पाऊसओळी

Submitted by धनुर्धर on 14 August, 2015 - 02:52

'ये रे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा'
असे म्हणत आपल्या आयुष्यात पावसाचा शिरकावा होतो. लहानपणी पहिल्या पावसाच्या वेळी आम्ही हे गाणं म्हणत असू. आभाळाकडे तोंड करून दोन्ही हात पसरून गोल गोल गिरक्या घेताना येणारी मजा अवर्णनीय अशीच होती. पाऊस कळू लागला तो या बालगीतातून . .
पुढे शाळेमध्ये आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातक चोचीने
प्यावा वर्षा ऋतु तरी
ही कविता भेटते. पावसाळा सुरु झाला की, आजही ह्या ओळी कानात रुंजी घालतात आणि डोळ्यात पाऊस जमा होऊ लागतो. आमच्या वर्गातली सर्व मुले ही कविता म्हणत आहेत. बाहेर धो धो पाऊस आम्हांला ताल देत आहे, आमच्या सुरात सुर मिसळत आहे. हे चित्र आजही डोळ्यासमोर उभे राहते. त्या वेळेस मी शाळेत असताना माझी आई मला न्यायला आलेली असे. मी खिडकीतून तिच्याकडे पाहत राही. ती शाळा सुटायची वाट बघत राही. शाळा सुटल्यावर मी नि आई पावसात घराकडे निघत असू भिजू नये म्हणून तिने माझ्यासाठी गोणपाट (पोते) आणलेले असे. ते गोणपाट अंगावर घेऊन आईबरोबर तो धो धो कोसळणारा पाऊस झेलत मी घरी जात असे. आजही तो पाऊस आठवतो आणि मन आठवणीत चिंब होऊन जाते.
वयानुसार पाऊसही बदलतो. 'आला आषाढ श्रावण' म्हणत येणारा पाऊस अचानक 'पाऊस असा रूणजुणता
पैंजने सखीची स्मरली' कधी म्हणू लागतो हे आपल आपल्याला ही कळत नाही. कधी नव्हे ते आपण कॉलेजला लवकर गेलेलो असतो आणि तीही लवकर आलेली असते. बंद वर्गाबाहेर दोघेच उभे नुसतेच एकमेकांकडे बघत! एकही शब्द न बोलता .. आणि फक्त पाऊस बोलत असतो. त्या वेळचा तो पाऊस आठवला की आजही भिजल्यासारखे वाटते.
शेतात मात्र पाऊस भेटला की 'मन चिंब पावसाळी ' आठवल्या शिवाय राहत नाही. आभाळात ढगांची गर्दी . . .( बाकी ढग म्हटलं की ते आभाळ पाहीजे , तिथे आकाश जरा कसेतरीच वाटते आणि चांदण्यांचे नाते आभाळापेक्षा आकाशाशीच जास्त जमते. ) मग एक एक थेंब खाली यायला सुरुवात होते. पाहता पाहता सारी धरती पाऊस आपल्या कवेत घेतो. पावसाच यथार्थ वर्णन करणार् या ह्या ओळी आपोआपच ओठांवर येऊन जातात.
पुढे श्रावणात तर पाऊस आणि कवितांच्या सरीवर सरी कोसळतात. हरीततृणांच्या हिरव्या गालिच्यावर खेळणारी फुलराणी आपल्याला मंत्रमुग्ध करते. श्रावणातला घन निळा आपल्याला भिजवून चिंब करतो. श्रावणमासी मनात हर्ष दाटतो. यासारख्या अनेक पाऊसओळींची बरसात आपल्यावर होते, आणि या वर्षावात आपण कधी वाहवून जातो. हे आपलं आपल्यालाच कळत नाही.

. . . . धनंजय . . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users