मिठातले आवळे

Submitted by राफा on 5 August, 2015 - 01:25

कु. कुंजलतिका तनमुडपे यांचे ‘आवळा: कृती व विचार’ हे पाककृतींपलिकडे जाऊन जेवणानुभूतीबरोबरच जीवनानुभूती देणारे खास नवगृहिणींसाठीचे पुस्तक लवकरच बाजारात येत आहे. ‘खल व बत्ते’ हे त्यांचे वायव्य महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडवून दिलेले पुस्तक वाचकांच्या ओळखीचे आहेच.

दोन्ही पुस्तके घेतल्यास २५% टक्के सवलत तसेच आवळकाठीचे एक पाकिट (लहान साईज) मोफत मिळेल.

सर्वत्र उत्सुकता निर्माण करणा-या ह्याच पुस्तकातील एक कृती खास तुमच्यासाठी.

मिठातले आवळे

साहित्य:

५० ग्राम काजू (नसल्यास भाजलेले शेंगदाणे चालतील)
८ ते १० आवळे. (१० ते ८ ही चालतील. तुम्ही कुठून बघताय त्यावर आहे)
मीठ (आयोडिनयुक्त असल्यास उत्तम. शक्यतो चवीला खारट असावे व दिसायला कतरीना कैफ च्या रंगाहून थोडे कमी उजळ असावे)
एक आकर्षक बाऊल (हा नसला तरी चालेल पण काहीही सर्व्ह करताना हा कृतीच्या शेवटच्या ओळीत सवयीने लागतोच तेव्हा हाताशी असलेला बरा असतो)
एक चमचा (पाहुण्यांना चिवडा देताना वापरतात तसा लहान आकाराचा असावा)
एक स्मार्ट मोबाईल (आवळ्यांच्या विविध अवस्थांचे तरंगते फोटो फेसबुकवर टाकायला)

कृती:

प्रथम दोन तीन काजू तोंडात टाकावेत. त्याने चित्तवृत्ती उल्हसित होतात आणि पाककृती करायला शारीरिक व मानसिक बळ मिळते.

काजू नीट खावून झाल्याची खात्री झाल्यावर बरणी समोर घ्यावी. त्यात बेताबेताने फिल्टर केलेले पाणी साधारण गळ्यापर्यंत येईल असे घालावे. मुंबईत काही विशिष्ट भागांत रहात असाल तर नळाचे पाणी घेऊ नये कारण पाण्याच्या रंगामुळे त्यात तरंगणारे आवळे दिसणार नाहीत.

टीप: बरणी नीट स्वच्छ असावी. त्यात आधी भरलेल्या कडधान्याचे वगैरे दाणे शिल्लक राहिले तर पाण्यामुळे मोड येऊन आवळ्यांची चव बदलू शकते. विशेषत: नवगृहिणींनी असा अनावस्था प्रसंग टाळावा.

आता मोबाईलने बरणी, आतले पाणी तसेच फिल्टर, किचन प्लॅटफॉर्म, टाईल्स, मायक्रोवेव्ह इत्यादी गोष्टींचे विविध कोनात फोटो काढावेत. फोकस, उजेड, क्लॅरिटी अशा फालतू गोष्टींमुळे कुठलाही फोटो बाद न ठरवता ते सर्वच्या सर्व फोटो फेसबुकवर पोस्ट करावेत. शिवाय खाली ‘आज वेळ होता म्हटलं मिठातले आवळे करावे’ अशी कॉमेंट टाकावी.

थोडा वेळ थांबून साधारण पहिला ‘लाइक’ आल्यावर सेलिब्रेट करायला अजून दोन-तीन काजू तोंडात टाकावे. मग आवळ्यांकडे वळावे. आवळे आठ ते दहा आहेत ना ते मोजून एकेक करुन बरणीच्या पाण्यात गरम तेलात लाटलेली पुरी सोडतात तसे सोडावे (तिखटमिठाच्या पु-यांची कृती ‘खल व बत्ते’ मधे पान नं. ६७ वर पहा)

मग चमचा चमचा मीठ सावकाश घालावे. मध्यम आकाराच्या आवळ्याला एक सपाट चमचा असे प्रमाण असावे. त्याच चमच्याने सावकाश ढवळून मिश्रण एकजीव करावे.

टीप: तो ढवळलेला चमचा पुन्हा मिठाच्या बरणीत खूपसू नये.

आता मघाचच्या फेसबुक पोस्टचे लाईक्स चेक करावेत. साधारण पंचेचाळीस लाईक झाले की मग पुन्हा एकदा पाणी ढवळून मिठासकटच्या पाण्याचे फोटो काढून फेसबुकवर पोस्ट करावेत. पुढची पंधरा मिनिटे ‘अगं आत्ता ग कुठे मिळाले आवळे?’, ‘छानच. पण प्रमाण तर सांगशील? किती चमचे पाणी घ्यायचे?’, ‘आता खातानाही टाका सगळ्यांचे फोटो’, ‘ए आवळ्यांवरून आठवले, रणवीर काय क्यूट दिसतो ना बाजीराव मधे’ अशासारख्या कॉमेंट्सना रिप्लाय द्यावेत.

ह्यानंतर पाच मिनिटे श्रमपरिहार करावा व अजून दोन-तीन काजू खावेत.

तरंगणा-या आवळ्यांचे फोटो काढून पोस्टावेत. काही वेळ आवळ्यांचे निरीक्षण करावे. सर्व आलबेल असल्याची खात्री करुन मग पोस्ट चेक करावे. ‘काय गोड कलर आहे गं. आम्ही कालच अश्याच रंगाचा फ्रिज घेतला. नव-याला वाईन कलरचा हवा होता पण मी दुर्लक्ष केले’ अशासारख्या कॉमेंट्स ना गोडगोड रिप्लाय द्यावेत.

टीप: आधी मीठ पाण्यात मिसळून मग आवळे टाकले तर चालणार नाही का? असा एक कॉमन आणि काहीसा आगाऊ प्रश्न मला विचारण्यात येतो. ही एक घातक प्रथा नवविवाहितेंमधे पडते आहे. अंतिम परिस्थिती साधारण तशीच असली (म्हणजे मॅरीड विथ वन किड) तरी लग्न व बारसे त्याच क्रमाने करतात हे इथे लक्षात ठेवावे.

मघाशी काढलेला आकर्षक बाऊल फोटो काढून पुन्हा कपाटात ठेवून द्यावा. आता ‘झाले तुमचे मिठाचे आवळे!’ असे कदाचित तुम्हाला वाटेल पण मध्यम आकाराच्या ८ ते १० आवळ्यांसाठी साधारण २ ते ३ मध्यम आकाराचे दिवस जाऊ द्यावेत. असे दिवस गेल्यावर आवळे चांगले लागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे!

दर तासाने मिठातल्या आवळ्यांचे फोटो काढावेत व फेसबुकावर पोस्ट करावेत. मीठ थेट बरणीत न टाकता वाटीत काढून घेतले असेल तर उरलेले मीठ वापरून बाकीचे खारे काजू करावेत.

मग, आवडली ना मैत्रिणींनो ही सोप्पी पाककृती? ह्या पाककृतीला फार डोके लागत नसल्याने नव-यालाही शिकवायला हरकत नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए आवळ्यांवरून आठवले, रणवीर काय क्यूट दिसतो ना बाजीराव मधे>>> Lol
असे दिवस गेल्यावर आवळे चांगले लागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे!>>> Proud
भारी लिहिलय.
लोकहो शीर्षक वाचताना "ठा" चे "ठी" करू नये ही नम्र विनंती >>> Lol मिठी आणि आवळा दोन्ही समानार्थी होणार नाहीत का ? Wink

Lol

धमाल!

>> असे दिवस गेल्यावर आवळे चांगले लागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे!

>> अंतिम परिस्थिती साधारण तशीच असली (म्हणजे मॅरीड विथ वन किड) तरी लग्न व बारसे त्याच क्रमाने करतात हे इथे लक्षात ठेवावे.

>> ए आवळ्यांवरून आठवले, रणवीर काय क्यूट दिसतो ना बाजीराव मधे

बेस्ट Lol

आवळ्यांऐवजी मी 'तिसर्‍या' घातल्या तर तेच प्रमाण चालेल का? आमच्याकडे सामिष फार आवडते सगळ्यांना..

प्रेमळ स्वागताबद्दल, राफाची वळख ठेवल्याबद्दल व मस्त प्रतिक्रियांबद्दल मंडळ आभारी आहे Happy . राफा, राफ्फा, राफ्या वाचून मन अतिचशय प्रसन्न झाले...

मित, 'गळ्यापर्यंत' तसाच अपेक्षित होता Happy
किरू, सत्य वचन. काजूंकडेच जास्त लक्ष Happy
झंपी, फेबु हे अनेक विनोदी लेखांना सामग्री पुरवत असते Happy
डीविनिता Happy
मंजूडी, आवळकाठीच्या रेसिपीसाठी 'खल व बत्ते' विकत घ्या Happy
असाम्या Happy

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

भारी.
यावरुन फेबु वरील "माय मिडनाईट क्रेव्हिंग" म्हणून एका प्रेग्नंटिनीने टाकलेले सॅलडच्या फोटोसहित स्टेटस आणि त्यावरुन मित्र मंडळीत झालेले "आता उद्या माय फर्स्ट मॉर्निंग सिकनेस कंटेंट" चा फोटो येणार असे मारलेले व्याआआआक शेरे आठवले.

Lol

अफाट आहे हे Rofl

‘ए आवळ्यांवरून आठवले, रणवीर काय क्यूट दिसतो ना बाजीराव मधे’ >> Rofl

मध्यम आकाराच्या ८ ते १० आवळ्यांसाठी साधारण २ ते ३ मध्यम आकाराचे दिवस जाऊ द्यावेत. असे दिवस गेल्यावर आवळे चांगले लागतात >>> लोटपोट झालेय मी इकडे. Rofl

>>क्यतो चवीला खारट असावे व दिसायला कतरीना कैफ च्या रंगाहून थोडे कमी उजळ असावे<< Biggrin
>>एक आकर्षक बाऊल<< कुणासारखा?

राफ्या राफ्या , कहां छुप गया था कठोर !

अजून तोच दर्जा, तोच पंच.

अब आ गये हो जाना नहीं...

फोटो काढून पुन्हा कपाटात ठेवून द्यावा.

>>

फोटो कपाटात ठेवून द्यावा ? ::अओ: ::फिदी:

Pages