रेलकथा १ - डेक्कन क्वीनच्या पासहोल्डर राण्या!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मृण्मयीच्या रेलकथांवरून स्फूर्ती घेऊन माझ्या काही रेलकथा.

नेपथ्य - पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा लेडीज पासहोल्डर डबा. डे क्वी मधे लेडीज पासहोल्डर्सचा वेगळा डबा असतो. बाकी गाड्यांच्यातला लेडीज डबा हा जनरल + पासहोल्डर्स असा असतो.
पहिल्यांदाच काढलेला पु-मु पास. लग्नही नुकतंच झालेलं. सासर मुंबई. माहेर पुणे. आणि खूप सारी कामेही अजून पुण्यातच होती त्यामुळे बसपेक्षा पास काढणे स्वस्त पडेल म्हणून सेकंड क्लासचा पास काढला.
सकाळी रिक्षावाल्यांच्या मिनतवार्‍या करत डे क्वी च्या वेळेआधी २० मिनिटे पोचले. लेडीज पासहोल्डर डबा शोधून त्यात शिरले. शिरल्या शिरल्या 'पासवालोंके लिये है. टिकटवाले जाओ जनरलमे!' अश्या वाक्यांनी माझे स्वागत केले. "माझा पण पासच आहे. दोनच दिवसांपूर्वी काढलाय." असे मी ही ठणकावून सांगितले.
एका रिकाम्या दिसलेल्या जागी बसायला गेले. बूड टेकवणार इतक्यात एका काकूंनी तिथे आपली पर्स आपटली. ह्या 'सहा जागा धरलेल्या आहेत. दुसरीकडे जा.' असं सुनावलं. हाच प्रकार अजून दोन तीन ठिकाणी घडल्यावर मग एका ठिकाणी बसले ते आता धरलेली जागा सांगितली तरी हलायचंच नाही हे ठरवून. पण चक्क ती जागा धरलेली नव्हती.
गाडी सुटायला ५ मिनिटे असताना सर्व डबा खच्चून भरला. सहा जागांच्या बाकड्यावर आठ जणी तर आरामात बसलेल्या होत्या.
गाडी सुटली. हळूहळू मी नवीन पासहोल्डर आहे हे आता सर्व नेहमीच्या बायकांना कळले. कुणीही माझ्याकडे 'तिकीटवाल्यांनी त्या डब्यात जा!' सांगायला आले की कुठून तरी "अगं नवीन पासहोल्डर आहे!" असा हाकारा येत होता.
मी आता बसल्या जागी जरा पेंगत होते तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर टपटप करून जागे केले. डोळे उघडले तर समोर कुणीतरी खाऊचा डबा धरला होता. अनोळखी माणसांकडून काही खायचे प्यायचे घेऊ नये असा नियम मी कैक वर्षांपासून पाठ केला होता. पण सर्वांचे डबे डबाभर फिरताना दिसले. मी समोरच्या डब्यातला थोडासा खाऊ तोंडात टाकला.
मग गप्पा सुरू झाल्या. तुम्ही कोण, आम्ही कोण वगैरे वगैरे. माझं दोनतीन महिन्यांपूर्वीच लग्न झालंय, मी पुण्याला तासांवर शिकवते विद्यापिठात, माहेर पुणे, सासर मुंबई, नाटक सिनेमातलं कपड्यांचं काम करते वगैरे सर्व तपशील कळले. मी रोज येणार नाहीये पण महिन्यातून ३-४ वेळा तरी येणेजाणे होईल म्हणून पास काढलाय हे ही त्यांना कळले.
नवीन लग्न आणि हातात बांगड्या नाहीत? नवर्‍याचं आणि तुझं आडनाव एकच का नाही? तू फिरतेस तर नवर्‍याच्या जेवणाचे काय? असले भोचक प्रश्न कुणीही विचारले नाहीत. नवीन लग्न झालेली मुलगी इतका प्रवास करते तर सासरी कुणी बोलत नाही ना? अशी काळजीवाहू चौकशी मात्र झाली.
कर्जतच्या इथे शेजारच्या ताईंनी दोन बटाटेवडे विकत घेतले. पिशवीतून दोन डबे काढले. त्यातला एक उघडला. तो रिकामा होता. झाकणामधे वड्यांचे आवरण काढून ठेवून आतली भाजी डब्यात घेतली. मग दुसर्‍या डब्यातली पोळी काढून पोळीभाजी खाऊन टाकली. मी बघत होते. काय करणार आज भाजी करायला वेळच नाही झाला असं ओशाळं हसत त्यांनी सगळ्यांना सांगितलं. त्या हडपसरला राहणार्‍या होत्या. डे क्वी ची वेळ सकाळी ७:१० ची. ह्डपसरला पीएमटी मिळणार कधी आणि स्टेशनला पोचणार कधी? किमान साडेपाच सहाला तरी निघत असाव्यात घरातून. आणि भाजी न केल्याबद्दल ओशाळवाण्या झाल्या होत्या? माझी सासू तर मी मुंबईत असायचे तेव्हाही स्वैपाकाची अपेक्षा करत नसायची. एकूणात गमतीशीरच सगळे.
सगळ्यांनी माझी माहिती विचारली तशी त्यांचीही त्यांनी सांगितली. त्याबद्दल पुढे कधीतरी...

- नी

विषय: 
प्रकार: 

मस्त. मीही डेक्कनची पासहोल्डर होते एक वर्ष पण माझ्या आठवणी मुळीच चांगल्या नाहीयेत. लिहिन प्रतिसादात नंतर कधीतरी. सध्या हे छान वाटतंय वाचायला.

पूनम, माझ्या चांगल्या वाईट दोन्ही आहेत.
हे लिहायला लागले तेव्हा तुझीच आठवण आली होती. तू सलग वर्षभर अपडाऊन केलेस ना?
माझे रोजचे नव्हते जाणे येणे. आणि वेळ ठरलेली नाही त्यामुळे मी कुठल्याही एक्स्प्रेसमधे बसून, उभी राहून, दारात बसून वगैरे आलेली आहे. ते सगळेच लिहिणार आहे पुढे.

तुझ्या आठवणी पण लिही प्लीज.

हो मी एक वर्षभर दर वीकेन्डला मुंबई-पुणे केलं आहे. मला मेजर बदलवून टाकलं त्या एका वर्षाने. त्या एक वर्षाची आत्मकथाच होईल लिहायचं झालं तर Proud
बहुतांश आठवणी या बोचणा-या आहेत म्हणून लक्षात आहेत. लिहिन वेळप्रसंग बघून सावकाश. त्या आठवणींपासून मुक्ती मिळायला हवीच आहे कधी ना कधीतरी.

छान लिहीलय. अजुन तपशील हवाय.
आधी मला वाटले की "पासहोल्डर्सच्या दमदाटीबद्द्ल" लिहित्येस की काय.

मी पण २-३ वर्ष दर शनिवार-रविवार मुम्बै-पुणे केलं...पण पास होल्डर बायका रिझर्वेशन च्या डब्यात पण असायच्या...आणि मला ही फार अनुभव चांगला नाही आला...मग मी प्रगती ने जायचे किंवा सरळ बस ने!

मला वाटतं जसं मुंबईच्या लोकलमधली वीकडेची गर्दी आणि वीकेण्डची गर्दी यात फरक असतो तसा डे क्वी मधेही असणार.

पासहोल्डर्स दमदाटी करतात वगैरे ठिके पण मला त्यांची बाजूही पटते काही प्रमाणात.

नी, छान लिहिल आहे. मी सुद्धा प्रत्येक महिन्याला ४-५ वेळा रेल प्रवास करते. त्यामूळे बरेच अनुभव जमा झाले. Happy पास होल्डर चा प्रश्न आमच्या ट्रेन्सला येत नाही त्यामूळे अशी दमदाटी कधी मिळाली नाही.

पंचवीसेक वर्षांपुर्वी एका पुस्तकात ( लेखक बहुतेक भुस्कुटे ) बारा मासलेवाइक लेख होते त्यात आमच्या 'डोंबिवलीतले ज्योतिषी ','डेक्कनचे क्वीनचे प्रवासी' हे दोन लेख होते.डेक्कनची परिस्थिती अजुनही तशीच आहे.एवढेच काय हे प्रवासी पुण्यात घरी असतानाही "मी डेक्कननेच जातो" हे वाक्य इतके ठासून { आही तुळशीबागेतूनच खरेदी करतो या वाक्यापेक्षा थोडे अधिक } की आपला समज होतो की हे शहात्तर हजार रुपडे मोजून डेक्कन ओडेसि { या गाडीचा रंग आता बघवतही नाही }नेच जातात.
मी एकदा कराडहून कोयना गाडीने येत होतो.रिजर्व डब्यात तुरळक लोक होते. साताय्राला बरेच प्रवासी चढले. एका पाच सहा जणांच्या गटातल्या एका बाईंनी आल्याआल्याच फरमान सोडले "उठा उठा आमचे रेझर्वेशन आहे." मी खिडकीत होतो.शांतपणे विचारले "हो का? तुमच्या तिकीटावरचे नंबर बघून त्यांनाच उठवा. सर्व गाडीच्या लोकांना कशाला उठवताय? "ती बाई वरमली आणि गुपचूप तिकीटे बघू लागली.

मी देखील 95-96 एक वर्ष केले अपडाऊन पार्ले कॉलेज (आता साठ्ये) मध्ये तासावर शिकवत होते. माहेर तेव्हा टिळकनगरला तर सासर पिंपरी. सोमवारी सकाळी सिंहगड पकडायची अन्‌ शनिवारी दुपारी सिंहगडच.. पासहोल्डर होते पण फार वाईट अनुभव नव्हता.

माझ्याकडे रेल्वेतल्या कथा नाहीत पण पुणे मुंबई वीकेंड अपडाऊनचा मिळेल त्या वहानाने प्रवासाचा अडीच वर्षाचा भक्कम अनुभव आहे.. रेल्वेचा पास काढावा असे कधी डोक्यात पण आले नाही..

त्याची कल्पना आहे नी....

मी सुद्धा स्वत:चा कधी दिल चाहता है मधला सैफ अली खान नाही करुन घेतलाय मिळेल त्या वाहनाच्या नादात..

या मालिकेतला एक सुगंधित लेख वाचलाय याअगोदर Wink अजून येऊद्यात...

आमच्या ब्लॉगावर पण लोकलकथा आहेत Wink आणि अजून येतील, लिहायचा मुहुर्त लागेल तेव्हा.

झाकणामधे वड्यांचे आवरण काढून ठेवून आतली भाजी डब्यात घेतली. मग दुसर्‍या डब्यातली पोळी काढून पोळीभाजी खाऊन टाकली>>>>
वड्यांचे आवरण का काढ्ले तेही खान्यासाठीच असते की......

छान लिहिलय व्होल्वो कथा पण येवु देत.

मस्त, छान वाटलं वाचून. पटापट टाक पुढचे भाग.

ह्या धाग्यावर इतरांनी अनुभव लिहिणं अपेक्षित नाहीये ना ? रेल्वेप्रवास फार केला नाहीये पण जो केलाय त्यातल्या एकदा बाबरी मशीदच्या ऐन दंगलीत मुंबई-जयपूर प्रवास केलाय. तेव्हा सलग ट्रेन नव्हती. सवाई माधौपूरहून गाडी बदलून. तो प्रवास किती भितीदायक होता हे मला तेव्हा जाणवलंच नाही. आता जाणवतं.
लोकलने पाच वर्षं प्रवास केलाय. माटुंग्याचा रुळ ओलांडून ! ( एकच ट्रॅक आहे तिथे ओलांडायला. त्यामुळे नसते साहस करायला गेले नाही तर खूप धोकादायक नाही. )

Pages