यंदाही नाहीच जमलं हो!

Submitted by मयुरा on 30 July, 2015 - 05:25

नाहीच जाऊ शकले मी यंदाही वारीला. मानभावीपणे रस्त्यात भेटलेल्या दिंडीला नमस्कार केला आणि वारीबरोबर एकही पाऊल न चालता फुकटचं पुण्य पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न मात्र तेवढा आठवणीने केला. वारीला न जाऊ शकण्याची कारणं नेहेमीचीच. सुट्टीच नाही....महिनाभर रजा कशी मिळणार...महिनाभर जायचं तर घरी कसं होणार...कोण करणार...मागच्याही वर्षी हीच कारणं होती आणि याही वर्षी त्यातील एकही कारण वेगळं नव्हतं. ही कारणं खरीच होती. पण तरीही त्यावर मात करत वारीची अनुभूती घेणं अशक्य नव्हतं. पण सदोदीत कारणं सांगायची सवय जडलीय बहुधा आपल्याला. कामं टाळायची असली की कारणंही सापडतात म्हणा. मला एक प्रश्‍न पडला, वर्षानुवर्षे कसं जमतं वारकर्‍यांना नित्यनेमाने वारीला जायला? एकवेळ श्‍वास घेणं पुढे मागे होईल पण वारकर्‍यांची वारी चुकणार नाही. शहरी तोंडवळ्याला सरावलेलं कोणीतरी परवा सहज म्हणालं, काय करणार, आपल्यामागे वेळापत्रक लागलंय ना! वारीत बहुतेक शेतकरी. त्यांचं बरंय. ना पंचिंगची गडबड ना रजेच्या अर्जाची कटकट. पण दोस्तांनो, वारकर्‍यांना आणि शेतीला वेळापत्रक नसतं असं वाटलं तरी कसं आपल्याला? एकवेळ आपण कारणं सांगून रजा घेऊ शकतो. पण शेतीच्या कामात एकही सुट्टी घेता येत नाही त्यांना. सारं कसं ठरल्या आणि नेमक्या वेळी पार पडलं तर हाताशी पीक येण्याची शक्यता असते. पाऊस कितीही बदडत असो..वारा कसाही सुसाटत असो..शेतात जावंच लागतं. मान आणि कंबर मोडेस्तो काम करावंच लागतं. तब्येत बिघडली तरी शेतीकाम चुकत नाही. निंदणी..खुरपणी...आवणी...लावणी...पेरणी...ही नावं तरी ऐकली आहेत का? त्याचे नेमके अर्थ तरी माहिती आहेत का? त्यात भर पडते पावसाच्या लहरीपणाची. आधी ओढ देतो आणि नेमका वारीच्या काळात पडतो. तरीही त्यांची वारी चुकत नाही. दोस्तांनो, वारकर्‍यांनाही सोपं नसतंच दिंडीला जाण्याची तयारी करणं. पण तरीही ते जातात. महिनाभर घर पांडुरंगाच्या भरवशावर सोपवतात आणि सरळ निघतात पंढरीच्या दिशेने..पांडुरंग हरी..विठ्ठल हरी..म्हणत. आता सारं काी माउलीच्या हाती... असं म्हणत घरटी एकतरी माणूस हातात टाळ आणि चिपळ्या घेतो. पाऊस असो व नसो..शेतीची कामं उरकलेली असो व नसो..दुष्काळ असो की भरमसाठ पाणी..एकदा वारीला जायचं ठरलं की त्यांना कोणीच अडवू शकत नाही. अगदी प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा. वीस-पंचवीस दिवस चालणं सोपं नसतं. रोज किमान वीस किलोमीटर चालावं लागतं. वेळापत्रकंही वेगळं असतं. रात्री तीनला उठून चालायला सुरुवात करावी लागते. कपडे सुकत नाहीत. झोप नीट होत नाही. नाश्ता..सकाळचा चहा असले लाड नसतात. झोपायला बारा तरी वाजतात. आपलं सारं काही, आपल्यालाच बघावं लागतं. तरीही प्रतेकाच्या चेहर्‍यावर ङ्गमाऊलीचंफ दर्शन होतं. दोस्तांनो, गैरसमज करुन घेऊ नका. तुलना करायचा हा प्रयत्न नाहीच मुळी. कितीही अडचणी आल्या तरी वारीचा नेम पाळायचं बळ येतं कुठून हे शोधायचा हा प्रयत्न आहे. आपण रोज ठरवतो चार किमी चालायचंच. पण दुसर्‍याच दिवशी हा नेम बारगळतो. आता अजिबात बाहेरचं खायचं नाही असं म्हणणार्‍यांची पावलं संध्याकाळी हमखास खाऊ गल्लीत वळतात. असाच पंचनामा कितीतरी नियमांचा करता येईल. पण वारकरी मात्र सारं काही विठ्ठलाच्या भरवशावर सोपवून निघतात. मग त्या विठ्ठलाचाही नाईलाज होतो. वारकरी पंढरीच्या दिशेने आणि विठोबा वारकर्‍यांच्या दिशेने निघतात. कधी तो वारकर्‍यांसाठी पाऊस होऊन बरसतो. कधी तो शेतातील पीक होतो. कधी बाजारभावाचे रुप घेतो. वारीमार्गात कुठेतरी वारकर्‍यांची आणि विठ्ठलाची उराउरी भेट होते. त्यावेळी त्याचे रुप बहुधा माणसाचेच असते. मग दोघे मिळून पंढरीला जातात. असं म्हणतात, कोणत्याही एकादशीला विठू राऊळी नसतोच मुळी. तो चंद्रभागेच्या वाळवंटी संत गोळा होतात, त्यांच्या सेवेत मग्न असतो. त्यांच्याबरोबर भजनीकिर्तनी रंगलेला असतो. वारकर्‍यांच्या नितांत श्रद्धेला त्याला जागावंच लागतं. ही अनुभूती घ्यायची तर एकदा तरी वारीला जायला हवं. पण हे जमणार कसं? काही जण टप्प्याटप्प्याने वारी करतात. प्रत्येक वर्षी वारीचा एक टप्पा पूर्ण करतात आणि परत येतात. पुढच्या वर्षी त्याच्या पुढचा टप्पा करतात. असं करत करत राउळाच्या कळसाचं दर्शन घेतात. पुढच्या वर्षी असं तरी काहीतरी करायला हवं. पंढरीचे वारकरी नाही होता आलं तरी आपल्याला आरोग्याची वारकरी होण्याची वेळ मात्र नक्की आली आहे. प्रयत्नांती आरोग्याची पंढरी गाठणं आपल्याला शक्य आहे. त्यासाठी जे काही ठरवू त्यावर श्रद्धा ठेवण्याची गरज आहे. कसोशीने नियमांचं पालन करणं ठरवलं तर आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. आरोग्याचे वारकरी होणं कठीण आहे पण अशक्य नाही. त्या दिशेने पहिलं पाऊल उचला तर खरं..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहीलयं छान. पण प्रत्येकाचे प्रांत वेगळे असतात.

त्यांना जमणार आहे का ८.३८ च्या फास्ट ट्रेन मध्ये चढायला ?

आधी प्रपंच करावा नेटका हे ही खरे आहे.