'हायवे' - अशी सेल्फी घ्यावीच!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 August, 2015 - 08:11

विलक्षण गतिमान आयुष्यात स्वतःविषयी, आपल्या गंतव्याविषयी, आपल्या माणसांविषयी विचार करत बसण्याचा वेळ असतो कोणापाशी? एका ठिकाणी सरशी झाली की लगेच दुसर्‍या गोष्टीच्या पाठोपाठ धावताना, किंवा हुकलेला डाव परत जमवताना स्वतःत डोकावायचे आपण पार विसरून जातो. बाहेरची दुनिया भुरळ घालत राहाते. नवीन क्षितिजे खुणावत राहातात. परंतु यासोबत काही क्षण स्वतःपाशी, स्वतःजवळ घालवायचे असतात याचा विसर पडलेल्या माणसांना एका हायवेवरचा प्रवास तो अनुभव कशा प्रकारे देऊन जातो याची कथा 'हायवे' चित्रपट उत्तमपणे मांडतो.

सध्या सेल्फीचा जमाना आहे. लोक सेल्फी स्टिक्स घेऊन स्वतःचे व आपल्या सोबतच्या लोकांचे ढीगाने फोटो काढताना जळी-स्थळी दिसतात. काही विद्यापिठांनी सेल्फीज् कशा काढाव्यात याबद्दलचे अभ्यासक्रमही सुरू केलेत आणि ते भरपूर गर्दीही खेचत आहेत म्हणे! आपल्या बाह्य छबीच्या मोहात असलेले आपण सर्वजणच या चित्रपटाच्या निमित्ताने सेल्फीज् पलीकडे असलेल्या आपल्या खर्‍या चेहर्‍याबद्दल जरा विचार करू लागतो हे या चित्रपटाचे यशच म्हणावे का?

अर्थात प्रत्येक चित्रपटाने काही संदेश द्यावाच असा आग्रह नसावा. थोडी निखळ करमणूक, विरंगुळा, मनोरंजन, नेमक्या टाळ्या घेणारे संवाद व भावमुद्रा आणि विरोधाभासातून घडणारा विनोद यांचे नक्षीकाम असलेला चित्रपट माझ्यासारख्या सर्वसाधारण प्रेक्षकाला जास्त भावतो. 'हायवे'चे कथानक, पात्रांची चपखल मांडणी व त्यांच्या तोंडचे संवाद या प्रकारेही आपले मनोरंजन करतात. प्रवासात औट घटकेसाठी भेटणारे विविधरंगी, विविधढंगी लोक आपल्या वागण्या-बोलण्यातून किती उत्कृष्ठ विनोद-निर्मिती करू शकतात याची एक झलकच येथे पाहावयास मिळते.

मध्यंतरापर्यंतचा आपला वेळ सर्व पात्रांच्या कथा, व्यक्तिरेखा समजून घेण्यातच जातो. हा प्रवास कंटाळवाणा होऊ न देता रंजक होईल व त्यातून ती ती व्यक्तिरेखा फुलत जाईल याची काळजी चित्रपटात पुरेपूर घेतली आहे. एडिटिंगही मस्त जमले आहे. चित्रीकरण करतानाचे अनोखे अँगल्स नाविन्यात भर घालतात. मध्यंतरानंतर मात्र खरा चित्रपट 'घडत' जातो. आतापर्यंत झालेली वातावरणनिर्मिती एका कळसाला जाऊन पोहोचते आणि त्यानंतर प्रत्येकाची उमटणारी सेल्फी ही बघण्याची व अनुभवण्याची चीज आहे.

मला व्यक्तिशः या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभिनय, त्यांनी भूमिकेचा सांभाळलेला बाज आवडला. अगदी नवकलाकारांपासून ते जुन्या जाणत्या, कसलेल्या अभिनेत्यांपर्यंत सर्वांचेच काम सुखावून जाते. टिस्का चोप्रा, हुमा कुरेशी, रेणुका शहाणे, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे यांपासून ते वृषाली कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी, मयुरेश खांडगे, छाया कदम... सर्वच मंडळींचा अभिनय सुरेख वठला आहे. गिरीश कुलकर्णी यांचा एन आर आय आणखी चांगल्या प्रकारे सादर होऊ शकला असता असे वाटते. पण तरी त्यांचे काम चित्रपटाच्या उत्तरार्धात अधिक उत्तम झाले आहे. टिस्काचे पात्र व त्यासंबंधाने तिचे पुढे येणारे कथानक मला जरा अधांतरी वाटले. खेळानंतर एका मायबोलीकरणीने तिला ते पात्र जसे समजले आहे तसे उलगडून सांगितल्यावर मला त्यामागचा वाटणारा अधांतरी भाव जरा कमी झाला! Happy चित्रपटात खूप छोट्या छोट्या गोष्टी खुणावत राहातात आणि कथानकाला जास्त भरीव करत जातात हेही विशेष करून लक्षात येते. संगीताची व ध्वनिसंयोजनाची बाजूही येथे सुरेख सांभाळली आहे. शहराचा कोलाहल जसा समर्पकपणे मांडला आहे तसाच हायवेवरचा वेग आणि एका शांत स्थळीचा ठहराव ध्वनीचे माध्यम नेमके वापरून सुंदर तोलला आहे. गीतरचनाही समर्पक आहे.

मायबोली.कॉमने माध्यम प्रायोजकत्व घेतलेल्या प्रत्येक चित्रपटाचे वेळी पडद्यावर मायबोलीचा लोगो झळकताना दिसला की एकदम 'आपले' असे फीलिंग येते. यावेळीही प्रीमियरला तोच अनुभव आला. चित्रपट व संबंधित क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि इतर मायबोलीकरांसमवेत हा शुभारंभाचा खेळ पाहावयास मिळाला याचा आणखी आनंद झाला. या चित्रपटातले बारकावे, पात्रांभोवती फिरणारी कथा इत्यादी गोष्टी अनुभवायला हा चित्रपट पुन्हा पाहावासा वाटत आहे. एकदा बघून पिक्चर संपत नाही. त्याची कथा आपल्या मनात पुढे चालूच राहाते. आपलीही अशी एक तरी सेल्फी घ्यावीच हे खुणावत राहाते! Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहेस अरुंधती !
>> चित्रपटात खूप छोट्या छोट्या गोष्टी खुणावत राहातात आणि कथानकाला जास्त भरीव करत जातात हेही विशेष करून लक्षात येते..
>>
हे आणि अशी निरीक्षणं खूपच सुंदर.

खुप छान लिहिलं आहेस अरुंधतीजी Happy

चित्रपटात खूप छोट्या छोट्या गोष्टी खुणावत राहातात आणि कथानकाला जास्त भरीव करत जातात हेही विशेष करून लक्षात येते. संगीताची व ध्वनिसंयोजनाची बाजूही येथे सुरेख सांभाळली आहे. शहराचा कोलाहल जसा समर्पकपणे मांडला आहे तसाच हायवेवरचा वेग आणि एका शांत स्थळीचा ठहराव ध्वनीचे माध्यम नेमके वापरून सुंदर तोलला आहे. गीतरचनाही समर्पक आहे. >>>>>+१०००० Happy

छान लिहिले आहे. चित्रपटाबद्दलची उत्सुकत हळूहळू वाढतेय

हर्पेन, भारतीताई, सुजा, सशल, मैथिली, आशूडी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

सशल, हो, चित्रपटाचे सर्टिफिकेशन यू/ए आहे बहुतेक. अकरा वर्षांच्या मुलाला चित्रपटास घेऊन जायला काहीच हरकत नाही.

छान लिहिले आहे...

गिरीश कुलकर्णी माझ्या आवडीचा कलाकार. त्याचा वळु, देउळ आणि मसाला खुपच आवडले होते. पण पुणे ५२ ने नीराशा केली. मायबोली मिडिया पार्ट्नर आहे म्हणुन पूणे ५२ खास पूण्यात असताना पाहिला ( माझी मुलगी नेमकी बरोबर होती) आणि फाडकन तोंडात मारल्या सारखे झाले. काही काही सीन नकोते होते. आणि ते ही भडक पणे चित्रित केलेले. सगळा सिनेमा सुचक पणे आहे, मग ते सीन ही सुचक दाखवायला नको... एकदम अ‍ॅबसर्ड सिनेमा.

त्यामुळे हायवे चा रीव्ह्यु वाचल्या शिवाय जाणारच नव्हते. आता बघते सिनेमा.

छान लिहिलंयस अरुंधती Happy

सशल, आक्षेपार्ह काही नसलं तरी ११ वयोगटाला गुंतवून ठेवण्यासारखा चित्रपट नाही. लेक कंटाळेल.

माझ्या प्रश्नाला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद!

वर सई. आणि वेल ह्यांनीं म्हंटल्याप्रमाणे ११-१२ वर्षांच्या मुलाला हा चित्रपट कळायला कठिण होता .. अध्येमध्ये थोडी करमणूक झाली (त्याची) पण ओव्हरऑल त्याला न्यायला नको होतं ..

मुख्य म्हणजे सुरूवातीला काही काही डायलॉग्ज मुलांसाठी योग्य नव्हते .. इथे सिनेमा दाखवताना सबटायटल्स सकट दाखवतात .. त्यामुळे प्रॉब्लेम झाला .. नुसतं ऐकून त्याला कदाचित कळलंही नसतं पण सबटायटल्स् मुळे सगळं अगदी स्पष्ट स्पेल आऊट झालं .. Lol Wink

तसंही सिनेमातल्या काही काही किंवा सगळ्याच सबस्टोरीज् ह्या मुलांनां कळणार्‍या नाहीत तेव्हा लेकाला न्यायला नको होतं ..

बाकी सिनेमा आवडला .. छान घेतला आहे .. हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा ह्यांनां(च) का घेतलं कळलं नाही ..