअलिकडे चंद्राला पण घरात माझ्या प्रवेश नसतो

असंख्य चेहेरे अवतीभवती जेव्हा जेव्हा डोळे मिटतो
उघड्या डोळ्यांपुढचा आरसा आरपार काचेचा असतो

रोजच सायंकाळी न्यायालय भरलेले घरात माझ्या
न्यायनिवाडा करताना मी पिंजर्यात बसलेला असतो

असाच एके दिवशी होतो आरोप माझ्यावर चोरीचा
सुटतो मी निर्दोष दुर्बिणीवर हाताचा ठसाच नसतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users