धर्म आणि मैत्री ..

Submitted by भारती.. on 2 August, 2015 - 06:39

धर्म आणि मैत्री ..

तिच्या वडिलांबरोबर ती प्रथमच माझ्या बँकेच्या शाखेत आली होती..

तिचे वडील नेहमीच माझ्याकडे येत, त्यांना मी एक एकाकी वृद्ध प्रोफेसर म्हणून ओळखत होते.या सधन वस्तीतील एका श्रीमंत स्टायलिश मुलांनी गजबजलेल्या कॉलेजमध्ये ते पूर्वी उर्दू शिकवत तेव्हापासून मी त्यांना पहात होते.

प्रोफेसर मुस्लिम होते.अत्यंत देखणं रूप, गोरापान रंग, खानदानी वावर ,देहबोली.या वार्धक्यात अधिकच गहिरलेली डोळ्यातली निळाई. सर उर्दूतले प्रसिद्ध शायर- साहित्यकारही होते.
आणि जिभेवर उर्दू शेरोशायरीबरोबरच फर्मास इंग्लिश भाषेची साखरपेरणी.त्यातच रंगतदार आठवणी.कधी कॉलेजचे किस्से , कधी फिल्म इंडस्ट्रीतल्या खमंग कहाण्या. तालेवार मुस्लिम घराण्यात जन्मलेल्या सरांची दिलीपकुमार वगैरे फिल्मी दिग्गजांशी अंतरंग मैत्री होती. हे सर्व रंग ल्यायलेलं सरांचं बोलणं कधी संपूच नये असं वाटायचं. शायरीची अनेक रूपं त्यांच्या संभाषणात सहज अवतरत ..
‘’आज हमारा दिल तडपे हैं कोई उधरसे आवेगा
या के नवीश्ता उन हाथोंका कासीद हमतक लावेगा ‘’
अशी इंतजारची भाषा , (मग त्यातच नवीश्ता म्हणजे पत्र, कासीद म्हणजे निरोप्या या टिप्पण्याही मला कळावं म्हणून ) तर कधी
दिल गया रौनक-ए-हयात गयी
गम गया सारी कायनात गयी ‘’- असं थरारून टाकणारं सत्य जे उर्दू गझलच्या दोन ओळीतच मावू शकतं , असं काहीबाही.सतत.

माझ्याकडे इतर कामांबरोबरच पेन्शन खाती होती आणि वृद्ध पेन्शनर लोकांची कामे जरा जास्तच मन लावून करायची सवय होती मला, तिथून आमची ओळख दाट होत गेली. मी मराठी भाषेतील एक कवयित्री असल्याचं त्यांना सांगून त्यांच्याकडून उर्दू शायरी ऐकण्याचा आनंद त्यांच्याशी बोलताना घेऊ लागले होते.

झकास विनोदबुद्धी असलेल्या सरांच्या डोळ्यात मात्र एक खोल वेदना होती.एकाकी जीवनाची. त्यांच्याबरोबर एखादा नोकर किंवा नोकराणी असे मदतीसाठी. दिवसेंदिवस त्यांना वावरणे , व्यवहार करणे जड चालले होते.मी माझ्या अधिकारात त्यांना जमेल तो आधार देत होते. माझी सिनियर आणि ज्युनियर – दोघीही मला यात सहकार्य करत होत्या. सर आमच्यावर खूष होते.

दिवस जात राहिले.

आणि आज सरांबरोबर ती आली होती. सितारा. त्यांची विवाहित, अमेरिकेत रहाणारी मुलगी.
एखाद्या व्यक्तीला पहाताच आपण तिच्या प्रेमात पडतो, सिताराच्या बाबतीत माझं तसंच झालं.
गोरीपान उंचीपुरी सितारा वडिलांइतकी देखणी नव्हती , पण खूप आकर्षक आणि आनंदी होती. अत्याधुनिक टाइट जीन्स टीशर्ट, कानातले गळ्यातले ठसठशीत ट्रेंडी अलंकारही आधुनिकतेचाच घोष करत होते.ती मोठ्यामोठ्या डोळ्यांनी मला निरखून बघत होती. वडिलांनी माझ्याबद्दल काही चांगले शब्द उच्चारले असावेत. त्या नजरेत मृदुभाव होता.
सिताराच्या अनेक अडचणी होत्या.ती अमेरिकेतून आली होती. तिला खातं उघडायचं होतं.वडिलांचे व्यवहार मार्गी लावायचे होते. त्यांच्या वार्धक्याला सुख देणाऱ्या सिस्टीम्स घरीदारी सुरू करून देऊन मग परत जायचं होतं.कठीण होतं काम. एक विवाहित परदेशस्थ मुलगी, आपल्या विधुर, एकाकी, वृद्ध,आजारी पित्यासाठी जीव टाकत होती.यात तिच्या एकुलत्या एका भावाने वडिलांकडे आणि तिच्याकडे पाठ फिरवली होती.
यात धर्माचा काहीच प्रश्न नव्हता.
एका स्त्रीला समजू शकणारं हे स्त्रीचं दु:ख.. विवाहानंतर दुभंग जगत रहाण्याचं .
मीही अनेक आघातांनी ग्रस्त आजारी वडिलांना वेळ देत होते.मी सिताराकडे आत्मीयतेच्या भावनेने ओढली गेले. तिला बँकेबाहेरही भेटू लागले. एका विसंगत मैत्रीचं उदाहरण होतं ते. मी,अत्यंत मराठमोळी,संघपरिवाराच्या छायेतलं बालपण. एकूण मुस्लीम जगापासून चार हात दूर राहणं पसंत करणारं .उर्दू कवितेच्या आवडीमुळे केवळ सरांकडे आकृष्ट झालेली मी . आणि आता माझ्यासमोर ही जिवंत कविता. ही वयाने माझ्यापेक्षा लहान खानदानी मुस्लीम मुलगी. आणि किती समृद्ध व्यक्तिमत्व. बोलताना मला चक्क परमहंस योगानंदांच्या Autobiography of a Yogi चे दाखले देऊन सिताराने मला जिंकून घेतलं.पडदा, बुरखा, कर्मकांडवादाचा लवलेशही नसलेली आणि तरीही स्वत:च्या परंपरेचा सार्थ अभिमान असलेली सितारा मुक्त मुस्लीम स्त्रीचं एक मनोहारी रूप होतं.त्या संस्कृतीचं ते खरं सौंदर्य होतं.सितारा मला माझ्या नसलेल्या सख्ख्या धाकट्या बहिणीसारखी वाटू लागली.
सरांच्या घरी माझं येणंजाणं सुरू झालं. भिंतीवर गतकाळाची सुंदर छायाचित्रे, काचेवर सिताराने स्वहस्ते केलेलं रंगीत नक्षीकाम .. सर्वत्र संपन्न अभिरुचीच्या खुणा. सर आणि सिताराही माझ्या घरी येऊन गेले.माझ्या आईशी खूप आत्मीयतेने बोलले. काही वेळा आम्ही तिघे बाहेरही भेटलो, जेवलो.
पण सर झपाट्याने खंगू लागले होते. स्मृती जात होती.अंथरूण पकडलं गेलं होतं. जेवताना ठसके लागत होते.अन्न शरीरात उतरत, पचत नव्हतं.विझत चाललेली गहिरी निळी नजर फक्त शायरीच्या आठवणीने थोडीशी धुगधुगे. सरांची एक जुनी सुंदर दीर्घकविता होती जिच्यात नमाज पढणाऱ्या त्यांच्या धाकट्या बहिणीचं वर्णन होतं. माथा झुकवून प्रार्थना करणारी ती जणू कोणी हूर ( अप्सरा ) असावी अशा अर्थाची.तिच्या ओळीच्या ओळी सर याही अवस्थेत उत्साहाने उद्धृत करत, तेव्हा जगावर रुसून सर्व बोलणे चालणे सोडलेल्या माझ्या वडिलांना संघाच्या प्रार्थनांनी फक्त चेतना येत होती त्याची मला आठवण यायची. किती विभिन्नतेत एकरूप असतात माणसं !
सिताराच्या भारतातील फेऱ्या वाढत चालल्या.काळजीने तिची घालमेल होत होती. काहीही केल्या ती वडिलांच्या वार्धक्याला पुरी पडत नव्हती. नोकरचाकर उद्दाम होत चालले होते. घर त्यांच्या हातात असे. सितारा आली की दोन-तीन महिने नाटके चालत.तिची पाठ वळल्यावर सर त्यांच्याच ताब्यात असत. त्यांचे अर्थव्यवहार, आरोग्यचाचण्या ती शक्य तितके रांगेला लावायचा प्रयत्न करत होती. एकाकी लढा एका तरुण स्त्रीचा..एका लाडक्या लेकीचा, म्हातारपणी मूल झालेल्या बापासाठी.हे सगळं बघताना मला गलबलत होतं.
यावेळी सरांची अवस्था अशी होती की सिताराची रजा संपून गेली तरी तिचा पाय निघेना . तिने नोकरी सोडून दिली ! वेबसाईटस वगैरे बनवण्याचं तिचं काम होतं. शक्य तितकं तिने घरून काम करून ते रेटलं होतं.आता ती उलघाल तिने संपवली.

स्वत:च्या घराची आघाडी ती कशीबशी सांभाळत होती ! नवरा, सासू-सासरे परदेशी. मूल अजून तरी झालेलं नव्हतं . ते समजून घेत होते. पण अशा परिस्थितीत सर्वांच्याच सहनशीलतेचा अंत पाहिला जातो.सितारा जणू तारेवरची कसरत करत होती. सर अत्यवस्थ झाले. एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं.ते कोमातच होते.सितारा त्यांच्या उशापायथ्याशी. चिंता अनेक.हॉस्पिटलची बिलं,नसलेलं मनुष्यबळ , जिवापाड प्रेम करणाऱ्या पित्याचं ते असहाय रूप .मग अकाली हे जग सोडून गेलेल्या आईची आठवण.भावाच्या वागण्याचं दु:ख.

मी जमेल तसं घरी, हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला जात होते.त्या रात्री ती अगदी थकलेली होती.तरीही कोमात असलेया वडिलांशी प्रेमाने बोलत होती. त्याना काही ना काही सांगत होती. ते ऐकत असतील अशी तिची श्रद्धा होती. भेटायला आलेली एक वडीलधारी स्त्री कुराणातले उतारे म्हणत होती.
मला म्हणाली,’’ माझ्या वडिलांसाठी प्रार्थना कर.’’ उशिरापर्यंत मी तिच्याबरोबर बसून राहिले. कुणी नातेवाईक वगैरे भेटून जात होते. सरांचे कॉलेजमधील सहकारी, विद्यार्थी फोनवर चौकशी करत होते.

मी कुठेच मंदिरात वगैरे जात नाही.कुठे जायचं असतं ! कुठेही जाणं प्रतीकात्मकच असतं.ही आपलीच आंतरयात्रा. पण त्या रात्री कुठेतरी जावंसं वाटलं.

त्या रात्री थेट घरी न जाता आधी माझ्याच इमारतीतील एका शेजारयांकडे एका संत-अवलियाची पूजा वगैरे चालते, तिथे जाऊन हात जोडले.सरांना या सर्वातून सोडवण्यासाठी प्रार्थना केली.

योगायोग असेल किंवा त्या महात्म्याने ती प्रार्थना खरंच ऐकली असेल, सकाळीच सिताराचा फोन आला. तिचे वडील तिच्या आईच्या भेटीला हे जग सोडून निघून गेले होते.

‘’ आता मला मृत्यू परका कसा वाटेल ? जिथे माझे आई-वडील आहेत ती जागा वाईट कशी असेल ?’’ सितारा चा प्रश्न.

किती खरं होतं ते ! एका उदास प्रसन्नतेने सिताराने माझा निरोप घेतला.तिचं कर्तव्य पूर्ण करून घेतलं होतं अल्लाहने तिच्याकडून.
गेली दोन-तीन वर्षे चाललेली मनाची कुरतड शांत झाली होती.पण माहेर संपलं होतं !
भारत हे तिचं माहेर होतं.तिला भारताचा अत्यंत अभिमान होता. इतक्या वर्षात तिने भारतीय नागरिकत्व सोडलं नव्हतं.
माझ्या अनेक संकल्पना- समजुतींना धक्का देत सिताराने मलाही मुक्त केलं होतं माझ्या पूर्वग्रहांपासून.माझा निरोप घेण्याआधी..

-भारती बिर्जे-डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता मला मृत्यू परका कसा वाटेल ? जिथे माझे आई-वडील आहेत ती जागा वाईट कशी असेल ?’’ >>>>>>>> क्या बात है, सुभान अल्लाह.. खूप आवडला लेख, सुंदर शैली Happy

फार सुंदर लेख.
मनातल्या आतल्या गाठी उकलणे ही एक नितांतसुंदर प्रोसेस असते.(प्रक्रिया शब्द इथे समर्पक वाटला नाही म्हणून प्रोसेस.)

हा लेख दिसला नाही मला ललितात Uhoh
किती ओघवतं आणि तरल! सितारा डोळ्यासमोर उभी केलीस! तुझ्या बरोबर ते सगळं आम्ही पण अनुभवलं! हॅरी पॉटर मधे दाखवलेल्या स्म्रुतीयंत्रात जसं आथवणी प्रत्यक्ष जगल्याचा भास तसंच झालं हे वाचताना!

काही नाती अनमोल असतात , आठवणी आणि अनुभवही>>>.खरय भारती , तुमच्या या विधानाशी अगदी सहमत आणि एखाद्याच भाग्यवंताला अशा नात्याला वेळ येताच मदतीचा हात देता येतो तर काही जणांना परिस्थितीच्या कचाटयात सापडल्याने प्राक्तनप्रवाहात नाईलाजास्तव वहावे लागते..... तुमचा हा लेख आजवर तीनदा वाचला तिन्हीवेळा लेखन वाचल्यावर प्रतिसाद देण्याऐवजी माझ्या विचारान्चे गलबत वेगळ्याच दिशेला भरकटत गेले कधी काळी गवसलेल्या मैत्र बेटाकडे.....फारच भावला लेख शब्दांत सांगायलाच हवे का? ..

हे आज वाचताना यात आणखी एक तपशील द्यावासा वाटला, या लेखात उल्लेखिलेले संत म्हणजे दाणोलीचे साटम महाराज.. तेव्हा आमच्या इमारतीतील वायंगणकर कुटुंबात त्यांच्या मूर्तीची खूप पूजा- अर्चा चाले..

Pages